Recent

Articles

पोलीस व्यवस्थेतील वाढते गुन्हेगारीकरण व उपाययोजना

By on March 30, 2021

17 मार्च रोजी, मुंबई पोलीस आयुक्त असलेल्या परमवीरसिंग यांची शासनाने बदली करून गृहरक्षकदल प्रमुख या पदावर नेमणूक केली. मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटविल्यावरून परमवीरसिंग ह्यांनी माननीय मुख्यमंत्री ह्यांना लिहिलेले पत्र माध्यमांच्या मार्फत प्रकाशित झाले. परमवीरसिंग ह्यांनी आरोप केला की, गृहमंत्रीपदी असलेल्या अनिल देशमुख ह्यांनी मुंबई पोलीस मधील ACP सुनील पवार व निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे ह्यांना आपल्या
शासकीय निवासस्थानी बोलावून मुंबईतील 1750 बार्स, पब्स, हुक्का पार्लर्स इत्यादी ठिकाणांहून प्रत्येकी 2-3 लाख वसूल करून महिन्याला 50 कोटी व अन्य प्रकारे वसुली करून दर महा 100 कोटी रुपयांची खंडणी वसूल करावी, ह्या गंभीर आरोपाची चोकशी CBI मार्फत व्हावी अशी त्यांनी सुरवातीस सर्वोच्च न्यायालयात व नंतर उच्च न्यायालयात प्रार्थना केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सदर आरोप फेटाळून ह्यात काहीही तथ्य नाही असे स्पष्ट केले आहे. त्यापूर्वी मुंबईतील अनिल अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर अनोळखी गाडीमधे स्फोटके आढळून आल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यास अटक केली. सचिन वाझेने मनसुख हिरन ह्याचा खून कसा केला त्याची सविस्तर

माहिती तपासात उघड होत आहे. ह्या शिवाय परमवीरसिंग ह्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत दावा केला आहे की, गृहमंत्री अनिल देशमुख पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या, पोस्टिंग्ज मधे ढवळाढवळ करत होते, तपासात हस्तक्षेप करत होते. पोस्टिंग्ज साठी IPS अधिकार्‍यांचे दलालांबरोबरील टेलिफोनिक संभाषणाचे पुरावे असलेला अहवाल रश्मी शुक्ला ह्यांनी ऑगस्ट मधे महासंचालक यांना दिला होता. ह्या उलट सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे आरोप फेटाळत महासंचालक सुबोध जयस्वाल, रश्मी शुक्ला, परमवीरसिंग हे भारतीय जनता पक्षाचे प्यादे असल्यासारखे वागत आहेत असा आरोप केला आहे. रश्मी शुक्ला ह्यांनी बेकायदेशीररीत्या फोन टॅप केले ह्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान गृह खात्याचे मंत्री नसलेले अन्य मंत्री पोलीस अधिकार्‍यांना बेकायदेशीर आदेश देत असल्याचाही आरोप आहे.

समाज कंटक व समाज विघातक अशा व्यक्ती मोठ्या प्रमाणात बार्स, पब्स, हुक्का पार्लर्स, बेकायदेशीर दारूचे गुत्ते, जुगाराचे अड्डे, वेश्या व्यवसाय, ड्रग्जमाफिया, शस्त्रास्त्रांची बेकायदेशीर ने आण व विक्री, भ्रष्टाचार आणि दहशतवाद ह्यामधे गुंतलेले असतात. त्यामुळे वर उल्लेख केलेल्या सर्व ठिकाणी चौकसपणे पोलीसांनी कठोरपणे वारंवार कारवाई केल्यास समाज विघातक व्यक्तींचे मनोधैर्य खच्ची होते व समाजात सामान्य व्यक्तीला शांततेने राहण्यास मदत होते. परंतु ह्या समाज विघातक शक्ती आणि समाज रक्षणाची जबाबदारी असणारे पोलीस अधिकारी हे संगनमताने समाजकंटकांविरुद्ध कारवाई करण्याचे टाळतात त्यावेळेस सामान्य माणसाच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होते. ह्या समाजविघातक व्यक्तींना राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याचे जेंव्हा स्पष्ट होते तेव्हा पोलीस गुन्हेगारांवर कारवाई का करत नाहीत हे उघड होते. राजकारणी व्यक्ती, पोलीस अधिकारी व गुन्हेगार हे एकत्र येऊन समाज सुरक्षा धोक्यात आणत आहेत काय? असा प्रश्न निर्माण होतो. वरिष्ठ पोलीस अधिकारी हे गुन्हेगारीत अडकलेल्या पोलीस अधिकार्‍यांवर नियंत्रण का ठेऊ शकत नाहीत असाही प्रश्न सामान्य जनतेला पडतो. पोलिस आयुक्त असताना परमवीर सिंग ह्यांनी हाताखालील अधिकार्‍यांना राजकीय दबावापासून वाचवण्याचे काही प्रयत्न केल्याचे दिसत नाही, हे पोलीस नेतृत्वाचे अपयश म्हटले पाहिजे.

