Author:

Praveen Dixit

Articles

यशस्वी उद्योजक होण्याची गुरूकिल्ली

By on October 31, 2023

यशस्वी उद्योजक होण्याची गुरूकिल्ली

प्रवीण दीक्षित

निवृत्त पोलीस महासंचालक

28/10/2023

शुक्ल यजुर्वेदीय माध्यन्दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान च्या वर्धापन दिना निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमामधे मला सहभागी करून घेतले ह्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी व कार्यवाह श्रीकांत जोशी ह्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.

 भा. ज. प. महिला मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष लोकप्रिय माजी आमदार मेधा कुलकर्णी, लोकप्रिय अभिनेता संकर्षण कर्‍हाडे, त्रिमूर्ती ऑटोडेको कॉम्पोनन्टस् प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक मकरंद जोशी, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्मान्य श्रोते, पत्रकार मित्र व बंधुभगिनींनो, 

सुरवातीलाच लोकप्रिय अभिनेता व कवी संकर्षण कर्‍हाडे ह्यांना सृजन युवा कलाकार पुरस्कार व यशस्वी उद्योजक मकरंद जोशी ह्यांना चंद्रकांत जोशी स्मृती प्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार मिळाल्याबद्दल मी उभयतांचे हार्दिक अभिनंदन करतो. उभयतांच्या यशस्वी प्रवासाबद्दल घेण्यात आलेली प्रकट मुलाखत आत्ता आपण ऐकली व त्यांच्या यशाचे रहस्य समजून घेतले.

यशस्वी कलाकार तसेच यशस्वी उद्योजक व्हायचे असल्यास काही समान गोष्टी अधोरेखित करणे गरजेचे आहे. सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे जी भूमिका आपल्याला पार पाडायची असेल त्याच्याशी पूर्णपणे समरस होणे. ही समरसता तेव्हा प्राप्त करता येते जेव्हा तुम्ही स्वतःला झोकून देऊन त्यातील बारीकसारीक सर्व बाबींचा सखोल अभ्यास करत असता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्यासाठी आपण सर्वकाही कारवाई करत असतो मग ते कदाचित प्रेक्षक असतील, श्रोते असतील किंवा कदाचित आपल्या मालाचा वापर करणारे उपभोक्ते असतील त्यांना केंद्रस्‌थानी ठेवून प्रत्येक गोष्ट करणे.. पूर्वी व्यवस्थापन शास्त्रामधे ह्याला customer satisfaction असे म्हटले जायचे. परंतु गेल्या अनेक वर्षात ह्यात प्रगती होऊन सध्या customer excellence ही संकल्पना रूढ होत आहे. ह्याचा अर्थ असा की आपण सादर केलेली कला असो, किंवा सेवा असो, किंवा वस्तु असो ही इतकी उत्तम पाहिजे की, जी ग्राहकांनी कल्पनाही केली नसेल. 

हे जे चोखंदळ ग्राहक असतात ह्यांना कल्पनातीत समाधान देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असलेला मंत्र लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. ‘‘Be Vocal for Local But be Global in your approach!’’ आज कलेच्या क्षेत्रात जरी पाहिले तरीही मराठी भाषिक हे केवळ महाराष्ट्रापर्यंत किंवा भारतापर्यंत मर्यादित नसून जगातील दोनशेपेक्षा अधिक देशांमधे पसरलेले आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे आन्तर्जालाच्या माध्यमामधून आज कोणत्याही ठिकाणावरून कोणतीही व्यक्ती तुमचे सादरीकरण पाहत वा ऐकत असते. तसेच तुम्ही निर्माण केलेली वस्तू ही सुद्धा जगातील कुठल्याही देशात पोचत असते. ह्यांचे समाधान करण्यासाठी निर्मात्याने पूर्णपणे पूर्वग्रहदूषितपणा सोडून जगातील कोणत्याही धर्मातील, भाषेतील, जातीतील, जमातीतील, स्त्री-पुरूषांचा विचार करून सादरीकरण करणे आवश्यक आहे. ह्यासाठी आपल्या मनातील इतरांबद्दलचे अनेक पूर्वग्रह आपण प्रयत्नपूर्वक दूर करणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर आपण सादर करीत असलेली कला, सेवा किंवा वस्तू  ही अत्यंत स्पर्धात्मक वातावरणातही यशस्वी करणे जरुरीचे आहे. केवळ दुसर्‍याची नक्कल करून तो यशस्वी झाला म्हणजे आपण यशस्वी होऊ हयाची खात्री नसते. ह्यासाठी तुम्हाला सखोल संशोधन, चिंतन, आवश्यक आहे व त्यातूनच तुम्ही सादर करत असलेल्या गोष्टीची निर्मिती होत असते. व ह्यालाच पेटंट मिळवणे असे संबोधले जाते. अनुकरण करणारे व्यवसाय थोड्याकाळात कदाचित यशस्वी झाल्याचे दिसते पण त्याच वेगानी ते काळाच्या पडद्याआडही जात असतात. परंतु ज्या उद्योजकांनी संशोधनपूर्वक आपले वैशिष्ट्य कायम ठेवले आहे, मिळणार्‍या नफ्यातील कमीतकमी 10%  रक्कम संशोधनासाठी नियमित खर्च केली आहे ते उद्योजक स्पर्धेवर मात करून टिकून राहतात असे दिसते.

