Articles

माओवाद्यांचे शहरातील कारस्थान

By on September 3, 2018

2004 मधे विविध माओवादी, लेनिनवादी कम्युनिस्ट घटकांचे विलीनीकरण झाल्यावर कम्युनिस्ट पक्ष (माओवादी ) स्थापण्यात आला. 2007 मधे ह्या पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली त्यात त्यांनी चीनच्या धर्तीवर भारतात क्रांती करून राज्य सत्ता बळकावण्याचा सविस्तर विचार Strategy and Tacticts of the Indian Revolution, CPI (Maoist) 2007 ह्या नावाने प्रसिद्ध केला. त्यानुसार, जर भारतात क्रांती करून राज्यसत्ता काबीज करायची असेल तर त्यासाठी भारतातील सैन्यदल, पोलीस व शासकीय अधिकारी ह्यांची कत्तल करण्यात यावी हे प्रमुख उद्दिष्ट ठरविण्यात आले. प्रथम ग्रामीण भागात क्रांती करावी असे ठरविण्यात आले. कारण तेथे भारतीय सैन्य व पोलीस ह्यांचा सहज पाडाव करणे शक्य होईल व नंतर हळु हळु शहरांनाही घेरून ज्या ज्या ठिकाणी शासकीय किल्ले मजबूत आहेत ते ते हळुहळु उध्वस्त करावेत असे ठरविण्यात आले. अशा प्रकारे ग्रामीण भागामधे गरिला गट व मुक्त भागाची निर्मिती करण्यात यावी व यासाठी आवश्यक पाठबळ निर्माण करण्यासाठी सामान्य माणसाची मदत इतक्या मोठ्या प्रमाणावर निर्माण करावी की ज्यामधे शासनाचे सर्व सैन्य व पोलीस बुडून जातील असेही ठरविले गेले.

सदरच्या प्रस्तावात शहरी भागांना क्रांतीच्या दृष्टीने विशेष महत्त्व देण्यात आले आहे कारण औद्योगिक कामगार हे शहरात मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत व ते क्रांतीला अनुकूल घटक आहेत आणि सत्ताधार्‍यांची प्रशासकीय

यंत्रणाही शहरी भागात एकत्रित आहे. शहरातील चळवळ ही प्रामुख्याने नवीन उमेदवार व नेतृत्त्व देण्याचा उगम आहे. त्यातूनच विविध गोष्टींची रसद पुरविणे, तंत्रज्ञान मिळविणे, माहिती मिळविणे ह्या सर्व जबाबदार्‍या शहरातील माओवादीच पार पाडू शकतात. शहरातील सशक्त माओवाद अजून सबळ केला नाही तर माओवादी चळवळीवर मर्यादा पडतील व चळवळीची प्रगती खंडित होईल हे ते चांगल्याप्रकारे जाणून होते.

शहरातील माओवादाची उद्दिष्टे खालील प्रकारे ठरवण्यात आली आहेत.

1 सामान्य लोकांना क्रांतीसाठी प्रोत्साहित करणे व एकत्र करणे.
2 त्यांची एकत्र संघटना तयार करणे.
3 त्यांना सशस्त्र कामासाठी तयार करणे.
1 सामान्य लोकांना क्रांतीसाठी प्रोत्साहित करणे व एकत्र करणे – कामकरी , अर्धकुशल कामगार, विद्यार्थी, मध्यम वर्गातील चाकरमाने व बुद्धिजीवी ह्यांच्या माध्यमातून ही जबाबदारी पार पाडणे महत्त्वाचे आहे. तसेच विशेष सामाजिक घटक जसे महिला, अनुसूचित जाती सदस्य, धार्मिक अल्पसंख्यांक ह्यांना क्रांतीसाठी तयार करणे आवश्यक आहे.

2 त्यांची एकत्र संघटना तयार करणे. – कामगारांना एकत्र करणे, नंतर कामगार व शेतकरी ह्यांच्यात एकी घडविणे, कामगारांच्या शोषणा विरुद्ध व अन्यायाविरुद्ध त्यांना एकत्र करणे, जागतिकी करणाला विरोध करणे, हिंदू प्राबल्यास विरोध करणे हे ह्यातील महत्त्वाचे घटक आहेत. शहरातील माओवाद्यांना ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडायची आहे.

3 त्यांना सशस्त्र कामासाठी तयार करणे. – ग्रामीण भागामधे सशस्त्र उठाव होत असतांना शहरातील चळवळीतून त्याला पूरक काम करणे महत्त्वाचे आहे. ह्यासाठी शहरातील माओवाद्यांनी सैन्य, पोलीस, प्रशासन, न्यायव्यवस्था ह्या विविध घटकांमधे खोलवर प्रवेश करणे, महत्त्वाच्या औद्योगिक चळवळीत लोकांना प्रोत्साहित करणे, ग्रामीण सशस्त्र चळवळीच्या नेत्यांच्या बरोबर समन्वय राखून घातपात करणे, आवश्यक ती रसद पुरविणे ही कामे करावयाची आहेत. ह्यासाठी वर उल्लेखलेल्या समाजातील लोकांना प्रोत्साहित करणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे.

