शहरी माओवाद: म्हणून हवा विशेष जनसुरक्षा कायदा!
प्रवीण दीक्षित
निवृत्त पोलीस महासंचालक
12 सप्टेंबर 2004 माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर आणि सीपीआय (एमएल) (पिपल्स वॉर) या दोन संघटनांचे विलिनीकरण झाले. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) चा जन्म झाला. अर्बन नक्षल संकल्पनेविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण, हा गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम माओवादी साहित्याचा अभ्यास गरजेचा आहे. जेणेकरून याबद्दलचे सर्व गैरसमज आणि मनातील शंका सहज दर होतील आणि जनसुरक्षा कायद्याचे महत्त्वही अधोरेखित होईल. यात विरोधी विचारांचा आवाज दडपण्याचा हेतू नाही, तर राष्ट्रविरोधी शक्तींच्या देशविघातक कृतींपासून देशाला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
अर्बन नक्षल म्हणजे काय ?
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) पक्षाचे स्ट्रॅटेजी अॅण्ड टॅक्टीस ऑफ इंडियन रिव्हॉल्युशन हे पुस्तक वेगवेगळ्या चकमकी दरम्यान जप्त करण्यात आले. ते आजही डिजिटल माध्यमातून उपलब्ध करुन दिले जाते. या पुस्तकाचा भाग-2, जो माओवाद्यांच्या कार्यनितीवर आधरित आहे, त्यातील प्रकरण क्रमांक 13 माओवाद्यांची शहरी भागातील कार्याची दिशा स्पष्ट करणारे आहे. यात माओवादी संघटनांनी 3 अस्त्रांना जादुई अस्त्र संबोधले आहे. ती म्हणजे पार्टी, संयुक्त मोर्चा आणि सैन्य. यातील संयुक्त मोर्चा (युनायटेड फ्रंट) हे सर्वाधिक प्रभावी आणि क्रांतिकारी अस्त्र म्हणून वापरले जाते. याचा मूळ उद्देश देशातील प्रस्थापित संवैधानिक व्यवस्थांविरुद्ध जनसमुदायाचा सहभाग. तो हेतू साध्य झाल्यानंतरच सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला जातो. यातील हा संयुक्त मोर्चा म्हणजेच, सोप्या भाषेत अर्बन नक्षल किंवा शहरी माओवादी.
शहरी माओवादाची कार्यपध्दती
यात प्रामुख्याने विद्यार्थी, बेरोजगार युवा, परिपूर्ण विकास न झालेले लोक, महिला, जंगलात राहणारे नागरिक, भूमिहीन व गरीब शेतकरी अशा सामाजिक घटकांवर लक्ष केंद्रित केले जाते. यासाठी विषय निवडून कृती समिती, संप समिती, संघर्ष समिती, आंदोलनांची आखणी केली जाते किंवा काही वाजवी आंदोलनांमध्ये शिरकाव / घुसखोरी केली जाते. आपल्या समस्या सशस्त्र क्रांतीशिवाय सुटूच शकत नाहीत, असे धडे दिले जातात आणि त्यातून गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण केली जाते. एवढेच नाही तर सैन्य आणि अर्धसैन्य दलात त्यांची घुसखोरी करुन त्यांना घातपाती कार्यासाठी प्रवृत्त केले जाते. नक्षली चळवळीसाठी शस्त्र, दारुगोळा, औषधी, तांत्रिक मदत, दळणवळण यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक साहित्य, प्रचार–प्रसार, नवीन नेतृत्त्वाची उभारणी आणि नवीन भरती इत्यादी कामे ही शहरी नक्षलवादाच्या माध्यमातून केली जातात.
उदाहरणच सांगायचे झाले, तर मिलिंद तेलतुंबडे हा यवतमाळ जिल्ह्यात वणी भागात एक तरुण युनियन नेता होता. तो वेस्टर्न कोलफिल्डसमध्ये कार्यरत होता. नक्षलींच्या सीसी सदस्यांनी त्याला बल्लारपूर परिसरात माओवादी विचारसरणीत अंतर्भूत केले. 1998 मध्ये तो भूमिगत झाला आणि 2005 मध्ये सीसी सदस्य झाला. त्याने विदर्भातील तरुणांना मोठ्या प्रमाणात आपल्या जाळ्यात ओढले. सुदर्शन रामटेके हा सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणार्या एका कर्मचार्याचा मुलगा. तो माओवादी चळवळीत सामिल झाला. प्रारंभी त्याने केंद्रीय समितीसाठी स्टेनो म्हणून काम केले. पण, सुदैवाने त्याचा चळवळीसंबंधीचा दृष्टिकोन स्पष्ट झाला आणि त्याने आत्मसमर्पण केले. राजुर्यात शिवाजी महाविद्यालय आहे. तेथे देशभक्ती युवा मंचच्या माध्यमातून राजा ठाकूर हा माओवादाशी जोडला गेला. नंतर तो गडचिरोलीत एका चकमकीत मारला गेला. संतोष शेलार (चळवळीतील नाव – पेंटर), प्रशांत कांबळे (चळवळीतील नाव – लॅपटॉप) अशी कितीतरी उदाहरणे आहेत. पुण्यातील झोपडपट्टी परिसरात सांस्कृतिक आघाडीच्या नावाने असेच जाळे टाकण्यात आले. तरुणांना जाळ्यात ओढायचे आणि भीमाशंकरच्या जंगलात प्रशिक्षणासाठी घेऊन जायचे.
