सार्वजनिक लोकोपयोगी कामे करताना घ्यायची काळजी
सार्वजनिक लोकोपयोगी कामे करताना घ्यायची काळजीः
प्रवीण दीक्षित.
(निवृत्त पोलीस महासंचालक)
21/6/2023
रोटरी क्लब पुणे लक्ष्मी रोड तर्फे आयोजित आजच्या कार्यक्रमात श्री अजेय चौगुले अध्यक्षपदाची पुढील वर्षासाठी जबाबदारी सांभाळत असताना मी आणि माझी पत्नी ह्यांना त्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होता आले ह्याचा आम्हाला अत्यंत अभिमान व आनंद आहे. येणार्या वर्षात अजेय ह्यांच्या नेतृत्त्वाखाली आपण ठरवलेली लोकोपयोगी कामे यशसवी होवोत अशी शुभेच्छा मी अजेय व त्यांचे सहकारी ह्यांना सुरवातीलाच देऊ इच्छितो.
आज हया कार्यक्रमामधे अत्यंत प्रतिष्ठित अशा “Rotary Vocational Excellence” Award ने सन्मानित डॉ. उमेश शाळिग्राम ह्यांचे मी कृतज्ञतापूर्व हार्दिक अभिनंदन करतो. डॉ. शाळिग्राम व त्यांच्या सहकार्यांनी COVISHIELD ही लस उपलब्ध करून भारत तसेच जवळ जवळ 150 देशातील कोट्यवधी लोकांना COVID 19 च्या महामारीतून यशस्वीपणे वाचविण्यासाठी फार मोठी मदत केली आहे. हे सर्व लोक त्याबद्दल डॉ. शाळिग्राम व त्यांच्या सहकार्यांचे ऋणी राहतील. जागतिक स्तरावर एवढी मोठी कामगिरी करणारी व्यक्ती ही आज आपल्यामधे उपस्थित आहे ह्याचा अत्यंत अभिमान वाटत आहे. पुण्यातील व्यक्तींनी सबंध भारताला अनेक वेळेला नेतृत्त्व दिले आहे. त्या सर्व महान विभूतींमधे डॉ. शाळिग्राम ह्यांनी एक महत्त्वाचा आयाम जोडलेला आहे. सामान्य माणसाला आरोग्यदायी जीवन देण्याच्या डॉ. शाळिग्राम ह्यांच्या नेतृत्त्वाखालील सर्व चमूला आपल्या सर्वांतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!
रोटरी क्लब लक्ष्मीरोड पुणे ह्यांनी अनेक लोकोपयोगी कामे आजपर्यंत यशस्वीपणे पार पाडलेली आहेत. जशी – पाणीपुरवठ्याच्या योजना, शौचालये बांधणे, शाळेमधे बाक देणे, अनाथ मुलांसाठी वसतिगृह बांधणे, वंचित वर्गातील व्यक्तिंसाठी आरोग्य, शिक्षण, पर्यावरण योजना राबविणे…. इत्यादि. अन्य ठिकाणच्या रोटरी सदस्यांनीही अनेक लोकोपयोगी कामे वर्षानुवर्षे उत्कृष्टपणे पार पाडलेली आहेत व समाजामधे नाव कमावले आहे. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात सुरक्षा सल्लागार म्हणून काम करत असताना पुण्यातील ससून हॉस्पिटलमधे भेट देण्यासाठी म्हणून मी गेलो असताना तेथे अनेक ग्रामीण वृद्ध स्त्री पुरुष येत असताना पाहले होते. त्यातील अनेक जणांना आपल्या आधीच्या भेटीचे कागद बरोबर आणण्याचे सुद्धा लक्षात येत नसे. त्यासाठी रोटरी क्लबने OPD Software तेथे लावण्याची सोय केली होती, त्यामुळे आलेल्या रुग्णाने आपले नाव सांगितले किंवा आपल्या अंगठ्याचा ठसा दिला की त्याचा पूर्वीचा आरोग्य इतिहास त्वरित उपलब्ध होत असे व वेळेची बचत होत असे.
