स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची आजची आावश्यकता
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षांनंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लिखाणाचा, भाषणांचा सखोल अभ्यास करण्याची काय आवश्यकता आहे असा प्रश्न कोणाच्या मनात निर्माण होईल. त्याला उत्तर असे की, शरीररूपी सावरकर जेव्हढे महत्त्वाचे होते; तेव्हढेच विचाररूपी सावरकर हे कालजयी आहेत व त्यांचे विचार हे अमर आहेत. सावरकरांची कूटनीती, हिंदुत्त्वाचे महत्त्व, सैनिकीकरण, समाज क्रांतीकारक, सामाजिक बंधुता, भाषाशुद्धी, अर्थचिंतक, त्यांचे इस्लाम विषयक विचार, विज्ञाननिष्ठता, गो-विचार, स्त्री सबलीकरण, युवकांना प्रेरणा देणारे ही सावरकरांची बहु आयामी व्यक्तिमत्त्वे आहेत. हिंदुस्थानची फाळणी सावरकर कसे टाळु शकले असते Veer Savarkar – The man who could have prevented Partition ह्या पुस्तकाचे लेखकद्वय उदय माहूरकर आणि चिरायू पंडित ह्यांनी स्वातंत्र्य मिळण्या पूर्वीच्या काळाचा व त्यावेळच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लिखाणाचा, भाषणांचा सखोल अभ्यास करून हे उत्कृष्ट पुस्तक लिहीले आहे. ते प्रत्येकाने वाचले पाहजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते ‘अल्पसंख्यांकांमधील जे विचारवंत आहेत, विवेकी आहेत, त्यांचा आवाज बुलंद करणे आवश्यक आहे.’ स्वातंत्र्यवीर सावरकर स्षट करतातः ‘धर्मप्रचार वेगळा आणि फसवून, लालूच लावून धर्मांतर करणे वेगळे’.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे काही विषयांवरील विचार थोडक्यात आपण पाहू या.
1 ऐतिहासिक घटनांचे अचूक ज्ञान-
भारताचा इतिहास अति प्राचीन असला तरी सर्वसामान्य इतिहासकार ज्याला मान्यता देतात अशा सिकंदरच्या भारतावरील मोहिमेपासूनच्या काळाचे सावरकरांनी विश्लेषण केले आहे. भारत सार्वभौम रहावा, स्वतंत्र रहावा व परकीयांचा गुलाम होऊ नये ह्यासाठी सावरकरांनी सहा सोनेरी पाने किंवा Six Glorious Epochs यांचे सविस्तर विश्लेषण केले आहे. सुवर्णपाने का लिहिली त्या बद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात, “ प्रत्येक देशाला स्वातंत्र्य युद्धांचे स्मरण केल्यामुळे जोश प्राप्त होतो. त्यांची अस्मिता तीव्र होते व माणसे आत्मविश्वासाने काम करून अनेक क्षेत्रांमधे उत्तमोत्तम कामगिरी करतात जसे, अमेरिकेच्या बाबतीत American war of Independence चे महत्त्व आहे. आपल्या प्राचीन इतिहासामुळे चीन, बॅबिलॉन, पर्शिया, इजिप्त, प्राचीन पेरू आणि मेक्सिको, ग्रीस आणि रोम अशा अनेक देशांना आपल्या हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पाने परत परत वाचाविशी वाटतात. परंतु ह्यातील सर्व राष्ट्रातील ऐश्वर्य व वैभव काळाच्या ओघात नाहिसे झाले आहे व त्यांचे फक्त नाव शिल्लक राहिले आहे; परंतु भारताचा इतिहास हा सतत प्रेरणा देणारा व चिरंतन आहे. चीनच्या बाबतीत भारतासारखेच