वाढता दहशतवाद
प्रवीण दीक्षित.
निवृत्त पोलीस महासंचालक महाराष्ट्र.
10 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ अत्यंत शक्तिशाली असा स्फोट एका हळु हळु पुढे सरकणार्या गाडीमधून झाला व त्यात 13 जण मृत्यू पावले व अनेकजण जखमी झाले. मृतांमधील अनेक जण मुस्लिम आहेत. हा स्फोट हे दहशतवादी कृत्य होते व त्यात अनेक निष्पाप लोकांना ठार मारून जगाचे लक्ष्य त्यांच्याक़डे वेधणे हेच होते. सध्या ह्या स्फोटाचा तपास NIA करत आहे. आत्तापर्यंतच्या तपासात असे दिसते की डॉ. उमर नबी जो दिल्लीजवळील फरिदाबाद येथे असलेल्या अल् फलाह विद्यापीठात शिकवत होता. हा मूळचा काश्मिरी पण त्याने 2024 मधे काश्मिर सोडले होते. IED स्फोट करण्यात तो प्रशिक्षित होता. त्यापूर्वी मागच्या 15 दिवसात जम्मु काश्मिर, हरियाणा आणि उत्तरप्रदेश पोलिसांनी 3 डॉक्टरांसह 8 लोकांना पकडले होते. त्यामधे पुलवामा येथे राहणार्या डॉ. मुझामिल अहमद गनेय (वय 32) उर्फ मुसाईब आणि लखनऊ येथे राहणार्या डॉ. शाहीन साईद (वय 40) ह्यांना अनुक्रमे 30 ऑ्क्टोबर आणि 8 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. हे दोघेही अल फलाह रुग्णालयात काम करत होते. डॉ. अदिल जो जम्मु काश्मिर मधील पुलगामा, वानपोरा इथला रहिवासी होता त्याला उत्तर प्रदेशातील सहाराणपूर येथून 5 नोव्हेंबरला पकडण्यात आले होते. 10 नोव्हेंबर रोजी डॉ. गनेय हा ज्या घरात भाड्याने रहात होता तेथून 350 किलो स्फोटके व शस्त्रे पकडल्याचे फरिदाबाद पोलीसांनी 10 नोव्हे. रोजी वृत्त प्रतिनिधींना सांगितल्यानंतर वरील लोकांना अटक केल्याचे उघडकीस आले होते. जम्मु काश्मिर पोलिसांनीही जाहीर केले की, 2900 किलो स्फोटके, शस्त्रे, टाइमर्स, बॅटरीज व मेटल शीटस् पकडली आहेत. बाकीचे लोक पकडले गेल्यानंतर घाईघाईत आपण पकडले जाऊ नये म्हणून डॉ. उमर नबी हा काही स्फोटके घेऊन गाडीने जात असताना त्यानी लाल किल्ल्याजवळील, मेट्रोस्टेशनच्या जवळ, संध्याकाळी गर्दीच्यावेळी स्फोट केला.
डॉ. शाहीन सईद ही नुकत्याच बनविण्यात आलेल्या ‘जमात-उल-मोमिनात’ ह्या संघटनेची कार्यकर्ती होती. ही महिलांची संघटना ‘जैश-ए-महंमद ह्या बंदी असलेल्या संघटनेनी ऑपरेशन सिंदूर नंतर भारतात दहशतवादी कृत्ये करण्यासाठी महिलांची भरती करणारी संस्था बनविण्यात आली होती. जैश-ए-महंमद चा प्रमुख मसूद अझर ह्याने सादिया अझर हिला ह्या संघटनेचा प्रमुख म्हणून ऑक्टो. मधे जाहीर केले होते. सादिया ही युसुफ अजहर जो 7 मे रोजी मर्काझ सुभानअल्ला बहवालपूर पाकिस्तान येथे भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमधे मारला गेला होता त्याची बायको आहे.
डॉ. सईद च्या अटकेतून हे स्पष्ट होते की, जैश-ए-महम्मद ही संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया (ISIS) प्रमाणे महिलांचा उपयोग हा हल्ले करण्यासाठी व आत्मघातकी कारवायांसाठी करत आहे. मूलतत्त्ववादी मौलवी हे शिक्षणसंस्थांमधे, मदरशांमध्ये तरूण मुलामुलींना मोठ्याप्रमाणात आपल्या जाळ्यात ओढतांना दिसतात. जैश-ए-महम्मद ह्या संघटनेस पाकिस्तान सरकार व लष्कराचा उघडपणे पाठिंबा आहे व त्यांना भारताविरुद्ध कारवायांना ते सतत मदत करत आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये उध्वस्त केलेली दहशतवादी संघटनांची ठिकाणे पाकिस्तान सरकार पुन्हा बांधून देण्यास मदत करत आहे.
