महाराष्ट्रात लाचखोरीच्या खटल्यात दोषसिद्धी कशी वाढवता येईल?
महाराष्ट्रामध्ये लाचखोरीच्या प्रकरणांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये, गुन्हा सिद्ध होऊन संबंधित आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. लाचखोरी प्रकरणात करण्यात आलेल्या एकूण गुन्ह्यांपैकी ९० टक्के प्रकरणांमध्ये आरोपी सहीसलामत सुटत आहेत. मात्र यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांचे हनन होत आहे. त्याचप्रमाणे सरकारी यंत्रणांच्या साधनांचा आणि वेळेचाही यामुळे अपव्यय होत आहे. संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात लाचखोरी किंवा भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, हे गुन्हे सिद्ध होऊन दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाण अजिबातच समाधानकारक नाही. हे प्रमाण वाढण्यासाठी आणि खऱ्या गुन्हेगारांवर आरोप सिद्ध होऊन त्यांना तातडीने शिक्षा होण्यासाठी, केवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागामधील अधिकारीच नव्हे तर लोकशाही मूल्यांची बुज ठेवून मानवी हक्काचे संरक्षण करण्यात स्वारस्य असलेल्या फौजदारी न्यायव्यवस्थेतील सर्व घटकांनीही भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याबाबत गांभीर्य दाखविणे आवश्यक आहे.
भ्रष्टाचाराविरोधात गुन्हे सिद्ध होऊन शिक्षा होण्याच्या प्रमाणाबाबत महाराष्ट्राशी इतर राज्यांशी तुलना करायची झाल्यास गुजरातमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुन्हे सिद्ध होऊन शिक्षा होण्याचे प्रमाण ४० टक्के एवढे आहे. केवळ गुजरातच नव्हे तर देशातील अन्य अनेक राज्यांत महाराष्ट्राच्या तुलनेत भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रासमोरील ही समस्या सोडविण्यासाठी काही उपायांवर आपण चर्चा करणार आहोत. तक्रारदार, साक्षीदार, तपास अधिकारी, न्यायवैद्यक तपास अधिकारी, सरकारी वकील आणि न्याय पालिकेतील अधिकारी यांसारख्या भ्रष्टाचाराशी संबंधित खटल्यातील विविध घटकांवर प्रभावीपणे काम करणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे विभागीय चौकशीच्या माध्यमातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागातही अंतर्गत सुधारणेसाठी विविध पावले उचलणे आवश्यक आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संचालक पदाच्या माझ्या कार्यकाळातील अनुभवाच्या आधारे काही सुधारणाविषयक मुद्दे प्रामुख्याने मांडावेसे वाटतात.
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक पद रिक्त ठेवता कामा नये. तेथे योग्य व्यक्तीची तातडीने नेमणूक करणे अत्यावश्यक आहे. कारण महासंचालक नसल्यास या संपूर्ण विभागातील यंत्रणेच्या मानसिकतेवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. मागील दीड वर्षांहून अधिक काळ हे पद रिक्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुख्य सचिवांनी विभाग प्रमुखांबरोबर नियमित बैठका घेऊन भ्रष्टाचाराबाबतच्या खटल्यांमध्ये आवश्यक असणाऱ्या मंजुरी सक्षम अधिकाऱ्याने तत्काळ दिल्या आहेत ह्याची खात्री करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आरोपींचे निलंबनही केले गेले पाहिजे. यासाठी नियमितपणे आढावा बैठक घेणे आवश्यक आहे. तसेच, ज्या पीठासमोर अथवा विशेष न्यायाधीशांसमोर भ्रष्टाचार प्रकरणातील खटल्यांची सुनावणी सुरू आहे, त्या न्यायाधीशांनी प्रत्येक महिन्याला किमान पाच खटले तरी निकाली काढणे आवश्यक असल्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. परंतु त्याप्रमाणे क्वचितच कारवाई होताना दिसते. ह्या प्राथमिक सुधारणांसह पुढील काही मुद्दे देखील लक्षात घ्यायला हवेत.
