माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज ( 31 ऑगस्ट 2020 ) दुःखद निधन झाले. एका अत्यंत हुशार, चाणाक्ष व मुरब्बी राजकारण्यास देश मुकला आहे. मी 1995 मधे आप्रवास ( immigration department) मधे उपसंचालक म्हणून नवी दिल्लीत कार्यरत होतो त्यावेळेस भारत सरकारच्या गृहमंत्रालयाची मार्गदर्शक समिती (consultative committee) चे प्रणव मुखर्जी अध्यक्ष होते. त्यावेळेस मी नुकत्याच शिकलेल्या power point चा उपयोग करून ह्या समितीसमोर “भारतात येणार्या व भारतातून जाणार्या प्रवाशांसाठी ही व्यवस्था सुधारण्याचे प्रयत्न’’ ह्या विषयावर सादरीकरण केले होते. अन्य राजकीय पक्षांचे खासदार व प्रणव मुखर्जी यांच्यासमोर सादरीकरण व त्यांनी विचारलेलल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे देणे हा माझ्यासाठी मोठाच अनुभव होता. दिल्लीतील संसद भवनासमोर असलेल्या parliament annexe मधील अंडाकृती टेबलावर ही बैठक होती. प्रणव मुखर्जी त्यांच्या बंगाली पद्धतीचे धोतर व झब्बा नेसून बैठकीत आले व जवळ जवळ दोन तास ह्या विषयावर चर्चा झाली. Immigration सुविधा सुधारण्यासाठी ह्या समितीने सरकारला काय सूचना द्याव्यात व शासनाकडून तुम्हाला काय मदत पाहिजे अशी विचारणा करत त्यांनी सभेला सुरवात केली. व आम्ही खालील प्रमुख सूचना केल्या.
1 विमानतळावरील प्रवाशांच्या तपासणीसाठी संपूर्ण संगणकीकरण करणे,
2 परदेशातील भारतीय वकिलाती, विविध विमान तळ. पोलिस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्त ह्यांच्या कार्यालयातील विशेष शाखा यांचे Networking करणे.
3 Immigration च्या कामासाठी dedicated अधिकारी cadre तयार करणे.
समितीने त्याची नोंद घेऊन पुढील वर्षात त्याप्रमाणे कार्यवाही झाली. व परदेशातून येणार्या व परदेशात जाणार्या लोकांची विमानतळावरील तपासणी कष्टमुक्त झाली.
2009 मधे प्रणव मुखर्जी वित्तमंत्री होते. त्यावेळेला Air Force च्या विशेष विमानाने ते नागपूर येथे आले होते. अन्य शासकीय अधिकारयांबरोबर मी त्यांचे स्वागत केले व नागपूर येथील Indian Revenue service च्या नवनियुक्त अधिकार्यांच्या foundation course च्या समारोपासाठी त्यांना Academy त घेऊन गेलो. तेथे महान अर्थनीतीकार कौटिल्य उर्फ चाणक्याच्या पूर्णाकृती पुतळ्याचे त्यांनी अनावरण केले. त्यानंतर नवनियुक्त अधिकार्यांचे अभिनंदन करून त्यांनी आपले काम प्रामाणिकपणे करावे व करदात्यांना त्रास न होता कर संकलनाचे काम कसे वाढवावे याचे मागदर्शन केले. पोलीस आयुक्त ह्या नात्याने सदर कार्यक्रमात मला निमंत्रण असल्याने मीही ह्या कार्यक्रमास हजर राहिलो. व त्यांचे विचार प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मला प्राप्त झाली.
प्रणव मुखर्जी हे जरी वित्तमंत्री होते तरी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवामुळे ते जणु पंतप्रधान आहेत असाच त्यांचा रुबाब असे. प्रणव मुखर्जी यांच्या स्मृतीस माझा सादर प्रणाम.