शहरातील माओवाद्यांनी मदत करतांना आवश्यक ते साहित्य, मनुष्यबळ ह्याचा अव्याहत पुरवठा होईल ह्याची खात्री करणे आवश्यक आहे. सैन्य, अर्धसैन्य, पोलीस, वरिष्ठ प्रशासन ह्या सर्व ठिकाणी माओवादी घुसविणे आवश्यक आहे. सैन्य व पोलीस दले ह्यांच्यामधे समविचारी लोकांना प्रोत्साहित करणे, त्यांच्या मदतीने क्रांती करणे, सैन्याची माहिती माओवादी लोकांना पुरविणे व अशा प्रकारे सैन्य व पोलीसदल आतून पोखरून खिळखिळे करणे ही महत्त्वाची कामे आहेत. शस्त्रे व दारूगोळा, संचारमाध्यमे, औषधांचा पुरवठा, दुरुस्तीसाठी
आवश्यक मदत, प्रचार, प्रसिद्धी, आजारी व्यक्तीना मदत ह्या सर्व गोष्टींसाठी शहरी चळवळीतील कार्यकर्त्यांवरच क्रान्ती अवलंबून आहे. गरिला भागांच्या आसपास असलेल्या छोट्या शहरांमधे क्रांतीकार्‍यांना मदत करण्यासाठी भूमीगत कार्यकर्त्यांनी समर्थक तयार करणे आवश्यक आहे.

शहरातील माओवादी ह्यांच्यामधे सतत नेतृत्त्व निर्माण करणे, उघड व गुप्त कामांमधे समन्वय राखणे, वरीष्ठ आणि कनिष्ठ यांच्यामधे एकसूत्रता ठेवणे, शहरी व ग्रामीण नेतृत्वामधे सौहार्द ठेवणे ही ह्यांची कामे आहेत.

माओवाद्यांच्या विविध संघटनांचे क्रांती हे एकमेव राजकीय उद्दिष्ट असले तरी त्यांच्या विविध संघटना जणु काही आपला एकमेकांशी काहीच संबंध नाही असा वरकरणी आव आणत असतात. पण आतून मात्र त्या एकमेकांशी घट्ट जोडलेल्या असतात. ह्यालाच संघटनात्मक विघटीकरण म्हणतात. कनिष्ठ पाताळीवरील सर्व कार्यकर्त्यांचा माओवादी विचारसरणीवर पक्का विश्वास असावालागतो. त्यामुळेच ते संघटनेच्या राजकीय उद्दीष्टांना पार पाडण्याचे काम अडचणीतही पूर्ण करू शकतात. हे करतांना वरिष्ठ नेतृत्त्वाने कनिष्ठ कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संबंध ठेऊ नये. जर कोणी कार्यकर्ते शासनाला माहिती झाले तर त्यांना त्वरित भूमिगत ठेवण्यात यावे अशी त्याची पद्धत आहे. सुरवातीपासून ते क्रांतीचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत क्रांतीसाठी आवश्यक नवीन व्यक्ती मिळविण्यासाठी शहरी भाग हा अत्यंत महत्वाचे उगमस्थान आहे. विविध स्तरांवर क्रान्ती घडवून आणण्यासाठी व राजकीय प्रशिक्षण व तसेच चळवळीवरीळ विश्वास घट्ट करण्यासाठी शहरातून नवनवीन कॉम्रेड्सचा पुरवठा होणे गरजेचे आहे. ( पान नं 29 ते 125) Strategy and Tacticts of the Indian Revolution, CPI ( Maoist)
2007

डिसेंबर 2012 मधे संयुक्त राजकीय आघाडी (UPA) ने जाहीर केले की, 2007 नंतर वरील प्रमाणे माओवाद्यांचे हस्तक म्हणून काम करणार्‍या 128 संघटना आहेत व सर्व राज्य सरकारांनी ह्या संघटनांविरुद्ध कारवाई करावी. वारावाराराव, सुधा भारद्वाज, सुरेंद्र गडलिंग्ज, रोना विल्सन, अरुण फरेरा, व्हेरनॉन गोन्साल्विस व महेश राऊत हे ह्या अशा संघटनांमधे काम करत होते. ह्यातील फरेरा व गोन्साल्विस हे 2007 साली त्यांच्या आक्षेपार्ह कारवायांमुळे पकडले गेले होते व कित्येक वर्षे तुरुंगात होते. वारावारा राव ह्याला आंध्रप्रदेश व तेलंगणा
पोलीस ह्यांनी अनेकवेळा पकडले होते. ज्या संघटनांमध्ये ह्या व्यक्ती काम करत

