Author:

Praveen Dixit

Articles

Birthday Greetings!

By on July 28, 2023

Greetings from Hon PM Narendrabhai Modi on the occasion of my birthday

 

प्रविण दीक्षित सर

पोलिस विभागात जे काही अतिदक्ष अधिकारी मी बघितले त्यात प्रविण दीक्षित सर यांना बराच अग्रक्रम द्यावा लागेल. सहसा सकाळी दहा ते संध्याकाळी सहा असा दैनंदिन कामाचा दिनक्रम असतो. पोलीस विभागात मात्र वेळेची मर्यादा नसते हे जरी खरे असले तरी सकाळपासून रात्री दहापर्यंत काम चालते. पण दीक्षित सर मात्र रात्रीही अगदी दक्ष असायचे. वायरलेस वर रात्रीही सावध राहून लक्ष ठेऊन असायचे. कधीही वायरलेस वर सतर्क राहून लगेच आदेश व सूचना द्यायचे.
आपण फोन केला आणि सरांचा फोन व्यस्त असला तर सर स्वतः परत फोन लावायचे आणि
‘ काय होते ‘
असे विचारुन माहिती घ्यायचे.

इतक्या मोठ्या पदावर असूनही एकदम साधी राहणी. ना पदाचा गर्व ना अभिमान. त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी फक्त एक दिवस सुट्टी घेऊन लगेच परत आले.
‘ शासनाने आपल्याकडे जबाबदारी दिली आहे तर ती योग्यप्रकारे पार पाडायला हवी ‘
असे ते म्हणायचे.

नागपुर येथे पोलीस आयुक्त असताना प्रविण दीक्षित सर यांनी केलेल्या कामाची आजही नेहमी आठवण निघत असते. नागपूर शहरात वाहतुकीला शिस्त लावायची महत्वाची कामगिरी सरांच्या कार्यकाळात पूर्णत्वास आली होती. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या विरुद्ध च्या केसेस ही सरांच्या काळात मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या होत्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा नागपूर शहर पोलीस दलात वापर ही त्यांच्याच कार्यकाळात सुरू झाला होता.
एक अत्यंत शिस्तप्रिय व अभ्यासू अधिकारी अशी प्रविण दीक्षित सर यांची ख्याती आहे.
आपल्या सोबतच्या पोलीस अधिकारी यांचेकडून अजानता काही चूक झाली तर खंबीरपणे त्या अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे राहायचे व प्रसंगी ‘ वाटल्यास माझी बदली करा ‘ असा गंभीर पवित्रा ते घ्यायचे.

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक असताना प्रविण दीक्षित सर यांनी विनंतीवरून पोलीस अधिकाऱ्यांच्या दर दोन महिन्यांनी बदल्या करून न्याय दिला होता. आत्ता अडचण आहे तर वर्षाने बदली करून काय उपयोग असा पवित्रा सरांनी घेतला होता.

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक या महत्वाच्या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर आरामात जगायचे असा सरांनी विचार केला नाही. विविध सामाजिक कार्यात स्वतः ला गुंतवून ठेवले आहे. त्यांचे पोलीस विषयावरील वैचारिक लेख नेहमी प्रसिद्ध होत असतात. आजही त्यांचे मोलाचे मार्गदर्शन पोलीस विभागाला मिळत असते.

कर्तव्यदक्ष, अभ्यासू, शिस्तप्रिय प्रविण दीक्षित सर यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली हे खरोखर माझे भाग्य म्हणावे लागेल.

तर अश्या प्रविण दीक्षित सर यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व उदंड, निरामय आयुष्य लाभून मनोवांछित इच्छा सफल होवोत हीच विधात्याचरणी प्रार्थना.

संजय भिकाजी पांडे
पोलीस उपअधीक्षक ( नि.)
नागपूर

 

आज मित्रवर्य निवृत्त पोलीस महासंचालक श्री. प्रवीण दीक्षित यांचा वाढदिवस ..
त्याच्या कारकीर्दीत पोलीस खात्यात एक नवी ऊर्जा निर्माण करण्याचे … नक्षलवादी चळवळ ठेचून काढण्याचे .. अॅन्टी करप्शन मधून राजकीय कृपा छत्र लाभलेले बाहुबळी पुढारी ना स्थानबध्द करण्याचे.. गुन्हेगारास शिक्षा होण्याच्या टक्केवारी त लक्षणीय वाढ करण्याचे .. “प्रतिसाद” (ASK ) सारखे महिला सुरक्षा अप ची अंमलबजावणी करण्याचे .. जनतेला पोलीस मित्र बनवून त्याचे सहकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी केलेले कार्य खूपच प्रभावी व प्रशंसनीय आहे ..