यशस्वी उद्योजक होण्यासाठी आपण निर्माण केलेल्या सुरवातीच्या गोष्टींमधे अडकून न पडता नवनवीन गोष्टी ग्राहकांपर्यंत पोचविणे व ग्राहकांकडून त्याची मागणी वाढविणे हे कौशल्य आवश्यक आहे. हे करत असताना जाहिरातीचे महत्त्व दुर्लक्ष करून चालणार नाही. माझी वस्तू चांगल आहे. ती कोणीही स्वीकारेल असे समाधान आत्मघातकी ठरू शकते. संस्कृतमधे म्हणतात, ‘‘अप्रकाशिता वार्ता मृता’’ म्हणजे तुम्ही काय केले आहे हे जो पर्यंत तुम्ही जगाला सांगत नाही तोपर्यंत ते लोकांना माहित होईल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. अर्थात ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे खोट्या नाण्याची कितीही प्रसिद्धी केली तरी ते लगेचच उघड पडते. ह्यासाठी मुळात तुमचे उत्पादन हे उत्तम पाहिजेच तसेच त्याची किंमतही लोकांना सहज परवडेल अशीही पाहिजे. ह्याचा अर्थ असा नव्हे की ती तुम्ही स्वस्तात द्यावी. ह्यासंबंधी नुकतेच उघडकीस आलेले उदाहरण म्हणजे जेट एअरवेज चे दिवाळे का वाजले हे विचार करण्यासारखे आहे. परवडत नसतानाही प्रत्येक कि.मि. मागे 1 रुपया कमी लावणयाचा निर्णय जेट कंपीचे संचालक गोयल ह्यांनी जाहीर केला. थोडे दिवस काही ग्राहक वाढलेही असतील परंतु एका वर्षातच जेट एअरवेज चे दिवाळे निघाले व कंपनीला कुलूप ठोकावे लागले.

हया सर्व गोष्टींशिवाय यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुम्हाला कंपनीसंबंधीच्या सर्व कायद्यांची माहिती पाहिजे. व कायद्याने सांगितलेले निर्बंध तुम्ही तंतोतंत पाळले पाहिजेत. जसे स्त्री कामगारांची गार्‍हाणी दूर करण्यासाठी विशाखा समितीची स्थापना, बालकामगार प्रतिबंध कायदा, कामगार कल्याणासाठी कामाचे तास नियंत्रित ठेवणे, कामगारांना वेळच्यावेळेस पगार, प्रॉव्हिडंट फंड उपलब्ध करून देणे, त्यांच्या सुरक्षेसाठी सर्व व्यवस्था ठेवणे इत्यादि.

हे सर्व करत असताना व्यवस्थापन प्रशिक्षणात शिकवलेले धडे पुरेसे नसतात हेही लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अमेरिकेतील अनेक सुप्रसिद्ध बिझिनेस स्कूलमधुन उत्तम गुण मिळवून बाहेर पडलेले अनेक CEOs तुरुंगात गेलेले दिसतात कारण त्यांच्यामधे पैसे कसे वाढवायचे ह्याची अक्कल होती परंतु नैतिकता नव्हती. नैतिकतेला इंग्रजीत Ethics किंवा Ethical Values म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे तर हया साठी यशस्वी उद्योजकांनी भारतीय व्यवस्थापन शास्त्र, भगवद्गीतेतील व्यवस्थापन शास्त्र तसेच दासबोधात रामदासस्वामींनी सांगितलेले व्यवस्थापन शास्त्र ह्याचा मुद्दाम अभ्यास करणे आवश्यक आहे. भगवान कृष्णाने गीतेत सांगितल्या प्रमाणे ‘‘यद्दयदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।’’ तसेच आचारः प्रभवो धर्मः धर्मस्य प्रभुरच्युतः । तुमचे स्वतःचे उ्तम आचरण हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे.