गेले काही महिने महाराष्ट्रातील राजकारणी व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यातील तणावग्रस्त संबंधांमुळे राज्यातील जनतेत तसेच पोलीस अधिकार्‍यांमधे एकमेकांविषयी संशयाचे वातावरण आढळून येत आहे. शासन व वरिष्ठ पोलीस अधिकारी ह्यांच्यामधे विश्वासाचे वातावरण असण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी एखादा अधिकारी कोणत्याही कारणाने आपल्याला आवडत असेल, किंवा काही कारणाने जवळचा असेल म्हणून त्याची नेमणूक अन्य सक्षम अधिकार्‍यांना डावलून महत्त्वाच्या कार्यकारी ठिकाणी करण्याने अनेक अधिकारी नाराज होत असतात. ज्या वेळेस मधले अनेक अधिकारी सक्षम, वरिष्ठ व निःपक्षपातीपणे काम करत असूनही त्यांना डावलून त्यांच्यापेक्षा कनिष्ठ
अधिकार्‍यांना नेमण्याने मधले अनेक अधिकारी नाराज होतात एवढेच नव्हे तर नेमलेला कनिष्ठ अधिकारीही स्वतःची नेमणूक योग्यता नसतानाही महत्त्वाच्या जागी झाल्यानंतर ज्यांच्या कृपेने तो त्या जागी बसला अशा लोकांनी /राजकारण्यांनी सांगितलेल्या गैरकायदेशीर गोष्टींकडेही दुर्लक्ष करतो व अनेक वेळा स्वतःही गैरकायदेशीर गोष्टी करण्यात पुढाकार घेतो. अशाप्रकारे आपल्या नेमणुकीची तो किंमत देत असतो. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या नेमणुका करण्यासाठी आस्थापना मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात असलेल्या अधिकार्‍यांनीही निःपक्षपातीपणे वागून सक्षम अधिकार्‍यांकडे दुर्लक्ष होणार नाही ह्याची खात्री करण्याची आवश्यकता आहे. परंतु त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. निव़ड मंडळाच्या निर्णयाविरुद्ध कारणे देऊन मंत्री त्यात बदल करू शकतात. त्याच बरोबर नेमणूक झालेल्या पोलीस अधिकार्‍यानेही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, लोकप्रतिनिधी लोकांच्या आशा आकांक्षा चांगल्या जाणून
असतात व त्यामुळे त्यांनी दिलेले कायदेशीर आदेश यांची तंतोतंत अम्मलबजावणी केली जाईल. एखाद्या अधिकार्‍यास आपल्या सांगण्याप्रमाणे नेमणूक मिळाली म्हणून राजकारणी व्यक्तींनीही त्यास गैरकायदेशीर आदेश देण्यापासून स्वतःला व आपल्या पाठीराख्यांना रोखणे आवश्यक आहे. किंबहुना पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या व नेमणुका ह्यात ढवळाढवळ होणार नाही ह्याची खबरदारी घेणे हे मंत्री व माननीय मुख्यमंत्री ह्यांचे गृह विभाग व राज्य प्रशासन प्रमुख या नात्याने आद्य कर्तव्य आहे. राजकारणी व्यक्तींशी असलेल्या ओळखीचा पोलीस अधिकार्‍यांनीही स्वतःच्या बदलीसाठी वा नेमणुकीसाठी गैरफायदा घेणे हे आक्षेपार्ह आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस प्रशासनात नुसती नाराजीच नव्हे तर धुमश्चक्रीचे स्वरूप प्राप्त होते. वर्षानुवर्षे ठराविक अधिकारी crime branch मधेच राहण्याने अन्य अधिकार्‍यांना नैराश्य येते. तसेच बदली न झालेल्या अधिकार्‍यांचे गुन्हेगारांशी सख्य वाढते. पोलीस आयुक्तांच्या हाताखाली काम करणार्‍या कोणत्या अधिकार्‍यास कुठे नेमायचे हे आदेश सुद्धा मंत्रालयातून येत असल्याने आयुक्तांचे कोणी ऐकेनासे होते व त्यातून ह्या पोलीस अधिकार्‍यांचे व गुन्हेगारांचे संगनमत तयार होते व भ्रष्टाचाराची साखळी तयार होते. हे अधिकारी खंडणी उकळायला मागेपुढे पाहत नाहीत.

