Articles

राष्ट्रीय सुरक्षा दिन व नागरिकांची जबाबदारी

By on February 10, 2023

राष्ट्रीय सुरक्षा दिन

प्रवीण दीक्षित.

निवृत्त पोलीस महासंचालक.

‘‘राष्ट्रीय सुरक्षा दिन’’ निमित्ताने राष्ट्रीय सुरक्षेबद्दल अंतर्मुख होऊन प्रत्येकाने गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. सध्या चालू असलेल्या व कधी संपेल हे माहित नसलेल्या रशिया विरुद्ध युक्रेनच्या माध्यमातून पाश्चिमात्य देशांमधील युद्ध, अफगाणिस्तानातून अमेरिकेने माघार घेतल्यानंतर इस्लामच्या नावाखाली चाललेले धर्मलंड माणसांचे महिलांवरील अत्याचार व दहशतवादाला प्रोत्साहन, चीनच्या विस्तारवादाच्या धोरणामुळे सीमेवरील अनेक देशांना वाटणारी सततची भीती अशा अनेक गोष्टींमुळे राष्ट्रीय सुरक्षेला केंव्हा तडा जाईल अशी परिस्थिती भेडसावत आहे. ह्यामुळे निर्वासितांचे लोंढे सुरक्षिततेसाठी स्वतःचा देश सोडून दुसर्‍या देशात जाण्यासाठी कासावीस झालेले आहेत. 30 ते 40% वेगाने वाढणार्‍या चलन फुगवट्यामुळे अनेक देशातील लोक मेटाकुटीला आले आहेत व नोकरी व्यवसायातून मिळणार्‍या अल्पशा पैशांमधे जगणार्‍या मध्यमवर्गीय लोकांना रोजचे दोन वेळचे संतुलित जेवण मिळणे सुद्धा स्वप्न ठरावे अशी चित्रे दूरदर्शनच्या माध्यमातून अनेक देशांमधे घडतांना दिसत आहेत. सैन्यातील अधिकार्‍यांची मुजोरी, जमीनदारांचे बेपर्वा वर्तन व भ्रष्टाचार ह्यामुळे भारताच्या शेजारी असलेल्या अनेक देशांमधे लोकशाही केव्हाच संपलेली असून अराजक चालू आहे. अशा ह्या जागतिक परिस्थितीत भारत अलिप्त राहील किंवा भारतावर त्याचा परिणाम होणार नाही असे वाटून घेणे स्वतःची फसवणूक ठरेल.

 जगातील अन्य ठिकाणांच्या तुलनेत भारताचे वेगळेपण हे केवळ भारतातील सनातन धर्म, त्याची शिकवण, भारतातील वेद, उपनिषदे ह्यातून निर्माण झालेले संस्कार व भारतातील कुटुंब व्यवस्था ह्याच्यामुळेच टिकून आहे. सतत सकारात्मक, केवळ आपल्यालाच नव्हे तर जगातील सर्व लोकांना मदत करण्याची इच्छा, सत्चारित्र्य, सद्गुणांवरील श्रद्धा हे भारताचे वैशिष्ट्य आहे; परंतु पाश्चिमात्य संस्कृतीच्या वरवर आकर्षक वाटणार्‍या पण खरोखर विनाशाकडे नेणार्‍या अनेक गोष्टींना भारतीय लोक बळी पडतील ह्यासाठीचा प्रचार अनेक माध्यमातून सतत चालू असतांना दिसतो. राष्ट्रीय सुरक्षा ही भारतातील प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा, कुटुंबाची सुरक्षा व एक भारत श्रेष्ठ भारत ह्या संकल्पनेवर आधारीत आहे. ह्याशिवाय भारतातील करोडो लोक हे जगातील अनेक देशांमधे नोकरी, शिक्षण, व्यवसाय निमित्ताने गेलेले आहेत. आज त्या ठिकाणीही त्यांच्यावर ते सनातन धर्मावरती विश्वास ठेवतात म्हणून जीवघेणे हल्ले केले जात आहेत. भारतातीलही लव्ह जिहाद च्या रूपाने होणारी तरुण महिलांची हत्या व फसवणुक ही काळजी निर्माण करणारी आहे. कुटुम्बापासून दूर राहणारे व एक एकटे असलेले वृद्ध हे सहज बळी पडतील अशी परिस्थिती आहे.

