Author:

Praveen Dixit

Articles

अमली पदार्थांवर अंकुश हवा

By on February 28, 2024

दखल
अमली पदार्थांवर अंकुश हवा


                – प्रवीण दीक्षित,

निवृत्त पोलिस महासंचालक


              अलिकडेच पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानी अशी ओळख मिरवणार्‍या शहरात अमली पदार्थांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. या कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुक करायला हवेच, मात्र इतयया राजरोसपणे असे देशविघातक कृत्य सुरू असते आणि ते संबधित यंत्रणांच्या लक्षातही येत नाही, ही बाब मात्र न पटणारी आहे. आज देशातच नव्हे तर जगभर व्यसनाधिनता वाढत असताना अशा गोष्टींवर अंकुश ठेवायलाच हवा.


                अलिकडेच पुणे पोलिसांनी अमली पदार्थांचा मोठा साठा हस्तगत केला. त्याचे बाजारमूल्य जवळपास सदतीसशे कोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेच्या निमित्ताने एकूणच हा विषय ऐरणीवर आला असून त्यावर गांभीर्याने चर्चा होण्याची गरज आहे.


                या सगळ्याचा सूत्रधार एक विदेशी पारपत्र धारक असून त्याला काही वर्षांपूर्वीच नर्कोटियस ब्युरोने अटकही केली होती. अशी पार्श्‍वभूमी असणार्‍या या व्यक्तीने पुन्हा एकदा भारतात प्रवेश केला आणि इथल्या काही उद्योजकांच्या मदतीने पुण्याजवळील कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीमध्ये तयार अन्न घटक बनवण्याचा उद्योग सुरू केल्याचे दाखवले. प्रत्यक्षात त्याठिकाणी अमली पदार्थ मोठ्या प्रमाणावर तयार होत होते. नंतर मोठ्या प्रमाणात बाजार असणार्‍या दिल्ली सारख्या ठिकाणी तो माल साठवला जात होता. एवढेच नव्हे तर हा माल इंग्लडपर्यंत पाठवण्याचा उद्योगही सुरू होता. हे सगळे लक्षात घेता पुन्हा असे प्रकार होऊ नयेत या हेतूने पुढील काळात काही खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. त्यातील पहिली बाब म्हणजे पूर्वी अशास्वरुपाची कारवाई ज्याच्यावर झाली आहे, अशा त्या विशिष्ट गुन्ह्याची पार्श्‍वभूमी असणार्‍यांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे, कारण हे लोक शिक्षा भोगूनही पुन्हा पुन्हा त्याच त्याच प्रकारचे गुन्हे करत असतात. दुसरे म्हणजे अमली पदार्थांसंदर्भात कार्यरत असणार्‍या वा तशी पार्श्‍वभूमी असणार्‍या परदेशी व्यक्तींवर भारताच्या परराष्ट्र खात्याने, गृहखात्याने ते आपल्या देशात कधीही परत येणार नाहीत, यादृष्टीने उच्चायुक्त, दूतावास, विमानतळे अशा सर्व ठिकाणी तशा सूचना देणे गरजेचे आहे. हे लोक भारतात येऊन तेच गुन्हे करतात आणि देशाची सुरक्षा धोक्यात येते. म्हणूनच ही दक्षता घ्यायला हवी. आता सुदैवाने चांगल्या प्रकारची संपर्क यंत्रणा सर्व विभागांना उपलब्ध आहे. त्याचा पूर्ण उपयोग करुन अशा गुन्हेगारांबद्दलची अद्ययावत माहिती सर्व संबंधितांना पोहोचली आहे की नाही, हे पाहणे गरजेचे आहे. तुरुंगविभागाकडून गुह्नेगार सुटण्याच्या माहितीचाही यात अंतर्भाव असावा. यामुळे तुरुंगात कोणता गुन्हेगार सुटला वा कोणता सुटणार आहे, त्याच्यावरील गुन्ह्याचे स्वरुप काय हे आधीच संबंधित यंत्रणांना समजले तर योग्य ती खबरदारी घेणे शक्य होईल. विमानतळ, दूतावास आदी ठिकाणी ही माहिती पोहोचली तर विमान तळावरील अधिकारी त्यांचे काम करुन गुह्नेगारांकढून होणार्‍या देशविघातक कृत्यांना वेळीच पायबंद घालू शकतील.