ह्यावर उपाय म्हणुन पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या व नेमणुका ह्यांचा वारंवार आढावा घेऊन अधिकार्‍यांची जर काही अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी प्रत्येक स्तरावर तीन वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मंडळाची नेमणूक आवश्यक आहे. जे अधिकारी बदलीसाठी वशिला आणतील, त्य़ांना त्याबद्दल लेखी समज देणे आवश्यक आहे. विहित कालावधी पूर्ण झालेल्या अधिकार्‍यांची बदली वेळच्या वेळी आवश्यक आहे. निवडलेले बहुसंख्य अधिकारी हे मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश ह्या विभागातील असतात व हे अधिकारी मराठवाडा, विदर्भ ह्या भागात जाण्यास नाराज असतात. मराठवाडा, विदर्भ ह्या भागात नेमणूक झालीच तर राजकारणी व्यक्तींचा किंवा दलालांचा दबाव आणून पाहिजे त्या ठिकाणी बदली करून घेतात. ह्यावर उपाय म्हणून नेमणूक करतांनाच विदर्भ व मराठवाडा ह्या भागातील उमेदवारांसाठी 30% प्रत्येक भागाप्रमाणे जागा राखुन ठेवणे आवश्यक आहे.

जनतेमधे पोलीसांविषयी विश्वास वाढविण्यासाठी जनतेच्या तक्रारी ह्या नवीन तांत्रिक पद्धतीने म्हणजेच अ‍ॅपच्या माध्यमातून घेणे गरजेचे आहे. आधारकार्डाचा वापर करून अ‍ॅप मधून केलेली तक्रार ही ग्राह्य धरण्यात यावी व त्यावर तातडीने कारवाई व्हावी अशाप्रकारचे कायद्यातील बदल होणे अपेक्षित आहेत. शहरी भागात लावण्यात आलेल्या CCTV च्या माध्यमातून तक्रारदाराची वाट न पाहता पोलीसांनी आपणहून गुन्हे दाखल करणे व समाजकंटकांवर कारवाई करणे ही काळाची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी होणारे सोन साखळी खेचण्याचे प्रकार, मोबाइल चोरीचे गुन्हे, घरफोड्या, आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे, महिलांविरुद्धचे गुन्हे ह्यामुळे आज जनता त्रस्त झाली आहे त्यासाठी पोलीसांनाही विशेष कौशल्य प्राप्त करून प्रभावी कारवाई होईल असे प्रशिक्षण देणे जरुरीचे आहे. शासन व पोलीस अधिकारी ह्या आव्हानांना कसे तोंड देतात ह्यावर येणार्‍या काळात राज्यातील शांतता व सुव्यवस्था अवलंबून राहणार आहे.