पुन्हा एकदा आजच्या सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून, आयोजकांना धन्यवाद देऊन मी माझ्या वाणीला विराम देतो.

——————   —————————–  ————-




Articles

ड्रग्जच्या विळख्या तरुणाई

By on October 18, 2023

ड्रग्जच्या विळख्या तरुणाई
– प्रवीण दीक्षित, माजी पोलिस महासंचालक


पुण्यातील ससून रुग्णालयात जप्त करण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांच्या ड्रग्ज साठा प्रकरणात मुंबई पोलिसांनी प्रमुख आरोपी ललित पाटील याला नुकतीच अटक केली आहे. वास्तविक, गेल्या काही वर्षांत अमली पदार्थांचा विळखा राज्यातच नव्हे तर सबंध देशभरात वाढत चालला आहे. खरे तर हे पाकिस्तानने भारताविरुद्ध छेडलेले छद्मयुद्ध किंवा प्रॉक्सी वॉर आहे. गेल्या वर्षभरात २५ हजार कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज तपास यंत्रणांनी, नार्कोटिक्स ब्युरोने आणि विविध राज्यांच्या पोलिसांनी पकडलेले आहेत. अर्थात, ही सतत चालत राहणारी लढाई आहे. ही लढाई केवळ पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी लढायची नाहीये; त्यामध्ये जनतेनेही खूप मोठ्या प्रमाणावर जागरुक राहणे गरजेचे आहे.


पुण्यातील ससून हॉस्पिटल ड्रग्स रॅकेट प्रकरणी फरार असणार्‍या ललित पाटील याला नुकतीच अटक करण्यात आली. श्रीलंकेला जाण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी जेरबंद केले. ललित पाटील हा मूळचा नाशिकचा असून २०२० मध्ये तो ड्रग्जच्या रॅकेटमध्ये असल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. अटक झाल्यापासून ललित प्रदीर्घ काळ ससून रुग्णालयात तळ ठोकून होता. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची शिफारस केली होती आणि त्याचा उपयोग करून तो ससूनमधून निसटला होता. अटकेनंतर त्याच्या चौकशीतून ड्रग्जचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वास्तविक, अलीकडील काळात राज्यातच नव्हे तर सबंध देशभरात अमली पदार्थांचा विळखा वाढत चालल्याचे दिसून येत आहे.

 
वस्तुतः अमली पदार्थ किंवा ड्रग्ज हा विषय अत्यंत संवेदनशील आणि गंभीर स्वरुपाचा आहे. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट स्थापन होण्यामागे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असणार्‍या आयएसआयचा मोलाचा वाटा होता. किंबहुना आयएसआयच्या समर्थनावरुनच तालिबानचे राज्य अफगाणिस्तानात स्थापन झाले. पाकिस्तानची भारताबाबतची रणनीती अत्यंत स्पष्ट आहे. प्रत्यक्ष युद्धामध्ये भारताला पराभूत करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर पाकिस्तानने छद्मयुद्धाचा मार्ग निवडला. त्याअन्वये दहशतवादी कारवाया करुन भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेमध्ये आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे आणून भारताची प्रगती रोखणे हे धोरण म्हणून पाकिस्तानने स्वीकारले. तथापि, भारताच्या संरक्षण यंत्रणांनी आणि सैन्याने पाकिस्तानचे हे मनसुबे वेळोवेळी हाणून पाडले. आतापर्यंत झालेल्या युद्धांमध्येही पाकिस्तानला भारताने धूळ चारली आहे. ‘ब्लीड इंडिया विथ थाऊजंड कटस्’ असे म्हणत भारताला रक्तबंबाळ करण्याचा प्रयत्न करणार्‍या पाकिस्तानचीच कालोघात शकले झाली आणि बांगला देश वेगळा झाला. तेव्हापासून पाकिस्तानने कधी पंजाबमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न केला, तर कधी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला; परंतु भारत सरकार, भारतीय सैन्य आणि भारतीय जनता या तिघांनी एकत्र येऊन पाकिस्तानला नेस्तनाबूत केले.

