स्पर्धा परीक्षेत मराठी उमेदवारांची टक्केवारी कशी वाढवावी
प्रवीण दीक्षित
(निवृत्त पोलीस महासंचालक)
संघ लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणार्या तीन टप्प्यातील स्पर्धा परीक्षेसाठी भारताततून दहा लाखाहून अधिक उमेदवार परीक्षा देतात. विविध गाळण्या पार करून त्यातील सुमारे 900 उमेदवारांना नेमणुकीसाठी निवडले जाते. त्यातील ह्या वर्षी 90 उमेदवार हे महाराष्ट्रातील होते. हे प्रमाण कसे वाढवता येईल ह्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दहा लाखातील 90 उमेदवारांमधे यायचे असेल तर उमेदवारांनीही प्रामाणिकपणे झटून तयारी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फेही विविध पदांसाठी नुकत्याच जाहीर झलेल्या निकाला प्रमाणे 405 उमेदवारांची वर्ग 1 साठी शिफारस करण्यात आली आहे.यशस्वी उमेदवारांनी परीक्षेसाठी घेतलेले विषय पाहिल्यास दिसते की त्यतील 80 टक्के ह्यांनी engineering, agriculture, ayurvedic, medicine हे पदवी परीक्षेसाठी घेतले होते व त्यानंतर पुढील 3-4 वर्षे त्यांनी राज्यशास्त्र, सार्वजनिक प्रशासन , इतिहास, समाज शास्त्र हे विषय घेतले होते. म्हणजेच आयुष्यातील महत्वाची 4 वर्षे त्यांची वाया गेली होती. ह्यावर उपाय म्हणजे, सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमातच राज्यशास्त्र, सार्वजनिक प्रशासन, इतिहास, समाज शास्त्र हे विषय शनिवारी, रविवारी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी शिकवण्याची व्यवस्था करणे जरुरीचे आहे. त्यामुळे राष्ट्राला होतकरू उमेदवार तरुणपणीच प्राप्त होतील.
ह्या परीक्षांसाठी अभ्यास कसा करावा ह्याबद्दल नंतर चर्चा करू. प्रथम इच्छुक उमेदवारांनी स्पर्धा परीक्षेसाठी करावयाचा अर्ज हा अत्यंत काळजीपूर्वक, बिनचूक व उपलब्ध माहिती बरोब्बर देऊन पूर्ण करणे आवश्यक आहे हे अधोरखित करणे गरजेचे आहे. अनेक चांगले उमेदवार अर्जात केलेल्या चुकांमुळे निवडीबाहेर फेकले जातात; व त्याबद्दल सतत दुःख व्यक्त करतात. अर्ज बिनचूक कसे भरायचे, ह्यामधे तुम्ही आरक्षणाचा फायदा घेत आाहात की नाही? घेत असल्यास कोणत्या वर्गात घेत आहात; अनुभव लिहीत असतांना नमूद केलेले दिनांक नीट आहेत ना, तुमचे नाव, जन्मतारीख, वय ह्या सर्व गोष्टी व तसेच तुम्ही कोणत्या पदासाठी इच्छुक आहात ह्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. अनेक पदांसाठी शारीरिक क्षमतेकडे विशेष लक्ष दिले जाते. जसे, उंची, दृष्टी, छातीचा घेर, वजन वगैरे. ह्या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उल्लेखलेली शारिरीक क्षमता आपल्यामधे आहे का नाही ह्याची वैद्यकीय अधिकारयांकडून अर्ज भरण्यापूर्वी तपासणी करुन घ्यावी ज्या योगे परीक्षा उत्तीर्ण होऊनही शारिरीक दृष्ट्या सक्षम नाही हे ऐकण्याची वेळ येणार नाही.