आत्तापर्यंत उपलब्ध माहितीवरून दिसते की, मोठ्या प्रमाणात वैद्यकीय तसेच संगणकीय, उच्च शिक्षण घेतलेल्या मुलामुलींना वापरून त्यांच्या माध्यमातून नवीन तरूणांना व तरूणींना दहशतवादी आपल्या जाळ्यात ओढत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातूनही अशाच प्रकारे काम करणार्या डॉक्टर व IT. मधे काम करणार्या व्यक्तींना अटक केली होती.अल् कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन हा ही खुप शिकलेला व धनाढ्य होता पण तितकाच अत्यंत कडवा दहशतवादी होता.
दहशतवादी संघटना ह्या मोठ्या प्रमाणात internet चा वापर करून तरूणांची डोकी भडकवत असतात. त्यांना खोटे video व्हिडिओ दाखवले जातात व त्यांना दहशतवादी कृत्ये करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. ह्या व्यक्ती आधुनिक शिक्षण घेतलेल्या, सर्व नवीन तंत्रज्ञानात कुशल, सॅटेलाइट फोनने सुसज्ज, भरपूर पैसे असणार्या परंतु धार्मिक क़डव्या अशा आहेत. नुकत्याच अटक झालेल्या व्यक्तींच्या जबाबातून स्पष्ट होते की, हैद्राबाद येथे राहणार्या व्यक्ती शस्त्रे मिळविण्यासाठी गुजरातच्या सीमावर्ती भागात आदलाद येथे गेले असतांना पाकिस्तानमधून ड्रोनच्या मदतीने शस्त्रे पाठवली होती ती घ्यायला ते गेलेले होते. पूर्ण गुप्तता राखली जाईल ह्या तत्त्वावर अमेरिकेतून चालवल्या जाणार्या व्हॉटस् अॅप सारखे सामाजिक प्लॅटफॉर्म्स ह्यांचा दहशतवादी संघटना पुरेपूर गैरफायदा घेत आहेत व सार्वभौम असलेल्या इतर देशातील सुरक्षा यंत्रणांना त्यावर काहीही कारवाई करणे वा माहिती मिळवणे हे जवळ जवळ अशक्य आहे. इंग्लंड, युरोप व अन्य देशांनी ह्या सामाजिक प्लॅटफॉर्म्सकडून मागितलेली माहिती सुरक्षेच्या कारणासाठी देण्यास अमेरिकेच्या प्रशासनाने पूर्णपणे नकार दिला आहे. इंटरनेटचा वापर करून प्रचंड प्रमाणात बिटकॉईन्स च्या माध्यमातून आज करोडो रुपये भारतातील तरूण त्यात खर्च करत आहेत. त्याचा वापर करून ड्रग्ज तसेच शस्त्रास्त्रे ह्यांचा व्यापार होत आहे. अनेक गुन्ह्यांच्या तपासात दहशतवादी ड्रग्जचा वापर करून शस्त्रे खरेदी करतात व दहशतवादी कृत्ये करतात हे स्पष्ट झाले आहे.
ह्या उलट भारतीय व्यक्तींनीच बनवलेली झोहो मेल, आरात्ताई ह्यांचा वापर अद्याप नगण्य आहे. त्यामुळे एकतर भारतातील सर्व डेटा हा अमेरिकेसारख्या परकीय देशाला सहज उपलब्ध होत आहे व त्यातून मिळणारी माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांना उपलब्ध होत नाही व दहशतवाद्यांचे आंतरराष्ट्रीय जाळे मजबूत होत आहे. ह्याउट चीनने सुरवाती पासूनच ह्या अमेरिकन संस्थांवर बंदी घालून स्वतःचे सामाजिक प्लॅटफॉर्म्स तयार केलेले आहेत.