भारतातील पारंपारिक व्यवसाय नाकारून, कोणतीही कौशल्ये निर्माण न करणाार्‍या पुस्तकी-शिक्षणाची पद्धत स्वीकारण्यामुळे भर तारुण्यात निराशाग्रस्त होऊन अनेक तरूण, तरूणींमध्ये पारंपारिक गुन्हे, सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे करण्याकडे कल वाढत आहे. ह्याशिवाय तरूणपणीच अनेक तरूण, तरुणी आत्महत्येसारखे नको ते पाऊल उचलत आहेत. मनःस्वाथ्य बिघडल्यामुळे आज अनेकजण भयंकर अशा ड्रग्ज, दारू अशा व्यसनांना बळी पडलेले आहेत. किंबहुना, भारततातील तरुणांना व्यसनाधीन बनवण्यासाठी शेजारील देश ड्रोन्स, जल, जमीन व हवाई मार्गाने तस्करी मार्फत ड्रग्ज पाठवण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत. गेल्या एका वर्षात 80,000 कोटी रुपयांची ड्रग्स तस्करी उघडकीस आणून हे ड्रग्ज नष्ट करण्यात आले.

भारत एकसंध राहून त्याची प्रगती होउ नये ह्यासाठी अंतर्गत दुफळी माजवणे, भारतातील लोकांना हाताशी धरून शासनावरील विश्वास नाहीसा करणे, ह्यासाठी अनेक देश कटिबद्‌ध झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ह्या सर्व बाबींपासून दूर राहणे हे राष्ट्रीय सुरक्षा दृढ करणे आहे.

युद्धात पराभव झाल्याने,अल्पसंख्य जमातीतील तरुणांना कट्टरवादी बनवून त्यांचामार्फत लोकशाहीमार्गाने निवडून आलेल्या सनातन धर्मातील लोकांच्या हत्या करणे, धर्माधर्माच्या अनुयायांमधे दंगे घडवणे हा शेजारील राष्ट्रांचा भारत खिळखिळा करण्याचा उपाय आहे. तसेच अनुसूचित जाती व जमातीमधील तरूणांमधे डाव्या विचारसरणीचे बीज पेरून विकासाची कामे उद्ध्वस्त करणे, विकास होऊ न देणे हेच काही मुठभर लोकांचे उद्दिष्ट झाले आहे. शहरातीलही अनेक प्राध्यापक, विद्यापीठातील तरूण, कलाकार वकील या प्रचाराला बळी पडून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देत आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या रूपाने जगातील अनेक देश भारतात निधी पाठवून धर्माधर्मात, जातीजातीत, स्त्री-पुरुषांमधे भेद निर्माण करून ठिकठिकाणी लोकशाहीने दिलेल्या हक्कांचा गैरवापर करून भारताच्या प्रगतीमधे खीळ घालत आहेत. ह्या सर्वांपासून विचारपूर्वक सावध राहणे आवश्यक आहे.

वैय्यक्तिक आपातकालामधे मदत मिळण्यासाठी भारतसरकारने 112 India हे विनामुल्य अ‍ॅप सुरू केले आहे.  स्वतःच्या स्मार्टफोनमधे ते प्रत्येकाने सुरू करून सुरक्षा-दलांबरोबर संपर्कात राहणे जरुरीचे आहे. अन्यायाविरुद्ध न्यायालयात दाद मागणे हा सर्वांचा हक्क असला तरीही प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जाऊन न्याय मिळतोच असे नव्हे. हे ओळखून आपापसातील मतभेद हे चार श्रेष्ठ माणसांच्या मदतीने सामोपचाराने सोडवणे हे शहाणपणाचे आहे. आर्थिक सुरक्षेसाठी रोकड व्यवहार न करता डिजिटल पेमेंट्स ही पद्धत स्वीकारणे म्हणजे जोखीम कमी करणे आहे. मी बदलणार नाही, असा अभिमान न बाळगता, अद्ययावत राहणे ही काळाची गरज आहे. शहरे वाढत असतांना रहदारीचे नियम काटेकोरपणे पाळणे म्हणजे स्वतःची सुरक्षा वाढविणे हे समजून स्वतः तर हे नियम पाळावेतच पण इतरांनाही ते मोडण्यापासून परावृत्त करणे जरूरीचे आहे. मुले मुली ही राष्ट्रीय संपत्ती समजून लहानपणापासूनच त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांच्यावर योग्य संस्कार करणे ही मोठ्यांची जबाबदारी आहे. दिवसेंदिवस लहान मुलांनी केलेले गुन्हे वाढत आहेत. त्यांच्याकडे लक्ष न दिल्यास त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. प्रगती करत असतांना वातावरणावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही ह्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अध्यात्मातील तत्त्वांवर विश्वास ठेऊन केलेली प्रगतीच शाश्वत सुखाकडे नेऊ शकते त्यामुळेच भारतीय परंपरा, संस्कार ह्यांचावर दृढ विश्वास ठेऊन नवनवीन शास्त्रीय व तांत्रिक गोष्टींचा स्वीकार केल्यास स्वतःची व राष्ट्राची सुरक्षा करण्यास आपण मदत करणार आहोत. प्रश्न आहे की तुम्ही तयार आहात का?

———————————————

 

TAGS
RELATED POSTS

LEAVE A COMMENT