समांतर आरक्षण अपेक्षित असल्यास खेळाडू तसेच आर्थिक दुर्बळ गट इत्यादी आवश्यक प्रमाणपत्रे अद्ययावत आहेत ना हे अर्ज भरण्यापूर्वी तपासणे आवश्यक आहे. खेळाडू म्हणून निवड व्हावी अशी इच्छा असल्यास आपण ज्या खेळात भाग घेतला होता तो खेळ शासनमान्य यादीत आहे का तसेच ज्या स्पर्धेत भाग घेतला असेल ती संस्था शासनमान्य आहे का हे तपासणे गरजेचे आहे. मान्यता नसलेल्या संस्थेच्या स्पर्धेमधे भाग घेतल्याचे प्रमाणपत्र नमूद केल्याने शेकडो उमेदवारांना निवड झाल्यानंतरही काढून टाकण्यात आले आहे. राष्ट्रीय व राज्य स्तरावरिल मान्यताप्राप्त स्पर्धेत सुवर्ण किवा रजत पदक मिळाले असल्यासच खेळाडू म्हणून फायदा मिळू शकतो. निवड होण्यासाठी खोटी प्रमाणपत्रे बनविणे, सामाजिक माध्यमातून प्रश्नपत्रिका मिळविण्याचा प्रयत्न करणे, खोटे उमेदवार उत्तर पत्रिका लिहीण्यासाठी पाठविणे वगैरे सर्व अपप्रकारांपासून दूर राहणे आवश्यक आहे. अन्यथा फौजदारी कारवाईला तोंड द्यायला लागेल व तुम्ही आयुष्याचे नुकसान ओढवून घ्याल.
पुढील 25 वर्षात भारताला जगातील प्रगत राष्ट्र बनवण्याची जबाबदारी यशस्वी उमेदवारांवर आहे व ती ते यशस्वीपणे पार पाडतील अशी अपेक्षा आहे. स्पर्धा परीक्षेत निवड झाल्यानंतर यशस्वी उमेदवार ज्या ठिकाणी राहणारा असेल ते ठिकाण सोडून अन्यत्र काम करावे लागणार आहे हे समजून घेणे गरजेचे आहे; अन्यथा मला दूर नेमणूक दिली म्हणून नाराज होऊन नोकरी सोडायची वेळ येते. स्पर्धा परीक्षेनंतर समाजातील गरजू व्यक्तिंची सेवा करण्यासाठी आपली निवड झाली आहे हे लक्षा ठेऊन, कोणताही भ्रष्टाचार न करता सेवा देणे गरजेचे आहे. भ्रष्टाचारामुळे परिवीक्षाधीन (probationer) अधिकार्यांपासून निवृत्तीला थोडे दिवस शिल्लक असलेल्या अधिकार्यांना नोकरीतून बडतर्फ व्हावे लागले आहे व आयुष्यभर नाचक्कीचा शिक्का घेऊन फिरावे लागते. शासन देत असलेल्या पगारात आनंदाने राहण्याची कला स्वतः व कुटुंबाने अंगिकारण्याची जरूर आहे. शासकीय सेवेत ठराविक कालावधीनंतर अन्यत्र बदली होणार आहे, ह्यासाठी मानसिक व शारिरीक तयारी ठेवणयाची जरुरी आहे. ह्या सर्व गोष्टींचा उघड्या डोळ्याने गंभीर विचार करावा; व त्या मान्य असल्यास सरकारी नोकरीत रुजु व्हावे.
स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी?
