2025 चे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शतकोत्तर प्रवास सुरू केला आहे. चारित्र्यवान, राष्ट्रप्रेमी लोक निर्माण करणे व त्यातून राष्ट्राचा व जगाचा उत्कर्ष साधणे ह्या ध्येयाने संघाशी निगडित प्रत्येकजण अविरत कार्य करत आहे. राष्ट्रावर मानवनिर्मित किंवा नैसर्गिक कोणतीही आपत्ती आल्यास पीडित व्यक्तींच्या मदतीसाठी धावून जाणे व त्याबद्दल वैयक्तिक फळाची कोणतीही अपेक्षा न करणे हे संघाच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. समाजातील उपेक्षित, वनवासी, दुर्लक्षित अशा व्यक्तींमधे राहून त्यांचा आत्मविश्वास वाढवणे व त्यांना सक्षम बनविणे हे काम संघ निरंतर करत आला आहे. विशेष म्हणजे, हे काम करणार्या प्रचारकांनी सुशिक्षित असूनही, फायद्याचे अनेक पर्याय उपलब्ध असूनही, त्याकडे पाठ फिरवून ह्या कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. तळमळीने कार्य करणार्या राष्ट्रप्रेमी संघकार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो व भारत-मातेला उच्चासनावर नेण्याच्या त्यांच्या ध्येयाला अभिवादन करतो व त्यांना सुयश इच्छितो.
माझे थोरले भाऊ प्रमोद दीक्षित ह्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पूर्णवेळ प्रचारक म्हणून संघासाठी आयुष्य समर्पित करण्याचे ठरवले व संघाच्या आदेशानुसार ते आसाम मधे रुजू झाले. 1973-74 हे ते वर्ष होते. आम्ही पाच भाऊ होतो. त्यातील एकाने देशसेवेसाठी स्वतःला अर्पण करावे असे ते आमच्या आईला सांगत असत. पुढे सरसंघचालक बाळासाहेब देवरस हेही आमच्या घरी आले होते. व त्यांनी प्रमोदजी ह्यांनी स्वीकारलेला मार्ग योग्य आहे ह्याला मान्यता दिली होती. आसाममधे शाळा चालवणे, रक्यपेढी चालवणे व इतर लोकोपयोगी कामे करत असताना देशद्रोही उल्फाच्या सदस्यांना मात्र ते खुपत होते. संघाच्या कार्यालयात प्रमोदजी बसलेले असताना बंदूकधारी उल्फा दहशतवादी तिथे आले व प्रमोदजींचे नाव विचारून खात्री झाल्यावर 14 ऑगस्ट 1991 रोजी त्यांच्यावर गोळीबार करून भ्याडपणे त्यांची हत्या करण्यात आली. स्थानिक लोकांनी मात्र प्रमोदजींचे बारपेटा येथे भव्य स्मारक बांधून त्यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांना अमर केले.
1966 साली ओळखीच्या व्यक्तीच्या लग्नासाठी आईबरोबर मी नागपूरला गेलो होतो. लग्न झाल्याबरोबर आई मला घेऊन रेशीमबागेत गेली होती व तेथे परमपूज्य संघ संस्थापक डॉ. हेडगेवार ह्यांच्या समाधीचे आम्ही दर्शन घेतले होते. आमचे मूळ गाव भोर. माझे आजोबा भोरचे संस्थानिक पंतसचिव ह्यांच्याकडे काम करत असत. त्यावेळेस रथखाना येथे चालणार्या शाखेत जाऊन संघाची प्रार्थना गंभीरपणे म्हणण्याचा प्रसंग आजही माझ्या मनावर कोरलेला आहे.
पुढे भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्यानंतर माझी पोलीस आयुक्त नागपूर म्हणुन नेमणूक झाली. 2006 साली पाकिस्तानी दहशतवाद्यांनी संघाच्या मुख्य कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु सतर्क अशा पोलीसांनी त्या सर्वांना थोपवून यमसदनी पाठविल्यामुळे पुढचा भीषण प्रसंग टळला होता. संघकार्यालयाची सुरक्षा हा त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असे. त्या अनुषंगाने मी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत ह्यांना भेटायला गेलेलो असताना हसत हसत ते मला म्हणाले, ‘‘पोलीसांशिवाय संघाची सुरक्षा करणारे आजूबाजुचे सर्व लोक सदैव सतर्क असतात व त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यायला आम्ही सज्ज आहोत.’’
मुंबईत असताना डॉ. मोहनजी वेळात वेळ काढून आमच्या घरी आले होते व जवळ जवळ एक तास त्यांनी मोकळेपणानी गप्पा मारल्या होत्या. संघाची अनेक कामे मी जवळून पाहिली आहेत व चारित्र्यवान लोकांनी ती चालवलेली असल्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर सतत द्विगुणित झाला आहे.
भारत माता की जय!
नमस्ते सद वत्सले मातृभूमे—–!
March 4, 2026
March 4, 2026
February 24, 2026
February 21, 2026
February 9, 2026
January 19, 2026
November 13, 2025
November 12, 2025
Praveen Dixit, IPS retired as DGP Maharashtra. He also worked as DG Anti Corruption Bureau. Mr Dixit is decorated with President’s Medal for Distinguished Services and for Meritorious Services. Special Rapporteur, National Human Rights Commission, in charge of Maharashtra and Goa. Mr Dixit also retired as Vice Chairman (Administrative) in Maharashtra Administrative Tribunal at Mumbai.
© 2022 Praveen Dixit – Copyright – Designed & Developed By Host2Unlimted