शक, हूण, मुघल ह्यांनी चिनी संस्कृती नामशेष केली. प्रसिद्ध चायना वॉल बांधूनही चीन स्वतःचे संरक्षण करू शकला नाही परंतु भारतीयांनी मात्र परकीयांचा प्रत्येकवेळी पराभव केला परंतु तरीही खोडसाळ इंग्रजी इतिहासकारांनी जाणूनबुजून खोटा प्रचार केला की, हिंदू हे सतत पराभूत होत राहिले व ते नेहमीच परकीयांचे गुलाम होते. दुर्देवाने काही भाडोत्री भारतीय इतिहासकारांनीही त्यांचीच री ओढली. स्वातंत्र्यवीर सावरकर लिहीतात, “हा प्रचार केवळ आपल्या देशाचा अभिमान कायम ठेवण्यासाठीच नव्हे तर ऐतिहासिक सत्य सांगण्यासाठी देशकार्य म्हणून करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात, पिढ्यांमागून पिढ्यांनी, भारतीय योद्ध्यांनी परकीय हल्लेखोरांचा पराभव करून देशाचे स्वातंत्र्य कसे आबाधित ठेवले हे स्पष्ट करण्यासाठी मी सहा सुवर्णपाने वाचकांपुढे उलगडून दाखवत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेले हे विचार त्रिकालाबाधित आहेत व शाळा, महाविद्यालयांच्या पुस्तकातून हे विचार जाणीवपूर्व दूर ठेऊनही ज्या कोणाला जेव्हा केव्हा हे विचारर वाचायला मिळतात तेव्हा त्यातील सत्यतेमुळे वाचक पूर्णपणे भारावला जातो व हे विचार आपण आधी का वाचले नाहीत म्हणून स्वतःला दोष देतो.
2 हिंदूपदपादशाही –
मराठ्यांच्या इतिहासाबद्दल लिहीतांना एक दुष्प्रचार केला जातो की, मराठे हे फक्त लुटारू होते व त्यांनी केवळ चौथाईचा हक्क वसूल करणे एवढेच काम केले. माराष्ट्राच्या बाहेरील हा खोटा प्रचार खोडून काढत स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या लिखाणातून सप्रमाण दाखवून देतात की, शिवाजी महाराज व पेशवे ह्यांच्यामुळेच हिंदू साम्राज्य स्थापन होऊ शकले. मोगलांबद्दल लिहीणार्या त्या कालच्या सर्व मुसलमान लेखकांनी केवळ मुसलमान बादशहांबद्दल स्तुतीपर लिहीले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर लिहीतात, हिंदू आणि मुसलमान ह्यांच्या ऐक्यासाठी भाऊसाहेब व विश्वासराव ह्यांनी 1761 साली दिल्लीचे तख्त फोडले हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्या घटनेनी हिंदूंनी आम्ही शारिरीक दृष्ट्याही समानतेच्या पातळीवर समर्थ आहोत हे दाखवून दिले. व हिंदूंना जिंकणार्यांचा त्यांनी पूर्ण पाडाव केला व जर आमच्याबरोबर मुसलमानांना मैत्री पाहिजे असेल तर त्यांनी आमच्याशी समानतेने वागले पाहिजे हे अधोरेखित केले व त्यामुळेच हिंदू व मुसलमान यांचे ऐक्य कायमचे कसे राहील ह्याचा धडा दिला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यामते छत्रपती शिवाजी, बाजीराव, भाऊसाहेब आणि जनकोजी, नाना आणि महादजी, रामदास आणि मोरोपंत यांच्या अभ्यासामुळे न्याय आणि मानवी हक्क तसेच स्वातंत्र्य व देशाची सार्वभौमता ह्याचे उत्कृष्ट उदाहरण डोळ्यासमोर उभे राहते. सावरकरांचे वरील विचार वाचल्यानंतर सामाजक ऐक्य राखण्यासाठी प्रत्येकाला मदत होईल ह्याचे अश्चर्य वाटायला नको.
