Author:

Praveen Dixit

Articles

ड्रग्जच्या विळख्या तरुणाई

By on October 18, 2023

ड्रग्जच्या विळख्या तरुणाई
– प्रवीण दीक्षित, माजी पोलिस महासंचालक


पुण्यातील ससून रुग्णालयात जप्त करण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांच्या ड्रग्ज साठा प्रकरणात मुंबई पोलिसांनी प्रमुख आरोपी ललित पाटील याला नुकतीच अटक केली आहे. वास्तविक, गेल्या काही वर्षांत अमली पदार्थांचा विळखा राज्यातच नव्हे तर सबंध देशभरात वाढत चालला आहे. खरे तर हे पाकिस्तानने भारताविरुद्ध छेडलेले छद्मयुद्ध किंवा प्रॉक्सी वॉर आहे. गेल्या वर्षभरात २५ हजार कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज तपास यंत्रणांनी, नार्कोटिक्स ब्युरोने आणि विविध राज्यांच्या पोलिसांनी पकडलेले आहेत. अर्थात, ही सतत चालत राहणारी लढाई आहे. ही लढाई केवळ पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी लढायची नाहीये; त्यामध्ये जनतेनेही खूप मोठ्या प्रमाणावर जागरुक राहणे गरजेचे आहे.


पुण्यातील ससून हॉस्पिटल ड्रग्स रॅकेट प्रकरणी फरार असणार्‍या ललित पाटील याला नुकतीच अटक करण्यात आली. श्रीलंकेला जाण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी जेरबंद केले. ललित पाटील हा मूळचा नाशिकचा असून २०२० मध्ये तो ड्रग्जच्या रॅकेटमध्ये असल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. अटक झाल्यापासून ललित प्रदीर्घ काळ ससून रुग्णालयात तळ ठोकून होता. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची शिफारस केली होती आणि त्याचा उपयोग करून तो ससूनमधून निसटला होता. अटकेनंतर त्याच्या चौकशीतून ड्रग्जचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वास्तविक, अलीकडील काळात राज्यातच नव्हे तर सबंध देशभरात अमली पदार्थांचा विळखा वाढत चालल्याचे दिसून येत आहे.

 
वस्तुतः अमली पदार्थ किंवा ड्रग्ज हा विषय अत्यंत संवेदनशील आणि गंभीर स्वरुपाचा आहे. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट स्थापन होण्यामागे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असणार्‍या आयएसआयचा मोलाचा वाटा होता. किंबहुना आयएसआयच्या समर्थनावरुनच तालिबानचे राज्य अफगाणिस्तानात स्थापन झाले. पाकिस्तानची भारताबाबतची रणनीती अत्यंत स्पष्ट आहे. प्रत्यक्ष युद्धामध्ये भारताला पराभूत करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर पाकिस्तानने छद्मयुद्धाचा मार्ग निवडला. त्याअन्वये दहशतवादी कारवाया करुन भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेमध्ये आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे आणून भारताची प्रगती रोखणे हे धोरण म्हणून पाकिस्तानने स्वीकारले. तथापि, भारताच्या संरक्षण यंत्रणांनी आणि सैन्याने पाकिस्तानचे हे मनसुबे वेळोवेळी हाणून पाडले. आतापर्यंत झालेल्या युद्धांमध्येही पाकिस्तानला भारताने धूळ चारली आहे. ‘ब्लीड इंडिया विथ थाऊजंड कटस्’ असे म्हणत भारताला रक्तबंबाळ करण्याचा प्रयत्न करणार्‍या पाकिस्तानचीच कालोघात शकले झाली आणि बांगला देश वेगळा झाला. तेव्हापासून पाकिस्तानने कधी पंजाबमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न केला, तर कधी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला; परंतु भारत सरकार, भारतीय सैन्य आणि भारतीय जनता या तिघांनी एकत्र येऊन पाकिस्तानला नेस्तनाबूत केले.