 भारतातील जनतेला याची शिक्षा द्यायची म्हणून या देशातील तरुणांभोवती अमली पदार्थांचा विळखा घालण्याचे षड्यंत्र आयएसआयने रचले आहे. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असण्याबरोबरच सर्वाधिक तरुणांचाही देश आहे. १५ ते ३५ वयोगटातील तरुणांचे प्रमाण आपल्या लोकसंख्येमध्ये मोठे आहे. ही तरुणपिढी म्हणजे भारताची संपत्ती आहे. लोकसंख्येच्या परिभाषेत त्यांना ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ असे म्हटले जाते. कार्यकुशल मनुष्यबळाची उपलब्धता हा आर्थिक व औद्योगिक विकासाचा कणा मानला जातो. तरुणपिढीचे हे योगदान आणि महत्त्व लक्षात घेऊन पाकिस्तानने भारतातील तरुणाईला व्यसनाधिन करुन टाकण्याचा जणू चंगच बांधला आहे. यासाठी कधी हवाई मार्गाने, कधी जमिनी मार्गाने किंवा कधी समुद्रमार्गाने पाकिस्तान भारतात अफू, चरस, गांजा, हेरॉईन यांसारख्या अमलीपदार्थ पाठवत आहे. हे प्रमाण साधेसुधे नसून अक्षरशः काही टन अमली पदार्थ पाकिस्तानातून तस्करीच्या मार्गाने भारतात येत आहेत. यातील काही अमली पदार्थांची किंमत ही काही हजारांमध्ये असते. उदाहरणच घ्यायचे झाल्यास एक ग्रॅम हेरॉईनची किंमत अफगाणिस्तानातून विकले जाते तेव्हा समजा १०० रुपये असेल तर मुंबईच्या बाजारात ते १० हजारांना विकले जाते. यातून एकीकडे भारतातील समाजव्यवस्थेत विष पेरायचे आणि दुसरीकडे प्रचंड नफा कमवायचा असा दुहेरी डाव पाकिस्तानकडून खेळला जात आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि अन्य काही संस्थांच्या, तपास अधिकार्‍यांच्या तपासातून ही बाब उघड झालेली आहे की, अमली पदार्थांच्या व्यापारातून-तस्करीतून मिळालेला पैसा शस्रास्रांचा पुरवठा करण्यासाठी आणि दहशतवादी तत्वांना आर्थिक रसद पुरवण्यासाठी वापरला जातो. म्हणजेच तुमच्याच पैशाने तुमच्याच देशात दहशतवाद पसरवायचा, लोकांना मूलतत्ववादी बनवायचे, लोकांना शस्रास्रे पुरवायची, बॉम्ब बनवायला मदत करायची असा पाकिस्तानचा डाव आहे. यासाठी अलीकडील काळात वेगवेगळ्या मोडस ऑपरेंडी पाकिस्तानकडून वापरल्या जात आहेत.

 
सुरुवातीला पाकिस्तानने जमिनीखाली बोगदे तयार करुन पंजाब, काश्मीर यांसारख्या सीमावर्ती राज्यांमध्ये ड्रग्ज पाठवण्याचा प्रयत्न केला. परंतु बीएसएफच्या जवानांनी हे बोगदे तपासण्यास सुरुवात केली आणि पाकिस्तानचा हा डाव हाणून पाडला. त्यानंतर पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमातून अमली पदार्थ आणि शस्रास्रे पाठवण्यास सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आता अँटी ड्रोन टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणावर वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ड्रोन्सच्या माध्यमातून होणारा अमली पदार्थांचा पुरवठा रोखण्यामध्ये यश येत आहे. त्यानंतर आता महिलांचा कुरीयर म्हणून वापर करत पाकिस्तान अमली पदार्थ भारतात पाठवत आहे. तसेच समुद्री मार्गाने कांडलासारख्या बंदरांमधून कंटेनर्समधून टनांनी हेरॉईन पाठवण्याचा प्रयत्न केला आहे. थोडक्यात, हवाई, समुद्री आणि जमिनी अशा तिन्ही मार्गाने पाकिस्तान तरुणपिढीला बरबाद करणारे हे विष भारतात पेरत आहे.