संघ लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेसंबंधी होणारे बदल, वेळापत्रके, अभ्यासक्रम अटी व शर्ती अशा अनेक गोष्टी उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर ठेवत असतात. संकेत स्थळावरील माहिती ही उमेदवाराने वाचली आहे असे गृहीत धरली जाते व अमूक बदल मला माहीत नव्हता ही सबब अमान्य केली जाते. त्यामुळे स्पर्धा परीक्षांना बसायचे ठरवण्या पूर्वी व नंतर वेळोवेळी ह्या संकेतस्थळांना भेट देणे अत्यंत आवश्यक आहे. ह्याील कोणत्याही बाबीबाबत काही शंका, प्रश्न, अडचण असल्यास आयोगाला त्वरित इ-मेल पाठवणे व त्याचे रेकॉर्ड जपून ठेवणे उपयोगी पडते. यशस्वी उमेदवारांनी लिहीलेल्या उत्तरपत्रिका हयाही संकेतस्तळावर मिळू शकतात. त्यांचा अभ्यास करणे फायद्याचे ठरते. यशस्वी उमेदवारांनी दिलेल्या मुलाखती मुद्दाम संग्रही ठेवाव्यात व वारंवार वाचाव्यात त्यामुळे चांगले मार्गदर्शन होते. प्रश्नपत्रिकेत कोणत्या विषयांवर प्रश्न विचारले जातील, तसेच प्रश्नमंजूषा (question bank) उपलब्ध आहेत का? हे तपासून पहावे. गेल्या तीन ते पाच वर्षाच्या विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध असतात. त्या दिलेल्या वेळेत सोडविण्याचा सराव परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. हुबेहुब तेच प्रश्न जरी आले नाहीत तरी परीक्षकांना कोणते विषय महत्वाचे वाटतात ते आपल्या लक्षात येते.
Prelim मधे 8-9 विषयांवर 6-7 प्रश्न असतात. जी उत्तरे माहित असतील, ती करावीत व अवघड वाटणारे प्रश्न, सर्व प्रश्न पत्रिका संपल्यावर सोडवण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी रोज घडणार्या गोष्टींची नोंद करून ठेवावी. लेखी परीक्षेतील काही विषय हे सक्तीचे असतात तर काही विषय हे ऐच्छिक असतात. सक्तीचे विषय जसे व्याकरण, निबंध, दिलेल्या परिच्छेदावरील प्रश्न ह्यासाठी दर आठवड्यास किमान एक पूर्ण पेपर लिहून तो तज्ज्ञ व्यक्तीकडून तपासून घ्यावा. निबंधामधे लिहीण्यापूर्वी विविध मुद्दयांची नोंद करावी. सुरवातीस प्रस्तावना, आपल्याला काय सांगायचे आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती, त्यानंतर आपण निबंध कशा प्रकारे लिहिणार आहोत जसे क्रमवारी पद्धतीने, तुलनात्मक पद्धतीने, विश्लेषण पद्धतीने हे स्पष्ट करावे. शक्यतो विषयासंबंधी दोन्ही बाजूची मते द्यावीत व शेवटी स्वतःचे मत काय आहे ते कारणांसह सविस्तर सांगावे. आपण काय लिहिले आहे ते अनुमान सकारात्मक पद्धतीने मोजक्या शब्दात द्यावे. मुद्द्यांची पुनरावृत्ती करू नये वेगळ्या विचारासाठी नवीन परिच्छेद सुरू करावा. परिच्छेद साधारण वीस ओळींपर्यंत असावा. लेखकाचे विचार अचूक आठवत नसल्यास लेखकाचे नाव, पुस्तकाचे नाव नमूद करून ते विचार स्वतःच्या शब्दात मांडावेत. आपण लिहिलेल्या मुद्द्यातून शेवट करावा व शेवट हा उल्लेखलेल्या मुद्दयांच्या विरुद्ध नसावा.