 भारतातील जनतेला याची शिक्षा द्यायची म्हणून या देशातील तरुणांभोवती अमली पदार्थांचा विळखा घालण्याचे षड्यंत्र आयएसआयने रचले आहे. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असण्याबरोबरच सर्वाधिक तरुणांचाही देश आहे. १५ ते ३५ वयोगटातील तरुणांचे प्रमाण आपल्या लोकसंख्येमध्ये मोठे आहे. ही तरुणपिढी म्हणजे भारताची संपत्ती आहे. लोकसंख्येच्या परिभाषेत त्यांना ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ असे म्हटले जाते. कार्यकुशल मनुष्यबळाची उपलब्धता हा आर्थिक व औद्योगिक विकासाचा कणा मानला जातो. तरुणपिढीचे हे योगदान आणि महत्त्व लक्षात घेऊन पाकिस्तानने भारतातील तरुणाईला व्यसनाधिन करुन टाकण्याचा जणू चंगच बांधला आहे. यासाठी कधी हवाई मार्गाने, कधी जमिनी मार्गाने किंवा कधी समुद्रमार्गाने पाकिस्तान भारतात अफू, चरस, गांजा, हेरॉईन यांसारख्या अमलीपदार्थ पाठवत आहे. हे प्रमाण साधेसुधे नसून अक्षरशः काही टन अमली पदार्थ पाकिस्तानातून तस्करीच्या मार्गाने भारतात येत आहेत. यातील काही अमली पदार्थांची किंमत ही काही हजारांमध्ये असते. उदाहरणच घ्यायचे झाल्यास एक ग्रॅम हेरॉईनची किंमत अफगाणिस्तानातून विकले जाते तेव्हा समजा १०० रुपये असेल तर मुंबईच्या बाजारात ते १० हजारांना विकले जाते. यातून एकीकडे भारतातील समाजव्यवस्थेत विष पेरायचे आणि दुसरीकडे प्रचंड नफा कमवायचा असा दुहेरी डाव पाकिस्तानकडून खेळला जात आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि अन्य काही संस्थांच्या, तपास अधिकार्‍यांच्या तपासातून ही बाब उघड झालेली आहे की, अमली पदार्थांच्या व्यापारातून-तस्करीतून मिळालेला पैसा शस्रास्रांचा पुरवठा करण्यासाठी आणि दहशतवादी तत्वांना आर्थिक रसद पुरवण्यासाठी वापरला जातो. म्हणजेच तुमच्याच पैशाने तुमच्याच देशात दहशतवाद पसरवायचा, लोकांना मूलतत्ववादी बनवायचे, लोकांना शस्रास्रे पुरवायची, बॉम्ब बनवायला मदत करायची असा पाकिस्तानचा डाव आहे. यासाठी अलीकडील काळात वेगवेगळ्या मोडस ऑपरेंडी पाकिस्तानकडून वापरल्या जात आहेत.

 
सुरुवातीला पाकिस्तानने जमिनीखाली बोगदे तयार करुन पंजाब, काश्मीर यांसारख्या सीमावर्ती राज्यांमध्ये ड्रग्ज पाठवण्याचा प्रयत्न केला. परंतु बीएसएफच्या जवानांनी हे बोगदे तपासण्यास सुरुवात केली आणि पाकिस्तानचा हा डाव हाणून पाडला. त्यानंतर पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमातून अमली पदार्थ आणि शस्रास्रे पाठवण्यास सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आता अँटी ड्रोन टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणावर वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ड्रोन्सच्या माध्यमातून होणारा अमली पदार्थांचा पुरवठा रोखण्यामध्ये यश येत आहे. त्यानंतर आता महिलांचा कुरीयर म्हणून वापर करत पाकिस्तान अमली पदार्थ भारतात पाठवत आहे. तसेच समुद्री मार्गाने कांडलासारख्या बंदरांमधून कंटेनर्समधून टनांनी हेरॉईन पाठवण्याचा प्रयत्न केला आहे. थोडक्यात, हवाई, समुद्री आणि जमिनी अशा तिन्ही मार्गाने पाकिस्तान तरुणपिढीला बरबाद करणारे हे विष भारतात पेरत आहे.

 
मध्यंतरी असे आढळून आले होते की, काही पाकिस्तानी स्मग्लर श्रीलंकेच्या तुरुंगातून समुद्री मार्गाने अमली पदार्थांच्या तस्करीचे नियोजन करत होते. आपल्याकडे मुंबई विमानतळावर युगांडा, नायजेरिया आदी ठिकाणांहून येणार्‍या अनेक स्मग्लरना मागील काळात रंगेहाथ पकडण्यात आपल्या तपास यंत्रणांना यश आले आहे. तथापि, यातील दुर्दैवाची बाब म्हणजे आपल्याकडील तरुणपिढी यामध्ये प्रचंड प्रमाणात गुरफटत चालली आहे. अगदी मोठमोठ्या, प्रतिष्ठित शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेणारे अनेक तरुण हे या अमली पदार्थांचे सेवन करत आहेत. अगदी आयआयटीसारख्या संशोधन क्षेत्रातील संस्था असोत किंवा व्यवस्थापनाची महाविद्यालये असोत, या परिसरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा पुरवठा करणारे अड्डे तयार झाले आहेत.