 
                  देशात वा राज्यात इतयया मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ सापडण्याची ही काही पहिलीच घटना नाही. ठिकठिकाणच्या औद्योगिक वसाहतींमध्ये असे प्रकार पूर्वीही उघडकीस आले आहेत. एक म्हणजे या वसाहती मुख्य जिल्हा, गाव वा शहरांपासून दूरच्या भागात विकसित केल्या जातात. ओसाड प्रदेशातच एमआयडीसी काढल्या गेल्या आहेत. त्यामुळेच आजूबाजूला तशीही फारशी वस्ती नसते. सहाजिकच अशा एरवी फारशी वर्दळ नसणार्‍या भागांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना हव्या त्या देशविघातक कारवाया करण्यासाठी शासनाच्या मदतीने मोकळे रान मिळाले असल्यासारखे चित्र निर्माण होते. खरे तर प्रत्येक औद्योगिक वसाहतीचे अधिकारी असतात, अन्न व औषधी प्रशासन अधिकारी असतात वा कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घेणारेही अधिकारी असतात. प्रत्येक औद्योगिक वसाहतीचे चेंबर ऑफ कॉमर्स असते. या सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या परिसरातील प्रत्येक उद्योग काय करतो याची सविस्तर चौकशी दर महिन्याला करणे गरजेचे आहे. आज ही चौकशी होत नसल्यामुळे या लोकांना मोकळे रान मिळाले असून आज त्यातील काही ठिकाणे देशविघातक कृती करण्याची केंद्र झाली आहेत. त्यामुळेच आधी उल्लेख केल्याप्रमाणे औद्योगिक वसाहतींचे प्रमुख, उद्योग सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक,  प्रत्येक जिल्ह्यातील अधिकारी या सगळ्यांमध्ये समन्वय असण्याची आवश्यकता आहे. या अधिकार्‍यांनी कोणत्या कारखान्यांना भेट दिली, तिथे काय सापडले, त्यात शंका घेण्यास जागा आहे का? या सगळ्याबाबतची सविस्तर माहिती ऑनलाईन पद्धतीने मंत्रालय, पोलिस महासंचालक आणि इतर संबंधित अधिकार्‍यांकडे वेळच्या वेळी पाठवली तर मोठे धोके टाळणे सहज शयय होईल.
बरेचदा अशा धंद्यांमध्ये वा अमली पदार्थांच्या उत्पादनामध्ये अनेकांचा सहभाग असूनही ही माहिती सहजासहजी बाहेर पडताना दिसत नाही. इथे यामागील कारणांची मीमांसाही व्हायला हवी. त्यातील पहिली बाब म्हणजे या कारखान्यांमध्ये काम करणार्‍या लोकांना भरपूर पैसे दिले जातात. सहाजिकच त्यांना ठराविक टक्केदारी दिली आणि पैशाची चटक लावली की तयार मालाचे पुढे काय होते, याच्याशी त्यांना काहीही देणेघेणे राहत नाही. खेरीज आपण एखादी देशविघातक गोष्ट करत आहोत, हे त्यातील काहींना कळतही नाही. म्हणजेच हे काम सगळे जाणूनबुजून करतात असेही म्हणता येत नाही. सहाजिकच यातून देशाचे काय आणि किती नुकसान होणार आहे, हे खूप थोड्या लोकांना ठाऊक असते. या पूर्ण चेनमध्येही बरेच भाग असतात. त्यामुळेही सगळ्यांकडेच याचा दोष जात नाही. मात्र इथे काही गैरव्यवहार होत नाही ना, हे पाहण्याची जबाबदारी असणार्‍यांवर मात्र दुर्लक्ष केल्याच्या कारणाखातर शासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.

 एकाबाजूला मी पुणे पोलिसांच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करुन त्यांचे अभिनंदन करेन, पण त्याचबरोबर संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करण्याचा आग्रहही धरेन. कोणीही पुढे अशाप्रकारचे दुर्लक्ष करण्यास धजावणार नाही यासाठीची यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, अशा भागांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे शक्य आहे. नेटवर्किंगमधून महत्त्वाची माहिती मिळू शकते. शेवटी उपलब्ध तंत्रज्ञानाचा फायदा घ्यायला हवा.
शेवटी असे गैरव्यवहार काही एका दिवसात झालेले नसतात. गेले काही महिनेच नव्हे तर वर्षानुवर्षे ते सुरू आहेत. त्यामुळेच याची जबाबदारी झटकणे देशासाठी योग्य नाही. यामुळे देशाच्या सुरक्षेचाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होतो. आज आंतरराष्ट्रीय पातळीवरुन अमली पदार्थ्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारांची दखल घेतली जात असली तरी हे खूप मोठे मार्केट असल्याचे नाकारुन चालणार नाही. इंग्लड, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियासारख्या विकसित म्हटल्या जाणार्‍या देशांमध्येच आज ड्रग्जचा प्रचंड प्रमाणात खप होतो आहे. इथे त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळेच यावरही बारकाईने लक्ष ठेवून, त्यांच्याकडे असणारी माहिती जाणून भारतातीलल त्यांना मदत करणार्‍यांवर कठोर कारवाईचे शस्त्र परजायला हवे.