महाराष्ट्र शासनाने त्यांची MAT चे सदस्य पदी नियुक्त केले .. तिथेही कामाची छाप पाडली 🙏🏼

पुणे सार्वजनिक सभा स्थापना 1870 कडून त्यांना सार्वजनिक काका पुरस्कार प्रदान करण्यात आला.. 🙏🏼

त्यांचे यशाच्या पाठी त्यांच्या सुविद्य पत्नी संस्कृत पंडिता व शैलीदार लेखिका अरुंधती वहिनी चा सुद्धा मोठा हातभार आहे त्यांचे सुद्धा मनःपूर्वक आभार

माझ्या फेसबुक व्हाटस अप
आणि आमच्या फर्ग्युसन च्या सर्व मित्रपरिवारा तर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा ..
……………………….. ………………………………..
सुरेश सोपानराव कालेकर
….. …….

 

 

 

 

 

Articles

दामदुप्पटच्या नावाखाली फसवणुक

By on July 27, 2023

दामदुप्पटच्या नावाखाली फसवणुक –

प्रवीण दीक्षित.

निवृत्त पोलीस महासंचालक.

आर्थिक गुन्ह्यांमधे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे हे सर्वात जास्त प्रमाणात होतात. ह्या गुन्ह्यांची सर्वसाधारण पद्धत अशी असते की एखादी अपरिचित व्यक्ती महत्त्वाच्या ठिकाणी जागा भाड्याने घेते व जाहिरात करते की तुम्ही जेवढी रक्कम त्याच्या योजनेत गुंतवाल तेवढ्या रकमेवर बँकेतील ठेवलेल्या मुदतीच्या ठेव्यांच्या दरापेक्षा जवळ जवळ दुप्पट दर असेल. त्याशिवाय तुम्हाला घरगुती वापराची महागडी उपकरणे नगण्य किमतीत घरपोच मिळतील. सुरवातीला दोनतीन महिने ही व्यक्ती सांगितल्याप्रमाणे व्याज देते व तुमचा विश्वास संपादन केल्यावर तुमच्यामार्फत अन्य व्यक्तींनाही पैसे गुंतवणुक करण्याचे आवाहन करते. जेवढ्या अधिक व्यक्तींकडून तुम्ही रक्कम आणाल त्यातील काही टक्के तुम्हाला बक्षीस म्हणून दिले जातात. काही व्यक्तींना मिक्सर, मायक्रोवेव्ह, घरगुती वापराचे डबे इत्यादि साहित्यही दिले जाते. आठ ते नऊ महिन्यानंतर दर महिन्याला मिळणारे व्याज मिळेनासे होते. तक्रार केल्यास ठेवी स्वीकारणारी व्यक्ती भेटायला टाळाटाळ करते. फोन स्वीकारत नाही.


वर्षभरात ही व्यक्ती एकदिवस अचानक नाहिशी होते व भाड्याने घेतलेली जागा रिकामी झालेली असते. आर्थिक फसवणुक करणारी व्यक्ती तो पर्यंत परदेशात गेलेली असते व जातांना अनेकांनी ठेवलेल्या मोठमोठ्या रकमा गायब झालेल्या असतात. त्यानंतर आपण फसवले गेलो आहोत हे लक्षात आले की असे लोक पोलीसांकडे तक्रार करतात. तो पर्यंत मधे बराच काळ गेलेला असतो. पोलीसांच्या प्रयत्नांनी फसवणूक करणारी व्यक्ती देशात अथवा देशाबाहेर पकडली गेलीच तरीही लोकांनी ठेवलेल्या रकमा परत मिळणे दुरापास्त होऊन बसते. ही होणारी फसवणूक ponzi schems नावाने प्रसिद्ध आहे.