 
गेल्या वर्षभरात २५ हजार कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज तपास यंत्रणांनी, नार्कोटिक्स ब्युरोने आणि विविध राज्यांच्या पोलिसांनी पकडलेले आहेत. अर्थात, ही सतत चालत राहणारी लढाई आहे. ही लढाई केवळ पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी लढायची नाहीये; त्यामध्ये जनतेनेही खूप मोठ्या प्रमाणावर जागरुक राहणे गरजेचे आहे. आज आपला मुलगा अमली पदार्थांचे सेवन करत आहे की नाही, हे पालकांना तोपर्यंत माहीत नसते जोपर्यंत तो पूर्णपणे व्यसनाधिन होत नाही. हे लक्षात घेता आपल्या पाल्यांबाबत अत्यंत जागरुक राहण्याची वेळ आजच्या काळात पालकांवर आली आहे. आजच्या पालकांची संगोपनाची व्याख्या पाहिल्यास बहुतांश आई-वडिलांचा कल मुलांना भरपूर पैसे आणि भौतिक सुविधा देण्याकडे असल्याचे दिसते. पण याखेरीज मुलांना पालकांनी क्वालिटी टाईम देणे गरजेचे आहे. तसेच ते काय करतात, ते कोणाबरोबर राहतात, त्यांची संगत कशी आहे, फ्रेंडसर्कल कसे आहे, त्यांच्या सवयींमध्ये काही बदल झाला आहे का, आपले मूल आपल्याशी काही लपवल्यासारखे वागते आहे का यावर पालकांचे अत्यंत सजगपणाने लक्ष असले पाहिजे. अमली पदार्थांच्या आहारी गेलेले अनेक तरुण आपल्या वडिलांच्या व्यवसायातून पैसे चोरतात, क्रेडिट कार्डचा वापर करुन कर्जबाजारी होतात; पण तरीही पालकांना याचा थांगपत्ता नसतो. काही पालक हे लक्षात आले तरी तरुण वय आहे, पैसा लागतोच असे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. वास्तविक, हे चुकीचे आहे. मुलांचे डोळे कसे आहेत, त्याच्यात काही सिंड्रोम्स दिसताहेत का, तो बावचळल्यासारखा, भ्रमिष्टासारखा वागतोय का, त्याची एकाग्रता कमी झाली आहे का, झोप कमी अथवा जास्त झाली आहे का या रोजच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींचे निरीक्षण पालकांनी केले पाहिजे. कोणतेही व्यसन हे सुरुवातीला गंमत किंवा थ्रील म्हणून केले जाते. पण पाहता पाहता आपण त्याच्या मगरमिठीत कसे अडकत जातो हे समजत नाही. याबाबत पालकांना वेळोवेळी मुलांना सावध केले पाहिजे. अगदी हुशार म्हणवली जाणारी मुलेही काही दिवसांत व्यसनाधिनतेच्या वाटेवर जाताना पाहायला मिळाली आहेत आणि त्यांचे आयुष्य बरबाद झाले आहे. अशी उदाहरणे मुलांसमोर आणली पाहिजेत.
ड्रग्ज पुरवठा करणारे पेडलर खरेदीदार तरुणांना आणखी चार जणांना तू ड्रग्ज घ्यायला प्रोत्साहन दे, तसे केल्यास तुला आम्ही मोफत ड्रग्ज देऊ असे सांगतात. त्यातून हा संसर्ग वाढत जातो. दुसरीकडे, हे तरुण एजंट बनून जातात आणि यामागचा मुख्य सूत्रधार लांब निघून जातो. परिणामी, पोलिसांच्या किंवा तपास यंत्रणांच्या जाळ्यातही हीच नवखी तरुण मंडळी सापडतात. त्यातून यामागच्या मास्टरमाईंडचा शोध घेणे कठीण होऊन बसते.

 
हा सेल्फ जनरेटिंग, कमी श्रमाचा आणि प्रचंड पैसा असलेला व्यवहार आहे. त्यामुळे यांचे मूळ पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात असले तरी आपल्यातीलच काही लोक त्यांना मदत करण्यासाठी पुढे येताना दिसतात. त्यांना यातील धोका माहीत नसतो असे नाही; पण झटपट पैशांची चटक त्यांच्यावर हावी होते. त्यामुळे आपल्या कुटुंबाचा, मुलाबाळांचा, स्वतःचा विचार न करता ही मंडळी या व्यवसायात सहभागी होतात. हे वास्तव लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांनीही केवळ आपल्या हिकमतीवर अमली पदार्थांचा विळखा मोडीत काढता येईल या भ्रमात न राहता प्रचंड मोठ्या संख्येने पोलिस मित्र तयार करण्याची गरज आहे. जनतेला जितक्या मोठ्या प्रमाणावर यामध्ये सहभागी केले जाईल तितक्या सुलभरित्या याबाबतची माहिती मिळवणे सोपे होईल आणि त्यातून हा विळखा तोडता येईल.

 

Articles

दहशतवादाविरुद्ध लढाई

By on October 9, 2023

दहशतवादाविरुद्ध लढाई

प्रवीण दीक्षित

निवृत्त पोलिस महासंचालक

 

  1. भारताच्या अंतर्गत सुरक्षेचा विचार केला तर एकदोन दशकांपूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यात काही फरक आहे का, तुम्ही तुलना कशी करालविशेषत: मुंबई, बंगळुरु, हैदराबाद सारख्या महानगरांमध्ये घडणाऱ्या  मोठ्या दहशतवादी कारवाया आता इतिहासजमा झाल्या आहेत किंवा थंडावल्या आहेत, अशी परिस्थिती आहे का?      