 
मध्यंतरी असे आढळून आले होते की, काही पाकिस्तानी स्मग्लर श्रीलंकेच्या तुरुंगातून समुद्री मार्गाने अमली पदार्थांच्या तस्करीचे नियोजन करत होते. आपल्याकडे मुंबई विमानतळावर युगांडा, नायजेरिया आदी ठिकाणांहून येणार्‍या अनेक स्मग्लरना मागील काळात रंगेहाथ पकडण्यात आपल्या तपास यंत्रणांना यश आले आहे. तथापि, यातील दुर्दैवाची बाब म्हणजे आपल्याकडील तरुणपिढी यामध्ये प्रचंड प्रमाणात गुरफटत चालली आहे. अगदी मोठमोठ्या, प्रतिष्ठित शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेणारे अनेक तरुण हे या अमली पदार्थांचे सेवन करत आहेत. अगदी आयआयटीसारख्या संशोधन क्षेत्रातील संस्था असोत किंवा व्यवस्थापनाची महाविद्यालये असोत, या परिसरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा पुरवठा करणारे अड्डे तयार झाले आहेत.

 
गेल्या वर्षभरात २५ हजार कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज तपास यंत्रणांनी, नार्कोटिक्स ब्युरोने आणि विविध राज्यांच्या पोलिसांनी पकडलेले आहेत. अर्थात, ही सतत चालत राहणारी लढाई आहे. ही लढाई केवळ पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी लढायची नाहीये; त्यामध्ये जनतेनेही खूप मोठ्या प्रमाणावर जागरुक राहणे गरजेचे आहे. आज आपला मुलगा अमली पदार्थांचे सेवन करत आहे की नाही, हे पालकांना तोपर्यंत माहीत नसते जोपर्यंत तो पूर्णपणे व्यसनाधिन होत नाही. हे लक्षात घेता आपल्या पाल्यांबाबत अत्यंत जागरुक राहण्याची वेळ आजच्या काळात पालकांवर आली आहे. आजच्या पालकांची संगोपनाची व्याख्या पाहिल्यास बहुतांश आई-वडिलांचा कल मुलांना भरपूर पैसे आणि भौतिक सुविधा देण्याकडे असल्याचे दिसते. पण याखेरीज मुलांना पालकांनी क्वालिटी टाईम देणे गरजेचे आहे. तसेच ते काय करतात, ते कोणाबरोबर राहतात, त्यांची संगत कशी आहे, फ्रेंडसर्कल कसे आहे, त्यांच्या सवयींमध्ये काही बदल झाला आहे का, आपले मूल आपल्याशी काही लपवल्यासारखे वागते आहे का यावर पालकांचे अत्यंत सजगपणाने लक्ष असले पाहिजे. अमली पदार्थांच्या आहारी गेलेले अनेक तरुण आपल्या वडिलांच्या व्यवसायातून पैसे चोरतात, क्रेडिट कार्डचा वापर करुन कर्जबाजारी होतात; पण तरीही पालकांना याचा थांगपत्ता नसतो. काही पालक हे लक्षात आले तरी तरुण वय आहे, पैसा लागतोच असे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. वास्तविक, हे चुकीचे आहे. मुलांचे डोळे कसे आहेत, त्याच्यात काही सिंड्रोम्स दिसताहेत का, तो बावचळल्यासारखा, भ्रमिष्टासारखा वागतोय का, त्याची एकाग्रता कमी झाली आहे का, झोप कमी अथवा जास्त झाली आहे का या रोजच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींचे निरीक्षण पालकांनी केले पाहिजे. कोणतेही व्यसन हे सुरुवातीला गंमत किंवा थ्रील म्हणून केले जाते. पण पाहता पाहता आपण त्याच्या मगरमिठीत कसे अडकत जातो हे समजत नाही. याबाबत पालकांना वेळोवेळी मुलांना सावध केले पाहिजे. अगदी हुशार म्हणवली जाणारी मुलेही काही दिवसांत व्यसनाधिनतेच्या वाटेवर जाताना पाहायला मिळाली आहेत आणि त्यांचे आयुष्य बरबाद झाले आहे. अशी उदाहरणे मुलांसमोर आणली पाहिजेत.
ड्रग्ज पुरवठा करणारे पेडलर खरेदीदार तरुणांना आणखी चार जणांना तू ड्रग्ज घ्यायला प्रोत्साहन दे, तसे केल्यास तुला आम्ही मोफत ड्रग्ज देऊ असे सांगतात. त्यातून हा संसर्ग वाढत जातो. दुसरीकडे, हे तरुण एजंट बनून जातात आणि यामागचा मुख्य सूत्रधार लांब निघून जातो. परिणामी, पोलिसांच्या किंवा तपास यंत्रणांच्या जाळ्यातही हीच नवखी तरुण मंडळी सापडतात. त्यातून यामागच्या मास्टरमाईंडचा शोध घेणे कठीण होऊन बसते.