 

हे फसवणुकीचे प्रकार जास्त करून निवृत्त झालेल्या व्यक्तींचा मोठ्याप्रमाणावर बळी घेतात. कमी वेळात रक्कम दुप्पट होईल, मित्राने, ओळखीच्या माणसाने पैसे ठेवायला सांगितले त्यामुळे विशेष विचारपूस न करता अशा व्यक्ती आयुष्यभराची ठेव त्या माणसाच्या जवळ बिनधास्तपणे देत असतात. जेवढे आर्थिक मागासपण जास्त तेवढे तेथील व्यक्तींना फसवण्यात ह्या अपराधी व्यक्ती तरबेज असतात.

 

अशा प्रकारे एकाचवेळी अनेक जिल्ह्यात, अनेक राज्यात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे वारंवार उघडकीस येत असल्याने प्रत्येक पोलीस आयुक्तालयात आर्थिक गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एक पोलीस उपायुक्त नेमलेला आहे. फार मोठ्या रकमेची अफरातफर असेल तर त्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍याकडे आर्थिक गुन्ह्याच्या तपासाचे काम दिले आहे. अपराधी व्यक्ती पकडल्यानंतर त्याच्याकडील रकमेतून त्याने काही स्थावर मालमत्ता केली असल्यास ती जप्त करून येणार्‍या पैशातून पीडित व्यक्तींना ही रक्कम परत देण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या व्यक्तीची नेमणुक केलेली आहे. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमधे न्यालयाकडून शिक्षा होण्यापेक्षा पीडित व्यक्तीस गेलेली रक्कम परत मिळणे जास्त महत्त्वाचे असते.

 

शासनातर्फे जरी वरी व्यवस्था राबवलेली असली तरीही कष्टाने मिळवलेले पैसे अशाप्रकारे दामदुप्पट करण्याच्या मिषाने किंवा अन्य कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता त्यापासून दूर राहणे हे शहाणपणाचे आहे. भारत सरकारतर्फे व रिझर्व बँकेनेही अशा अपराधी व्यक्तींविरुद्ध कडक तरतुदी केल्या आहेत. परंतु तरीही अशा प्रकारे फसवणारे व त्यांच्या भूलथापांना बळी पडणारे लोक ठिकठिकाणी वारंवार नजरेस येत असतात. आर्थिक सुशिक्षितता, सावधानता बाळगून, शासनमान्य शेड्यल्ड बँका, शेअरमार्केट, म्युचुअल फंड ह्याठिकाणी रक्कम गुंतवणेच योग्य आहे. अथवा पैसे गेल्याचे दुःख करण्यापलीकडे हातात काही उरत नाही.

————————————-

Articles

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ

By on July 22, 2023

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ
राष्ट्रीय रौप्य महोत्सवी परिषद
12-13/11/2022 वडोदरा

प्रवीण दीक्षित
माजी पोलीस माहासंचालक, महाराष्ट्र

अखिल देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ मुंबई व वडोदरा
यांच्या संयुक्त विद्यमाने आज ही राष्ट्रीय रौप्य महोत्सवी परिषद सम्पन्न होत
आहे; त्यासाठी सर्व आयोजकांचे हार्दिक अभिनंदन. आजच्या ह्या परिषदेत माझी
सुविद्य पत्नी व मी आम्हाला ह्या परिषदेत उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध
करून दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो व उत्कृष्ट नियोजनाबद्दल
सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो.

स्वातंत्र्यपूर्वकाळामधे आपल्या समाजातील अनेक नामवंत व्यक्तींनी
राजकीय, आर्थिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांमधे बहुमोल कामगिरी करून,
केवळ आपल्या जातीबांधवांनाच नव्हे तर जातीची बंधने ओलांडून देशातील सर्व
समाजाला फार मोठे मार्गदर्शन केले होते. दुर्देवाने गांधीहत्येनंतर विनाकारण
ब्राह्मण समाजातील शेकडो कुटुंबांना आपल्या घराची व सम्पत्तीची राखरांगोळी
होतांना पहावे लागले; त्यामुळे प्रसिद्ध कादंबरीकार व आनंदीगोपाळचे लेखक श्री.
ज. जोशी ह्यांनी म्हटल्याप्रमाणे सर्व ब्राह्मण समाज हा स्वयंकेंद्री झाला व
त्याने अन्य समाजातील लोकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे सोडून दिले. ह्याचा
परिणाम म्हणून समाजातील हजारो तरूण तरूणी देश सोडून इतर राष्ट्रांमधे गेले
व तिथे त्यांनी स्वतःचे अत्युच्च यशाचे शिखर पादाक्रांत केले. ब्राह्मणांवरील
शारीरिक हल्ले जरी आता फारसे होत नसले तरीही त्यांना नावे ठेवायचे,