2014 मधे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर व त्यापूर्वी भारतामधील दहशतवादाची परिस्थिती यामधे जमिन असमानाचा फरक आहे. 2014 पूर्वी दिल्ली, जयपूर, मुंबई, नागपूर, पुणे बंगळुरू, हैद्राबाद, कोईमतूर अशा भारतातल्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये अनेकवेळा दहशतवादी हल्ले झाले होते. 2014 नंतर काश्मिरमधे दहशतवादी हल्ले झाले आहेत. परंतु 2019 मधे कलम 370 अ रद्द केल्यानंतर हे हल्ले ठोसपणे कमी झाले आहेत. इतरत्र भारतामधे दहशतवाद्यांनी हल्ले करण्याचा प्रयत्न केला परंतु तत्पूर्वीच ह्या प्रयत्न करणारयांना पकडण्यात आले.  त्यामुळे त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे हे दहशतवादी प्रयत्न करताएत परंतु त्यापूर्वीच जागरूक असलेल्या सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्यावर परिणामकारक काारवाई केली आहे. 



  1. जागतिक स्तरापासून अगदी तळागाळातील, दहशतवादाचा सामना करण्याची जबाबदारी कोणकोणत्या सुरक्षा संस्थांवर सोपवलेली असते आणि त्या कशा प्रकारे एकमेकांशी समन्वय साधतात?

 

जागतिक स्तरावर इंटरपोल तसेच विविध मित्र राष्ट्रांमधे असलेला समन्वय व संयुक्त राष्ट्रे ही दहशतवादाविरुद्ध काम करत आहेत. भारतात NIA (national investigation agency) राज्यामध्ये ATSऽ स्थानिक पोलीस हे एकमेकांशी समन्वय ठेऊन दहशतवाद विरोधी कारवाया करत असतात. ह्याशिवाय NCB (narcotics control Bureau) ही आमली पदार्थांविरोधी कारवाई करते. महाराष्ट्रात CID मधे आमली पदार्थ विरुद्ध Task Force ची निर्मिती करण्यात आली आहे. आर्थिक दहशतवादाविरुद्ध ED (Enforcement Directorate) कारवाई करते. सायबर गुन्ह्यांविरुद्ध केंद्र व राज्य पातळीवर विशेष यंत्रणा उभारण्यात आली आहे. ह्या सर्व सुरक्षा यंत्रणांमध्ये भारत सरकारचे गृह मंत्रालय व त्यात काम करणार्‍या सुरक्षा यंत्रणा सतत जागरूक राहून सर्व संबंधितांना माहितीची देवाण-घेवाण व देशाबाहेरील यंत्रणांशी समन्वय राखत असतात.

 

  1. तंत्रज्ञान जसजसे प्रगत जातं तसतसे दहशतवादाचे स्वरूप देखील विकसित होतं.उदाहरणार्थ, क्रिप्टो चलन, हवाला जाळं, अंमली पदार्थांची तस्करी अशा गुन्हेगारीचे वाढते धोके! तर भारतातली पोलीस यंत्रणा आणि तिला उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, या धोक्यांचा, गुन्हेगारी मधल्या वाढत्या आधुनिकतेचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत का?

 

नवनवीन तंत्रज्ञान वापरून भारताबाहेरील दहशतवादी त्याचा गैरवापर करत आहेत. ह्यावर उपाय करण्यासाठी भारतातील पोलीस यंत्रणाही नवीन प्रशिक्षण व पायाभूत सुविधा ह्यांचा सक्षमतेने वापर करत आहेत. परंतु ही न संपणारी अशी प्रक्रिया आहे. दहशतवादामुळे बळी ठरलेल्या अनेक देशांनी जसे इस्रायल, फ्रांस, इंग्लंड, अमेरिका, भारत हे एकत्र येऊन दहशतवादाच्या नवीन गुन्हेगारीविरुद्ध एकत्रितपणे प्रतिकार करीत आहेत.

 

 

  1. दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपल्या सुरक्षा यंत्रणांनी कशाप्रकारे चाकोरी बाहेर विचार करावा आणि नवनवीन कल्पनांनी युक्त अशा उपाययोजना राबवाव्या ?


दहशतवादाचा सामना ही सर्व लोकशाहीप्रेमी राष्ट्रातील सुरक्षा यंत्रणा, तसेच जबाबदार नागरीक ह्यांची संयुक्त जबाबदारी आहे. दहशतवादाविरोधी आधुनिक तंत्रज्ञान तसेच व्यक्तिकेंद्रित माहिती अचूकपणे मिळवणे आवश्यक आहे. Artificial Intelligence (AI) च्या मदतीने अचूक माहिती मिळविणे शक्य झाले आहे. तसेच मोबाईल वापरामुळे ह्या दहशतवाद्यांचे नेमके ठिकाण नक्की करण्यात बरीच मदत होत आहे. परंतु तरीही दहशतवाद्यांधील व्यक्तिंकडून अचूक माहिती मिळविण्यासाठी पोलीस मित्रांची फार मोठी आवश्कता आहे. सुरक्षा यंत्रणा व सामान्य माणसे ह्यातील दूरी हे पोलीस मित्र कमी करतात व आजूबाजूला घडत असणार्‍या संशयास्पद कारवायांची माहिती ते सुरक्षायंत्रणांना त्वरित देतात.