नक्षलवादाच्या प्रभावाने गडचिरोलीतील दुर्गम भागांमधे आरोग्य, शिक्षण ह्या सुविधा मिळणे आजही अवघड आहे. अशावेळी मुंबईतील माझ्या मित्रांनी जे रोटरी क्लबचे सदस्य आहेत, त्यांनी उदारहस्ते लाखो रुपये देणगी देऊन वृद्ध स्त्री, पुरुष अशा आठशेहून अधिक व्यक्तिंच्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यास मदत केली आहे. दुर्गम भागात आरोग्यासाठी तपासणी करणे, गरजू व्यक्तींना सुसज्ज अशा रुग्णालयात नातेवाइकाबरोबर नेणे व परत आणणे आणि शस्त्रक्रिये नंतरही जरुरीची औषधे पुरविणे अशी ही योजना आहे. दृष्टी प्राप्त झाल्यानंतर ह्या व्यक्तिंच्या चेहर्यावर उमटणारा आनंद तुम्हालाही एक वेगळाच आनंद देऊन जातो.
ह्याच आठवड्यात मुंबईतील रोटरी सदस्याने दिलेल्या उदार देणगीमुळे गडचिरोलितील अति दुर्गम व नक्षलपीडित अशा भागातील मुलींना शाळा दूर असल्यामुळे शाळा सोडायला लागू नये म्हणून 150 सायकली देण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे शाळा सोडून नक्षल चळवळीत सामिल होण्यापासून ह्या मुली वाचणार आहेत व समाजामध्ये शांतता नांदणार आहे. तरुण आदिवासी मुले व मुली ह्यांची वेळोवेळी लग्ने लावणे व त्यांना संसारोपयोगी वस्तू भेट देणे हा कार्यक्रम नियमित चालू आहे. मुलांसाठी आज प्रत्येक पोलीस ठाण्यात गोष्टीच्या पुस्तकांचे ग्रंथालय बनवण्यात आले आहे व मुले त्याचा फायदा घेत आहेत. दिवाळीच्या वेळी नवी मुंबईच्या मित्रांनी ट्रक भरून दिलेले संसारोपयोगी भांडी, फराळाचे पदार्थ, साड्या, धोतरे, गडचिरोलीतील गरजूंना दिले आहेत.
कोविड 19 च्या महामारीत, पुण्यातील भोर, पुरंदर येथील वृद्धाश्रमांसाठीही रोटरी सदस्याने भरघोस देणगी देऊन तेथील गरजूंना मोठी मदत केलेली आहे.
पुण्यातील येरवडास्थित Regional Mental Hospital येथे रुग्णांसाठी 200 नवीन पलंग व गाद्यांची गरज होती. नुकतेच पुण्यातील माझे मित्र ह्यानी उदारपणे त्यातील 100 पलंग व गाद्या तिथे उपलब्ध करून दिल्या आहेत. RMH ला अजून 100 पलंग व गाद्यांची आवश्यकता आहे व मानसीक रुग्णांसाठी आपण ती मदत करावी अशी मी विनंती करतो.
सार्वजनिक लोकोपयोगी कामे करताना शासकीय विभाग आणि स्वयंसेवी संस्था ह्यांनी एकत्र येऊन कोणतेही काम केल्यास ते काम यशस्वीपणे पार पाडता येते. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे रोटरी इंटरनॅशनलने पोलिओ निर्मूलन ह्यासाठी केलेले अथक परिश्रम हे होय. रोटरी व अन्य आरोग्य अधिकारी, कर्मचारी ह्यांच्या प्रयत्नांमुळे आज पोलिओचे जगातील सर्व भागातून निर्मूलन झाले आहे. शासकीय विभागात नेहमीच निधीची चणचण भासत असते त्यामुळे स्वयंसेवी संस्थांनी उदारहस्ते मदत केल्यास लोकांच्या अडचणी कमी होऊ शकतात ह्याची अनेक उदाहरणे आहेत. लोकोपयोगी कामे करत असताना काही गोष्टी जरुर लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जसे- लाभार्थी कोण असावेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या साठी महिला केंद्रित लोकोपयोगी कामे केल्याने एक महिलाच नव्हे तर तिचे संपूर्ण कुटुंबही प्रगती करते. लोकोपयोगी कामे करताना जर दुर्गम भागातील वनवासी ह्यांना प्राधान्य दिले तर ह्या लोकांचा शहरांकडे येणारा ओघ थोडा कमी होऊ शकतो. शहरात येऊन शहरात राहण्याची कौशल्ये लवकर स्वीकारता न आल्याने येणार्याा बाहेरच्या लोकांमधील अनेकजण वाममार्गाला लागण्याची शक्यता असते. सार्वजनिक लोकोपयोगी केलेली कामे ही केवळ देणगीच्या बळावर चालू राहणे अवघड असते, त्यामुळे ज्यांना मदत केलेली असेल त्यांच्याध्ये कौशल्ये निर्माण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणे ह्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. लोकोपयोगी कामांना मदत देणार्या दानशूर व्यक्तिंचा शोध घेणे, कर्मचार्यांना प्रशिक्षण देणे, ज्यांना मदत केली असेल त्यांच्या प्रगतीचा आलेख वारंवार तपासणे आणि त्यासाठी मदत देणे, ह्यासाठी आधुनिक सॉफ्टवेअर वापरणे आवश्यक आहे. दानशूर व्यक्तिंशी संपर्क ठेऊन केलेल्या कामाची प्रगती त्यांना वारंवार कळविणे जरुरीचे आहे. ही कामे करत असताना कामे यशस्वी कशी झाली ह्या संबंधीची नोंद ठेवणे व नवीन सदस्यांना त्याबद्दल परिचित करणे उपयोगी ठरते.