कायद्याची गरज का?
मुळात हे लक्षात घेतले पाहिजे की, आपला देश हा महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेच्या मजबुत पायावर उभा आहे आणि माओवाद नेमकी हीच राज्यघटना नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बहुपक्षीय लोकशाही, निवडणुका, मतदानाचा अमूल्य अधिकार, विचारस्वातंत्र्य, प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य, न्यायव्यवस्था हे माओवाद्यांना मान्य नाहीत. सर्व फुटीर शक्ती एकत्र आणणे आणि त्यातून देशाच्या प्रगतीला बाधा आणणे, कायम अशांतता ठेवणे हेच त्यातून साध्य केले जाते.
माओवादी फ्रंटल संघटनेची कार्यपद्धती वैविध्यपूर्ण आणि गुंतागुंतीची आहे. सामाजिक संघटना, राजकीय पक्ष विरहित घटक आहेत, तेथे माओवादी हे जनसामान्यांमध्ये अस्तित्त्वात असलेल्या संवैधानिक यंत्रणा आणि एकूणच लोकशाही प्रक्रियेविरुद्ध रोष/असंतोष निर्माण करतात. असे गुन्हे हे युएपीए कायद्याच्या कक्षेत येत नाहीत. विविध न्यायालयांनी सुद्धा अशा घटनांचा युएपीए अंतर्गत मर्यादांवर बोट ठेवले आहे. त्यामुळेच अशाप्रकारचा स्वतंत्र कायदा ही राज्याची गरज आहे. त्यातून खर्या अर्थाने अशा घटनांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यास मदतच होणार आहे.
मा. मुख्यमंत्री यांनी विधानसभेत जे निवेदन केले, त्यातही परिशिष्टातील उद्देश आणि कारणे यात स्पष्टपणे नमूद केले आहे की, हा कायदा माओवादी फ्रंटल संघटनांच्या क्रियाकल्पांवर ज्याचा उद्देश जनसामान्यांमध्ये संविधान आणि संवैधानिक व्यवस्थेविरोधात असंतोष निर्माण करणे आणि त्यातून सशस्त्र माओवादी विचारांचा प्रसार करणे हा आहे, त्याला पायबंद घालण्यासाठीच हा कायदा आहे. महाराष्ट्रातील एका दैनिकाने एका लेखात असे नमूद केले की, बेकायदेशीर कृत्याच्या व्याख्येत एखाद्या व्यक्तीने एखादी कृती करुन, बोललेल्या किंवा लिखित किंवा चिन्हाद्वारे केलेल्या कृतीचाही समावेश कायद्यात आहे. परंतू, याठिकाणी आवर्जून हे सांगेन की, माओवाद्यांचा प्रचार–प्रसार करण्यात चेतना नाट्यमंच (ज्यावर छत्तीसगड सरकारने बंदी घातली आहे) या संघटनेचा मोठा वाटा आहे. आत्मसमर्पित नक्षल्यांच्या चैकशीतून हे उघड झाले की, 70 टक्के तरुण हे चेतना नाट्यमंचाच्या माओवादी क्रांती मंचाच्या नाटकातून, गाण्यांमधून माओवादाकडे आकर्षित झाले.