                 कितीही कठोर कायदे केले तरी गुन्हेगार अनेक पळवाटा शोधत असतात. अमली पदार्थांचे तस्करी करणारेही अनेक मार्गांनी देश विघातक कृत्ये करत असतात. त्यासाठी अनेक चांगल्या योजनांचा गैरवापरही केला जातो. वारंवार होणार्‍या तपासण्यांमुळे यास आळा घालणे शयय होईल. दुसरे म्हणजे सध्या घराघरात नवरा-बायको दोघेही कामानिमित्त बाहेर पडतात. सहाजिकच मुलांकडे, त्यांच्या सवयींकडे, वागण्यातील बदलांकडे तितकेसे लक्ष जातेच असे नाही. अलिकडेच नाशिकमध्ये घडलेली एक घटना हे सत्य समोर मांडणारी आहे. तिथे एका शाळेत चौदा वर्षाच्या मुलीकडे ई सिगारेट सापडली. सहाजिकच मुख्याध्यापकांनी तिच्या पालकांना ही बाब कळवली. हे मुलीला समजल्यानंतर तिने आत्महत्या केली. म्हणजेच नाशिकसारख्या ठिकाणी एखादी चौदा वर्षांची मुलगी व्यसनाच्या इतयया आहारी गेली असेल, तर वास्तव किती भीषण आहे हे आपण समजून घ्यायला हवे. ड्रग्जचे लोण किती खोलवर पोहोचलेले आहे हे जाणून वेळीच लक्ष दिले तर हा प्रश्‍न काही अंशी नियंत्रणात राहू शकेल. बरेचदा आपले मूल व्यसनाधिन झाले आहे, हे पालक मान्यच करत नाहीत. मुलांनी पैसे चोरण्याच्या घटनेकडेही आजकाल दुर्लक्ष होताना दिसते. ही बाबही धोक्याचीच आहे. म्हणूनच प्रत्येक पालकाने जागरुक राहणे गरजेचे आहे.
अफगाणिस्तान, पाकिस्तान वा म्यानमार सारख्या देशांमधून अमली पदार्थांच्या पुरवठ्यामार्गे एक प्रकारचे छुपे युद्ध खेळले जात आहे. त्यामुळेच कधी काश्मीर, पंजाब, गुजरात, मणिपूर तर कधी महाराष्ट्रा सारख्या भागात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे साठे सापडतात. गेली तीस वर्षे पाकिस्तान ड्रोन, बोटी, सुरुंग, स्त्रिया आदींच्या मदतीने भारतात अमली पदार्थ पोहोचवत आहे. हे लक्षात घेऊन ड्रग्जविरोधातील ही लढाई भारत-पाकिस्तान वा भारत-अफगाणिस्तानमधील लढाई इतक्याच गांभीर्याने घेण्याखेरीज पर्याय नाही. केवळ भारताच्या आजूबाजूचे नव्हे तर अगदी दक्षिण अमेरिकेमधील काही देशांमध्येही प्रचंड प्रमाणावर अमली पदार्थांना आवश्यल असणार्‍या मालाचे उत्पादन होते. हाच माल कंटेनरमध्ये भरुन समुद्रमार्गे जगभर पोहोचवला जातो. तसाच तो भारतातही येतो आणि इथून अन्यत्रही पोहोचवला जातो. त्यामुळे यावरही काळजीपूर्वक लक्ष ठेवून दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे. तरच पुढली पिढी या संकटापासून सुरक्षित राहू शकेल.

Articles

भगवद्गीता माहात्म्य

By on February 19, 2024

भगवद्गीता माहात्म्य

प्रवीण दीक्षित

2 फेब्रुवारी 2024

श्री गीता मंजुषा मंथन पुष्प हा उपक्रम गेले 23 महिने सातत्याने भाण्डारकर प्राच्य विद्या संशोधन संस्स्थेत चालवल्याबद्दल आदरणीय लीना मेहेंदळे, सुनीता फडके व त्यांचे सहकारी ह्यांचे मी सुरवातीसच अभिनंदन करतो व त्यांना पुढील पुष्पांसाठी सुयश चिंतितो.  ह्या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेण्यासाठी नवीन पिढीतील तरुणांना प्रोत्साहन देणार्‍या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. सध्या मुलांच्या पुढे असणार्‍या विविध आकर्षणांमधून त्यांना गीतेची गोडी लावणे ही मोठी दुरापास्त गोष्ट आहे. प्रत्येक पुष्पामधे विविध प्रश्न तयार करणे त्यातून मुलांमधे गीतेचे ज्ञान, त्यातील व्याकरणाची माहिती वाढवणे हे गीतेवर निष्ठा असल्याशिवाय होणे शक्य नाही. हा उपक्रम तरुण सहकार्‍यांनी पुढे येऊन यशस्वी करणे जरूरीचे आहे.

