दिल्ली जवळील गुरुग्राम येथील RYON International school मधे सकाळी साडेसात वाजता वडिलांनी दुसरीतील मुलास व त्याच्या बहिणीस शाळेत सोडले व वीस मिनिटांनीच त्यांना दूरध्वनीने कळविले गेले की, शाळेतील शौचालयात त्यांचा मुलगा मृत सापडला आहे. अशाच प्रकारे शाळेतील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना किंवा खंडणीसाठी मुलांना पळविणे, त्यांचा खून करणे अशा घटना वेळोवेळी ठिकठिकाणी घडतांना दिसतात. अनेकवेळा मुलांना वेश्यावृत्तीसाठी किंवा भीक मागण्यासाठी किंवा उंटांच्या शर्यतीसाठी पळविल्याचे प्रकारही उघडकीस येतात. हे प्रकार केवळ शहरातच मर्यादित नसून ग्रामीण भागात देखील अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असतात. कित्येकवेळा मुलांना आपल्याशी केलेल्या दुष्कृत्याबद्दल नीट सांगताही येत नाही इतकी ती मुले लहान असतात. मुलांनी अशा घटनांबद्दल शाळेत कुणास सांगायचा प्रयत्न केल्यास तो ऐकून घेतला जात नाही. पालकांना सांगितल्यास पालक त्याविरुद्ध तक्रार करायला आल्यावर त्यांनाच दमदाटी केली जाते. पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेल्यास ती गांभिर्याने पाहिली जात नाही. सार्वजनिक रुग्णालयात रुग्णालयातील कर्मचारी सहानुभूतीने लक्ष देत नाहीत व न्यायालयापर्यंत खटला पोचल्यानंतर आरोपीलाच संरक्षण मिळेल व बालक कसे खोटे सांगत आहे हे
सिद्ध करण्याकडे कल असतो. त्यातूनही आरोपीस शिक्षा झाली तर मधे एवढा काळ गेलेला असतो की तो पर्यंत त्या मुलाचे अजून काही बरेवाईट झालेले असते.
मुले शाळेत जातात त्या वाहनांमधील त्यांची सुरक्षा, मुले शाळेत असतांना त्यांची सुरक्षा, मुले ज्यावेळेस अन्य काही क्लासेस किंवा खेळ याठिकाणी जातात त्यावेळची त्यांची सुरक्षा ही पालकांसाठी एक मोठीच डोकेदुखी निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या शिवाय जी मुले वसतिगृहात राहतात किंवा आश्रमशाळेत असतात, ह्या मुलांच्या सुरक्षेचे प्रश्न तर जास्तच गंभीर आहेत.
लहान मुले सुरक्षित राहण्यासाठी शाळा, बसेस तसेच पालक यांनी जाणीवपूर्वक काही सुरक्षेचे उपाय पाळण्याची आवश्यकता आहे. शाळेत मुले सुरक्षित राहण्याची जबाबदारी ही शाळेचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व तेथे असणारी मुले या प्रत्येकाची आहे. संचालकांनी विद्यार्थ्यांशिवाय अन्य कोणीही व्यक्ती शाळेत प्रवेश करण्यापूर्वी त्याची नोंद करून त्या व्यक्तीचा उद्देश प्रवेश दारापाशीच समजून घेणे आवश्यक आहे. अपरिचित व्यक्तीस शाळेत कोणत्याही मुलास भेटायचे असल्यास त्या ठिकाणी शाळेने नेमलेला सुरक्षा कर्मचारी उपस्थित ठेवणे आवश्यक आहे. मुलांच्या शौचालयाचा उपयोग मुलांव्यतिरिक्त कोणी करत नाही याची खात्री करण्यासाठी शक्यतो स्त्री कर्मचारी शौचालयाच्या प्रवेशद्वाराशी उपस्थित ठेवणे बंधनकारक ठेवावे. शाळेतील महत्त्वाच्या