 
हा सेल्फ जनरेटिंग, कमी श्रमाचा आणि प्रचंड पैसा असलेला व्यवहार आहे. त्यामुळे यांचे मूळ पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात असले तरी आपल्यातीलच काही लोक त्यांना मदत करण्यासाठी पुढे येताना दिसतात. त्यांना यातील धोका माहीत नसतो असे नाही; पण झटपट पैशांची चटक त्यांच्यावर हावी होते. त्यामुळे आपल्या कुटुंबाचा, मुलाबाळांचा, स्वतःचा विचार न करता ही मंडळी या व्यवसायात सहभागी होतात. हे वास्तव लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांनीही केवळ आपल्या हिकमतीवर अमली पदार्थांचा विळखा मोडीत काढता येईल या भ्रमात न राहता प्रचंड मोठ्या संख्येने पोलिस मित्र तयार करण्याची गरज आहे. जनतेला जितक्या मोठ्या प्रमाणावर यामध्ये सहभागी केले जाईल तितक्या सुलभरित्या याबाबतची माहिती मिळवणे सोपे होईल आणि त्यातून हा विळखा तोडता येईल.

 

Articles

दहशतवादाविरुद्ध लढाई

By on October 9, 2023

दहशतवादाविरुद्ध लढाई

प्रवीण दीक्षित

निवृत्त पोलिस महासंचालक

 

  1. भारताच्या अंतर्गत सुरक्षेचा विचार केला तर एकदोन दशकांपूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यात काही फरक आहे का, तुम्ही तुलना कशी करालविशेषत: मुंबई, बंगळुरु, हैदराबाद सारख्या महानगरांमध्ये घडणाऱ्या  मोठ्या दहशतवादी कारवाया आता इतिहासजमा झाल्या आहेत किंवा थंडावल्या आहेत, अशी परिस्थिती आहे का?      

2014 मधे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर व त्यापूर्वी भारतामधील दहशतवादाची परिस्थिती यामधे जमिन असमानाचा फरक आहे. 2014 पूर्वी दिल्ली, जयपूर, मुंबई, नागपूर, पुणे बंगळुरू, हैद्राबाद, कोईमतूर अशा भारतातल्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये अनेकवेळा दहशतवादी हल्ले झाले होते. 2014 नंतर काश्मिरमधे दहशतवादी हल्ले झाले आहेत. परंतु 2019 मधे कलम 370 अ रद्द केल्यानंतर हे हल्ले ठोसपणे कमी झाले आहेत. इतरत्र भारतामधे दहशतवाद्यांनी हल्ले करण्याचा प्रयत्न केला परंतु तत्पूर्वीच ह्या प्रयत्न करणारयांना पकडण्यात आले.  त्यामुळे त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे हे दहशतवादी प्रयत्न करताएत परंतु त्यापूर्वीच जागरूक असलेल्या सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्यावर परिणामकारक काारवाई केली आहे. 



  1. जागतिक स्तरापासून अगदी तळागाळातील, दहशतवादाचा सामना करण्याची जबाबदारी कोणकोणत्या सुरक्षा संस्थांवर सोपवलेली असते आणि त्या कशा प्रकारे एकमेकांशी समन्वय साधतात?

