पोलिसांवरील ताण व त्यासाठी उपाय
प्रवीण दीक्षित
पोलीस महासंलक(निवृत्त)
मुंबई पोलिसांच्या उपलब्ध आकडेवारीनुसार 2022 पासून आता पर्यंत कर्तव्यवर असताना 379 पोलिसांचा मृत्यु झाला आहे. 379 पैकी 334 पोलिसांचा नैसर्गिक मृत्यु झाला आहे. तर 23 जणांचा अपघाती व 22 जणांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकार्यांशिवाय मुंबई विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनीही पुढे येऊन ह्यातील प्रत्येक घटनेच्या पार्श्वभूमीची आणि कारणांची चिकित्सा करणे आवश्यक आहे. अशाच घटना महाराष्ट्रातील इतर भागातही सतत होत असतात.
देशात कायदा व सुव्यवस्था चांगली रहावी, शांतता असावी व त्यातून जनसामान्यांना स्वतःचा व राष्ट्राचा विकास करता यावा ह्या उद्देशाने शासनाने पोलीसदलाची निर्मिती केली आहे. परंतु प्रत्येक समाजात अनेक कारणांमुळे गुन्हे करणारे, समाजामधे धर्म, जात, प्रांत, भाषा, लिंग अशा अनेक कारणांनी असंतोष निर्माण करणारे, दंगली घडवू आणणारे व त्यातून आपला राजकीय स्वार्थ पूर्ण करणारे अनेकजण असतात. अशा ह्या समाजविघातक, राष्ट्रद्रोही व्यक्तींचा समाजातील सामान्य नागरिक फारसा विरोध करू शकत नाहीत. त्यांना संघटितपणे, कायद्याच्या आधारे, त्यांनी सभ्यपणाचा घातलेला बुरखा दूर करून न्यायालयापुढे सादर करणारे व त्यांना नयायालयामार्फत शिक्षा करणारे पोलीस दल आवश्यक आहे व ते पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे. परंतु पोलीसांच्या कामामधे ढवळाढवळ करणे, गुन्हेगारांना, समाजविरोधकांना पकडू न देणे, पकडले असल्यास त्यांना सोडायला लावणे, गुन्हेगारांना कायद्यातील पळवाटा शोधून शिक्षा होऊ न देणे ह्यासाठी समाजातील अनेक घटक हे हिरिरीने प्रयत्न करताना दिसतात. पोलीसांचे मनोधर्य खच्ची करणे, त्यांनी केलेल्या कर्तव्याबद्दल त्यांना निलंबित करणे, त्यांना पदोन्नती मिळू न देणे ह्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. स्वतःची मनमानी चालू ठेवता यावी हयासाठी स्वतःच्या हातचे बाहुले होऊन वागणार्या पोलीस अधिकार्यांना आपल्या जवळच्या पोलिस ठाण्याच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यासाठी स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणणार्या अनेक व्यक्ती काम करत असतात. आपण केलेल्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष व्हावे व आपल्याराजकीय विरोधकांना कायद्याच्या माध्यमातून त्रास देता यावा ह्यासाठी ह्या पोलीस अधिकार्यांचा वापर केला जातो. आपल्या मनाविरुद्ध व कायद्याप्रमाणे वागणार्या अधिकार्यांना वेळोवेळी बदलून त्यांना अकार्यकारी व कमी महत्त्वाच्या पदांवर तडकाफडकी बदलले जाते. पोलीसांचा पाणउतारा करण्यासाठी बदली व निलंबन ही दोन शस्त्रे प्रामुख्याने पाजळली जातात. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनीही सर्व कर्मचारी हे आपले सहकारी आहेत असेच त्यांच्याशी वर्तन ठेवणे गरजेचे आहे. थोड्याशा कारणाने त्यांना शिक्षा करणे, अपमान करणे हे शिस्तबद्ध खात्यास लाजिरवाणे आहे.
ह्याशिवाय समाजातील गुन्हेगार व्यक्ती वाहतुकीचे नियम पाळायला सांगणार्या पोलिसांवर हल्ले करतात. गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या पोलीस चमूवर जीवघेणा हल्ला करून त्यांना पळवून लावले जाते वा ठार मारले जाते. अनेक गुन्हेगारांनी बेकायदेशीररीत्या जमवलेल्या पैशातून अनेक सिनेमे काढले आहेत; ज्यात पोलीसांचा पांडु हवालदाार, नेभळट, लाचखोर, लाचार अशाप्रकारे वर्णन केले जाते. ह्या सर्व गोष्टींमुळे पोलीसांचे मानसिक खच्चीकरण व्हावे हा उद्देश असतो.