जागी व प्रवेशद्वारांवार CC T.V. कॅमेरे ज्यामधे आवाजाचेही रेकॉर्डिंग होईल अशी सुविधा ठेवणे गरजेचे आहे. हे CCT.V. कॅमेरे केवळ त्याच कामासाठी नेमलेल्या व्यक्तीने सतत लक्ष देऊन पहाणे व आवश्यकता वाटल्यास संबंधित ठिकाणी सुरक्षा कर्मचारी पाठविणे हे ही तेवढेच महत्त्वाचे आहे. शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ह्यांना नेमतांना त्यांची चारित्र्य पडताळणी करणे गरजेचे आहे. त्याशिवाय दारू, ड्रग्ज किंवा कर्जबाजारीपणा ह्यामुळे शाळेतील शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचारी व्यसनाधीन आहे किंवा कसे ह्याबद्दल वर्षातून कमितकमी एकदा पडताळणी करणे गरजेचे आहे. ज्या वेळेस एखादी व्यक्ती व्यसनाधीन आहे हे लक्षात येते तेंव्हा त्यास व्यसनातून दूर होईपर्यंत मुलांच्या सान्निध्यात राहण्यापासून मज्जाव करणे गरजेचे आहे. शाळेच्या बसेस चालवणार्या चालक, वाहक यांचीही व्यसनाधीनतेसाठी वेळोवेळी तपासणी करणे व त्यांच्या चारत्र्याची पडताळणी करणे जरुरीचे आहे. प्रत्येक शाळेने सुरक्षेसाठी एक पूर्णवेळ प्रशिक्षित व्यक्ती नेमणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पैसे वाचविण्यासाठी कुठल्यातरी व्यक्तीस अप्रशिक्षित असतांनाही हे काम देणे जोखमीचे आहे ज्यामुळे संचालक, मुख्याध्यापक यांच्यावर फौजदारी कार्यवाही होऊ शकते. शाळेत कोणतीही अश्लाघ्य घटना घडल्यास ती पोलीस स्टेशनला कळवली तर शाळेची बदनामी होईल असे न समजता तातडीने घटना जशी घडली तशी पोलिसस्टेशनला लेखी कळविणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
2012 मधे शासनाने सम्मत केलेला `बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा’ स्पष्ट करतो की, अत्याचाराची घटना न कळविणे हाही दंडनीय अपराध आहे व त्यास तीन वर्ष कैद सुचवलेली आहे.
मुलांना शाळेत पाठविले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे न समजता पालकांनीही मुले शाळेतून आल्यानंतर बसमधे, शाळेमधे काय घडले ह्याबद्दल सविस्तर माहिती घेणे व काही अयोग्य घटना असल्यास त्याबद्दल दक्षता घेणे ही पालकांची जबाबदारी आहे. कोणत्याही कारणासाठी मुले नेहमीच्या चाकोरीपेक्षा काही वेगळे वागत असल्यास त्याबद्दल खोलात जाऊन चौकशी करणे गरजेचे आहे. मुलांच्या बाबतीत कोणतीही अप्रिय घटना घडली असल्यास ती पोलिसांच्या नजरेत तातडीने आणावी. `पोलिसमित्र महाराष्ट्र’ हे मोबाईल अॅप प्रत्येकाने आपल्या मोबाईलमधे डाऊनलोड करावे व कोणतीही बेकायदेशीर गोष्ट पोलिसांना व्हिडिओ, ऑडिओ किंवा डिजिटल पद्धतीने कळवावी. तसेच 1098 ह्या
चाईल्डहेल्पलाईनवर स्वयंसेवी संस्थेस माहिती द्यावी.
मुले हीच आपली खरी सम्पत्ती आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या योग्य सुरक्षेसाठी आवश्यक ते सर्व उपाय केल्याने आपण त्यांचे भवितव्य नक्कीच उज्ज्वल करू शकू.