`अंतर्गत शांतता असेल तरच देशाचा विकास होऊ शकतो’ हे अनेक उदाहरणांनी अधोरेखित केले आहे. ही शांतता टिकवण्यासाठी पोलीस प्रशासनास जनतेचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे. पोलीसांच्या कामात कोणत्या प्रकारच्या सुधारणा कराव्यात की ज्यामुळे पोलीस आणि जनता यांच्यात सुसंवाद कायम राहील हा अवघड प्रश्न आहे. करोनाच्या संदर्भात लॉकडाऊन राबवणे असो, अनेक निराधार व्यक्तींना मदत पुरविणे असो अथवा सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण असो अशी नवनवीन आव्हाने पोलीसांना सतत पेलावी लागतात. त्याचबरोबर पारंपारिक गुन्हे जसे घरफोडी, चेनस्नॅचिंग, खून, महिलांवरील अत्याचार ह्यांचाही तपास करण्याचे काम पोलीसांना करावे लागते. त्याशिवाय आरोपींना न्यायालयापुढे ने-आण करणे , महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा करणे, संवेदनाशील ठिकाणांचे संरक्षण करणे, कायदा व सुव्यवस्था ठेवणे ह्या व अशा अनेक कामातील गुंतागुंत वाढत आहे. त्याशिवाय दहशतवाद्यांकडून होणारे संभाव्य हल्ले व मूलतत्त्ववाद्यांपासून, डाव्या अतिरेक्यांपासून देशाचे रक्षण करणे अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या पोलीसांना पार पाडाव्या लागतात. यातील कोणतीही जबाबदारी ही कमी महत्त्वाची समजता येत नाही. महाराष्ट्रात आजमितीस जवळ जवळ दोन लाख वीस हजार (2,20,000) पोलीस अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यांनी 12 तास काम करूनही पोलीसांची संख्या अजून वाढवावी अशी मागणी सतत होत असते. एका पोलीस कर्मचार्‍यासाठी शासनास सुमारे रुपये पन्नास हजार (50,000) पेक्षा अधिक रक्कम पगार व इतर सुविधांसाठी खर्च करावे लागतात. बाकीच्या सर्व विकासकामातून पोलीसांच्या पगारासाठी किती रक्कम वाढवायची ह्यावर सतत मर्यादा असते. त्यामुळे पोलीसांची संख्या वाढवून ही समस्या सुटेल का? की अधिक गुंतागुंतीची होईल ? ह्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

देशातील वाढत्या समस्यांना केवळ पोलीस प्रभावीपणे उत्तर देऊ शकतील अशी अपेक्षा करणे म्हणजे ह्या वाढत्या जबाबदारींमुळे पोलीस खात्यात काम करणार्‍या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना अल्पावधित अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक व्याधींमधे लोटणे आहे. करोनाच्या महामारीत गेल्या 12 महिन्यात 500 हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी मृत्युमुखी पडले, ह्या शिवाय वाहतुकीच्या नियमांची अम्मलबजावणी असो अथवा दरोडा प्रतिबंधक कारवाई असो, किंवा गर्दीचे नियंत्रण असो, देशविघातक शक्ती पोलिसांवर हल्ले करून त्यांना जायबंदी करतात व काही वेळा ते मृत्यूमुखीही पडतात. अशा ह्या पोलीसांकडून समाजात शांतता राखणे व त्यांना विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करणे हे अवघड होत चालले आहे. आर्थिक कारणांमुळे शहरांमधे बेसुमार वाढ होत आहे. परंतु अशा नवीन झालेल्या ठिकाणी गुन्हेगारी वाढू नये अथवा दहशतवादी लपून राहू नयेत ह्यासाठी तितक्याच वेगाने पोलीस स्थानके व कर्मचारी ह्यांची वाढ केली जात नाही. याशिवाय कोणतीही सामाजिक समस्या समाजातील सर्व घ़टकांनी एकत्र येऊन काम केल्याशिवाय आटोक्यात येत नाही हे करोना नियंत्रण, सर्व शिक्षा अभियान, पोलिओ निराकरण अशा अनेक उदाहरणांमुळे अधोरेखित झाले आहे. असे असतांना सुरक्षचे काम फक्त पोलीसांचेच आहे असे समजणे बरोबर नाही.

वरील परिस्थितीवर प्रभावी उपाययोजना म्हणून नागपूर येथे पोलीस आयुक्त म्हणून काम करत असतांना समाजातील सर्व वयाच्या, सर्व धर्माच्या, जातीच्या, भाषांच्या स्त्री व पुरुषांना पोलीसमित्र म्हणून जवळच्या
पोलीस स्टेशनमधे नाव नोंदण्यासाठी आवाहन केले. इच्छुक व्यक्तींच्या बाबतीत काही आक्षेपार्ह नोंदी नाहीत हयाची खात्री केल्यानंतर त्यांच्यासाठी खालील विषयांवर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. जसेः अफवा पसरणार नाहीत, बाँब सदृश वस्तूपासून गर्दीचे नियंत्रण करणे, बस स्थानके व रेल्वे स्थानकात हरवलेल्या मुलांचा शोध घेणे. एकट्याने राहणार्‍या वृद्ध नागरिकांना आवश्यक ती मदत करणे, वस्तीत आलेल्या अनोळखी व्यक्तींची विचारपुस करणे, गुन्हेगारी अथवा
अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या तरूण मुलांना त्यातून बाहेर येण्यासाठी मदत करणे, शाळा व महाविद्यालयांजवळ गर्दीच्या वेळेस वहातूक नियंत्रण करणे, जत्रेच्या वेळेस सार्वजनिक घोषणा करणे, गणपती, देवी विसर्जनाच्या वेळेस गर्दीचे नियंत्रण करणे इत्यादी. ज्यावेळेस पोलीस गस्त घालत असतील त्यावेळेस पोलीस मित्र त्यांना साथ देत होते. जे तरूण सुट्टीच्या वेळात पोलीसांबरोबर काम करत होते, त्यांना प्रमाणपत्रेही देण्यात आली.

