हरवलेल्या मुलांची समस्या व उपाय
नागपूर अधिवेशनात विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षात राज्यात १८ वर्षांखालील ५ हजारहून अधिक अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याचे नमूद केले. त्यावेळेला हेही सांगण्यात आले की, हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’मध्ये त्यातील २२०० हून अधिक मुलांना शोधण्यात यश आले. लहान मुले हरविणे, ती का हरवली जातात व त्यांना शोधण्यासाठी काय प्रयत्न करणे आवश्यक आहे, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.
या संबंधी एनसीआरबीने नुकत्याच प्रकाशित केलेल्या २०१६ तील घटनांचा आढावा घेताना म्हटले आहे की, देशात एकूण लहान मुले पळविण्याच्या ८८ हजार ८ घटना नमूद आहेत. २०१५ च्या तुलनेत ही ६% नी वाढ आहे. यात एकूण ८९ हजार ८७५ (२३ हजार ३५० मुले व ६६ हजार ५२५ मुली) पळविण्यात आली होती. यातील जास्तीत जास्त मुली म्हणजेच ३३ हजार ८५५ जणींना लग्नासाठी पळविण्यात आले. उत्तर प्रदेशमध्ये १५ हजार ८९८ घटना घडल्या व खालोखाल महाराष्ट्रामध्ये ९ हजार ३३३ घटनांची नोंद आहे. यातील ६९ हजार ५९९ मुले शोधण्यात यश मिळाले. (१८ हजार ९७४ मुले व ५० हजार ६२५ मुली) यापैकी ६९ हजार २७४ जिवंत मिळाली तर ३२५ मृत होती. म्हणजेच १८ वयोगटाखालील एकूण मुलांची संख्या पाहता २७६२ मुले व ५४९८ मुली मिळून एकूण ८२६० एवढी आहे. यावरून हे स्पष्ट होते की १२ वर्षाखालील मुले जास्त गायब होतात व १२ वर्षावरील मुली जास्त गायब होतात.
जी मुले सापडली त्यावरून मुलांना का पळविले जाते याच्या कारणांचा विचार केला तर असे दिसते की –
लग्नासाठी ६ वर्षाखालील १३९; ६ ते १२ वयोगटातील ६६६; १२ ते १६ वयोगटातील ६४६१ आणि १६ ते १८ वयोगटातील ९६७१ जणांना पळविण्यात आले. लग्नासाठी जास्तीत जास्त मुलींना पळवले जाते.
बेकायदेशीर संभोगासाठी ६ वर्षाखालील मुले २ व मुली १५; ६ ते १२ वयोगटातील मुलगा १ व मुली ११६; १२ ते १६ वयोगटातील मुले ११ तर मुली ५९३ आणि १६ ते १८ वयोगटातील मुले १२ तर मुली ८३८ होत्या.
पळवलेल्यांपैकी खून झालेल्यांमध्ये ६ वर्षांखालील १६ मुले व १ मुलगी; ६ ते १२ वयोगटातील ४८ मुले व १८ मुली; १२ ते १६ वयोगटातील ७१ मुले व ८ मुली आणि १६ ते १८ वयोगटात ५९ मुले व ७ मुली होत्या.
२०१६ मध्ये पळवून नेलेल्यांपैकी ६५८९ मुलांना शोधण्यात महाराष्ट्र पोलिस यंत्रणा यशस्वी झाली. त्यातील २२६२ मुले होती व ४३२७ मुली होत्या. शोध यशस्वी परंतु पळवलेल्या मुलांचे मृतदेह सापडले अशी ३७ मुले होती व २७ मुली होत्या.
एनसीआरबीच्या अहवालाप्रमाणे महानगरातून पळवण्याच्या घटना पाहता मुंबईतून २०१४ मध्ये ५४१ घटना होत्या. २०१५ मध्ये १५८३ घटना होत्या व २०१६ मध्ये १९४९ घटनांची नोंद आहे. नागपूरमधून २०१४ मध्ये १४५; २०१५ मध्ये ३५५ तर २०१६ मध्ये ५०९ घटना घडल्या. पुण्यात २०१४ मध्ये २२८, २०१५ मध्ये ७०७, व २०१६ मध्ये ८५१ घटना घडल्या.
यातील वयोगटाप्रमाणे पाहता –
मुंबईत ६ वर्षाखालील ४४ मुले व ५० मुली होत्या.