प्रत्यक्ष भगवंतांनी सांगिल्याप्रमाणे ईश्वर प्राप्तीसाठी कृष्ण व अर्जुन यांच्यात झालेला संवाद ह्यांचा जो अभ्यास करतो, त्या ज्ञानयज्ञामुळे त्यांची ती इच्छा खात्रीपूर्वक पूर्ण होते. एचढेच नव्हे तर श्रद्धा असणार्‍या व मत्सर नसणार्‍या व्यक्तीने नुसती गीता ऐकली तरीही त्याला सुद्धा तेच फळ मिळू शकते.

आजपर्यंत भगवद् गीतेवर आद्य श्रीशंकराचार्य, ज्ञानेश्वर माउली, लोकमान्य टिळक यांच्यासह अनेकांनी भाष्य केलेले आहे, ज्ञान योग, ध्यान योग, कर्म योग, भक्ती योग हे कल्याणाचे साधन आहे व आपल्या आवडी प्रमाणे, श्रद्धे प्रमाणे, यो्ग्यते प्रमाणे त्याचा वापर करून प्रत्येकजण आपला उद्धार करून घेऊ शकतो. ज्ञाानेश्वर माउलींनी म्हटल्याप्रमाणे-

साचचि बोलाचें नव्हे हें शास्त्र

पैं संसारु जिणतें हें शास्त्र

आत्मा अवतरिते मंत्र

अक्षरें इयें (अध्याय 15 वा ओवी 577)

अर्थ –

खरेच नुसते बोलण्याचे

हे शास्त्र नाही वाचे

संसाराशी जिंकण्याचे

समर्थ शस्त्र आहे हे

किंवा अर्जुना जाण बा रे

गीता म्हणजे मंत्राक्षरे

ज्याच्या जपाने अवतरे

आत्मा पुढती प्रत्य़क्ष

(प्रा अनंतराव आठवले कृत अनुवाद ज्ञानेश्वरी अध्याय 15 ओवी 577-578)

गीता महात्म्याबद्दल सांगताना ज्ञाानेश्वर माउली म्हणते

ऐसिया शते सात श्लोकां

परी आगळा येकयेका

आता कोण वेगळिका

वानावा पां (अध्याय 18 वा ओवी 1677)

गीतेतला प्रत्येक श्लोक व त्याचा अर्थ एकाहून एक वरचढ आहे त्यामुळे त्यातला अमुक मोठा व अमुक लहान असा फरक करणे शक्य नाही.

आज नास्तिकपणाच्या नावाखाली अर्जुनासारखा प्रत्येकजण किं कर्तव्य मूढ झालेला दिसतोय. मानसिक रोगाने लोक त्रस्त झालेले आहेत. नैराश्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत. व्यसनाधीन होत आहेत. विषयासक्त होऊन, हे शरीर म्हणजेच मी अशा मायाजालात गुरफटलेले आहेत.

स्थितप्रज्ञ, गुणतीत होऊन कर्मफळाचा त्याग करून अहंकार न ठेवता जो उत्कृष्टपणे, स्वधर्माने सांगितलेले काम करतो त्यालाच मनःशांतता लाभते. तुमच्या मनातील परमेश्वर जसे तुम्हाला वागवतो तसे ईश्वरावर श्रद्धा ठेवून तुम्ही वागत राहिलात तर नक्कीच ही मायानदी तरून जाण्याची शक्यता आहे.

गीताशास्त्रमिदं पुण्यं यः पठेत्प्रयतः पुमान्

विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः

अर्थ

जो रोज सकाळी पुण्यकारक गीता वाचतो, त्याची भीती, दुःख नाहिसे होऊन त्याला विष्णुपद प्राप्त होते.

एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो.

जय कृष्ण.

 

 

 

 

 

 

 

Articles

दखलशस्त्रे नेमकी कशासाठी?

By on February 15, 2024

दखल शस्त्रे नेमकी कशासाठी?


                   प्रवीण दीक्षित,

 निवृत्त पोलिस महासंचालक


              अलिकडे महाराष्ट्र गंभीर घटनांनी हादरुन गेला. शस्त्रांचा वापर करत केलेले जीवघेणे हल्ले हे काहींना संपवून तर काहींना जखमी करुन गेले. मात्र मुंबई, ठाणे, पुणे, उल्हासनगर आदी ठिकाणच्या घटना पाहता त्यामागे वैयक्तिक कारणे आणि वैमनस्य दिसून येते. त्यामुळे त्याला टोळीयुद्ध म्हणण्याचे वा समजण्याचे कारण नाही. अर्थात या निमित्ताने शस्त्र परवाना धोरण वा शस्त्रांची हाताळणी या विषयावर मात्र पुन्हा विचार करावा लागेल.