शाब्दिक टोमणे मारायचे आणि विनाकारण त्यांची निंदानालस्ती करायची हा
स्वतःला नेते म्हणविणार्‍या अनेक व्यक्तींचा गेली अनेक दशके लाडका उद्योग
आहे. अन्य वर्णीयांना सतत ब्राह्मणांविरुद्ध खरे खोटे सांगत राहून ब्राह्मणांनी
आमच्यावर अत्याचार केले अशी आवई कोणत्याही पुराव्यांशिवाय उठवत राहणे
ह्याच्यामधेच त्यांना आनंद मिळत असतो. दुर्दैवाने ह्यामागे भारत तोडो हा
परकीय शक्तींचा कुटिल डाव आहे व त्याला काही लोक बळी पडत आहेत.
परंतु ह्या सतत होणार्‍या उपेक्षेने किंवा ब्राह्मणांना होणार्‍या सर्व
प्रकारच्या विरोधाला किंवा पारंपारिक व्यवसायाला खीळ बसल्याने प्रचंड गरीबीला
न घाबरता ब्राह्मण समाजाने आपली मूल्यांवरील श्रद्धा ही सतत मनःपूर्वक
जपली आहे. मिळेल त्या विषयाचा सखोल अभ्यास करणे, त्यातही आपली भाषा,
संस्कृती, परंपरा आणि विचार जपणे आणि वाढवत राहणे, कोणतेही काम हे
हलके किंवा निषिद्ध न समजता प्रामाणिकपणे कौशल्याने, सचोटीने करत राहणे
ही ती मूल्ये आहेत. त्यात महिला असोत वा पुरूष; मुले असोत वा वृद्ध,
स्वतःचा स्वाभिमान राखून, एकमेकांना मदत करून परंतु कोणाकडेही तोंड न
वेंगाडता कुठल्याही प्रकारे गुन्हेगारीच्या मार्गाला न जाता, फसवाफसवी न करता
ब्राह्मण समाज वाटचाल करत आला आहे व ती अव्याहत चालू आहे. कोणत्याही
प्रकारे आरक्षणाचा फायदा न घेताही किंवा शिष्यवृत्या न मिळताही
ब्राह्मणसमाजातील अनेक मुले, मुली यांनी मोठमोठ्या पदव्या मिळवल्या आहेत
व ज्ञानसमृद्धी केली आहे. आजही ब्राह्मण समाजातील काही व्यक्ती अत्युच्च
पदी पोचलेल्या असल्या तरी आपले हजारो जातीबांधव हे निम्न मध्यमवर्गीय
ह्या स्तरात मोडतात व त्यांच्यासाठी यशाच्या संधी अजून उपलब्ध व्हायच्या
आहेत. ही मुले मुली आम्हाला मदत करा असे म्हणणार नाहीत तरीही जे
आपल्या व्यवसायात यशस्वी झाले आहेत त्यांनी आपल्या यशाची गुरुकिल्ली
ह्या मुलांसाठी उघड करणे आवश्यक आहे. भारत सरकार तसेच महाराष्ट्र
सरकार ह्यातल्या अनेक विभागांमधे दरवर्षी हजारो व्यक्तींची स्पर्धा परीक्षा
घेऊन भरती केली जाते. ह्या संबंधीची माहिती आज आंतर्जालाच्या मार्फत
सर्वांना आपल्या टिचकीवर उपलब्ध आहे. केवळ भारत सरकारचाच विचार केला