शासनातर्फे संचालक समाज कल्याण विभाग हे वंचित, पीडित, शोषित अशा विविध घटकांसाठी नवनवीन योजना राबवत असतात. सुदैवाने हे कार्यालय पुण्यात उपलब्ध आहे. त्यामुळे संचालक समाजकल्याण, संचालक आरोग्य विभाग, संचालक शिक्षण विभाग, ह्या संबंधित शासकीय अधिकार्यांशी संपर्क वाढवून नवीन योजनांची माहिती घ्यावी व लोकांच्या नेमक्या काय गरजा आहेत ही माहिती शसकीय अधिकार्यांपर्यंत पोचवावी.
पोलीस आयुक्त, नागपूर म्हणून काम करत असताना प्रत्येक पोलीस ठाण्या अंतर्गत बाल गुन्हेगार म्हणून आढळलेल्या व्यक्तिंची यादी मी बनवली होती. रोटरी क्लबच्या मदतीने प्रशिक्षित अशा दोन अधिकार्यांची (counsellors) नेमणूक करण्यात आली. वर्षभरात सदर मुले, त्यांचे पालक ह्यांना वारंवार भेटी देऊन ह्या मुलांना गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांना व्यवसाय कौशल्ये देण्यात आली. सदर व्यवसाय कौशल्ये देण्यासाठी रोटरिचे सदस्य असलेले अनेक उद्योजक पुढे आले. व नंतर ह्याच मुलांना त्यांनी आपल्या व्यवसायात चांगले पगार देऊन कर्मचारी म्हणून नेमणूक केली. त्यातील अनेक जणांनी स्वतःचे व्यवसाय उभारून स्वतःला व स्वतःचे घर चालवायला मोठी मदत केली. एका दानशूर व्यक्तिने आपल्या मोटर चालक प्रशिक्षण शाळेत अशा अनेक मुलांना मोटर चालवायचे प्रशिक्षण दिले. त्यातील अनेक मुले आज स्वतःची टॅक्सी चालवत आहेत.
रोटरी क्लब पुणे ह्यांच्या प्रोत्साहनाने, रोटरी वर्ल्ड पीस फेलो म्हणून माझी निवड केली होती व त्यातून अमेरिकेतील ड्युक विद्यापीठातून आन्तर्राष्ट्रीय विकास धोरण ह्या विषयात मला प्रगत अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यामुळे अनेक देशातील रोटरी सदस्यांना मला भेटता आले व त्यांच्या अनुभवातून बरेच काही शिकता आले व अनेक लोकोपयोगी सार्वजनिक कामांमधे योगदान देता आले. ह्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मी तयार केलेला माझा बाल कामगार प्रथा स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कशी कमी करता येईल हा शोध प्रबंध मी वेगळा अध्यक्षांच्या मार्फत पाठवत आहे तो आपण सवडीने पहावा.
आपल्या सर्व लोकोपयोगी कामांमधे आपण यशस्वी व्हावे अशी आमच्यातर्फे सदिच्छा! व आपणा सर्वांना शुभेच्छा
——————-