3 1857 चे स्वातंत्र्यसमर –
1857 साली झालेले युद्ध हे शिपायांचे बंड नसून ते स्वातंत्र्य समर होते हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विस्तृतपणे दाखवून दिले आहे. ज्या देशाला आपल्या इतिहासाची योग्य जाणीव नसेल त्याला कोणतेही भविष्य असत नाही हे स्पष्ट करतांना इतिहासाचे योग्य ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. असे सावरकर लिहितात. स्वातंत्र्यवीर सावरकर पुढे लिहीतात, छत्रपती शिवाजींच्या काळात मोगलांविरुद्धचा राग योग्य असला तरी आजच्या काळात मुसलमानांविरुद्ध कोणतीही भावना ठेवणं हे केवळ मूर्खपणाचेच नसून पूर्णपणे अन्यायकारक आहे. 1857 चे स्वातंत्र्ययुद्ध हिंदू व मुसलमान यांनी एकत्रपणे परकीय इंग्रजांशी दिलेला लढा है उत्कृष्ट उदाहरण आहे. सिंधुपासून म्यानमारमधील इरावडी पर्यंत भारत हा एक आहे व भारत अखंड राहिला पाहिजे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ठाम मत होते.1857 चे युद्ध हे स्वधर्म व स्वराज्य ह्यासाठीचा लढा होता हे त्यांनी स्पष्ट केले आहे.
4 हिंदू समाजील वैगुण्ये –
हिंदू समाजातील विविध चालींचा प्रदीर्घ अभ्यास केल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर अंतर्मुख होतात आणि भारतातील विविध प्रकारच्या 7 बंदींकडे लक्ष वेधतात. त्या अशा
1 वाळीत टाकणे – श्रुतीस्मृतीपुराणोक्त बेडी
2 लोटीबंदी (पाणी पिण्यावरील बंदी)
3 रोटीबंदी (जेवणावरील बंदी)
4 बेटी बंदी (आंतर्जातीय विवाहावरील बंदी)
5 स्पर्श बंदी (अस्पृश्यता)
6 शुद्धीबंदी (धर्मांतर केलेल्या लोकांना शुद्ध करून/ आपल्या धर्मात घेण्यास बंदी)
7 सिंधुबंदी (समुद्रप्रवासावर बंदी)
स्वातंत्र्यवीर सावरकर लिहीतात, ह्या सात बंदी म्हणजे हिंदू समाजाच्या पायातील बेड्या होत्या. ह्या बेड्या मुस्लिम, ख्रिश्चन किंवा अन्य परकीय सत्तेनी घातलेल्या नव्हत्या तर हिंदूंनीच त्यांच्या धर्म रक्षणासाठी घातल्या होत्या. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांचा उल्लेख सात स्वदेशी बेड्या असा करतात. हिंदूंचे गुणच विवेक न बाळगल्यामुळे त्यांचे दोष बनले. भगवद्गीतेचा संदेश की गुण हे सुद्धा सापेक्ष आहेत आणि परिपूर्ण नाहीत. माणसा माणसामधे सत्त्व, रज आणि तामस गुणांवर आधारित भेद करण्याची आवश्यकता आहे ह्या भगवद्गीतेच्या महत्त्वाच्या संदेशाकडे हिंदूंनी दुर्लक्ष केले आणि स्वतःचा विनाश ओढवून घेतला. जिंकल्यानंतर शरण आलेल्या शत्रूला जीवदान देणे हा आपल्याकडे गुण समजला जातो; परंतु त्याचा गैरवापर करून कृतघ्न अशा महम्मद घोरी, रोहिला नजिबखान ह्यांना मोकळे सोडण्यामुळे त्यांच्यावर उपकार करणार्या पृथ्वीराज चव्हाण ह्याला त्यानी ठार मारले. व दुसर्याने मराठ्यांचा पानिपतच्या युद्धात पराभव करण्याची हिम्मत दाखवली. हिंदुंच्या अत्यंत पवित्र अशा सोमनाथ मंदीराचा विध्वंस मुसलमानांनी केला. त्यानंतर अनेक वेळेला सुवर्णसंधी लाभूनही विषारी अशा नाग सापांसारख्या क्रूर मुस्लिम हल्लेखोरांच्या एकाही मशिदीची एकही वीट हिंदूंनी उपसून काढली नाही.