                मुंबई, ठाणे, पुणे,नागपूर आदी महानगरांमध्ये तसेच इतरत्रही परवानाधारक शस्त्रातून गोळीबाराच्या घटना घडत असून, ती चिंतेची बाब आहे. यातून कुठे मृत्यू तर कोणी जखमी होण्याच्या बातम्या वारंवार कानावर पडत आहेत. यास कुठलेही शहर अपवाद नाही. त्यामुळेच हल्लेखोरांकडे इतयया सोयिस्कर पद्धतीने शस्त्रे येतात कशी हा विचार मनात येतो. आपल्याकडे शस्त्र कायद्यानुसार जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी तसेच पोलिस आयुक्तालय असेल तिथे पोलिस आयुक्त यांना शस्त्र परवानगी देण्याचे अधिकार आहेत. यामध्येही जिल्हाअंतर्गत जिल्ह्याबाहेर असे दोन प्रकार आहेत. आधी शस्त्रे बाळगण्यासाठी संबंधित अर्जदाराने दिलेले कारण तसेच त्याच्या जीवाला असणारी भीती याबाबत पडताळणी केली जाते. चौकशीअंती ठरावीक काळासाठी परवाना मिळतोवेळोवेळी त्याचे नूतनीकरण करावे लागते. परवानाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांनाही परवाना सहज मिळू शकत नाही. त्यांनाही सर्व प्रक्रिया पार करूनच परवाना दिला जातो. ही झाली शस्त्रे बाळगण्याची कायदेशीर पद्धत.

 मात्र, माफियांना गावठी, विदेशी पिस्तूल बेकायदेशीर मार्गाने सहज उपलब्ध होताना दिसत आहेतबंदुकीच्या धाकाने उद्योजक, व्यावसायिकांसह विविध क्षेत्रातील मंडळींना खंडणीसाठी धमकावले जाते. याच भीतीतून स्वसंरक्षणासाठी ही मंडळी शस्त्र परवान्याची मागणी करतात. दुसरीकडे माफिया, खंडणी मागणारे, दहशतवादी, माओवादी यांना बहुतांश शस्त्र चीन आणि पाकिस्तान सीमेपलीकडून मिळताना दिसतात. पाकिस्तानने तर उघड उघड ड्रोनच्या मदतीने देशविघातक शक्तीपर्यंत शस्त्र पुरवल्याचेही समोर आले आहे. 


                  हे लक्षात घेता अशा घटनांना आळा घालायचा तर बेकायदा येणारी शस्त्रे, त्यांचे माध्यम, ठिकाणे शोधून कठोर कारवाई करायला हवी. शस्त्र देणार्या अधिकार्यांनी गैरप्रकार केल्याचे आढळताच संबंधित जिल्हाधिकारी किंवा पोलिस आयुक्तांवर तातडीने कारवाई करायला हवी. जेणेकरून इतरांना यातून धडा मिळेल. सगळ्या गोष्टींचा विचार करून शासनाने शस्त्र परवाना धोरणात, काळाप्रमाणे योग्य ते बदल करण्याची वेळ आता आली आहे, हेच अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर सांगता येईल.
अर्थात एका जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये कडक धोरण राबवत शस्त्र परवाना देण्याचे ठरवले तरी, नागरिक दुसर्या मार्गाने भ्रष्टाचार करून तसेच त्यांना राजकीय दृष्टीने अनुकूल भागातून संपूर्ण देशामध्ये वापरता येईल असा शस्त्र परवाना मिळवतात. उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांमधून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी बरीचशी शस्त्रे मिळवली आहेत.काही वर्षांपूर्वी  काश्मीरमधून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून शस्त्र परववाने देण्यात आले होते राजकीय दबावाने अथवा भ्रष्टाचाराने ती मिळवली आहेत. ती देशभर कुठेही वापरण्याच्या परवान्याची असतात. आज हेच लोक ती घेऊन मुंबई सारख्या मोठमोठ्या शहरात वावरतात. म्हणूनच महाराष्ट्राबाहेरचे शस्त्रपरवाने काळजीपूर्वक तपासणे गरजेचे आहे. खेरीज कोणत्या जिल्हाधिकार्याने शस्त्र दिले हे जाणून घेऊन त्यांच्याकडेही चौकशी होणे गरजेचे आहे. कारण एखादी नोकरी मिळवण्यासाठी वा अन्य लाभ घेण्यासाठीही लोक शस्त्रपरवान्याची विनंती करतात. त्यामुळेच परवाने धारक व्यक्तीला खरोखरच स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगणे आवश्यकत आहे का? याची पुन्हा एकदा तपासणी व्हायला हवी. पूर्वी अशी तपासणी अवघड होती. मात्र आता तंत्रज्ञान बरेच पुढे गेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही आयुक्ताला दुसर्या राज्यातील आयुक्ताशी संपर्क करुन यासंबंधी माहिती घ्यावीशी वाटली तर फारसे अवघड नाही.
शस्त्रपरवान्याविषयीची माहिती आयुक्त वा जिल्हाधिकार्यांलाच ठाऊक असते. पण आता यात महत्त्वपूर्ण बदल घडणे गरजेचे आहे. तुम्ही शस्त्रपरवाना दिला तर तो स्थानिक पातळीवर आहे की संपूर्ण देशपातळीवरील आहे, यासंबंधीचा खुलासा तातडीने गृहमंत्रालय आणि सर्व जिल्हांच्या अधिकार्यांना कळवायला हवा. त्यासाठी भारत सरकारने एक पोर्टल तयार करणे गरजेचे आहे. ज्यावर सर्व शस्त्रधारकांची माहिती, त्यांचा आधार क्रमांक ही माहिती सहज मिळेल.  यामुळे कोणाकडे परवानाधारक शस्त्रे आहेत ही माहिती पारदर्शक पद्धतीने सर्वांना उपलब्ध होईल. राज्यवार, जिल्हावार अशी माहिती असेल तर अनेक गोष्टींची स्पष्टता होऊ शकेल. उदाहरणार्थ, एखाद्याकडे परवाना असणारे शस्त्र असेल आणि त्याने ते कोणा दुसर्याला दिले तर लगेचच तपासता येईल. सध्या अशी पडताळणी करणे वेळखाऊ आहे.  एखादे शस्त्र त्या धारकाचे आहे की नाही आणि ते परवाना असणारे आहे की नाही यासंबंधी कळणे सध्या अवघड आहे. मात्र माहितीमध्ये पारदर्शकता आवश्यक आहे. 