 

जागतिक स्तरावर इंटरपोल तसेच विविध मित्र राष्ट्रांमधे असलेला समन्वय व संयुक्त राष्ट्रे ही दहशतवादाविरुद्ध काम करत आहेत. भारतात NIA (national investigation agency) राज्यामध्ये ATSऽ स्थानिक पोलीस हे एकमेकांशी समन्वय ठेऊन दहशतवाद विरोधी कारवाया करत असतात. ह्याशिवाय NCB (narcotics control Bureau) ही आमली पदार्थांविरोधी कारवाई करते. महाराष्ट्रात CID मधे आमली पदार्थ विरुद्ध Task Force ची निर्मिती करण्यात आली आहे. आर्थिक दहशतवादाविरुद्ध ED (Enforcement Directorate) कारवाई करते. सायबर गुन्ह्यांविरुद्ध केंद्र व राज्य पातळीवर विशेष यंत्रणा उभारण्यात आली आहे. ह्या सर्व सुरक्षा यंत्रणांमध्ये भारत सरकारचे गृह मंत्रालय व त्यात काम करणार्‍या सुरक्षा यंत्रणा सतत जागरूक राहून सर्व संबंधितांना माहितीची देवाण-घेवाण व देशाबाहेरील यंत्रणांशी समन्वय राखत असतात.

 

  1. तंत्रज्ञान जसजसे प्रगत जातं तसतसे दहशतवादाचे स्वरूप देखील विकसित होतं.उदाहरणार्थ, क्रिप्टो चलन, हवाला जाळं, अंमली पदार्थांची तस्करी अशा गुन्हेगारीचे वाढते धोके! तर भारतातली पोलीस यंत्रणा आणि तिला उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, या धोक्यांचा, गुन्हेगारी मधल्या वाढत्या आधुनिकतेचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत का?

 

नवनवीन तंत्रज्ञान वापरून भारताबाहेरील दहशतवादी त्याचा गैरवापर करत आहेत. ह्यावर उपाय करण्यासाठी भारतातील पोलीस यंत्रणाही नवीन प्रशिक्षण व पायाभूत सुविधा ह्यांचा सक्षमतेने वापर करत आहेत. परंतु ही न संपणारी अशी प्रक्रिया आहे. दहशतवादामुळे बळी ठरलेल्या अनेक देशांनी जसे इस्रायल, फ्रांस, इंग्लंड, अमेरिका, भारत हे एकत्र येऊन दहशतवादाच्या नवीन गुन्हेगारीविरुद्ध एकत्रितपणे प्रतिकार करीत आहेत.

 

 

  1. दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपल्या सुरक्षा यंत्रणांनी कशाप्रकारे चाकोरी बाहेर विचार करावा आणि नवनवीन कल्पनांनी युक्त अशा उपाययोजना राबवाव्या ?


दहशतवादाचा सामना ही सर्व लोकशाहीप्रेमी राष्ट्रातील सुरक्षा यंत्रणा, तसेच जबाबदार नागरीक ह्यांची संयुक्त जबाबदारी आहे. दहशतवादाविरोधी आधुनिक तंत्रज्ञान तसेच व्यक्तिकेंद्रित माहिती अचूकपणे मिळवणे आवश्यक आहे. Artificial Intelligence (AI) च्या मदतीने अचूक माहिती मिळविणे शक्य झाले आहे. तसेच मोबाईल वापरामुळे ह्या दहशतवाद्यांचे नेमके ठिकाण नक्की करण्यात बरीच मदत होत आहे. परंतु तरीही दहशतवाद्यांधील व्यक्तिंकडून अचूक माहिती मिळविण्यासाठी पोलीस मित्रांची फार मोठी आवश्कता आहे. सुरक्षा यंत्रणा व सामान्य माणसे ह्यातील दूरी हे पोलीस मित्र कमी करतात व आजूबाजूला घडत असणार्‍या संशयास्पद कारवायांची माहिती ते सुरक्षायंत्रणांना त्वरित देतात.

  1. गेल्या काही वर्षांचा धांडोळा घेतला, तर गेल्या 9 वर्षांत दहशतवादाची परिसंस्था यशस्वीपणे नष्ट झाली आहे किंवा समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे असे तुम्हाला वाटते का?