  1. गेल्या काही वर्षांचा धांडोळा घेतला, तर गेल्या 9 वर्षांत दहशतवादाची परिसंस्था यशस्वीपणे नष्ट झाली आहे किंवा समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे असे तुम्हाला वाटते का?

 

दहशतवादामधे देशांतर्गत दहशतवादी कारवाई करणारे व देशाबाहेरील दहशतवादाला प्रोत्साहन देणारे असे दोन मुख्य गट आहेत. देशामधे दहशतवादी कारवाया होणार नाहीत ह्यासाठी आाज देश मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला आहे. परंतु भारताची शत्रू राष्ट्रे भारतातील जनतेत धर्म, प्रांत, लिंग, भाषा, जात अशा विविध मार्गांनी असंतोष निर्माण करण्याचा व तुमच्यावर अन्याय होत आहे त्याचा तुम्ही प्रतिकार करावा ह्यासाठी प्रशिक्षण, शस्त्रे, दारुगोळा, अमली पदार्थ, दळणवळणाची साधने अशा अनेक प्रकारे मदत करत आहेत. ह्याशिवाय जनतेमधे बुद्धिभेद निर्माण करून भारतातील सुरक्षा यंत्रणांविरुद्ध सतत संशयाचे वातावरण निर्माण करत आहेत. त्यातच पेड न्यूज, फेक न्यूज, फेक व्हिडिओज पसरविण्याचे तंत्र मोठ्या प्रमाणात विकसित करण्यात आले आहे.



  1. डावी विचारसरणी किंवा साम्यवाद आधार मानून फोफावलेला कट्टरतावाद आणि बंडखोरीबद्दल बोलायचं झालं,तर  सध्या अशा कारवायांची व्याप्ती आणि प्रमाण किती आहेगेल्या दशकभरात अशा कारवायांमधून होणारी जीवित आणि वित्तहानी कमी करण्यात पोलीस आणि प्रशासन कितपत यशस्वी झाले आहेत? A

डाव्या विचारसरणीमुळे फोफावलेल्या बंडखोरीमधेही 50% हून अधिक घट झाली् आहे. विकासाची कामे, रोजगार निर्मती, रेल्वे रस्ते यांचे वाढलेले जाळे ह्यामुळे माओवाद्यांनी निर्माण केलेली सुरक्षित ठिकाणे जवळजवळ नाहिशी झाली आहेत. स्थानिक नवीन भरती जवळ जवळ संपलेली आहे. पोलीस आणि प्रशासन ह्यांनी केलेल्या प्रभावी कारवाईमुळे स्थानिक व्यक्ती माओवाद्याच्या विरुद्ध माहिती देण्यास पुढे येत आहेत. तसेच अनेक मओवादीही सामान्य जीवन जगण्यासाठी शासनाने दिलेली मदत स्वीकारून बंडखोरी विरुद्ध पुढे येत आहेत.



  1. पुढील 2 वर्षात हा डाव्या विचारसरणीचा कट्टरतावाद पूर्णपणे समूळ नष्ट होईल असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहेहे ध्येय साध्य करता येईल का?

 

गृहमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे पुढील दोन वर्षात डाव्या विचारसरणीचा कट्टरवाद नष्ट करण्यासाठी सर्व संबंधित राज्य सरकारांनी भारत सरकारबरोबर एकदिलाने प्रयत्न केल्यास हे ध्येय साध्य करणे अवघड नाही.


  1. या डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावादाचा सामना करण्यासाठी सरकारचं झिरो टॉलरन्स म्हणजेच हा प्रकार अजिबात खपवून घेण्याचं धोरण काय आहे?

Zero tolerance म्हणजे ज्या ठिकाणी कट्टरतावादी शस्त्रास्त्रे वापरत असतील तेथे त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. गैर कायदेशर कृत्ये करणार्‍यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच जे शहरी नक्षलवादी आर्थिक, मनुष्यबळ, दळणवळणाची साधने, प्रशिक्षण अशा प्रकारे मदत करत असतील, त्यांनाही उघड पाडले जाईल. व त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.
 

  1. नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी आणि आणि या क्षेत्रासह नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारनं काय विशेष प्रयत्न केले आहेत?

 

नक्षलभागाच्या विकासासाठी गडचिरोली, गोंदिया भागामधे ‘‘पोलीस दादालोरा खिडकी’’ योजने अंतर्गत एक लाखाहून अधिक स्थानिकांना विविध आवश्यक शासकीय प्रमाण पत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच त्यांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण ह्याची व्यवस्था करण्यात आली आहे. International Association of Chiefs Of police ह्यांनी पोलीस अधिक्षक गडचिरोली ह्यांना सन्मानित केले आहे. तसेच विविध उद्योजक नवनवीन पोलादाचे कारखाने काढून येणार्‍या काळात एक लाखाहून अधिक व्यक्तीँना रोजगार निर्मिती करणार आहेत. 

