नोव्हेंबर 2019 पासून चीनमधील वुहान प्रांतातून कोविड-19 ह्या विषाणुने माणसे पटापट दगावायला सुरवात झाली. आज त्यामुळे 185 देशातील 36,09,990 हून अधिक व्यक्ती बाधीत आहेत व 2,50,090 मृत झाल्या आहेत. भारतात 46,433 व महाराष्ट्रात 14,541 कोविड बाधीत व्यक्ती आहेत. जगात 2,39,000 मृत पावले. भारतात 1,568 व महाराष्ट्रात 583 मृत पावले. महाराष्ट्रात विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर औरंगाबाद, सोलापूर, मालेगाव व अनेक शहरात प्रादुर्भाव झाला आहे. तज्ज्ञांच्या मते कोविड-19 च्या 1,2,3 अशा संक्रमण अवस्था आहेत. अद्यापपर्यंत भारतात पहिली व दुसरी अवस्था आहे. व संसर्गामुळे होणारी तिसरी अवस्था निर्माण झालेली नाही. 15 मार्च पासून देशातील सर्व व्यवहार पूर्ण बंद असल्यामुळे रुग्णांची संख्या अल्प ठेवण्यात आत्तापर्यंत यश आले आहे. परंतु जसजसे सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होतील तेंव्हा सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दी न करणे ह्या सारखे उपाय राबविणे शक्य होतील काय? ह्याबद्दल अनेकजण साशंक आहेत.
वैयक्तिक स्वच्छतेचे नियमपालन जसे बाहेर फिरतांना मास्क वापरणे, हातमोजे वापरणे, उघड्यावर न थुंकणे, खोकला वा शिंक आल्यास रुमाल वापरणे हया प्राथमिक गोष्टींमुळे कोविडचा प्रसार आटोक्यात राहू शकतो. परंतु हे उपाय केल्यानंतरही कोविडचा प्रसार होणार नाही हयाची खात्री नाही. विशेषतः दाट वस्ती असलेल्या शहरी भागात ही समस्या गंभीर आहे. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था वापरणारे लाखो प्रवासी आहेत ज्यांना सुरक्षित अंतर पाळणे अशक्य आहे. आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा, रेल्वे वाहतूक व अन्य व्यवहार बंद असण्यामुळे ह्या समस्या नियंत्रणात होत्या. परंतु येणार्या काळात जसजसे हे सर्व सुरू होईल तसतसे गंभीर समस्या अपेक्षित आहेत व त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणे अवघड होत जाणार आहे.
गेल्या काही दिवसात आपण अनुभवले आहे की काही विशिष्ट लोक जाणीवपूर्वक आपण रुग्ण आहोत हे लपवित आहेत. त्यामुळे त्यांच्याजवळ वावरणार्या अनेक लोकांना ह्या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. काही समाजकंटक उपचार करणार्या डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस ह्यांच्याच अंगावर थुंकणे, लघवी करणे, नागडे फिरणे असे अभद्र प्रकार करून ह्या कोविड योद्ध्यांशी आक्षेपार्ह वर्तन करत आहेत व त्यामुळे ह्या कोविड योद्ध्यांपैकी अनेक डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस हे ह्या रोगाचे बळी झाले आहेत, व दुर्दैवाने अनेकजण दगावले आहेत. कोविडविरुद्ध उपाय म्हणून रुग्णालयात डॉक्टर्स व परिचारिका कार्यरत आहेत तर सुरक्षित अंतर व इतर उपाय करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे. अनेक धार्मिक स्थळांमधे , सार्वजनिक बाजारांमधे कोणतेही नियम न पाळता लोक गर्दी करतांना दिसत आहेत. परराज्यात जाण्यासाठी कामगार नवनवीन शक्कल लढवून टँकर, कंटेनर, बोटी मधून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्या ठिकाणची स्वच्छता ,ह्या लोकांची मोजदाद व शांतता ठेवण्याची जबाबदारी पोलीसांना पार पाडावी लागत आहे, ह्याशिवाय कोणत्याही कारणाशिवाय केवळ मजा म्हणून दुचाकीवर फिरणार्या टोळक्यांना आवरणे, मॉर्निंग वॉकसाठी फिरणाय़ा स्त्री पुरुषांना प्रतिबंध करणे हेही काम पोलीसांना पार पाडावे लागत आहे.