कोणतेही घर भाड्याने द्यायचे असल्यास त्यासंबंधीची माहिती पोलीसांना देणे बंधनकारक असूनही फार क्वचित ती पुरवली जाते व माहिती न देणार्यांवरही न्यायालयातून कठोर शिक्षा झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे पैशाच्या लोभाने दहशतवादी मनात येईल त्या ठिकाणी भाडेकरू म्हणून राहतात व आपले उद्दिष्ट साध्य करतात हे वारंवार अनेक घटनांनी दाखवले आहे. लोकांना दाखविण्यासाठी समाजात प्रतिष्ठा असेल अशा पदाचा वापर करून ते आपल्या दहशतवादी कारवाया करतांना दिसतात. फरिदाबाद येथे सापडलेली 2900 किलो स्फोटके हे दहशतवादी अनेक महिन्यांपासून साठवत होते. स्फोटकांसाठी आवश्यक अशी रासायनिक द्रव्ये, टायमर्स, मेटलशीट्स विकणार्या सर्व विक्रेत्यांवरही ह्य गोष्टी कोणाला विकल्या ही माहीती पोलिसांना देणे आवश्यक करण्याची गरज आहे. ह्या सर्व स्फोटकांची वाहतूक ही लक्षात येणार नाही अशाप्रकारे विवध वाहनांमधून होतांना दिसते. त्यासाठी ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करणे गरजेचे आहे. वाहने खरेदी करताना खोटे पत्ते दिले जातात व ते सहज मान्य केले जातात ही चिंतची बाब आहे.
दहशतवादी कृत्ये करणार्यांची माहिती केवळ तंत्रज्ञानाचा वापर करून मिळेल हे समजणे पुरेसे नाही. वर चर्चा केल्याप्रमाणे ही माहिती मिळण्यावर अनेक बंधने आहेत व सर्व दहशतवादी ही माहिती विविध खोटी नावे किंवा कोड वापरून पाठवत असतात. त्यामुळे त्यांची खरी ओळख फारच क्वचित होउ शकते. त्यामुळे व्यक्तींच्या सहाय्याने गोळा केलेली गुप्त माहिती (ह्युमन इन्टलिजन्स) ही सद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. दहशतवादा विरुद्ध लढा हे सर्व थरांनी एकत्र येऊन लढणे अत्यंत आवश्यक आहे. भारतातील लोकशाहीवर विश्वास असलेल्या अशा मुस्लिम समाजातील लोकांनाच त्यासाठी प्रोत्साहन देऊन ह्या कृत्यांचा त्यांनीही निषेध करणे गरजेचे आहे. त्यांच्या आजूबाजूला कडवे विचार पसरविणारे कोण आहेत, गैर कृत्ये करणारे कोण आहेत हयाची माहिती त्यांनी सुरक्षा यंत्रणांपर्यंत पोचविणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कडव्या विचारांना प्रत्युत्तर देण्याचे कामही ह्या मुस्लिम संघटनांनी करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर सर्व सामान्य लोकांना देखील पोलीस मित्र म्हणून सामावुन घेउन त्यांना चौकस राहणे, संशयीत व्यक्तींची माहिती सुरक्षा यंत्रणांना पुरवणे ह्याचे प्रशिक्षण देणे अत्यंत महत्वाचे आहे.
आर्थिक विकास झाला किंवा वैद्यकीय, तांत्रिक प्रगत शिक्षण मिळाले म्हणजे लोक धार्मिक कडव्या विचारांपासून दूर जातील असे समजणे म्हणजे स्वतःची फसवणूक करणे आहे. अमेरिकेतील 9/11 पासून ते दिल्लीतील 10/11 पर्यंत घडलेल्या दहशतवादी घटनांमधून लवकरात लवकर हा बोध घेणे गरजेचे आहे.
____________ ________ ___________________
March 4, 2026
March 4, 2026
February 24, 2026
February 21, 2026
February 9, 2026
January 19, 2026
November 13, 2025
Praveen Dixit, IPS retired as DGP Maharashtra. He also worked as DG Anti Corruption Bureau. Mr Dixit is decorated with President’s Medal for Distinguished Services and for Meritorious Services. Special Rapporteur, National Human Rights Commission, in charge of Maharashtra and Goa. Mr Dixit also retired as Vice Chairman (Administrative) in Maharashtra Administrative Tribunal at Mumbai.
© 2022 Praveen Dixit – Copyright – Designed & Developed By Host2Unlimted