ह्या उपायांमुळे पोलीस आणि जनता यांमधे एक विश्वासाचे नाते निर्माण झाले. चेनस्नॅचिंग सारख्या घटना व रस्त्यावर होणारे गुन्हे ह्यांमधे 15% हून अधिक घट झाली. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी वेळ न जाता पकडले जाऊ लागले. वेगवेगळ्या प्रकारे पोलीस मित्रांनी जनतेमधे सम्पत्तीचे रक्षण कसे करावे? आर्थिक फसवणुकींपासून दूर कसे रहावे? मुलांची सुरक्षा कशी वाढवावी? सायबर सुरक्षेसाठी काय करावे? अशा विविध विषयांमधे जनजागृतीची फार मोठी कारवाई केली.

त्यामुळे पोलीस स्टेशनमधे गुन्हे नोंदवले जात नाहीत अशा तक्रारी संपुष्टात आल्या, तसेच पोलीस कोठडीत होणारी छळवणूक अथवा मृत्यू बंद झाले. उघडकीस न आलेले अनेक गंभीर गुन्हे व त्यातील आरोपी पकडता आले. भ्रष्टाचाराच्या तक्रारी कमी झाल्या. पोलीस मित्र ओळखू येण्यासाठी त्यांना टोपी व हातावर बांधण्याची खूण देण्यात आली. पोलीस बरोबर असल्याशिवाय सदर व्यक्ती कोणतीही कारवाई स्वतंत्रपणे करणार नाही ह्याची खात्री करण्यात आली.

सदर योजनेस नागपुर मधील लोकांनी उत्साहाने स्वीकारल्यामुळे, 2015 मधे पोलिस महासंचालक पदाची सूत्रे स्वीकारताच ही योजना मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात आली. ठाणे, पुणे, औरंगाबाद अशा शहरांसह सर्व जिल्ह्यातून दोन लाखांहून अधिक पोलीसमित्र पोलीसांबरोबर जनजागृतीचे काम मोठ्या प्रमाणावर करू लागले. दिवसा-रात्री पोलीसांबरोबर गस्त घालू लागले. त्यामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींविरुद्ध हल्ल्यांमधे घट झाली. सम्पत्तीचे गुन्हे कमी झाले. चेन स्नॅचिग व जबरी चोर्‍या यांच्या घटनां मधे लक्षणीय घट झाली. दिवसा तसेच रात्री बोलावल्याबरोबर सदर पोलीसमित्र पोलीस निरीक्षकांच्या हाकेला प्रतिसाद देत होते. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी, सक्षम स्त्री-पुरुष पुढे येऊन गावोगावी प्रभात फेर्‍या काढून नागरिकांना पोलीसांशी सहकार्य करण्याचे आवाहन करू लागले. पोलीस मित्र सामाजिक माध्यमातून लोकप्रशिक्षणाचे काम पार पाडत होते. पोलीसांनी दाखविलेलल्या विश्वासामुळे पोलीस व समाज ह्यात आढळणारी दरी मोठ्या प्रमाणात कमी झाली व पोलीसांच्या कामात पारदर्शीपणा निर्माण झाला.