                 यासंदर्भातील आणखी एक बाब म्हणजे काही जमातींचा पारंपरिक व्यवसायच शस्त्र बनविण्याचा आहे. ते कुठलेही शस्त्र हुबेहूब बनवतात आणि सर्रास त्यांची विक्री करताना दिसतात. पाकिस्तानसारख्या काही देशांमध्ये शस्त्रांचा बाजार भरतो. तिथे एके 47 पासून सर्व प्रकारची शस्त्रे मिळतात. भारतातही अनेक ठिकाणी अशीच शस्त्रे मिळताना दिसतात. त्याठिकाणी कठोर कारवाई करत शस्त्र तयार करणार्या लोकांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. त्यामुळेही अयोग्य व्यक्तींच्या हाती शस्त्रे येण्यास पायबंद घालता येईल. सार्वजनिक शांतता, उत्कृष्ट सुरक्षितता ठेवण्यासाठी पोलिसांनी आणि न्यायालयाने कठोर भूमिका घेत कारवाई करायला हवी.
ड्युटीवर असताना पोलीस अधिकार्यांकडे शासकीय सर्व्हिस रिव्हॉलवर उपलब्ध असते परंतू ती व्यक्ती पोलीस अधिकारी असल्याचे गुन्हेगार जाणून असतात. त्यामुळेच त्या अधिकार्यांवर लक्ष ठेवून गुन्हेगार पोलिसांचा जीव घेण्यासही मागेपुढे पाहात नाहीत. दुसरीकडे सतत गुन्हेगारी कृत्यांसंदर्भात काम करणार्या पोलीस अधिकार्यांना सुलभ पद्धतीने शस्त्रपरवाना मिळत नाही. ते मिळवण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेता अशा अधिकार्‍यांना स्वत:चे संरक्षण करण्यासाठी शस्त्रपरवाना देणे आवश्यक आहे, ज्या ठिकाणी पोलिस ठाण्यावर हल्ला करून शस्त्रे पळवली असतील, ते प्रत्येक शस्त्र परत मिळवणे गरजेचे आहे. 