   ————    ——————–    —————————–

                                                                               

Articles

कॅनडातील भारतीयांची सुरक्षितता

By on September 28, 2023

कॅनडातील भारतीयांची सुरक्षितता

कॅनडातील भारतीय वंशाच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यास भारत सक्षम

 

प्रवीण दीक्षित,

अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक,

भुतपूर्व पोलीस महासंचालक.

खलिस्तानी दहशतवादी व संघटित गुह्नेगारी करणार्‍या हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामधील तणाव सध्या शिगेला पोहोचला आहे. दरम्यान भारत सरकारने कॅनडामध्ये राहणारे विद्यार्थी आणि भारतीय नागरिकांच्या सतर्कतेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामध्ये भारत सरकारने कॅनडात राहणाऱ्या नागरिकांना सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदू भारतीयांना धमकी देण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या कॅनडातील भारतीय लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये आलेला दुरावा, त्याचा कॅनडात स्थायिक झालेल्या भारतीयांवर काय परिणाम होईल, याची चिंता आहे. मात्र असे असले तरी यामध्ये भारताच्या प्रयत्नांना अनेक देशांचा पाठिंबा आहे. त्यामुळे कॅनडावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे. कॅनडातील भारतीय वंशाच्या हिंदू लोकांना सुरक्षित ठेवण्यास भारत पूर्णतः सक्षम आहे.

भारताचे तुकडे व्हावेत व भारताचे कॅनडाशी संबंध बिघ़डावेत हा पाकिस्तानचा मनसुबा

        कॅनडा व भारत यांच्यातील संबंध बिघडावेत म्हणून पाकिस्तानच्या ISI नेच निज्जर याची हत्या केली अशी दाट शक्यता आहे. नुकत्याच उपलब्ध झालेल्या CCTV footage मधून स्पष्ट होते की ६ व्यक्तींनी गुरुद्वारा समोर ५० गोळ्या चालवून निज्जर ची हत्या केली आहे. हे लोक कोण होते त्यांनी वापरलेली कार कुठे आहे, ह्याचा तपास कॅनडाच्या पोलिसांना अद्याप लागलेला नाही. पाकिस्तान च्या सांगण्यावरून भारताचे तुकडे करण्याचा मनसुबा बाळगून असलेले खलिस्तानी आता कॅनडामधील भारतीय वंशातील नागरिकांना टार्गेट करू लागले आहेत. त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत, अशा आशयाचा व्हिडिओही व्हायरल झाला. भारतासाठी खलिस्तानी हे काही नवे नाहीत. त्यांच्या गुप्त कारवाया सतत चालू असतात. भारत-कॅनडाच्या वादात पाकिस्ताननेच भारताचे तुकडे व्हावेत यासाठी सुरु केलेली ही चळवळ आहे. स्वतःला खलिस्तानी म्हणवणारे अनेक लोक आहेत, आजही त्यांना पाकिस्तानमध्ये राजरोसपणे ठेवले राहू दिले जात आहे. त्यांना व्यवस्थित संरक्षण देण्यात येत आहे. त्यांना भक्कम पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे खलिस्तानी भारतामध्ये इतर देशांमधून ड्रग्स, अवैध शस्त्रास्त्रे यांचा धंदा करत आहेत. दहशतवादी कारवाया करत आहेत. यात प्रमुख देश म्हणजे पाकिस्तान, जर्मनी, कॅनडा, ब्रिटन, अमेरिका हे आहेत.