६ – १२ वयोगटातील १५१ मुले व ५८ मुली होत्या.
१२ – १६ वयोगटातील ४१९ मुले व ४७५ मुली होत्या.
१६ – १८ वयोगटातील १७० मुले व ५७३ मुली होत्या.
पोलिस आणि स्वयंसेवी संस्था यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मुंबईत १५४५ मुले सापडली. (मुले ६५४ व मुली ८९१); नागपूरमध्ये ३७९ मुले सापडली. (मुले ४१ व मुली ३३८) आणि पुण्यात ५७० मुले शोधण्यात यश आले. यातील १८२ मुले होती व ३८८ मुली होत्या.
याविरुद्ध प्रतिबंधक उपाय म्हणून शासनाच्या गृह विभागाने सर्व पोलिस ठाण्यांना सूचना दिली आहे की, कोणत्याही पालकाने १८ वर्षाखालील मूल गायब झाले आहे, असे कळविल्यास त्याची त्वरीत नोंद घ्यावी व त्याला पळविले आहे, असे समजून पहिल्या ६ तासातच सर्व प्रयत्न करावेत. त्यामुळे जरी या घटनांची नोंद वाढत आहे, असे वाटले तरीही त्याबद्दल जास्तीत जास्त गंभीर प्रयत्न होतील.
महाराष्ट्र हे औद्योगीकरणात अत्यंत प्रगत राज्य आहे; त्यामुळे कामधंद्याच्या शोधासाठी अनेक प्रांतातील लोक येथे येत असतात. त्यातील अनेकजण घराच्या अभावी येथे झोपडपट्टीत राहत असतात. त्यामुळे अशा ठिकाणांहून मुलांना पळविण्याचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पालकांबरोबर दुःखी संबंध असलेली, घरातील बंधने नको असलेली, प्रेमसंबंधास घरातून विरोध असलेली, शहरी जीवनाचे आकर्षण असलेली, अभ्यासाचा कंटाळा असलेली व कौटुंबिक कलहास त्रासलेली मुले पळून जातात.
यासाठी रेल्वेस्थानके, बसस्थानके, धार्मिक स्थळे, बेकर्या, गॅरेज, हॉटेल्स/ धाबे, लॉजेस अशा ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या मुलांचा शोध घेणे आवश्यक आहे. याशिवाय १२ पोलिस डिव्हिजन्समधे मुलांच्या बेकायदेशीर तस्करीविरुद्ध ‘अनैतिक व्यापार प्रतिबंधक कक्ष’ स्थापन करण्यात आले आहेत. मुले हरवल्यास कशा प्रकारे त्यांचा शोध घ्यावा याबद्दल सविस्तर सूचना पोलिस ठाण्यास देण्यात आल्या आहेत.
हरवलेल्या मुलांचा तातडीने शोध लागावा यासाठी भारत सरकारने
www.trackthemissingchild.gov.in ही वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे. त्याच्यावर हरवलेल्या व सापडलेल्या मुलांचे फोटो देता येतात. याशिवाय १०९८ ही Childline सुरु करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांतर्फे ‘खोया-पाया’ हे portal चालू करण्यात आले आहे. त्यावर कोणीही आपल्याला हरवलेले मूल सापडल्यास कळवू शकतो. याचप्रमाणे ’खोया-पाया’ हे Android App उपलब्ध आहे.
बाजार, गर्दीची ठिकाणे या ठिकाणी प्रत्येकाने लक्ष ठेऊन अशी मुले दिसल्यास त्याबद्दल संबंधितांना त्वरीत कळवल्यास ही समस्या कमी होऊ शकेल. त्याचबरोबर घरातल्या मोठ्या व्यक्तींनीही लहान मुलांशी वागताना त्यांच्या बालमनावर वाईट परिणामहोणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
प्रत्येक मुलाचे आधार कार्ड करण्याच्या योजनेमुळे ही समस्या येत्या काळात कमी होईल अशी अपेक्षा आहे. या घटनांकडे प्रत्येक पोलिस घटक प्रमुखाने संवेदनशीलतेने पाहून Operation मुस्कान सर्व संबंधितांची मदत घेऊन सतत हिरीरीने राबवल्यास हरवलेली मुले मोठ्या प्रमाणात सापडू शकतात; हे माझ्या अनुभवावरून, मी अधोरेखित करू इच्छितो.
TAGS