              शस्त्रांचा वापर करुन जीवे मारण्याच्या ताज्या घटनांद्वारे वाढत्या गुन्हेगारीची बाब पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण इथे लक्षात घ्यायला हवे की मुंबई, उल्हासनगर, ठाणे वा पुणे येथे घडलेले गुन्हे वैयक्तिक वैमनस्यातून झाले आहेत. याला कोणत्याही प्रकारे टोळीयुद्ध म्हणणे वा तसे स्वरुप देणे योग्य नाही. पैशाचे व्यवहार, वैयक्तिक आरोप, वैमनस्य आदी कारणांमधून हे गुन्हे घडल्याचे समजून येते. त्यामुळेच अलिकडे घडलेले हे गुन्हे म्हणजे टोळीयुद्धाची सुरूवात आहे, असे म्हणता येणार नाही. अगदी घोसाळकर हल्ला प्रकरणातही कोणी नगरसेवक व्हायचे, कोणी राजकीय पुढारीपण मिरवायचे या स्वरुपातील वैयक्तिक कारणांमुळे असलेले वैमनस्य समोर येते. या लोकांकडून छोटेमोठे गुन्हे घडत असतात तेव्हा तपास करताना त्यांच्या रेकॉर्डमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी समजते. अशा तुरुंगात असणार्या वा तुरुंगातून बाहेर असणार्या गुन्हेगारांवर पोलिसांनी लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या लोकांनी अनेक शत्रू निर्माण केलेले असतात. त्यामुळेच हा गुन्हेगार तुरुंगातून कधी बाहेर येतो आणि कधी आपण याला संपवतो याची त्यांचे शत्रू वाटच बघत असतात. त्यामुळेच अगदी पॅरोलवर बाहेर असले वा शिक्षा संपवून बाहेर आले असले तरी पोलिसांनी त्यांच्यावर सतत नजर ठेवणे आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर पोलिसांनी या लोकांनाही तुझ्या जीवाला धोका असल्याची समज देणे गरजेचे आहे


              शस्त्रे आणि अमली पदार्थांचे व्यवहार यांचा निकटचा संबंध आहे. यातून शस्त्रांचे मोठमोठे व्यापार होतात. आत्तापर्यंत झालेल्या तपासातून वारंवार ही बाब स्पष्ट आहे. त्यामुळेच या बाबीला आळा घालण्यासाठी अमली पदार्थांच्या तस्करीवर, विक्रीवरही मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणणे गरजेचे आहे. तरच अशा घटना कमी होणे शयय होईल. दुसरे म्हणजे गावठी कट्टे बनवणार्या शिकलगार समाजासारख्या लोकांचे पुनर्वसन करणेही गरजेचे आहे. आजही हे लोक आपापल्या वस्तीमध्ये शस्त्रे बनवून विकत असतात. त्यामुळेच त्यांची ओळख पटवून, त्यांना योग्य ती मदत देऊ करत पुनर्वसन घडवून आणले तर हे लोक शस्त्रे बनवणार नाहीत. बरेचदा शस्त्रे, दारुगोळा निर्माण करणार्या कारखान्यातूनही शस्त्रास्त्रांची चोरी होते. हेदेखील तातडीने बंद व्हायला हवे कारण पुढे हीच चोरीची शस्त्रे गुन्ह्यांसाठी वापरली जातात. अशा विविध पातळ्यांवरुन प्रयत्न केले तरच गुन्ह्यांमध्ये शस्त्रांचा वापर कमी होणे शयय होईल.


  (शब्दांकनस्वाती पेशवे) (अद्वैत फीचर्स)

Articles

बंदुका इतक्या सहज मिळतात, तेव्हा! शस्त्र परवाना धोरणात बदलाची गरज

By on February 15, 2024

बंदुका इतक्या सहज मिळतात, तेव्हा!
– शस्त्र परवाना धोरणात बदलाची गरज

———————————
प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलिस महासंचालक
मुंबई, ठाण्यासारख्या अनेक शहरांमध्ये व इतरत्र परवानाधारक शस्त्रातून गोळीबाराच्या घटना घडत असून, ती चिंतेची बाब आहे. यातून कुठे मृत्यू तर कोणी जखमी होत आहे. यामध्ये कुठलेही शहर अपवाद नाही.
आपल्याकडे शस्त्र कायद्यानुसार जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी तसेच जिथे पोलिस आयुक्तालय आहे तिथे पोलिस आयुक्त यांना शस्त्र परवानगी देण्याचे अधिकार आहेत. यामध्येही जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेर तसेच खेळाडूंसाठी असे तीन प्रकार आहेत. संबंधित अर्जदाराने दिलेले कारण तसेच त्याला असणारी भीती याबाबत पडताळणी केली जाते. चौकशीअंती ठरावीक काळासाठी त्यांना परवाना मिळतो. त्यानंतर वेळोवेळी त्यांना त्याचे नूतनीकरण करावे लागते. परवानाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांनाही परवाना सहज मिळू शकत नाही. त्यांनाही सर्व प्रक्रिया पार करूनच परवाना दिला जातो.