दोन देशातील संबंध बिघडण्याला सर्वस्वी कॅनडा जबाबदार
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानं भारत आणि कॅनडातील राजनैतिक संबंध तणावाचे बनले आहेत. कॅनडानं या हत्येमागं भारताचा हात असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. परंतू निज्जर दोन्ही हातात एके ४७ घेऊन उघड उघड गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.  म्हणजे तिथे अशी शस्त्रास्त्रे सहजपणे उपलब्ध होत आहेत. गुरपतवंत सिंग पन्नून याने कॅनडा मध्ये आवाहन केले आहे की सर्व हिंदूंनी कॅनडा सोडून जावे. हे जे चालू आहे ते म्हणजे तेथील शीख लोकांचा यांना पाठिंबा आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण तेथील फार कमी लोक त्यांच्या बाजूने उभे राहतील. गेल्या अनेक वर्षांपासून हे शीख लोक जे कॅनडात स्थायिक झाले आहेत, ज्यांनी शेती करून पैसे मिळवले आहेत त्यांची New Democratic Party आहे. त्याचे 28 खासदार आहेत. ते तेथील गुरुद्वारा मध्ये एकत्र झालेले पैसे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुड्रो यांना देतात. त्यांच्या पाठिंब्यावर टुड्रो पंतप्रधान म्हणून टिकून आहेत.  त्यामुळे हे लोक जे बोलतील त्याला टुड्रो पाठिंबा देत आहेत.  शिखांच्या बाबतीत पुष्टीकरण करण्याचे टुड्रो यांचे धोरण आहे. प्रत्यक्षात हे संघटित गुन्हेगारी करणार्‍यांना मदत करणारे आहे जे खुद्द कॅनडाला सुद्धा जड जाणार आहे. पाकिस्तानमध्ये या गोष्टी चोरीछुप्या चालू आहेत. मात्र कॅनडा मध्ये हे राजरोसपणे सुरु आहे. त्यांचा नुसताच ह्या अतिरेकी शिखांना पाठिंबा आहे असे नाही तर ते त्यांना प्रोत्साहन पण देत आहेत. या गुह्नेगारांच्या कारवायाची माहिती भारताने कॅनडाला अनेकवेळा दिली आहे आणि यावर कारवाई करा असेही सांगितले. पण त्यावर ते काहीच करत नाहीत. त्यामुळे संबंध बिघडले आहेत. या दोन देशातील संबंध बिघडण्याला सर्वस्वी कॅनडाच जबाबदार आहे.           

  कॅनडातील भारतीयांच्या रक्षणासाठी सतर्कता
        कॅनडामधील वाढत्या भारतविरोधी कारवाया, राजकीयदृष्ट्या प्रेरित गुन्हे, गुन्हेगारी, हिंसाचारामुळे सध्या कॅनडामध्ये राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांनी तसेच प्रवासाचा विचार करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला केंद्राच्यावतीने देण्यात आला आहे. अलीकडे भारतविरोधी अजेंडा चालवणाऱ्या लोकांकडून भारतीय मुत्सद्दी आणि तेथे राहणाऱ्या भारतीय समुदायाला धमक्या दिल्या जात आहेत. भारतीय नागरिकांना कॅनडातील ज्या भागात अशा घटना घडल्या आहेत अशा ठिकाणी प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कॅनडामधील भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी भारताचे उच्चायुक्त/ वाणिज्य दूतावास कॅनडाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. कॅनडातील बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांना उच्चायुक्त/ वाणिज्य दूतावासांमधे नोंदणी करण्यास सांगितले आहे. वर्षानुवर्षे   कॅनडात राहणारे  हे सगळे लोक जरी हिंदू असले तरी ते कॅनडाचे नागरीक/ स्थायिक आहेत. त्यांना प्रत्यक्ष संरक्षण देणे हे शक्य नाही. मात्र संयुक्त राष्ट्र संघासारख्या आंतरराष्ट्रीय संघटना व इतर मित्र राष्ट्रे त्यांच्या संरक्षणासाठी कॅनडावर दबाव आणतील.


सध्याच्या सरकारकडून सावरकरांच्या विचारांचे अनुकरण
वीर सावरकरांनी जे सांगितले ते आजही लागू पडत आहे. कारण कॅनडासोबत निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देताना वीर सावरकरांच्या विचारसरणीचा भारत सरकार अवलंब करत आहे. वीर सावरकरांचे विचार अतिशय वास्तववादी होते आणि आपले सरकारही त्याच मार्गाने जात आहेत. कारण कॅनडाला समजणारी भाषा अशीच आहे. त्यासाठी आपण आर्थिकदृष्ट्या सबळ असणे गरजेचे आहे.  भारताने आधुनिक तंत्र शस्त्र यांनी सुसज्ज असावे हीच वीर सावरकरांची मागणी होती. या लोकांना जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीला उत्तर देण्याची ताकद भारताकडे आहे. तरच तुमच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिम्मत होऊ शकत नाही. हे सावरकरांचे मूलभूत चिंतन आहे. त्यामुळे सावरकरांच्या विचारातील तथ्य आता भारत सरकार अंमलात आणत आहे.  

————————————————————-   ——————————————–

Articles

पोलिसांवरील ताण व त्यासाठी उपाय

By on September 19, 2023

पोलिसांवरील ताण व त्यासाठी उपाय

प्रवीण दीक्षित

पोलीस महासंलक(निवृत्त)