आता हा कायदा भारतीय संविधानाच्या कलम 19 च्या चैकटीत बसणारा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमर्याद असलेच पाहिजे. पण, ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे सार्वजनिक सुरक्षा, सुव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येईल, त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणता येणार नाही. आणि नक्षलवादात प्रामुख्याने निवडणुका, न्यायालय, विधीमंडळ अशा स्तंभांना जनसामान्यांमध्ये बदनाम करणे आणि त्यातून लोकशाहीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, हीच कार्यपद्धती आहे. या कायद्याची महाराष्ट्रात सर्वाधिक गरज का आहे? केंद्रीय गृहमंत्रालयाचा एक अहवाल आहे, ज्यात माओवादाचा प्रसार करणार्या सर्वाधिक 64 इतक्या फ्रंटल संघटना या महाराष्ट्रात आहेत. एकतर महाराष्ट्रात वेगाने होणारे शहरीकरण आणि दुसरीकडे जंगलांतील कारवायांमध्ये आलेले मोठे अपयश यामुळे नक्षलवादाचा मोठा प्रसार आता शहरांतून होतो आहे. गेल्या काही वर्षांत नक्षल्यांकडून जे साहित्य जप्त करण्यात आले, त्यातून आता पुढची लढाई ही शहरी युद्ध आणि शहरांमध्ये माओवादी संघटनांचा विस्तार याचे सज्जड पुरावे मिळालेले आहेत. माओवाद्यांच्या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत केंद्रीय कार्यकारिणीत सुद्धा हे निर्णय झालेले आहेत.
कायद्यातील संरक्षणात्मक तरतुदी
आंध्र आणि तेलंगणा राज्यात जंगलातील कारवायांमध्ये घट झाली. पण, त्या राज्यांनी किमान 12 ते 14 फ्रंटल संघटनांवर बंदी टाकली. कारण, तेथे सुद्धा शहरी नक्षलवाद मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. तिसरे राज्य छत्तीसगड जर यात जोडले तर किमान ४48 संघटनांवर बंदी आहे. प्रामुख्याने सांस्कृतिक आघाडी, विद्यार्थी आघाडी, नागरिक हक्क समिती, वकील संघटना अशा नावाने संघटना काढून माओवादाच्या प्रसाराला हातभार लावला जातो. कारवाई झाली की, या संघटना स्वतःचा बचाव करायला जातात आणि मग सामाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्त्यांवर कारवाई झाली, असा अपप्रचार केला जातो. पण, वस्तुतः ते बंदी असलेल्या सीपीआय माओवादी संघटनेचे सदस्य असतात. त्यांचे प्रमुख लक्ष्य प्रदीर्घ युद्ध जिंकणे आणि 2047 मध्ये लालकिल्ल्यावर सीपीआय माओवादीचा झेंडा फडकाविणे हा आहे.
केवळ आणि केवळ अशाच संघटनांसाठी हा कायदा आहे. कायदा व सुव्यवस्था हाताळताना ज्या तरतुदी अन्य कायद्यांमध्ये नाहीत, अशा तरतुदींचा हा कायदा आहे. या कायद्यावर जे विविध आक्षेप व्यक्त झाले, त्यांनी हा कायदा आधी समजून घेतला पाहिजे. त्यातील काही बाबी अशाः
1) एखाद्या संघटनेवर बंदी घालायची असल्यास त्यासाठी सल्लागार मंडळाची तरतूद आहे. हे सल्लागार मंडळ
न्यायालय नियुक्त करीत असते. त्यामुळे आपोआपच सरकार या कायद्याचा दुरुपयोग करु शकत नाही.
2) एखाद्या संघटनेवर बंदी घातल्यानंतर कारवाई करण्यासाठी किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस
उपमहानिरीक्षक दर्जाच्याच अधिकार््याची परवानगी अनिवार्य आहे.
3) आरोपपत्र दाखल करण्यासाठी अपर पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकार््याची परवानगी आवश्यक आहे. या तरतुदींमुळे कनिष्ठ अधिकारी किंवा राजकीय दबावाचे आरोप नगण्य ठरतात.
महाराष्ट्राने 40 वर्ष माओवादाशी जंगलात लढा दिला. पण, शहरी भागात 50 वर्षांपासून कार्यरत माओवादी संघटनांवर कोणतीही कार्यवाही केली नाही. परंतू अलिकडच्या काळात शहरी भागात नक्षलींचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यावर कारवाई ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ती वेळीच केली नाही, तर राज्याच्या सामाजिक व्यवस्थेसमोर गंभीर संकट निर्माण होऊ शकते. संविधान आणि लोकशाही न मानणार््या माओवादी फ्रंटल संघटनांवर कारवाई हाच महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्याचा मुख्य गाभा आहे.
******************* ********************************* ******************
March 24, 2025
March 22, 2025
March 22, 2025
February 16, 2025
January 26, 2025
January 26, 2025
January 21, 2025
Praveen Dixit, IPS retired as DGP Maharashtra. He also worked as DG Anti Corruption Bureau. Mr Dixit is decorated with President’s Medal for Distinguished Services and for Meritorious Services. Special Rapporteur, National Human Rights Commission, in charge of Maharashtra and Goa. Mr Dixit also retired as Vice Chairman (Administrative) in Maharashtra Administrative Tribunal at Mumbai.
© 2022 Praveen Dixit – Copyright – Designed & Developed By Host2Unlimted