ब्राह्मण अविकसित आहेत का?
ब्राह्मण अविकसित आहेत का?
प्रवीण दीक्षित
माजी पोलीस माहासंचालक, महाराष्ट्र
स्वातंत्र्यपूर्वकाळामधे आपल्या समाजातील अनेक नामवंत व्यक्तींनी राजकीय, आर्थिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांमधे बहुमोल कामगिरी करून, केवळ आपल्या जातीबांधवांनाच नव्हे तर जातीची बंधने ओलांडून देशातील सर्व समाजाला फार मोठे मार्गदर्शन केले होते. दुर्देवाने गांधीहत्येनंतर विनाकारण ब्राह्मण समाजातील शेकडो कुटुंबांना आपल्या घराची व सम्पत्तीची राखरांगोळी होतांना पहावे लागले; त्यामुळे प्रसिद्ध कादंबरीकार व आनंदीगोपाळचे लेखक श्री. ज. जोशी ह्यांनी म्हटल्याप्रमाणे सर्व ब्राह्मण समाज हा स्वयंकेंद्री झाला व त्याने अन्य समाजातील लोकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे सोडून दिले. ह्याचा परिणाम म्हणून समाजातील हजारो तरूण तरूणी देश सोडून इतर राष्ट्रांमधे गेले व तिथे त्यांनी स्वतःचे अत्युच्च यशाचे शिखर पादाक्रांत केले. ब्राह्मणांवरील शारीरिक हल्ले जरी आता फारसे होत नसले तरीही त्यांना नावे ठेवायचे, शाब्दिक टोमणे मारायचे आणि विनाकारण त्यांची निंदानालस्ती करायची हा स्वतःला नेते म्हणविणार्या अनेक व्यक्तींचा गेली अनेक दशके लाडका उद्योग आहे. अन्य वर्णीयांना सतत ब्राह्मणांविरुद्ध खरे खोटे सांगत राहून ब्राह्मणांनी आमच्यावर अत्याचार केले अशी आवई कोणत्याही पुराव्यांशिवाय उठवत राहणे ह्याच्यामधेच त्यांना आनंद मिळत असतो. दुर्दैवाने ह्यामागे भारत तोडो हा परकीय शक्तींचा कुटिल डाव आहे व त्याला काही लोक बळी पडत आहेत.
परंतु ह्या सतत होणार्या उपेक्षेने किंवा ब्राह्मणांना होणार्या सर्व प्रकारच्या विरोधाने किंवा पारंपारिक व्यवसायाला खीळ बसल्याने प्रचंड गरीबीला न घाबरता ब्राह्मण समाजाने आपली मूल्यांवरील श्रद्धा ही सतत मनःपूर्वक जपली आहे. मिळेल त्या विषयाचा सखोल अभ्यास करणे, त्यातही आपली अस्मिता, भाषा, संस्कृती, परंपरा आणि विचार जपणे आणि वाढवत राहणे, कोणतेही काम हे हलके किंवा निषिद्ध न समजता प्रामाणिकपणे कौशल्याने, सचोटीने करत राहणे ही ती मूल्ये आहेत. त्यात महिला असोत वा पुरूष; मुले असोत वा वृद्ध, स्वतःचा स्वाभिमान राखून, एकमेकांना मदत करून परंतु कोणाकडेही तोंड न वेंगाडता कुठल्याही प्रकारे गुन्हेगारीच्या मार्गाला न जाता, फसवाफसवी न करता ब्राह्मण समाज वाटचाल करत आला आहे व ती अव्याहत चालू आहे. वेळ पडल्यास वाराने दुसर्यांकदे जेवून, एकवेळ उपाशी राहून अनेकांनी विद्याभ्यास पूर्ण केला व अपल्या अनेक नातेवाइकांना शिक्षण पूर्ण करण्यास मदत केली. कोणत्याही प्रकारे आरक्षणाचा फायदा नाही, किंवा शिष्यवृत्या नाहीत तरीही ब्राह्मण समाजातील अनेक मुले, मुली यांनी मोठमोठ्या पदव्या मिळवल्या आहेत व ज्ञानसमृद्धी केली आहे.