ही झाली कायदेशीर पद्धत. मात्र, माफियांना गावठी, विदेशी पिस्तूल बेकायदेशीर मार्गाने सहज उपलब्ध होताना दिसते आहे. माफिया, खंडणीखोर यांच्याकडून बंदुकीच्या धाकात उद्योजक, व्यावसायिकांसह विविध क्षेत्रातील मंडळींना खंडणीसाठी धमकावले जाते. याच भीतीतून स्वसंरक्षणासाठी या मंडळी शस्त्र परवान्यासाठी मागणी करतात. त्यानुसार, त्यांना शस्त्र परवाना दिला जातो. माफिया, खंडणी मागणारे, दहशतवादी, माओवादी यांना बहुतांश शस्त्र चीन आणि पाकिस्तान सीमेपलीकडून मिळताना दिसतात. पाकिस्तानने तर उघड उघड यापूर्वी ड्रोनच्या मदतीने देशविघातक शक्तीपर्यंत शस्त्र पुरवल्याचे समोर आले होते.

बेकायदा येणारी शस्त्रे, त्यांचे माध्यम, ठिकाणे शोधून कठोर कारवाई करायला हवी. शस्त्र देणाऱ्या अधिकाऱ्यांनी गैरप्रकार केल्याचे आढळताच संबंधित जिल्हाधिकारी किंवा पोलिस आयुक्तांवर तातडीने कारवाई करायला हवी. जेणेकरून इतरांना यातून धडा मिळेल.

सगळ्या गोष्टींचा विचार करून शासनाने शस्त्र परवाना धोरणात, काळाप्रमाणे योग्य ते बदल करण्याची वेळ आता आली आहे.

———————————
कसा होतो भ्रष्टाचार?

एका जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये कडक धोरण करत शस्त्र परवाना न देण्याचे ठरवले तरी, ते नागरिक दुसऱ्या ठिकाणी ज्या भागात भ्रष्टाचार होऊ शकतो किंवा भ्रष्टाचार करून तसेच त्यांना राजकीय दृष्टीने अनुकूल भागातून सबंध देशासाठीचा परवाना मिळवतात.
परवानाधारक शस्त्र हे भ्रष्टाचाराने मिळविणे हे महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी आजही आढळून येते. मुंबईसह अन्य ठिकाणी याचा सर्रास गैरवापर होतो.
शस्त्र बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय!
काही जमातींचा पारंपरिक व्यवसायच शस्त्र बनविण्याचा आहे. ते कुठलेही शस्त्र हुबेहूब बनवतात. तेदेखील सर्रासपणे विक्री करताना दिसतात. पाकिस्तानसारख्या काही देशांत शस्त्रांचा बाजार भरतो. तिथे एके ४७ पासून सर्व प्रकारची शस्त्रे मिळतात. भारतातही काही ठिकाणी अशा जमाती जिथे आहेत तिथेही शस्त्र मिळतात. त्याठिकाणी कठोर कारवाई करत या लोकांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे.

सार्वजनिक शांतता, उत्कृष्ट सुरक्षितता ठेवण्यासाठी पोलिसांनी आणि न्यायालयाने कठोर भूमिका घेत कारवाई करायला हवी.

———————-

खंडणीखोर, धमकाविणाऱ्यांविरुद्ध वेळीच कारवाई करून नागरिकांमधील भीती घालवायला हवी. त्यासाठी परिणामकारक पोलिसिंगची आवश्यकता आहे. सार्वजनिक ठिकाणी सशस्त्र पोलिस नेमावेत. कुठे जबरी चोरी झाल्याचा अहवाल जरी आला तरी मी पोलिस आयुक्त असताना घटनास्थळी जाऊन तपास करत होतो. प्रत्येक छोट्यामोठ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करत सुरक्षा वाढविणे गरजेचे आहे.
दुसरीकडे ज्यांना परवाना देत आहोत ते खरोखरच त्याचा वापर कशासाठी करत आहे, याचाही अभ्यास करण्यासारखा आहे. अनेक परवानाधारक स्वतःच्या शस्त्राने आत्महत्या करतात किंवा त्यांच्या घरातली मुले खेळण्यासाठी शस्त्र वापरतात. त्यात काहीचा मृत्यू ओढवल्याचेही समोर आले होते. परवानाधारकाने कोणत्याही कारणासाठी शस्त्र दुसऱ्या व्यक्तीस देणे हा गंभीर गुन्हा आहे.

काय करायला हवे?
– शस्त्र परवाना घेणाऱ्यांची सायकोलॉजिकल टेस्ट करायला हवी. ती एकदा करून उपयोग नाही, तर ती वेळोवेळी व नूतनीकरण करताना करायला हवी.
– कारण माणसाचं मन स्थिर नसते ते सतत बदलत राहते. संबंधित व्यक्ती स्वतःवर शस्त्र चालवणार तर नाही ना, हे पाहायला हवे.
– लोकांना अनेकदा नैराश्य येते. त्यातून ते टोकाचे पाऊल उचलतात. त्याबाबत सतर्क राहायला हवे.
– लोकांना निर्भय वाटेल. त्यांना शस्त्रांची आवश्यकता भासणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करायला हवी.
– 
————-