भुकेलेल्याला जेवण व तहानेलेल्याला पाणी देणे हा गुण आहे असे हिंदूंनी पाठ केले होते. त्यामुळे ह्या अत्यंत विषारी अशा नाग सापांसारख्या क्रूर मुस्लिम हल्लेखोरांना योग्य धडा शिकवण्या ऐवजी ते दूध पाजत राहिले. मथुरा काशी ते थेट रामेश्वर पर्यंतची अनेकमंदिरे फोडून तिथल्या विटा हिंदूंचा अपमान करणयासाठी मुसलमानांच्या शौचालये आणि मुतार्यांमधे पायदळी तुडवल्या जात असतांना अशा अक्षम्य अपराधाकडे दुर्लक्ष करून त्यांना क्षमा करणे हा हिंदूंचा सर्वात मोठा अपराध समजला पाहिजे. राजकीय विजय मिळवल्यानंतरही काशी, मथुरा येथील एकही मशिद हिंदू राजांनी फोडली नाही. जास्तीतजास्त काही ठिकाणी त्यांनी पुन्हा मंदिरे उभारली. हे एकदा नव्हे तर वारंवार घडल्याचे स्वातंत्र्यवीर सावरकर अधोरेखित करतात.
हिंदूंच्या स्त्रिया पळवणे व त्यांना स्वतःच्या जनानखन्यात कोंबणे हे आक्रमक मुसलमान आपले धर्मकर्तव्य समजत होते. परंतु अनेकवेळा आक्रमक मुसलमानांवर विजय मिळवल्यानंतरही मुसलमानांनी कोंडलेल्या हिंदू बायकांना हिंदू राजांनी सोडवले नाही व त्यांना मुसलमानांच्या कैदेतच गुलाम म्हणून खितपत ठेवले. हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते अक्षम्य अपराध होता. मुस्लिम स्त्रियांना हिंदू करणे हा तर घोर अपराध समजला जात होता. अनेक मुलमान स्त्रियाही हिंदू स्त्रियांवर अत्याचार करत होत्या. परंतु तरीही स्त्रियांवर दया दाखवावी ह्या गुणाचा अतिरेक होऊन हिंदूंनी स्वतःचे अपरिमित नुकसान केले. स्वातंत्र्यवीर सावरकर खेदाने म्हणतात, अहिंसा, दया, शत्रूच्या बायकांबद्दलही उदारता, शरण आलेल्याला क्षमा, धार्मिक सहिष्णुता हे नक्कीच गुण आहेत परंतु ते कधी व कसे वापरायचे याचा विवेक घालवल्यानेच हे गुण हिंदू समाजाचे दोष ठरले. स्वातंत्र्यवीर सावरकर खेदाने म्हणतात,
पात्रापात्र विवेकशून्य, आचरि जरि सद्गुण ।।
तो तोचि ठरे दुर्गुण, सद्धर्मघातक ।।
(पाचवे सुवर्ण पान – प्रकरण 7)
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते “ज्याची ज्याची पितृभू आणि पुण्यभू आसिंधु सिंधू भारतभू आहे तो हिंदू! किती उदात्त कल्पना आहे. ह्याबद्दल कोणाचेच दुमत होण्याचे कारण नाही.
