यशस्वी उद्योजक होण्याची गुरूकिल्ली
प्रवीण दीक्षित
निवृत्त पोलीस महासंचालक
28/10/2023
शुक्ल यजुर्वेदीय माध्यन्दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान च्या वर्धापन दिना निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमामधे मला सहभागी करून घेतले ह्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी व कार्यवाह श्रीकांत जोशी ह्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
भा. ज. प. महिला मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष लोकप्रिय माजी आमदार मेधा कुलकर्णी, लोकप्रिय अभिनेता संकर्षण कर्हाडे, त्रिमूर्ती ऑटोडेको कॉम्पोनन्टस् प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक मकरंद जोशी, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्मान्य श्रोते, पत्रकार मित्र व बंधुभगिनींनो,
सुरवातीलाच लोकप्रिय अभिनेता व कवी संकर्षण कर्हाडे ह्यांना सृजन युवा कलाकार पुरस्कार व यशस्वी उद्योजक मकरंद जोशी ह्यांना चंद्रकांत जोशी स्मृती प्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार मिळाल्याबद्दल मी उभयतांचे हार्दिक अभिनंदन करतो. उभयतांच्या यशस्वी प्रवासाबद्दल घेण्यात आलेली प्रकट मुलाखत आत्ता आपण ऐकली व त्यांच्या यशाचे रहस्य समजून घेतले.
यशस्वी कलाकार तसेच यशस्वी उद्योजक व्हायचे असल्यास काही समान गोष्टी अधोरेखित करणे गरजेचे आहे. सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे जी भूमिका आपल्याला पार पाडायची असेल त्याच्याशी पूर्णपणे समरस होणे. ही समरसता तेव्हा प्राप्त करता येते जेव्हा तुम्ही स्वतःला झोकून देऊन त्यातील बारीकसारीक सर्व बाबींचा सखोल अभ्यास करत असता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्यासाठी आपण सर्वकाही कारवाई करत असतो मग ते कदाचित प्रेक्षक असतील, श्रोते असतील किंवा कदाचित आपल्या मालाचा वापर करणारे उपभोक्ते असतील त्यांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक गोष्ट करणे.. पूर्वी व्यवस्थापन शास्त्रामधे ह्याला customer satisfaction असे म्हटले जायचे. परंतु गेल्या अनेक वर्षात ह्यात प्रगती होऊन सध्या customer excellence ही संकल्पना रूढ होत आहे. ह्याचा अर्थ असा की आपण सादर केलेली कला असो, किंवा सेवा असो, किंवा वस्तु असो ही इतकी उत्तम पाहिजे की, जी ग्राहकांनी कल्पनाही केली नसेल.
हे जे चोखंदळ ग्राहक असतात ह्यांना कल्पनातीत समाधान देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असलेला मंत्र लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. ‘‘Be Vocal for Local But be Global in your approach!’’ आज कलेच्या क्षेत्रात जरी पाहिले तरीही मराठी भाषिक हे केवळ महाराष्ट्रापर्यंत किंवा भारतापर्यंत मर्यादित नसून जगातील दोनशेपेक्षा अधिक देशांमधे पसरलेले आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे आन्तर्जालाच्या माध्यमामधून आज कोणत्याही ठिकाणावरून कोणतीही व्यक्ती तुमचे सादरीकरण पाहत वा ऐकत असते. तसेच तुम्ही निर्माण केलेली वस्तू ही सुद्धा जगातील कुठल्याही देशात पोचत असते. ह्यांचे समाधान करण्यासाठी निर्मात्याने पूर्णपणे पूर्वग्रहदूषितपणा सोडून जगातील कोणत्याही धर्मातील, भाषेतील, जातीतील, जमातीतील, स्त्री-पुरूषांचा विचार करून सादरीकरण करणे आवश्यक आहे. ह्यासाठी आपल्या मनातील इतरांबद्दलचे अनेक पूर्वग्रह आपण प्रयत्नपूर्वक दूर करणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर आपण सादर करीत असलेली कला, सेवा किंवा वस्तू ही अत्यंत स्पर्धात्मक वातावरणातही यशस्वी करणे जरुरीचे आहे. केवळ दुसर्याची नक्कल करून तो यशस्वी झाला म्हणजे आपण यशस्वी होऊ हयाची खात्री नसते. ह्यासाठी तुम्हाला सखोल संशोधन, चिंतन, आवश्यक आहे व त्यातूनच तुम्ही सादर करत असलेल्या गोष्टीची निर्मिती होत असते. व ह्यालाच पेटंट मिळवणे असे संबोधले जाते. अनुकरण करणारे व्यवसाय थोड्याकाळात कदाचित यशस्वी झाल्याचे दिसते पण त्याच वेगानी ते काळाच्या पडद्याआडही जात असतात. परंतु ज्या उद्योजकांनी संशोधनपूर्वक आपले वैशिष्ट्य कायम ठेवले आहे, मिळणार्या नफ्यातील कमीतकमी 10% रक्कम संशोधनासाठी नियमित खर्च केली आहे ते उद्योजक स्पर्धेवर मात करून टिकून राहतात असे दिसते.