आजही ब्राह्मण समाजातील काही व्यक्ती अत्युच्च पदी पोचलेल्या असल्या तरी आपले हजारो जातीबांधव हे निम्न मध्यमवर्गीय ह्या स्तरात मोडतात व त्यांच्यासाठी यशाच्या संधी अजून उपलब्ध व्हायच्या आहेत. हे आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ही मुले मुली आम्हाला मदत करा असे म्हणणार नाहीत तरीही जे आपल्या व्यवसायात यशस्वी झाले आहेत त्यांनी आपल्या यशाची गुरुकिल्ली ह्या मुलांसाठी उघड करणे आवश्यक आहे. भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकार ह्यातल्या अनेक विभागांमधे दरवर्षी हजारो व्यक्तींची स्पर्धा परीक्षा घेऊन भरती केली जाते. ह्या संबंधीची माहिती आज आंतर्जालाच्या मार्फत सर्वांना आपल्या टिचकीवर उपलब्ध आहे. केवळ भारत सरकारचाच विचार केला तर, सीमासुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल हया सारख्या सहा केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांनी मागील पाच वर्षात दोन लाख लोकांना रोजगार दिला आहे. ह्या शिवाय येणार्या 18 महिन्यात 10 लाख युवकांना रोजगार देण्याचा मोदी शासनाने निश्चय केला आहे. महाराष्ट्रातही 75 हजार युवकांना लवकरच रोजगार देणार असल्याचे महाराष्ट्राचे नेते व ब्राह्मण असलेल्या देवेंद्र फडणवीस ह्यांनी जाहीर केले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही रोजगार व शिक्षण ह्यात आर्थिक मागास व अन्य कोठलेही आरक्षण नसलेल्या अशा गरिबांसाठी 10% आरक्षण घटनेस अनुसरून आहे असा ऐतिहासिक निकाल दिला आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी युवकांनी पुढे यावे. महाराष्ट्र सरकारने अमृत अर्थात महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी संस्था हयाला मान्यता दिली आहे. त्याची कार्यवाही लवकरच सुरू होइल. ह्या संस्थेमार्फत ब्राह्मण समाजातील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अमृतची स्थापना करण्यात आली आहे. ब्राह्मण तरुणांना स्पर्धा परिक्षेत मदत दे्ण्याचा अमृतचा निर्धार आहे.
सनदी सेवांसाठी तरूण विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शनाची `स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर’ येथे सर्व प्रकारची तयारी करून घेतली जाते. आवश्यक त्या विषयांच्या टिप्पणी, प्राथमिक परीक्षा, लेखी परीक्षा, मौखिक परीक्षा ह्यांची तज्ज्ञांकडू तयारी करून घेतली जाते. महेश कुलकर्णी (9820364243) हे वरील काम निष्ठेने करीत आहेत. अशाच प्रकारे स्पार्क संस्था (9823298147) पुण्यात निःशुल्कपणे काम करीत आहे. व्यवसायातही आज अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याचा आपण फायदा घेला पाहिजे.
माझ्या वडिलांची मी शाळेत असतांनाच डोळ्यांनी दिसत नाही ह्या कारणासाठी नोकरी गेली. पण तरीही शाळेचे शिक्षण मी विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झालो. महाविद्यालयात व विश्वविद्यालयात गुणांमुळे नादारी मिळाली व पुणे विद्यापीठ येथून उत्तम गुणांनी पदवी घेतली. School of International Studies JNU येथून पदव्युत्तर अभ्यासक्रम शिष्यवृत्ती मिळवून पूर्ण केला. भारतीय पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर रोटरी क्लबतर्फे अमेरिकेतील Duke विद्यापीठातील School of Public Policy येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाली. यथावकाश मी पोलिस महासंचालक झालो व सर्वांना आनंद झाला.
तुम्ही जर प्रामाणिकपणे मन लावून अभ्यास केला असेल तर अनेक संधी तुम्हाला शोधत येतात व त्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता हे अधोरेखित करण्यासाठी मी हे उदाहरण सांगत आहे.तरूणांनी मिळणार्या प्रत्येक संधीचा आह्वान समजून स्वीकार करावा. येणार्या अडचणींवर मात करावी व आायुष्यात यशस्वी व्हावे ही माझी व सर्व ब्राह्मण समाजाची कळकळीची इच्छा आाहे. ब्राह्मण अविकसित नसून ते स्वत;बरोबर सर्वांचा विकास घडवणारे आहेत.
—————— ——————– ——————