होत्या त्या प्रतिबंधित अशा कम्युनिस्ट पार्टी ( माओवादी) ह्यांना मदत करत होते व त्यांच्या भूमिगत कार्यकर्त्यांना मदत करून लोकांनी लोकशाही मार्गाने निवडून दिलेल्या शासनास उलथवून टाकण्याचा प्रयत्न करत होते. कामगारांचे व शोषितांचेराज्य स्थापन करण्यासाठी जनक्रांती करणे व त्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील चळवळींमधे समन्वय निर्माण करणे हे माओवाद्यांचे प्रमुख धोरण आहे. शहरातील कार्यकर्त्यांमधून माओवाद्यांना रसद व कार्यकर्ते याचा अखंड पुरवठा करणे, आवश्यक सामुग्री पुरविणे, तंत्रज्ञान उपलब्ध करणे, कुशल कामगार देणे माहिती पुरविणे, औषधै पुरविणे ही जबाबदारी शहरातील उघड रीत्या काम करणार्‍या कार्यकर्त्यांची जबाबदारी ते पार पाडत होते.

माओवाद्यांनी 2001 पासून 6956 निरपराधी नागरिकांना व 2517 पोलीसांना निर्घृणपणे ठार मारले आहे. ह्याशिवाय विकासासाठी आवश्यक असे रस्ते, पूल, इमारती ह्यांचा विध्वंस केला आहे. व विकास पूर्णपणे बंद पाडला आहे. आदिवासींनी माओवाद्यांना झिडकारल्यामुळे आता ते शहरी भागात विशेष लक्ष देत आहेत.

6 जून 2018 रोजी व नंतर महाराष्ट्र पोलीसांनी पकडलेल्या व्यक्ती व त्यांच्याशी निगडीत असलेल्या संस्था पुढीलप्रमाणे-

सुरेंद्र गडलिंग ( Gen. secretary Indian Association of People’s Lawyers), रोना विल्सन ( Public Relation Secretary Committee for the Release of Political Prisoners) सुधीर ढवळे (Republican Panthers), शोमा सेन ( Executive Member, Committee for Protection for Democratic Rights ), महेश राउत, ( State Convener, Maharashtra Visthapan Virodhi Jan Vikas Andolan), वारावारा राव

(President, Revolutionary Democratic Front), सुधा भारद्वाज ( Vice President, Indian Association of People’s Lawyers), गौतम नवलाखा(Leader, People’s Union for Democratic Rights), व्हेरनॉन गोन्साल्विस (ex Secretary, Maharashtra State Committee of CPI/Maoist), आणि अरूण फरेरा ( ex-Member, Maharashtra State Committee of CPI- Maoist).

लोकांनी निवडून दिलेल्या अत्युच्च लोकप्रतिनिधींना ठार मारण्याचा कट रचल्याचा व त्यासाठी आवश्यक दारूगोळा, शस्त्रे मिळविण्याचा प्रयत्न करणे हा आरोप ह्यांच्यावर आहे. त्यासाठी नेपाळ व मणिपूर येथील कॉम्रेडस् ची मदत घेणे प्रस्तावित होते.

शोषित व पीडीत व्यक्तींना सामाजिक न्याय मिळवून देणे हे जर ह्या लोकांचे उद्दिष्ट असेल तर शासनाच्या या घटकांसाठीच्या विविध कल्याणकारी योजना परिणामकारक रीत्या राबविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असते व शासनाला मदत केली असती. जी लोकशाही सतत वाढावी म्हणून सर्व थरांवर गेली सात दशके प्रयत्न झाले आहेत तीच लोकशाही नष्ट करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. लोकशाहीने उपलब्ध करून दिलेले भाषणाचे स्वातंत्र्य शासनाविरुद्ध वापरून मार्क्सिस्ट लेनिनिस्ट माओअिस्ट प्रणाली जी चीन व रशियातूनही हद्दपार झाली
आहे ती त्यांची प्रेरणास्थळे आहेत.

इतके दिवस दुर्गम अशा भागातील आदिवासींना क्रूररीत्या छळल्यानंतर त्यांनी शहरातील गरीब, झोपडपट्टीत राहणार्‍या व्यक्ती व सहज बळी पडणार्‍या महाविद्यालय, विद्यापीठ येथील तरूण – तरुणी यांना सावज करायचे ठरविले आहे. व त्यातूनच जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित

संस्थांमधे, TISS मध्ये त्यांनी चळवळी उभारल्या आहेत. प्राध्यापक साईबाबा हा अशाच लोकांचा म्होरक्या होता. परंतु न्यायालयाने त्याच्या देशविघातक कारवायांसाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे महाविद्यालयातील तरूण, शहरातील बुद्धिजीवी, अनुसूचित जातीतील व्यक्ती ह्यांनी माओवाद्यांच्या स्वार्थी भूलथापांना बळी न पडता त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत असलेल्या योजनांमधे सहभागी होणे आवश्यक आहे. तसेच अन्य विरोधी पक्षांनीही हे समजून घेणे गरजेचे आहे की ह्या चळवळीचे लक्ष भाजप नसून सर्व देशात अराजक माजवणे हे आहे.

TAGS
RELATED POSTS

LEAVE A COMMENT