विज्ञाननिष्ठ सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यानी `विज्ञाननिष्ठ निबंध’ ह्यामधे अनेक विषयांवर सविस्तर लिहीले आहे. निसर्गचक्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करून स्वातंत्र्यवीर सावरकर लिहितात, विश्वातील यच्चयावत वस्तूजातीच्या मूळाशी जी शक्ती आहे तिला देव म्हणावयाचे असेल तर देवाने हे सारे विश्व मनुष्याच्या सुखसोयीसाठीच निर्मिले ही भावना भाबडी, खुळी व खोटी आहे. मनुष्य हा विश्वाच्या देवाच्या खिसगणतीतही नाही. ह्या विश्वाच्या देवाशी कोणताही संबंध जोडण्याची हाव मनुष्याने सोडून द्यावी हेच इष्ट. कारण तेच सत्य आहे. माणसाचे वाईट किंवा बरे करणे ह्या दोन्ही भावना विश्वाच्या देवाच्या ठायी असमंजस आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर पुढे लिहितात, मनुष्य जातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले, प्रतिकूल ते वाईट अशी नीती अनीतीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे. देवास आवडते ते चांगले. आणि मनुष्यास जे सुखदायी ते देवास आवडते ह्या दोन्ही समजुती खुळचट आहेत. कारण त्या असत्य आहेत. विश्वात आपण आहोत पण विश्व आपले नाही; फारफार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे; फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे – असे जे आहे ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे! आणि विश्वाच्या देवाची तीच खरी खरी पूजा !!
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा बुद्धिप्रामाण्यवाद –
बुद्धिप्रामाण्यावर भर देऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामाजिक क्रांती केली. सावरकरांच्या मते हिंदू राष्ट्राच्या अधोगतेस कारणीभूत होणार्या दुष्ट राष्ट्रीय रूढींसही हे श्रुतीस्मृतिपुराणोक्तच अमर करून ठेवीत आले आहे. कर्तृत्त्वाचे हातपाय जखडून टाकणार्या ह्या बेड्या तोडल्याच पाहिजत आणि ते सुदैवाने आपल्या इच्छेवर अवलंबुन आहे. कारण ह्या बेड्या मानसिक आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर आग्रहाने सांगतात, भारतीयांनी विज्ञानयुगाचे पान उलटले पाहिजे. आज काय योग्य ते सांगण्याचा अधिकार प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगक्षम विज्ञानाचा! ह्यापुढे कोणतीही गोष्ट चांगली की वाईट, सुधारणा इष्ट की अनिष्ट ह्या प्रश्नांचे उत्तर ती आज उपयुक्त की अनुपयुक्त आहे ह्या एकाच प्रत्यक्ष कसोटीवर पारखून दिले पाहिजे. तिला शास्त्राधार आहे का? हा प्रश्न आता केव्हाही विचारला जाऊ नये.
कोणती गोष्ट राष्ट्राच्या उद्धरणार्थ आज आवश्यकआहे ते प्रयोगाने प्रत्यक्षपणे सिद्ध करून देता येते. कोणताही ग्रंथ अपरिवर्तनीय आणि त्रिकालाबाधित आम्ही मानत नाही, पुरातन ग्रंथ आम्ही अत्यंत कृतज्ञ आदराने आणि ममत्वाने सन्मानतो, पण ऐतिहासिक ग्रंथ म्हणून. अनुल्लंघ्य धर्मग्रंथ म्हणून नव्हे. त्यातील सारे ज्ञान, अज्ञान आजच्या विज्ञानाच्या कसोटीस आम्ही लावणार आणि त्यानंतर आज राष्ट्र उद्धारणास जे आवश्य वाटेल ते बेधडक आचरणार. आम्ही अद्ययावत बनणार.
ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय?