तक्रारदार
संशयित भ्रष्ट अधिकाऱ्यांना अथवा अन्य कर्मचाऱ्यांना सापळा रचून त्यांचा भांडाफोड केल्यानंतर, तक्रारदारांना कायम एका गोष्टीची चिंता सतावत असते आणि ती म्हणजे सरकारी कार्यालयातील त्यांचे काम आता आडून राहणार. यावर तोडगा म्हणजे, संबंधित प्रकरणाची तपासणी करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने तक्रारदाराचे सरकार दरबारी असणारे काम पूर्ण होईल याकडे स्वतः लक्ष देणे अथवा संबंधित विभाग प्रमुखांना लिखित स्वरूपात तक्रारदाराचे काम पूर्ण करण्याबद्दल सूचना करणे. यामुळे तक्रारदार आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील लोकांच्या मनातही आत्मविश्वास निर्माण होईल. दुसरी गोष्ट म्हणजे तक्रारदारावर गुन्हेगार अथवा त्यांच्या साथीदारांकडून कोणताही दबाव येणार नाही याची काळजी घेणे, यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचे मनोबल वाढविण्यासाठी आणि त्याला धीर देण्यासाठी वारंवार त्याच्याशी संवाद साधला पाहिजे. त्याचप्रमाणे संबंधित खटला न्यायालयात दाखल होईपर्यंत तक्रारदाराला कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायालयात खटला सुरू होण्यापूर्वी तक्रारदाराला घडलेल्या घटना पूर्णपणे आठवत आहेत की नाही, याची चाचपणी करून घेणे
आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नेमके काय घडले आहे, संबंधित अधिकाऱ्याला अथवा कर्मचाऱ्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात पूर्वी त्या अधिकाऱ्याकडून अथवा कर्मचाऱ्यांकडून कशा पद्धतीने भ्रष्टाचार सुरू होता, या सर्वांची उजळणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच सापळा रचताना घडलेल्या घटना तक्रारदाराला व्यवस्थित आठवत आहेत की नाही याची खातरजमा करून घेणेही अत्यंत आवश्यक आहे.
साक्षीदार
अशा प्रकरणांतील साक्षीदार हे सर्व सरकारी कर्मचारी असतात. सापळा रचताना जेव्हा त्यांना सहभागी करून घेण्यात येते तेव्हा त्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असणे अपेक्षित आहे. एखाद्या प्रकरणांमध्ये अशा कोणा अधिकाऱ्यांनी शत्रुत्व घेण्याचा प्रयत्न केला असता त्या अधिकाऱ्याच्या विभाग प्रमुखांना त्याच्या विरोधात कारवाई करण्याबाबत सूचना देणे आवश्यक आहे.
तपास अधिकारी
तपास अधिकाऱ्याला प्रारंभी आणि नंतरदेखील वरचेवर, तक्रारी समजून घेणे आणि त्यापुढील प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते, तसेच कारवाईसाठी आणि सापळा रचण्यासाठी नवनवीन उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने केला जाऊ शकतो याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. बहुतांश वेळा असे होते की, एखादे प्रकरण न्यायालयात दाखल होऊन त्यावर सुनावणी सुरू झाली असता संबंधित प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याची बदली झालेली असते. अशा परिस्थितीत संबंधित अधिकाऱ्याला खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात हजर राहण्यासाठी दुसऱ्या विभागातून परवानगी मिळणे आणि संबंधित अधिकाऱ्याने सुनावणी दरम्यान वेळोवेळी हजर राहणेही आवश्यक आहे.
न्याय वैद्यक अधिकारी
पुराव्यांबाबत तज्ञांचे मत घेणे, विशेषतः आवाजाच्या नमुन्याबाबत न्यायवैद्यक अधिकाऱ्याचे मत घेणे अत्यंत आवश्यक आहे. यात कोणताही हलगर्जीपणा अथवा उशीर झाला तर त्याचा संबंधित खटल्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. यासाठी प्रशिक्षित कर्मचारी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी नेमणूक करण्यात आलेले कर्मचारी नियमित तत्त्वावर कामावर घ्यायला हवेत. कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी योग्य वेळी उपलब्ध होतीलच असे नाही.