 

दहशतवादामधे देशांतर्गत दहशतवादी कारवाई करणारे व देशाबाहेरील दहशतवादाला प्रोत्साहन देणारे असे दोन मुख्य गट आहेत. देशामधे दहशतवादी कारवाया होणार नाहीत ह्यासाठी आाज देश मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला आहे. परंतु भारताची शत्रू राष्ट्रे भारतातील जनतेत धर्म, प्रांत, लिंग, भाषा, जात अशा विविध मार्गांनी असंतोष निर्माण करण्याचा व तुमच्यावर अन्याय होत आहे त्याचा तुम्ही प्रतिकार करावा ह्यासाठी प्रशिक्षण, शस्त्रे, दारुगोळा, अमली पदार्थ, दळणवळणाची साधने अशा अनेक प्रकारे मदत करत आहेत. ह्याशिवाय जनतेमधे बुद्धिभेद निर्माण करून भारतातील सुरक्षा यंत्रणांविरुद्ध सतत संशयाचे वातावरण निर्माण करत आहेत. त्यातच पेड न्यूज, फेक न्यूज, फेक व्हिडिओज पसरविण्याचे तंत्र मोठ्या प्रमाणात विकसित करण्यात आले आहे.



  1. डावी विचारसरणी किंवा साम्यवाद आधार मानून फोफावलेला कट्टरतावाद आणि बंडखोरीबद्दल बोलायचं झालं,तर  सध्या अशा कारवायांची व्याप्ती आणि प्रमाण किती आहेगेल्या दशकभरात अशा कारवायांमधून होणारी जीवित आणि वित्तहानी कमी करण्यात पोलीस आणि प्रशासन कितपत यशस्वी झाले आहेत? A

डाव्या विचारसरणीमुळे फोफावलेल्या बंडखोरीमधेही 50% हून अधिक घट झाली् आहे. विकासाची कामे, रोजगार निर्मती, रेल्वे रस्ते यांचे वाढलेले जाळे ह्यामुळे माओवाद्यांनी निर्माण केलेली सुरक्षित ठिकाणे जवळजवळ नाहिशी झाली आहेत. स्थानिक नवीन भरती जवळ जवळ संपलेली आहे. पोलीस आणि प्रशासन ह्यांनी केलेल्या प्रभावी कारवाईमुळे स्थानिक व्यक्ती माओवाद्याच्या विरुद्ध माहिती देण्यास पुढे येत आहेत. तसेच अनेक मओवादीही सामान्य जीवन जगण्यासाठी शासनाने दिलेली मदत स्वीकारून बंडखोरी विरुद्ध पुढे येत आहेत.



  1. पुढील 2 वर्षात हा डाव्या विचारसरणीचा कट्टरतावाद पूर्णपणे समूळ नष्ट होईल असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहेहे ध्येय साध्य करता येईल का?

 

गृहमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे पुढील दोन वर्षात डाव्या विचारसरणीचा कट्टरवाद नष्ट करण्यासाठी सर्व संबंधित राज्य सरकारांनी भारत सरकारबरोबर एकदिलाने प्रयत्न केल्यास हे ध्येय साध्य करणे अवघड नाही.


  1. या डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावादाचा सामना करण्यासाठी सरकारचं झिरो टॉलरन्स म्हणजेच हा प्रकार अजिबात खपवून घेण्याचं धोरण काय आहे?

Zero tolerance म्हणजे ज्या ठिकाणी कट्टरतावादी शस्त्रास्त्रे वापरत असतील तेथे त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. गैर कायदेशर कृत्ये करणार्‍यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच जे शहरी नक्षलवादी आर्थिक, मनुष्यबळ, दळणवळणाची साधने, प्रशिक्षण अशा प्रकारे मदत करत असतील, त्यांनाही उघड पाडले जाईल. व त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.
 

  1. नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी आणि आणि या क्षेत्रासह नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारनं काय विशेष प्रयत्न केले आहेत?

 

नक्षलभागाच्या विकासासाठी गडचिरोली, गोंदिया भागामधे ‘‘पोलीस दादालोरा खिडकी’’ योजने अंतर्गत एक लाखाहून अधिक स्थानिकांना विविध आवश्यक शासकीय प्रमाण पत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच त्यांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण ह्याची व्यवस्था करण्यात आली आहे. International Association of Chiefs Of police ह्यांनी पोलीस अधिक्षक गडचिरोली ह्यांना सन्मानित केले आहे. तसेच विविध उद्योजक नवनवीन पोलादाचे कारखाने काढून येणार्‍या काळात एक लाखाहून अधिक व्यक्तीँना रोजगार निर्मिती करणार आहेत. 

   ————    ——————–    —————————–