पोलीसांना आवश्यक अशी सर्वसोयींनी युक्त सरकारी घरे निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन न देणे, असलेल्या घरांची डागडुजी न करणे ह्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे सारख्या महानगरातील पोलीसांना व त्यांच्या कुटुंबियांना अत्यंत खराब स्थितीत जगावे लागते. रोज 12 तास काम, सुट्टी मिळण्याची कमी शक्यता ह्यामुळे पोलिस कर्मचार्यांचे आरोग्य धोक्यात येते व ते व्यसनाधीन बनतात. वेळच्यावेळी जेवण न मिळणे, शांत झोप न मिळणे, व्यायाम करायला सोयी नसणे ह्याचा परिणाम होऊन पोलिसांना सतत ताणतणावात दिवस काढायला लागतात.
ह्यावरील उपाय म्हणून पोलीसांच्या कामाच्या वेळा कमी करणे, जिथे काम असेल त्या ठिकाणीच त्यांची राहण्याची, व्यायामाची, झोपायची सोय करणे, पौष़्टिक आहार परवडणर्या किमतीत उपलब्ध करणे, त्यांच्या कुटुंबियांसाठी सुरक्षित ठिकाणी आवश्यक त्या सोयींनीयुक्त घरे बांधणे गरजेचे आहे. सल्लागारांची मदत घेऊन मानसिकरीत्या दुर्बळ पोलीसांना वेळोवेळी वैद्यकीय मदत देणे जरूरीचे आहे. कोणताही पोलीस कर्मचारी अथवा अधिकारी नेहमी समूहात राहील ह्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. आत्महत्या प्रतिबंधक helpline (DISHA) 1056 ची माहिती प्रत्येक पोलीसस्थानकात लावणे सक्तीचे करण्यात यावे. प्रशिक्षण काळात तसेच वेळ मिळेल तेव्हा रामायण, भागवत ह्यासारख्या ग्रंथांचे परिशीलन करण्यास आध्यात्मिक गुरुंच्या सहाय्याने प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. पूर्वी ह्यातील गोष्टी सहज कानावर पडत असत. त्यातून फार मोठी आध्यात्मिक मदत मिळत असते व त्यामुळे अपयशाने माणूस खचून जात नाही.
त्याशिवाय पोलीसांची टिंगल टवाळी करणार्या सिनेमांवर समाजाने जाहीर बहिष्कार घालणे, पोलीसांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी प्रत्येक सक्षम स्त्री-पुरुष यांनी पुढे येऊन पोलीस-मित्र म्हणून काम करणे जरुरीचे आहे. गणपती, मोहरम, नवरात्र उत्सव ह्यासारख्या उत्सवांसाठी पोलिसांनीही पोलीस मित्रांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. लोकांनीही त्यात समजूतदारपणा दाखवणे जरूरीचे आाहे. राजकीय नेतृत्त्वानेही पोलीसांच्या कायदेशीर कामामध्ये ढवळाढवळ न करणे, पोलीसांची बदली अथवा निलंबन दबावाखाली न करणे अत्यंत आवश्यक आहे. कायदा व सुव्यवस्था राखताना पोलिसांनी नियमाप्रमाणे कारवाई केली तरीही त्यांना निलंबित करावे ही मागणी कितपत योग्य आहे ह्याचा धर्म, जात, पक्ष ह्यांच्या पलीलडे जाऊन विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलीसांनाच मदत होईल असे नव्हे तर समाजाला व राष्ट्रालाही जगात विकसित देश बनविणे शक्य होईल.
———————————————
March 4, 2026
March 4, 2026
February 24, 2026
February 21, 2026
February 9, 2026
January 19, 2026
November 13, 2025
November 12, 2025
Praveen Dixit, IPS retired as DGP Maharashtra. He also worked as DG Anti Corruption Bureau. Mr Dixit is decorated with President’s Medal for Distinguished Services and for Meritorious Services. Special Rapporteur, National Human Rights Commission, in charge of Maharashtra and Goa. Mr Dixit also retired as Vice Chairman (Administrative) in Maharashtra Administrative Tribunal at Mumbai.
© 2022 Praveen Dixit – Copyright – Designed & Developed By Host2Unlimted