आधुनिक इतिहासातील 1000 वर्षांच्या इतिहासाचे विश्लेषण करून स्वातंत्र्यवीर सावरकर लिहीतात की, केवळ ज्याला आपण तपस्या म्हणतो त्यामुळे कदाचित आत्मप्रसाद मिळत असेल पण, त्यामुळे राष्ट्रीय उत्थान इत्यादि भौतिक चळवळींचे यश किंवा अपयश अवलंबून नसते; तर मुख्यतः ते भौतिक सामर्थ्यावर अधिष्ठित असते. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हे तेव्हाच यशस्वी झाले जेव्हा त्यांनी ऐहिक, भौतिक, प्रत्यक्ष सृष्टीत उपयोगी पडतील तेवढी साधने संपादून विपक्षावर `सामर्थ्या’त मात केली. मग त्याला धार्मिक पोथ्यातील कल्पनांप्रमाणे आध्यात्मिक अधिष्ठानाचा पाठिंबा असो वा नसो. हे स्पष्ट करतांना स्वातंत्र्यवीर सावरकर पुढे म्हणतात, त्यामुळेच ह्या प्रत्येक धर्मातील लोकांचा कधी जय वा कधी पराजय झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर पुढे म्हणतात, ज्याना ज्याना आपल्या चळवीस ऐहिक यश हवे, त्याने त्याने आमच्या पक्षास न्याय आहे, आमच्या पक्षास देव आहे, आम्ही विजयी होणारच अशा वल्गना करण्याच्या नादी न लागता `सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे’, इतकेच काय ते खरे मानावे आणि वैज्ञानिक सामर्थ्यशाली प्रत्यक्षनिष्ठ अशा ऐहिक साधनांनी विपक्षाहून वरचढ होण्याचा यत्न करावा. हेही लक्षात ठेवावे की, कोणतेही वैभव कोणाचेही सदैव टिकलेले नाही. वैज्ञानिक बळाने जे ऐहिक यश मिळवू शकतात ते ऐहिक यश ज्यास हवे, त्याने ते अद्ययावत वैज्ञानिक सामर्थ्य संपादावे. चळवळीत ते सामर्थ्य असले तर भगवंताच्या अधिष्ठानावाचून काही अडत नाही. ते सामर्थ्य नसले तर भगवंताच्या अधिष्ठानासाठी कोटी कोटी जप केले तरी ऐहिक यश मिळत नाही हाच सिद्धांत!
स्पर्श बंदी ( अस्पृश्यता )
स्वातंत्र्यवीर परखडपणे लिहितात, आम्ही शाळांतून पूर्वास्पृश्य मुलांना सरमिसळ बसविण्याची चळवळ रत्नागिरी जिल्हाभर चालविली तेव्हा गावोगाव स्पृश्य जनता चवताळून उठली. जो तो आम्हांस म्हणाला, ‘अहो, तुम्ही आम्हा स्पृश्यांच्या धर्मभावना का दुखवता?’ तेव्हा आम्ही त्यांना विचारावे की ‘आम्ही तरी काय करावे? तुम्हांस जशा भावना आहेत तशाच अस्पृश्यांना नाहीत का? तुमची भावना त्यांना कुत्र्याहून दूर सारावे ही. ती न दुखवावी तर आमच्या मानवी धर्मबंधूंना कुत्र्याहून अस्पृश्य मानण्यात नि ज्या शाळेत कुत्री बसतात त्यातून त्यांना हुसकून देण्यात त्यांच्या भावना दुखतात? अशा परिस्थितीत ज्यांची भावना अन्याय्य, लोकहितविघातक, आततायी त्यांचीच भावना दुखविणे प्राप्त. चोराची भावना दुखवू नये म्हणून सावास जागवू नये की काय?’ तोच न्याय बुध्दिभेद करू नका, भावना दुखवू नका ही ओरड करणार्या सर्वांच्या प्रकरणी लागू आहे!
खरोखरच चातुर्वर्ण्याचा आणि त्यासच जर सनातन धर्म म्हणावयाचा असेल तर सनातन धर्माचा-जर कोणी कट्टर शत्रू असेल तर तो जातीभेदाचे निर्मूलन करू निघालेला सुधारक नसून जातीभेदासही सनातन म्हणून उचलून धरणारा ‘सनातन धर्माभिमानीच’ होय.
