ह्या 26 /11 रोजी, 2008 साली मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. ही घटना जरी नऊ वर्षांपूर्वी घडली असली तरी, तिचे भयानक स्वरूप आठवल्यानंतर आजही थरकाप होतो. लष्कर-ए तैयबाच्या दहा भाडोत्री दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत सहजपणे प्रवेश मिळवला आणि 197 निष्पाप भारतीय व परदेशी नागरिकांना ठार मारले आणि 600 पेक्षा अधिक नागरिकांना जायबंदी केले. ह्या हल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी हाफिज सैयद ह्याला अन्य देशांचा विरोध असतानाही पाकिस्तानी न्यायालयाने कैदेतून मोकळे केलेले आहे. त्यामुळे अशाच प्रकारच्या दहशतवादी कारवाया आपल्या सहकार्यांसह तो पुन्हा करण्याची शक्यता आहे.
नऊ वर्षानंतर मुंबईतील जीवन पूर्ववत झाले असले तरी त्यामुळे अशाप्रकारच्या घटना पुन्हा होणार नाहीत ह्याची सतत काळजी घेणे गरजेचे आहे. दहशतवादाला तोंड देण्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र शासन ह्यांनी नौदल, कोस्ट गार्ड, NSG, पोलिसदल ह्यांच्यात मोठे फेरबदल केले आहेत. समुद्रमार्गे येणारे प्रत्येक जहाज ओळखण्यासाठीची अत्याधुनिक यंत्रणा नौदलाला उपलब्ध करणे चालू आहे, विविध मोक्याच्या ठिकाणी सुसज्ज असे तळ, हेलिकॉप्टर्स, रडार यंत्रणा ह्यांनी कोस्ट गार्ड सज्ज करण्यात आले आहे. NSG फक्त दिल्लीत उपलब्ध होती, ती आता मुंबईसह अन्यत्रही निर्माण केली आहे. पोलिसदलात, सर्व
सुविधा, प्रशिक्षण, हत्यारे, वहाने युक्त अशा `फोर्स वन'ची निर्मिती करण्यात आली आहे. फोर्स वन मधील प्रशिक्षित अधिकारी राज्यातील प्रत्येक पोलिस घटकामधे प्रशिक्षित असे पोलिस अधिकारी व अम्मलदार सुसज्ज ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ह्या शिवाय भारत सरकारने व महाराष्ट्र शासनाने 40 हून अधिक गस्त नौका मुंबई व महाराष्ट्राच्या 720 कि.मी. किनार्यावर सतत उपलब्ध ठेवल्या आहेत. ह्याशिवाय मुंबई शहर, ठाणे, पुणे आणि अन्य शहरे चोवीस तास CCTV च्या निरीक्षणाखाली आणली आहेत. विविध राष्ट्रीय आणि राज्यातील गुप्त वार्ता संस्था, सुरक्षादले यांचा समन्वय करण्यासाठी राज्यशासन आणि पोलिस महासंचालक हे सतत प्रयत्नशील आहेत. पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना देशातील व देशाबाहेरचेही दहशतवाद विरोधी प्रशिक्षण वारंवार देण्यात येत आहे. राज्य शासनाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे की पोलिसांच्या अधुनिकीकरणासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही.
लष्कर-ए- तैयबा, हिज्बुल मुजाहिदीन सारख्या पाकिस्तानस्थित दहशतवादी संस्था ह्या काश्मीर आणि अन्य भागातही आपल्या कारवाया करताना दिसतात. त्यातील अनेकांना बांगलादेशमधूनही मदत मिळाल्याचे दिसते. मागच्यावर्षी झालेल्या विमुद्रीकरणामुळे खोट्या नोटांचा प्रसार करून देशाची आर्थिक घडी विस्कटविण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात अयशस्वी झाले आहेत. परंतु ड्रग्ज, शस्त्रास्त्रांची चोरटी आयात व खंडणी आणि गुन्हेगारी यामधे सामील असणार्या व्यक्ती आणि दहशतवादी यांचा जवळचा संबंध आहे. तसेच लहान मुले, स्त्रिया यांना पळवून नेणे आणि जनावरांची तस्करी करणे ह्यांचाही दहशतवाद वाढविण्यास आर्थिक पाठिंबा असतो. वर उल्लेख केलेल्या दहशतवादी संस्थांशिवाय माओवादी,
मार्क्सिस्ट लेनिनिस्ट वगैरे नक्षलवादी यांच्यामुळे निर्माण होणारा दहशतवाद
पशुपतीपासून तिरुपतीपर्यंत अनेक राज्यात व शहरांमधेही वारंवार डोके वर काढत असतो. महाराष्ट्रातील गडचिरोलीचा काही भाग व गोंदिया जिल्ह्याचा काही भाग ह्या ठिकाणी नक्षलवादी, पोलिसांवर तसेच सार्वजनिक बांधकामे करणार्या कंत्राटदारांवर व त्यांच्या वहानांवर जाळपोळ, हल्ले करतांना दिसतात. दहशतवादाचे नवे स्वरूप पाहता त्यामधे दहशतवादी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात गैर वापर करत आहेत असे आढळते. शाळा, कॉलेजमधे जाणारे अनेक तरुण व तरुणी त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडून
स्वतःचे आयुष्य खराब करतांना दिसतात. महाराष्ट्राच्या काही भागातील तरुण ISIS च्या प्रचाराला बळी पडून इराकमधे गेल्याचे निष्पन्न झाले होते. अशा अनेक तरुणांना व तरुणीँना दहशतवाद विरोधी पथकाने योग्य हाताळणी करून पुन्हा दैनंदिन जीवन जगण्यास प्रोत्साहित केले आहे. त्यात अनेक मुस्लीम धर्मगुरुंनीही सक्रीय सहकार्य दिले आहे. इराक, सिरीया देशातील ISIS चा जवळ जवळ बीमोड करण्यात आला आहे. त्यामुळे तेथून मिळणार्या तेलाच्या रूपाने गैर कायदेशीर निधीस लगाम लागण्याची शक्यता आहे. परंतु त्यात भाग घेणारे दहशतवादी हे अन्य देशात जाऊन घातपात करण्याची शक्यता वाढली आहे. सुरक्षित ठिकाणांवर हल्ला करण्यापेक्षा मशिद, इदगाह, मंदिर अशा धार्मिक स्थळी, तसेच स्टेडियम्स, बाजार, ज्या ठिकाणी लोकांची गर्दी असते, अशा ठिकाणी एकट्या दहशतवाद्याने (lone wolf attacks) हल्ले करण्याचे प्रमाण जगातील अन्य देशात वाढले आहे.
सतर्क संरक्षण दले, सुसज्ज पोलिस, चांगले प्रशासन याजबरोबर सामान्य नागरिकांचा प्रशासनाबरोबर सक्रीय सहभाग आणि सदैव जागरूकता ह्या गोष्टीच दहशतवादाला नियंत्रणात ठेऊ शकतील.