महाराष्ट्रातील नुकत्याच घडलेल्या घटनेने समाजमन सुन्न झाले. आई वडिलांनीच आपल्या वयात आलेल्या मुलीची हत्या केली व तिचे दहन करण्यासाठी तिला स्मशानात घेऊन गेले. परंतु तेवढ्यात कोणीतरी पोलीसांकडे तक्रार केली व पोलीस वेळेवर पोचल्याने मुलीचे प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. शवविच्छेदनाच्या अहवालातून निष्पन्न झाले की मुलीचा मृत्यू हा नैसर्गिक नसून ती हत्या आहे. पोलीस तपासात पुढे निष्पन्न झाले की मुलीच्या मृत्यूस तिचे आई वडीलच जबाबदार होते व त्यांना अटक करण्यात आली. स्वतःच्या मुलीची हत्या करण्यामागे काय हेतू होता हे चौकशी करतांना उघडकीस आले की आई वडील हे सम्पन्न घरातील होते व त्यांच्याकडे घरगडी म्हणून वर्षाच्या बोलीवर ठेवलेल्या माणसाचा मुलगा व त्या सम्पन्न घराण्यातील मुलगी यांचे प्रेम संबंध होते. गड्याच्या मुलाबरोबर संबंध ठेवणे हे आईवडिलांना आपल्या प्रतिष्ठेला काळिमा आहे असे वाटले व त्यामुळे समाजात आपली बेअब्रू होईल व ती टाळावी म्हणून आईवडिलांनी मुलीला ठार मारले होते. व तिच्या प्रेताची गुपचुप विल्हेवाट लावावी हा त्यांचा उद्देश होता. शहर असो अथवा गाव; भारत, पाकिस्तानमधे अशाप्रकारे मुलीने आपल्या जातीतील मुलाऐवजी दुसर्या जातीतील मुलाबरोबर किंवा दुसर्या धर्मातील मुलाबरोबर प्रेमसंबंध वाढविणे व त्यामुळे आपल्या घराण्याचे नाक कापले गेले, आपली छी थू झाली असे मानून मुलीचा भाऊ, मुलीचे वडील, मुलीचे आजोबा ह्यांनी मुलीला ठार मारण्याचे प्रकार वारंवार ठिकठिकाणी उघडकीस येतात. परंतु मुलीनेच आत्महत्या केली, किंवा मुलीचे प्रेत नदीत सापडले किंवा मुलीचा आगगाडीखाली मृत्यू झाला अशाप्रकारच्या अनेक घटना कळवल्या जातात. परंतु त्यापाठीमागेदेखील केलेल्या हत्येला आत्महत्येचे स्वरूप देऊन तपासयंत्रणांना गुंगारा देणे व आरोपी पकडण्यात पोलीस अक्षम आहेत अशा प्रकारचा कांगावाही अनेकवेळा होतांना दिसतो. मुलीचे संबंध अन्य जातीतील, धर्मातील मुलाबरोबर आहेत ह्याची जाणीव शेजार्यांना किंवा ओळखीच्या अनेक व्यक्तींना असूनही त्यासंबंधी ते पलाकांना कळवत नाहीत किंवा पालकांनीच त्यामुलीची हत्या केल्यानंतरही त्याबद्दलची माहिती पोलीस तपासामधे देण्यास असमर्थता व्यक्त करतात त्यामुळे मुलीची हत्या करूनदेखील अनेक जवळचे नातेवाईक, आईवडिल हे गुन्हेगार असूनही कायद्याच्या कचाट्यात न सापडता मिरवत राहतात. ज्यावेळेला एखादी मुलगी वर्षानुवर्षे अन्य जातीतील किंवा धर्मातील मुलाबरोबर राहत असते, भेटत असते त्यावेळेला अनेक पालक त्यासंबंधी पूर्णपणे अंधारात असतात किंवा त्याकडे काणाडोळा करत असतात. त्यानंतर जेंव्हा मुलगी अशा अन्य जातीतील मुलाबरोबर लग्न करणार असे जाहीर करते त्यावेळेला पालकांना ते असह्य होऊन असहाय अशा मुलीचाच घात करण्यास ते प्रवृत्त होतात. जसजशी आर्थिक प्रगती होत जाते व शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय निमित्ताने महिला अनेक पुरुषांच्या संपर्कात येतात त्या वेळेस त्या व्यक्तीची जात, धर्म याचा विचार न करता त्याचा स्वभाव व अन्य गोष्टींचा विचार करून जर सज्ञान मुलीने त्याच्याशी विवाह करण्याचे ठरविले तर ते पूर्णपणे कायदेशीर आहे. किंबहुना कोणत्याही सज्ञान मुलीला आपण कोणाबरोबर विवाह करावा ह्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे व त्याला कायद्याचा पूर्ण पाठिंबा आहे. अनेकवेळेला आपली मुलगी सज्ञान झालेली आहे व तिला अशाप्रकारे पूर्ण स्वातंत्र्य आहे हेच घरातील आईवडिलांना आणि अन्य व्यक्तिंना मान्य नसते व ते आपली इच्छा तिच्यावर बळजबरीने लादत असतात. अनेकवेळा अशा मुली घरातून पळून जाऊन लग्न करतात किंवा घरातील त्रासाला कंटाळून निघून जातात. एखादेवेळेस त्यांचा पत्ता लागला तरीही मी घरी परत जाणार नाही, त्यापेक्षा एखाद्या शेल्टरहोममधे राहीन असे न्यायालयासमोर व पोलीसांना निक्षून सांगतात. अनेक घटनांमधे अशा नवराबायकोंना पोलीस संरक्षण द्यावे असेही न्यायालयाने आदेश दिले आहेत. समाजामधे होत असलेले बदल मान्य करून मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिला स्वातंत्र्य देणे व आपला निर्णय घेतांना तिने सर्व बाबींचा सखोल विचार करणे यासाठी पालकांनी मुलगी लहान असल्यापासूनच तिच्याबरोबर सुसंवाद ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर समाजातील अन्य व्यक्तींनीही मुलीने असा निर्णय घेतल्यास तिच्या पालकांना बहिष्कृत करणे, वाळित टाकणे किंवा जातीतील कार्यक्रमास येण्यास मनाई करणे असे गैरकायदेशीर प्रकार होणार नाहीत ह्याची खात्री करणे आवश्यकता आहे. स्त्री पुरूष संबंधामधे नवीन सामाजिक घडी प्रमाणे येणारा मोकळेपणा मान्य करून मुलांना तसेच मुलींना सक्षमपणे आयुष्य जगण्यास शिकवणे हे पालकांचे व समाजाचे कर्तव्य आहे. ते आपण स्वीकारणार का? हा खरा प्रश्न आहे. अशाप्रकारे समाजप्रबोधन झाल्यास खोट्या प्रतिष्ठेमुळे मुलींचे जाणारे बळी टाळता येणे शक्य आहे. हे बदल स्वीकारण्यात होणारी दिरंगाई ही समाजस्वास्थ्य बिघडवणारी आहे.
प्रवीण दीक्षित.
निवृत्त पोलीस महासंचालक