सिंधुबंदी ( समुद्रप्रवासावर बंदी)
स्वातंत्र्यवीर म्णतात, मलबारातील मोपल्यांचे आणि मध्यप्रांतातील ‘हलबीचे’ उदाहरण वानगीसाठी विवंचून पहा! ‘समुद्रयातुः स्वीकारः कलौ पंच विवर्जयेत्’ – समुद्रगमन करणार्यास जातिबहिष्कृत करावे, हा सिंधुबंदीचा करंटा धर्मनियम जेव्हा शास्त्रांनी घालून दिला तेव्हापासून हिंदूराष्ट्राचा सारा परदेशीय वाणिज्य व्यापार आम्ही आपण होऊन परक्यांच्या हाती सोपवून दिला! अर्थात् मलबारातील हिंदूराजेही समुद्र उल्लंघणे महापाप समजू लागले. परंतु अरब लोक मलबाराशी जो सामुद्रिक व्यापार करीत त्याद्वारे अलोट संपत्ति मिळते तीही आपल्याला मिळावी, आपल्याच सत्तेखालच्या सेवकांनी आपल्या मोठमोठया वाणिकनौका घेऊन नि जगातील द्रव्य आणून आपल्या कोशात त्याची भर घालावी, अशीही लालसा त्या मलबारी हिंदू राजांना झाली. तेव्हा समुद्रगमनाचे पाप तर हिंदूंच्या हातून होऊ नये आणि समुद्रगमनानेच मिळणारी जागतिक वाणिज्यसंपदा तर संपादिता यावी, या दोन्ही परस्परविरूध्द हेतूंना साधणारी कोणती फक्कड युक्ति त्या हिंदू राजांनी काढली म्हणता? तर प्रत्येक हिंदू कुटुंबातील एकेक मुलाने मुळातच हिंदूचे मुसलमान व्हावे ही!! तशी राजाज्ञा सुटली, आणि या ‘धार्मिक’ भावनेपायी सहस्त्रावधि कुटुंबातील एकेक मुलगा मुसलमानास देऊन टाकला!! स्वयंपाक करावयास सरपण हवे म्हणून हातपायच कापून चुलीत कोंबण्यात आले!! ही ऐतिहासिक घटना आहे – सिंधुबंदीचा ‘धर्म’ रक्षावा म्हणून मुसलमान झाले – त्यांचेच वंशज हे मोपले मुसलमान! आज तेच हिंदू समाजावर अनन्वित बलात्कार करून, सहस्त्रावधि हिंदूंना तरवारीच्या धाकाने बाटवून गोताचेच काळ झाले आहेत!
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे अजरामर आहेत. व त्यातून चिरंतन प्रेरणा मिळत असते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे विचार मोठ्याप्रमाणात 1935 ते 1950 ह्या काळात लिहीलेले असले तरीही ते जणु काही आजच लिहीलेले आहेत इतके ताजेतवाने आहेत व त्यातून त्यांनी काढलेली अनुमाने ही पूर्णपणे कालाच्या मर्यादांवरती विजय मिळवून चिरंतन झाली आहेत. हे विचार जेवढे आपण वाचतो, विचार करतो, तेवढे ते आपल्याला पटत जातात आणि अभ्यास करणारा तेव्हढाच सावरकरमय होऊन जातो. विशेष म्हणजे लोकांनी स्वतःच हे विचार स्वीकारल्यामुळे त्यांचा कोणीही प्रचार न करताच ते विचार पुन्हापुन्हा वाचले जातात व त्यामुळेच लोकांना स्फूर्ती प्राप्त होऊन ते अमर झालेले आहेत. त्यामुळे गरज कशाची असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा सखोल अभ्यास करण्याची.
—————————- ————————— ———————–
January 18, 2025
January 13, 2025
January 11, 2025
December 13, 2024
December 13, 2024
Praveen Dixit, IPS retired as DGP Maharashtra. He also worked as DG Anti Corruption Bureau. Mr Dixit is decorated with President’s Medal for Distinguished Services and for Meritorious Services. Special Rapporteur, National Human Rights Commission, in charge of Maharashtra and Goa. Mr Dixit also retired as Vice Chairman (Administrative) in Maharashtra Administrative Tribunal at Mumbai.
© 2022 Praveen Dixit – Copyright – Designed & Developed By Host2Unlimted