तर, सीमासुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल हया सारख्या सहा केंद्रीय
सशस्त्र पोलिस दलांनी मागील पाच वर्षात दोन लाख लोकांना रोजगार दिला
आहे. ह्या शिवाय येणार्‍या 18 महिन्यात 10 लाख युवकांना रोजगार देण्याचा
मोदी शासनाने निश्चय केला आहे. महाराष्ट्रातही 75 हजार युवकांना लवकरच
रोजगार देणार असल्याचे महाराष्ट्राचे नेते व ब्राह्मण असलेल्या देवेंद्र फडणवीस
ह्यांनी जाहीर केले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही रोजगार व शिक्षण ह्यात
आर्थिक मागास व अन्य कोठलेही आरक्षण नसलेल्या अशा गरिबांसाठी 10%
आरक्षण घटनेस अनुसरून आहे असा ऐतिहासिक निकाल दिला आहे. त्याचा
फायदा घेण्यासाठी युवकांनी पुढे यावे. महाराष्ट्र सरकारने अमृत अर्थात महाराष्ट्र
संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी संस्था हयाला मान्यता दिली आहे. परंतु
अद्याप त्याची कार्यवाही सुरू झाली नाही. ती तातडीने राबविण्याची आवश्यकता
आहे. ह्या संस्थेमार्फत ब्राह्मण समाजासह खुल्या प्रवर्गातील 96 जातींच्या
आार्थिक आणि शैक्षणिक प्रगीसाठी अमृतची स्थापना करण्यात आली आहे. असे
परशुराम सेवा संघचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ देशपांडे ह्यांनी सांगितले आहे.

सनदी सेवांसाठी तरूण विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शनाची `स्वातंत्र्यवीर
सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर’ येथे सर्व प्रकारची तयारी करून घेतली जाते.
आवश्यक त्या विषयांच्या टिप्पणी, प्राथमिक परीक्षा, लेखी परीक्षा, मौखिक
परीक्षा ह्यांची तज्ज्ञांकडू तयारी करून घेतली जाते. महेश कुलकर्णी हे वरील
काम निष्ठेने करीत आहेत. अशाच प्रकारच्या संस्था अन्य अनेक शहरांमधेही
निःशुल्कपणे वर्षानुवर्षे करीत आहेत, व्यवसायातही आज अनेक संधी उपलब्ध
आहेत. त्याचा आपण फायदा घेला पाहिजे.

माझ्या वडिलांची मी शाळेत असतांनाच डोळ्यांनी दिसत नाही ह्या
कारणासाठी नोकरी गेली. पण तरीही शाळेचे शिक्षण मी विशेष प्राविण्याने उत्तीर्ण
झालो. महाविद्यालयात व विश्वविद्यालयात गुणांमुळे नादारी मिळाली व पुणे
विद्यापीठ येथून पदवी, School Of International Studies JNU येथून
पदव्युत्तर अभ्यासक्रम मी पूर्ण केला. भारतीय पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर

रोटरी क्लबतर्फे अमेरिकेतील Duke विद्यापीठातील School of Public Policy
येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाली.

तुम्ही जर प्रामाणिकपणे मन लावून अभ्यास केला असेल तर अनेक
संधी तुम्हाला शोधत येतात व त्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता हे अधोरेखित
करण्यासाठी मी हे उदाहरण सांगत आहे.तरूणांनी मिळणार्‍या प्रत्येक संधीचा
आह्वान समजून स्वीकार करावा. येणार्‍या अडचणींवर मात करावी व
आायुष्यात यशस्वी व्हावे ही माझी व सर्व ब्राह्मण समाजाची कळकळीची इच्छा
आाहे. सर्वांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो.

—————— ——————– ——————-
संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी खालील लिंकला भेट द्यावी-
Day 1 proceedings on Nov 12 ,202
https://youtu.be/5LVQ5aLHRUs
Day 2 proceedings on Nov 13, 2022
https://youtu.be/DjQSSqDgmK0

Articles

परिपक्व राजकारणी

By on July 19, 2023

परिपक्व राजकारणी

प्रवीण दीक्षित

(निवृत्त पोलीस महासंचालक)

एकेकाळी महाराष्ट्रट, प्रशासनाच्या बाबतीत प्रगत राज्य म्हणून ओळखले जात असे. परंतु 2014 पूर्वीच्या दशकात महाराष्ट्रात आघाडीचे शासन सुरू झाले. हया काळात मुख्यमंत्री एका पक्षाचे तर गृहमंत्री दुसर्‍या पक्षाचे; त्यामुळे होणार्‍या निर्णायकी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत नाजुक बनली. जगातील सर्वात भीषण असा दहशतवादी हल्ला मुंबईवर झाला. समुद्रमार्गे दहशतवादी मुंबईत घुसले व त्यांनी तीन दिवस भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा सर्व व्यवहार ठप्प केला. शेकडो निरपराध व्यक्तींचे बळी घेतले. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना ह्या हल्ल्यात हुतात्मा व्हावे लागले. ह्या हल्ल्यानंतर असेच अनेक दहशतवादी हल्ले, शस्रास्त्रांची खुलेपणाने वाहतुक, मादक पदार्थांचा मोठा व्यापार, गुन्हेगारांचे पोलिसांवरील वर्चस्व, कोणत्याही गुन्हेगारांना शिक्षा न होणे हे प्रकार सर्रास सुरू झाले. केंद्राप्रमाणेच राज्यातील भ्रष्टाचार एवढाा वाढला की त्यामधे शासनाचा एकही विभाग, एकही जिल्हा मोकळा राहिला नाही. त्यामुळे सामान्य माणूस जिकीरीला येऊन महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे का? अ‍से वैतागाने विचारू लागला.