मंजुरी देणारे अधिकारी
मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडे जेव्हा तपासाचा अहवाल सुपूर्द करण्यात येतो तेव्हा, संबंधित प्रकरणात प्रथमदर्शी पुरावा आहेना हे पाहणे एवढेच अपेक्षित आहे. संबंधित प्रकरणांची कायदेशीर छाननी न्याय पालिकेतील अधिकाऱी सविस्तर करणारा असतात. खरे तर खटले चालवण्याबाबतची मंजुरी दोन महिन्यांच्या आत देणे आवश्यक आहे. यांपैकी अनेक अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न्यायालयात साक्ष देतात. या व्हिडिओची गुणवत्ता बरेचदा चांगली नसल्याने त्याचा परिणाम संबंधित खटल्यावर होतो, त्या दृष्टीने सुधारणा करणे देखील आवश्यक आहे.
सरकारी वकील
गुन्हा सिद्ध होण्यामध्ये आणखी एक मोठा अडथळा म्हणजे सरकारी वकिलांची उदासीनता. ही समस्या सोडविण्यासाठी दर सहा महिन्यांनी सरकारी वकिलांना प्रशिक्षण देणे, त्यांना नव-नवे तंत्रज्ञान अवगत करून देणे आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याबाबत प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तसेच महत्वाच्या खटल्यांमधे नाणावलेल्या अभियोक्त्यांची नेमणूक करणे गरजेचे आहे.
न्यायपालिका : जरी माननीय उच्च न्यायालयाने अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांना लाचलुचपत प्रकरणांच्या खटल्यांसाठी विशेष न्यायाधीश घोषित करून त्यांना किमान पाच खटल्यांचा निपटारा करण्याबाबत सूचना दिल्या असल्या तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. याचा परिणाम म्हणजे खटले निकाली लागण्यास वेळ लागत आहे. त्याचप्रमाणे, अशा प्रकारच्या खटल्यामध्ये उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या निकालांचे व्यवस्थित आकलन होण्यासाठी जिल्हास्तरावरील न्यायपालिकेतील अधिकाऱ्यांसाठी वरचेवर प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करणेही आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानातील नवे-नवे बदलदेखील त्यांना समजावून देणे आणि त्याचा वापर करण्यास शिकवणे आवश्यक आहे. काही प्रकरणांत न्यायालयातील अधिकारीही आरोपींना संशयाचा फायदा देऊन निर्दोष सोडत असल्याचे निदर्शनास येते, अशा परिस्थितीमध्ये ही बाब उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या लक्षात आणून देणे आवश्यक आहे. यासाठी दर महिन्याला संचालकांनी त्यांच्या बरोबर बैठका घेणे आवश्यक आहे.
आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाचखोर अधिकाऱ्याला पकडण्यासाठी सापळा रचल्यानंतर, संबंधित विभागात प्रशासकीय यंत्रणेत ज्या त्रुटी आढळलेल्या आहेत. त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच एखादा कर्मचारी दोषी सिद्ध झाल्यानंतर त्याला खात्यातून बडतर्फ का करू नये ही विचारणा करून त्याच्यावर तातडीने पुढील कारवाई करणे आवश्यक आहे.
यात अजून एक उपक्रम राबवता येईल तो म्हणजे, प्रत्येक प्रकरणांची प्रथमिक स्तरावर छाननी करताना संबंधित जिल्ह्यातील जवळच्या विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेता येऊ शकेल. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात संबंधित खटल्यातील त्रुटी दूर होण्यास अधिक मदत होईल.
या सर्व उपायांची अंमलबजावणी केल्यास आणि त्यांचे पालन नीट होत आहे की नाही याकडे वरिष्ठ पातळीवरून लक्ष दिल्यास गुन्हा सिद्ध होण्याच्या प्रमाणात नक्कीच वाढ होईल. या सर्व उपायांची अंमलबजावणी तातडीने व्हावी आणि लाचलुचपत प्रकरणांत गुन्हे नोंदविण्यात अग्रेसर असलेला महाराष्ट्र गुन्हे सिद्ध होण्याच्या प्रमाणातही अग्रस्थानी जावा हीच इच्छा.