देशात कायदा व सुव्यवस्था चांगली रहावी, शांतता असावी व त्यातून जनसामान्यांना स्वतःचा व राष्ट्राचा विकास करता यावा ह्या उद्देशाने शासनाने पोलीसदलाची निर्मिती केली आहे. परंतु प्रत्येक समाजात अनेक कारणांमुळे गुन्हे करणारे, समाजामधे धर्म, जात, प्रांत, भाषा, लिंग अशा अनेक कारणांनी असंतोष निर्माण करणारे, दंगली घडवू आणणारे व त्यातून आपला राजकीय स्वार्थ पूर्ण करणारे अनेकजण असतात. अशा ह्या समाजविघातक, राष्ट्रद्रोही व्यक्तींचा समाजातील सामान्य नागरिक फारसा विरोध करू शकत नाहीत. त्यांना संघटितपणे, कायद्याच्या आधारे, त्यांनी सभ्यपणाचा घातलेला बुरखा दूर करून न्यायालयापुढे सादर करणारे व त्यांना नयायालयामार्फत शिक्षा करणारे पोलीस दल आवश्याक आहे व ते पोलिसांचे  आद्य कर्तव्य आहे. परंतु पोलीसांच्या कामामधे ढवळाढवळ करणे, गुन्हेगारांना, समाजविरोधकांना पकडू न देणे, पकडले असल्यास त्यांना सोडायला लावणे, गुन्हेगारांना कायद्यातील पळवाटा शोधून शिक्षा होऊ न देणे ह्यासाठी समाजाील अनेक घटक हे हिरिरीने प्रयत्न करताना दिसतात. पोलीसांचे मनोधर्य खच्ची करणे, त्यांनी केलेल्या कर्तव्याबद्दल त्यांना निलंबित करणे, त्यांना पदोन्नती मिळू न देणे ह्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. स्वतःची मनमानी चालू ठेवता यावी हयासाठी स्वतःच्या हातचे बाहुले होऊन वागणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना आपल्या जवळच्या पोलिस ठाण्याच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यासाठी स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणणार्‍या अनेक व्यक्ती काम करत असतात. आपण केलेल्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष व्हावे व आपल्याराजकीय विरोधकांना कायद्याच्या माध्यमातून त्रास देता यावा ह्यासाठी ह्या पोलीस अधिकार्‍यांचा वापर केला जातो. आपल्या मनाविरुद्ध व कायद्याप्रमाणे वागणार्‍या अधिकार्‍यांना वेळोवेळी बदलून त्यांना अकार्यकारी व कमी महत्त्वाच्या पदांवर तडकाफडकी बदलले जाते. पोलीसांचा पाणउतारा करण्यासाठी बदली व निलंबन ही दोन शस्त्रे प्रामुख्याने पाजळली जातात.

ह्याशिवाय समाजातील गुन्हेगार व्यक्ती वाहतुकीचे नियम पाळायला सांगणार्‍या पोलिसांवर हल्ले करतात. गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या पोलीस चमूवर जीवघेणा हल्ला करून त्यांना पळवून लावले जाते वा ठार मारले जाते. अनेक गुन्हेगारांनी बेकायदेशीररीत्या जमवलेल्या पैशातून अनेक सिनेमे काढले आहेत; ज्यात पोलीसांचा पांडु हवालदाार, नेभळट, लाचखोर, लाचार अशाप्रकारे वर्णन केले जाते. ह्या सर्व गोष्टींमुळे पोलीसांचे मानसिक खच्चीकरण व्हावे हा उद्देश असतो. 

पोलीसांना आवश्यक अशी सर्वसोयींनी युक्त सरकारी घरे निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन न देणे, असलेल्या घरांची डागडुजी न करणे ह्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे सारख्या महानगरातील पोलीसांना व त्यांच्या कुटुंबियांना अत्यंत खराब स्थितीत जगावे लागते. रोज 12 तास काम, सुट्टी मिळण्याची कमी शक्यता ह्यामुळे पोलिस कर्मचार्‍यांचे आरोग्य धोक्यात येते व ते व्यसनाधीन बनतात. वेळच्यावेळी जेवण न मिळणे, शांत झोप न मिळणे, व्यायाम करायला सोयी नसणे ह्याचा परिणाम होऊन पोलिसांना सतत ताणतणावात दिवस काढायला लागतात.   

ह्यावरील उपाय म्हणून पोलीसांच्या कामाच्या वेळा कमी करणे, जिथे काम असेल त्या ठिकाणीच त्यांची राहण्याची, व्यायामाची, झोपायची सोय करणे, त्यांच्या कुटुंबियांसाठी सुरक्षित ठिकाणी आवश्यक त्या सोयींनीयुक्त घरे बांधणे गरजेचे आहे. त्याशिवाय पोलीसांची टिंगल टवाळी करणार्‍या सिनेमांवर समाजाने जाहीर बहिष्कार घालणे, पोलीसांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी प्रत्येक सक्षम स्त्री-पुरुष यांनी पुढे येऊन पोलीस-मित्र म्हणून काम करणे जरुरीचे आहे. येणार्‍या गणपती, मोहरम, नवरात्र उत्सव ह्यासाठी पोलिसांनीही पोलीस मित्रांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. लोकांनीही त्यात समजूतदारपणा दाखवणे जरूरीचे आाहे. राजकीय नेतृत्त्वानेही पोलीसांच्या कायदेशीर कामामध्ये ढवळाढवळ न करणे, पोलीसांची बदली अथवा निलंबन दबावाखाली न करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पोलीसांनाच मदत होईल असे नव्हे तर समाजाला व राष्ट्रालाही जगात विकसित देश बनविणे शक्य होईल.

———————————————