ह्या पार्श्वभूमीवर 2014 मधे राज्यात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देवेद्र फडणवीस ह्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली. मुख्यमंत्री होताच फडणवीस ह्यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री ही दोन्ही पदे स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. गृहमंत्री म्हणून त्यांनी जाहीर केले, की पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या व नेमणूका ह्याचे पूर्ण अधिकार महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख असणार्‍या पोलीस महासंचालाकांना देत आहे.  त्यामुळे विविध राजकारण्यांची मदत घेऊन भ्रष्ट पोलीस अधिकारी हव्या त्या ठिकाणी नेमणूक करून घेण्याला खीळ बसली. पोलीस अधिकारी व कर्मचारी ह्यांचे मनोबल वाढण्याला मदत झाली. पोलीस अधिकारी व कर्मचारी ह्यांच्या भरतीत पारदर्शीपणा आणून भ्रष्ट आधिकार्‍यांना व कर्मचारय़ांना पोलीसात पोचायचे दरवाजे बंद झाले.

दहशतवादामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांमधे अपप्रकार रोखण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक CCTV यंत्रणा लावण्याचे अधिकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले. त्यामुळे अवघ्या काही महिन्यातच ह्या सर्व महानगरातील सुरक्षा व्यवस्था बळकट होण्यास मदत झाली. तसेच पोलीसांच्या संरक्षणासाठी बुलेटप्रुफ जॅकेट्स घेण्याचा निर्णय करण्यात आला. ह्यामुळे पोलीस अधिकार्‍यांमधे सुसज्जता आली.

नक्षलवाद्यांच्या कारवाया महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या गडचिरोली, गोंदिया ह्या भागात थैमान घालत होत्या. ह्या जिल्ह्यातील भ्रष्टाचारी राजकारणी, लोकोपयोगी कल्याणकारी योजना वंचित, शोषित, पीडित अशा वनवासी जनतेपर्यंत पोचू देत नव्हते. त्यामुळे नक्षलवाद्यांचा जोर वाढत होता. रस्ते, शिक्षण, आरोग्य, दळणवळण संबधी सर्व योजना ठप्प झाल्या होत्या. पोलिसांकडे प्रभावी शस्त्रांचा अभाव, बॉंम्ब्स पासून संरक्षण देणार्‍या वाहनांचा अभाव, पोलीस अधिकारी व कर्मचारी ह्यांच्या कामात अडथळा आणणार्‍या बाबी दूर करण्यासाठी प्रशासनाचे पूर्णपणे असंवेदनशील धोरण त्यामुळे महाराष्ट्रातून कधी नक्षलवाद संपेल का? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात भर म्हणून शहरी नक्षलवादी, सुशिक्षित अशा प्रतिष्ठित व्यक्तींच्या माध्यमातून ह्या असंतोषात वाढ करीत होते. फडणवीस ह्यांनी गृहमंत्री झाल्यावर पोलीसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पोलीसांना पुरेशी प्रभावी शस्त्रास्त्रे, अन्य सामुग्री व धाडसी प्रशासकीय निर्णय घेतले. त्यामुळे गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 70 ते 75 पोलिस कर्मचारी शहीद होण्याऐवजी 40 नक्षलवादी पोलीसांच्या कारवाईत ठार झाले. अनेक प्रमुख नक्षल नेते धारातीर्थी पडले. इतर अनेक शरण आले. त्याच बरोबर सामान्य जनतेची उपेक्षा संपून तरुणांना रोजगार, व्यावसायिक प्रशिक्षण, आरोग्य सुविधा, शालेय मुलींना सायकली अशी अनेक कामे होऊ लागली; त्यामुळे नक्षल कारवायांना प्रतिबंध होऊन विकासाची कामे होऊ लागली. माओवादाच्या नावाखाली नक्षल व्यक्ती आंबेडकरवादी चळवळीचा गैरवापर करत होते. हा त्यांचा कपटी डाव उलथून पाडण्यात आला.

धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न चालू होते. “भारत तोडो’’ ह्या मोहिमेचाच तो भाग होता. परंतु समाजातील सर्व घटकांच्या न्याय्य मागण्यांबाबत संवेदनशील राहून पंतप्रधान मोदी ह्यांचा “सबका साथ सबका विकास’’ ही घोषणा फडणवीस ह्यांनी प्रत्यक्षात आणली. “पोलीस मित्र’’ ही संकल्पना रुजवून महाराष्ट्रातील सामान्य जनतेला समाजघातक कारवायांविरोधी प्रयत्नांमधे हातभार लावायला फडणवीस ह्यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे महिलांविरुद्ध होणारे गुन्हे, अनुसूचित जाती जमातींवर होणारे अत्याचार ह्यात मोठ्या प्रमाणात घट झाली.

विकासासाठी शहरांची होणारी वाढ लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवीन पोलीस आयुक्तालये सुरू करावीत अशी मागणी बरीच वर्षे  होत होती. ह्याचे गांभीर्य ओळखून मिराभाईंदर तसेच पिंपरी चिंचवड ह्या ठिकाणी नवीन पोलीस आयुक्तालये सुरू करण्यात आली. अतिरिक्त पोलीस महासंचालक ह्यांच्या नेतत्त्वाखाली समाजविरोधी गटांवर कारवाई होऊ लागल्याने त्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था निर्माण होण्यास मदत झाली.

पूर्वी पोलीस अधिकार्‍यांची वार्षिक गुन्हेविरोधी परिषद ही गृहमंत्र्यांच्या उपस्थितीशिवाय पार पडत असे. परंतु केंद्रात पोलीस महासंचालक ह्यांच्या वार्षिक परिषदेस पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याची प्रथा अमलात आली होती. ह्याचे अनुकरण करून महाराष्ट्रातही पोलीस अधिकार्‍यांच्या परिषदेस फडणवीस ह्यांनी पूर्णवेळ उपस्थित राहण्याचे मान्य केले. त्यामुळे ही परिषद म्हणजे औपचारिकता न राहता त्यात दहशतवाद विरोध, नक्षलवाद विरोध, सायबर व आर्थिक सुरक्षा, महिला सुरक्षा अशा अनेक बाबींवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्याचा परिणाम होऊन जनसामान्यांचा शासनावरील विश्वास दृढ झाला.

गुन्हेगारांना न्यायालयाकडून शिक्षा होणे हाच गुन्हेगारीस प्रतिबंध करण्याचा प्रभावी उपाय आहे हे लक्षात घेऊन गुन्हे शाबीत होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी पोलीस तपासात अत्याधुनिक तंत्रज्ञानानाचा वापर करणा्यावर फडणवीस हयांनी भर दिला. CCTNS प्रणााली यशस्वीपणे राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य झाले. न्यायवैद्यक संस्था मजबूत करण्यात आल्या. तुरुंग विभागात तुरुंगातून चालणार्‍या अवैध प्रकारांना प्रतिबंध करण्यात आले.

वरील धाडसी व धडाडीचे निर्णय हे केवळ फडणवीस हे एक परिपक्व राजकारणी असल्यामुळेच शक्य झाले. पोलीस अधिकार्‍यांच्या चांगल्या हेतूने घेतलेल्या निर्णयांमागे फडणवीस खंबीरपणे उभे रहायचे धाडस दाखवत असत. दिवसभर काम करून रात्री दोन वाजे पर्यंत काम करायचे व आलेल्या प्रत्येक संदेशाला त्वरीत उत्तर द्यायचे हा फडणवीस ह्यांच्यातील विशेष गुण आहे. जनसामान्यांचे प्रश्न संवेदनाशीलपणे हाताळणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था उत्तम राखून विकासाला चालना देणार्‍या देवेंद्र फडणवीस ह्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्व शुभेच्छा!

———————————   ——————————