यशस्वी उद्योजक होण्यासाठी आपण निर्माण केलेल्या सुरवातीच्या गोष्टींमधे अडकून न पडता नवनवीन गोष्टी ग्राहकांपर्यंत पोचविणे व ग्राहकांकडून त्याची मागणी वाढविणे हे कौशल्य आवश्यक आहे. हे करत असताना जाहिरातीचे महत्त्व दुर्लक्ष करून चालणार नाही. माझी वस्तू चांगल आहे. ती कोणीही स्वीकारेल असे समाधान आत्मघातकी ठरू शकते. संस्कृतमधे म्हणतात, ‘‘अप्रकाशिता वार्ता मृता’’ म्हणजे तुम्ही काय केले आहे हे जो पर्यंत तुम्ही जगाला सांगत नाही तोपर्यंत ते लोकांना माहित होईल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. अर्थात ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे खोट्या नाण्याची कितीही प्रसिद्धी केली तरी ते लगेचच उघड पडते. ह्यासाठी मुळात तुमचे उत्पादन हे उत्तम पाहिजेच तसेच त्याची किंमतही लोकांना सहज परवडेल अशीही पाहिजे. ह्याचा अर्थ असा नव्हे की ती तुम्ही स्वस्तात द्यावी. ह्यासंबंधी नुकतेच उघडकीस आलेले उदाहरण म्हणजे जेट एअरवेज चे दिवाळे का वाजले हे विचार करण्यासारखे आहे. परवडत नसतानाही प्रत्येक कि.मि. मागे 1 रुपया कमी लावणयाचा निर्णय जेट कंपीचे संचालक गोयल ह्यांनी जाहीर केला. थोडे दिवस काही ग्राहक वाढलेही असतील परंतु एका वर्षातच जेट एअरवेज चे दिवाळे निघाले व कंपनीला कुलूप ठोकावे लागले.
हया सर्व गोष्टींशिवाय यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुम्हाला कंपनीसंबंधीच्या सर्व कायद्यांची माहिती पाहिजे. व कायद्याने सांगितलेले निर्बंध तुम्ही तंतोतंत पाळले पाहिजेत. जसे स्त्री कामगारांची गार्हाणी दूर करण्यासाठी विशाखा समितीची स्थापना, बालकामगार प्रतिबंध कायदा, कामगार कल्याणासाठी कामाचे तास नियंत्रित ठेवणे, कामगारांना वेळच्यावेळेस पगार, प्रॉव्हिडंट फंड उपलब्ध करून देणे, त्यांच्या सुरक्षेसाठी सर्व व्यवस्था ठेवणे इत्यादि.
हे सर्व करत असताना व्यवस्थापन प्रशिक्षणात शिकवलेले धडे पुरेसे नसतात हेही लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अमेरिकेतील अनेक सुप्रसिद्ध बिझिनेस स्कूलमधुन उत्तम गुण मिळवून बाहेर पडलेले अनेक CEOs तुरुंगात गेलेले दिसतात कारण त्यांच्यामधे पैसे कसे वाढवायचे ह्याची अक्कल होती परंतु नैतिकता नव्हती. नैतिकतेला इंग्रजीत Ethics किंवा Ethical Values म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे तर हया साठी यशस्वी उद्योजकांनी भारतीय व्यवस्थापन शास्त्र, भगवद्गीतेतील व्यवस्थापन शास्त्र तसेच दासबोधात रामदासस्वामींनी सांगितलेले व्यवस्थापन शास्त्र ह्याचा मुद्दाम अभ्यास करणे आवश्यक आहे. भगवान कृष्णाने गीतेत सांगितल्या प्रमाणे ‘‘यद्दयदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।’’ तसेच आचारः प्रभवो धर्मः धर्मस्य प्रभुरच्युतः । तुमचे स्वतःचे उ्तम आचरण हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे.
पुन्हा एकदा आजच्या सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून, आयोजकांना धन्यवाद देऊन मी माझ्या वाणीला विराम देतो.
—————— —————————– ————-
September 28, 2026
September 28, 2026
July 27, 2026
July 21, 2026
June 23, 2026
Praveen Dixit, IPS retired as DGP Maharashtra. He also worked as DG Anti Corruption Bureau. Mr Dixit is decorated with President’s Medal for Distinguished Services and for Meritorious Services. Special Rapporteur, National Human Rights Commission, in charge of Maharashtra and Goa. Mr Dixit also retired as Vice Chairman (Administrative) in Maharashtra Administrative Tribunal at Mumbai.
© 2026 Praveen Dixit – Copyright – Designed & Developed By Host2Unlimited