विषयाचा अभ्यास करण्यासाठी स्पर्धापरीक्षेत जे विषय आपण घेणार असू त्या विषयांचा महाविद्यालयापासून अभ्यास केल्यास त्याचा खूप फायदा होतो. जसे राज्यशास्त्र, सार्वजनिक प्रशासन, आन्तर्राष्ट्रीय संबंध, अर्थशास्त्र, समाज शास्त्र, मानसशास्त्र, तर्कशास्र, भूगोल, इतिहास वगैरे. ह्या विषयांचा पदव्युत्तर पर्यंतचा अभ्यास अपेक्षित असतो. त्यासाठी प्रसिद्ध लेखकांची किमान दोन अभ्यासक्रमासाठी नेमलेली पुस्तके समजून अभ्यास करावा. अवघड शब्द अर्थासकट लक्षात घ्यावेत. स्वतःच्या शब्दात विविध मुद्द्यांवर टिपा तयार कराव्यात. एक प्रकरण संपले की त्यातील आपल्याला काय समजले ते स्वतःच्या शब्दात लिहावे व तो विषय पक्का करावा. त्या विषयासंबंधीच्या चार ते पाच प्रश्नपत्रिका दिलेल्या वेळेत लिहून पूर्ण करण्याचा सराव करावा. त्या विषयासंबंधी शक्य असल्यास अॅकॅडमिक जर्नलमधील लेख वाचावेत. व त्याच्या टिपा काढून तयार ठेवाव्यात. उत्तरे लिहीताना त्याचा वापर केल्यास नक्की फायदा होतो.
पाच ते आठ मुलामुलींनी एकत्र येऊन अभ्यास केल्यास त्याचे अनेक फायदे होतात. दर आठवड्यास एक विषय गटामध्ये वाटून घ्यावेत व प्रत्येकाने केलेल्या तयारीच्या आधारे सादरीकरण करून एक तास चर्चा करावी. काढलेले मुद्दे एकमेकांना द्यावेत सदर चर्चा करतांना तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली चर्चा केल्यास त्याला योग्य दिशा प्राप्त होते. व विषय समजण्यास त्याचा मोठा फायदा होतो. आकाशवाणीवर रोज रात्री 9 वाजता दिल्या जाणार्या बातम्या, त्या नंतर असणारे स्पॉटलाइट ही तज्ज्ञ व्यक्तिंची चर्चा अद्ययावत राहण्यास उपयोगी राहते. सदर चर्चा आता आकाशवाणीच्या NewsonAIR ह्या अॅपवर आणि संकेतस्थलावर भेट देऊन ऐकता येते. राष्ट्रीय विचाराच्या वर्तमान पत्रांमधील लेखकांचे लेख मुद्दाम वाचावेत तसेच दूरदर्शन वरील चर्चा ऐकाव्यात. विविध विकासोपयोगी, लोककल्याणाच्या योजनांबद्दल पंतप्रधानांनी केलेली भाषणे व शासकीय प्रकाशने जशी, योजना, लोकराज्य ही नेहमी वाचनात ठेवावी. आन्तर्राष्ट्रीय संबंधांसाठी Indian Council of World Affairs च्या संकेतस्थळाला वरील गोष्टींचाभेट द्यावी व भारतीय दृष्टिकोन समजून घ्यावा.
मुद्देसुद विचार, विचारांची स्पष्ट मांडणी, खोलात जाऊन विषयाचा तसेच समस्येचा अभ्यास व त्यासंबंधी सकारात्मक उपाय योजना ह्यामुळे उमेदवाराचे व्यक्तिमत्व छाप पाडून जाते व अन्य उमेदवारांपेक्षा त्याची निवड नक्की होण्याची शक्यता असते. पोपटपंची लगेचच उघड पडते व ते उमेदवार नाकारले जातातत. मुलाखतीत सहजपणा असावा व गंभीरपणे विचार करून बोलावे.
काही कारणाने परीक्षेत यश न मिळाल्यास त्यामुळे खट्टू होऊ नये. एका पाठोपाठ तीन वेळा परीक्षा देण्याचा कसोशीने प्रयत्न करावा. त्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शक्य असेल तिथे काम करून अर्थार्जन करावे व वेळ काढून परीक्षेसाठी प्रयत्न चालू ठेवावेत. केलेले प्रयत्न वाया जात नाहीत.
माठी तरुण हे नक्कीच हुषार आहेत वरील गोष्टींचा साकल्याने सराव केल्यास ते स्पर्धा परिक्षेत मोठ्या प्रमाणात यशस्वी होतील ह्याची खात्री आहे.
——————————————-