Articles

Greatness of Bhagavad Gita

By on February 19, 2024

भगवद्गीता माहात्म्य

प्रवीण दीक्षित

2 फेब्रुवारी 2024

श्री गीता मंजुषा मंथन पुष्प हा उपक्रम गेले 23 महिने सातत्याने भाण्डारकर प्राच्य विद्या संशोधन संस्स्थेत चालवल्याबद्दल आदरणीय लीना मेहेंदळे, सुनीता फडके व त्यांचे सहकारी ह्यांचे मी सुरवातीसच अभिनंदन करतो व त्यांना पुढील पुष्पांसाठी सुयश चिंतितो.  ह्या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेण्यासाठी नवीन पिढीतील तरुणांना प्रोत्साहन देणार्‍या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. सध्या मुलांच्या पुढे असणार्‍या विविध आकर्षणांमधून त्यांना गीतेची गोडी लावणे ही मोठी दुरापास्त गोष्ट आहे. प्रत्येक पुष्पामधे विविध प्रश्न तयार करणे त्यातून मुलांमधे गीतेचे ज्ञान, त्यातील व्याकरणाची माहिती वाढवणे हे गीतेवर निष्ठा असल्याशिवाय होणे शक्य नाही. हा उपक्रम तरुण सहकार्‍यांनी पुढे येऊन यशस्वी करणे जरूरीचे आहे.

प्रत्यक्ष भगवंतांनी सांगिल्याप्रमाणे ईश्वर प्राप्तीसाठी कृष्ण व अर्जुन यांच्यात झालेला संवाद ह्यांचा जो अभ्यास करतो, त्या ज्ञानयज्ञामुळे त्यांची ती इच्छा खात्रीपूर्वक पूर्ण होते. एचढेच नव्हे तर श्रद्धा असणार्‍या व मत्सर नसणार्‍या व्यक्तीने नुसती गीता ऐकली तरीही त्याला सुद्धा तेच फळ मिळू शकते.

आजपर्यंत भगवद् गीतेवर आद्य श्रीशंकराचार्य, ज्ञानेश्वर माउली, लोकमान्य टिळक यांच्यासह अनेकांनी भाष्य केलेले आहे, ज्ञान योग, ध्यान योग, कर्म योग, भक्ती योग हे कल्याणाचे साधन आहे व आपल्या आवडी प्रमाणे, श्रद्धे प्रमाणे, यो्ग्यते प्रमाणे त्याचा वापर करून प्रत्येकजण आपला उद्धार करून घेऊ शकतो. ज्ञाानेश्वर माउलींनी म्हटल्याप्रमाणे-

साचचि बोलाचें नव्हे हें शास्त्र

पैं संसारु जिणतें हें शास्त्र

आत्मा अवतरिते मंत्र

अक्षरें इयें (अध्याय 15 वा ओवी 577)

अर्थ –

खरेच नुसते बोलण्याचे

हे शास्त्र नाही वाचे

संसाराशी जिंकण्याचे

समर्थ शस्त्र आहे हे

किंवा अर्जुना जाण बा रे

गीता म्हणजे मंत्राक्षरे

ज्याच्या जपाने अवतरे

आत्मा पुढती प्रत्य़क्ष

(प्रा अनंतराव आठवले कृत अनुवाद ज्ञानेश्वरी अध्याय 15 ओवी 577-578)

गीता महात्म्याबद्दल सांगताना ज्ञाानेश्वर माउली म्हणते

ऐसिया शते सात श्लोकां

परी आगळा येकयेका

आता कोण वेगळिका

वानावा पां (अध्याय 18 वा ओवी 1677)

गीतेतला प्रत्येक श्लोक व त्याचा अर्थ एकाहून एक वरचढ आहे त्यामुळे त्यातला अमुक मोठा व अमुक लहान असा फरक करणे शक्य नाही.

आज नास्तिकपणाच्या नावाखाली अर्जुनासारखा प्रत्येकजण किं कर्तव्य मूढ झालेला दिसतोय. मानसिक रोगाने लोक त्रस्त झालेले आहेत. नैराश्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत. व्यसनाधीन होत आहेत. विषयासक्त होऊन, हे शरीर म्हणजेच मी अशा मायाजालात गुरफटलेले आहेत.

स्थितप्रज्ञ, गुणतीत होऊन कर्मफळाचा त्याग करून अहंकार न ठेवता जो उत्कृष्टपणे, स्वधर्माने सांगितलेले काम करतो त्यालाच मनःशांतता लाभते. तुमच्या मनातील परमेश्वर जसे तुम्हाला वागवतो तसे ईश्वरावर श्रद्धा ठेवून तुम्ही वागत राहिलात तर नक्कीच ही मायानदी तरून जाण्याची शक्यता आहे.

गीताशास्त्रमिदं पुण्यं यः पठेत्प्रयतः पुमान्

विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः

अर्थ

जो रोज सकाळी पुण्यकारक गीता वाचतो, त्याची भीती, दुःख नाहिसे होऊन त्याला विष्णुपद प्राप्त होते.

एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो.

जय कृष्ण.

 

 

 

 

 

 

 

TAGS
RELATED POSTS

LEAVE A COMMENT