पोलीसमित्र योजना ही पूर्णपणे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मर्जीवर अवलंबून आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सदर योजनेस अनुकूलता दाखवली नाही तर लोकांची कितीही इच्छा असली तरी ती योजना राबवली जाऊ शकत नाही.ह्यात बदल करून पोलिस मित्र ही संकल्पना संस्थात्मक करणे गरजेचे आहे. ही योजना राबविण्यासाठी कोणत्याही कायद्यांमधे बदल करण्याची आवश्यकता नाही तसेच ह्यासाठी सरकारी तिजोरीतून आर्थिक मदतीची आवश्यकता नाही. राजस्थान, गुजराथ, रेल्वे पोलीस ही योजना राबवत आहेत. राज्य सरकारने ठरविल्यास ही योजना प्रभावीपणे राबवणे शक्य आहे. त्यामुळे अधिकार्‍यांच्या मनमानीला व भ्रष्टाचाराला आळा बसेल. पोलीस व गुन्हेगार यांच्या संगनमतास
चाप बसेल.

आज आंतरजालामुळे (internet) व नवनवीन तंत्रज्ञान विकासामुळे पारंपारिक पोलीसिंग करणे हे खर्चिक तसेच दुरापास्त झाले आहे. ह्याचा साकल्याने विचार करून येणार्‍या काळाची आव्हाने स्वीकारण्यासाठी मूलभूत बदल स्वीकारण्याची सर्वांनाच आवश्यकता आहे. आत्तापर्यंत गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदाराने पोलीस ठाण्यात जाणे आवश्यक होते. परंतु नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन Smart Phone द्वारे आधार क्रमांक देऊन पोलीस नियंत्रण कक्षास दिलेली माहिती हीच गुन्ह्याची पहिली माहिती (FIR) समजून योग्य त्या पोलिस अधिकार्‍याने प्रथम तपास करणे आवश्यक आहे. गुन्हा घडल्यानंतर प्रत्येक गुन्ह्याचा तपास कसा करावा ह्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आवश्यक असते. प्रत्येक गुन्ह्यामधे तज्ज्ञ व्यक्ती संबंधित ठिकाणी उपलब्ध असणे शक्य नाही त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर तज्ज्ञ व्यक्तींची समिती ठेऊन त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे Video Call च्या माध्यमातून तपास करणे आवश्यक आहे. सध्या दाखल झालेल्या जवळ जवळ सर्व गुन्ह्यात दोषारोप पत्र पाठवले जाते त्यामुळे न्यायालयातील विलंब वाढत जातो व शेवटी सरासरी 25% गुन्हेगारांना शिक्षा होते. ह्या ऐवजी तपासाअंती पोलिस अधिकार्‍यांनीच अनेक गुन्हे सुनावणीस योग्य नाहीत हे न्यायालयाच्या मंजुरीने मान्य करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची तपासिक अधिकार्‍यांबरोबर सांगड घालण्याची आवश्यकता आहे. सध्याची पोलीसांची गस्त घालायची पद्धत ही कालबाह्य झालेली असल्याने त्यात बदल करून ड्रोनच्या सहाय्याने गस्त घालणे गरजेचे आहे. गुन्हा घडल्यानंतर वर्षानुवर्षे त्याचा तपास व दीर्घकाळ चालणार्‍या न्यायालयीन सुनावणीपेक्षा, गुन्हे घडणारच नाहीत ह्यासाठी जनतेच्या प्रबोधनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनासाठी उपलब्ध 50% निधी, गुन्हे होणार नाहीत ह्या उद्देशाने सामाजिक प्रबोधन करण्यासाठी वापरणे गरजेचे आहे. समाजातील विविध विषयातील तज्ज्ञ, Electronic, Print, Social Media ह्यांची मदत घेऊन विविध स्तरावर सातत्याने प्रबोधन करणे आवश्यक आहे. डिजिटल (digital) पुराव्यांचा तपासकामामधे अंतर्भाव केल्यास गुन्हेगार सुटण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

राजकारणी व वरिष्ठ पोलीस अधिकारी ह्यांच्यामधे विश्वासाचे वातावरण, नेमणूकीत पारदर्शकता, अधिकार्‍यांच्या व कर्मचार्‍यांच्या अडचणींचे वेळच्यावेळी निराकरण, जनतेच्या तक्रारी सोडवताना तंत्रज्ञानाचा वापर व नवनवीन गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी प्रशिक्षित पोलीस अधिकारी व कर्मचारी ह्या उपायांनी पोलीस हे जनतेचे संरक्षक व मित्र आहेत हा विश्वास अधोरेखित होईल.

TAGS
RELATED POSTS

LEAVE A COMMENT