मार्च महिन्यात चीन व अन्य काही देशातुन येणार्या भारतीयांना विलगीकरणासाठी ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते, त्या ठिकाणची व्यवस्थाही पोलीसांनी समर्थपणे हाताळली होती. परंतु आता 7 मे पासून गल्फ प्रदेशातून हजारो लोक येण्याची अपेक्षा आहे. येणार्या ह्या सर्व लोकांची राहण्याची व वाहतुकीची व्यवस्था करण्याची मोठी जबाबदारी शासनास व पोलीसांना पार पाडावी लागणार आहे. त्याचबरोबर परराज्यात जाऊ इच्छिणार्या लाखो श्रमिकांना आरोग्य प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शासकीय रुग्णालयामधे जाणे सक्तीचे करण्यात आले आहे. ह्या ठिकाणी लागणारा वेळ व रांगा हाताळणे ही पोलिसांपुढे महत्त्वाची जबाबदारी झाली आहे. ह्या शिवाय रेशन दुकानासमोरील गर्दी व सध्या दारूच्या दुकानांसमोरील गर्दी हाताळणे हेही काम पोलीस पार पाडत आहेत. त्यातच रेशन दुकानांमधे होणार्या भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी येत आहेत. दुकानात जाऊन सामान घेण्याऐवजी ऑनलाईन खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. ह्याचा गैरफायदा घेऊन ऑनलाईन व्यवहारामार्फत सर्व वैयक्तिक माहिती मिळवून फसवाफसवी होत असल्याच्या तक्रारीही वाढीस लागल्या आहेत. लॉकडाऊनमुळे स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण व तक्रारी देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
अशा प्रकारे स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्यास जपणे, रस्त्यावरील लोकांना शिस्त लावणे, अफवा पसरविणारयांविरुद्ध कारवाई करणे, नवनवीन गुन्ह्यांचा तपास करणे, अशा अनेक जबाबदार्या पोलीसांना हाताळाव्या लागत आहेत. येणार्या काही दिवसातच न्यायालये काम सुरू करतील, त्यावेळेस तुरुंगातून कैद्यांची ने आण करणे, कैद्यांना रुग्णालयात नेणे ही जबाबदारीही पोलीसांना पार पाडावी लागणार आहे.
उपाय – वरील परिस्थितीत रस्त्यावर एकत्र होणार्या लोकांना हाताळतांना पोलीसांची कसोटी लागत आहे. जमलेला जमाव पांगविण्यासाठी लाठी व अश्रुधूराचा वापर करणे ह्या पारंपारीक पद्धती पोलीस वापरत आहेत. त्या ऐवजी श्रमिक असोत, अथवा धर्मवेडे लोक असोत ह्यांच्या नेत्यांशी संपर्क करून त्यांच्या मार्फत सदर लोकांवर नियंत्रण वाढविण्याची आवश्यकता आहे. ह्यासाठी अशा विविध गटाच्या नेत्यांशी दैनंदिन संपर्क वाढविण्याची गरज आहे. अनेक सामाजिक संस्था, एन्. सी. सी. चे विद्यार्थी, स्वयंसेवक ह्यांचीही माहिती एकत्र करून त्यांचा वापर करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर अन्य शासकीय विभाग जसे महसूल, वाहतुक, महानगरपालिका ह्यांच्याशी समन्वय व संवाद वाढवणे जरुरीचे आहे. आजमितीस ह्यांच्यातील समन्वयाअभावे अनेक गंभीर समस्या कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या बनत आहेत.
ह्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे अतिशय जरुरीचे आहे. विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस मदतनीस/मित्र ह्यांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी app चा वापर पोलीसांचे काम सोपे करू शकतो. आज मोठ्या शहरांमधे सी.सी. टि.व्ही चे जाळे बसविण्यात आले आहे. त्याचा वापर करून आवश्यक त्या ठिकाणी कारवाई करणे सहज शक्य आहे. ड्रोन तंत्रज्ञान वापरून व त्यातच स्पीकरचा उपयोग केल्यास जमाव पांगवण्यासाठीही मदत मिळू शकेल. त्याचबरोबर पोलीसांकडे माहिती/ तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर / व्हॉटसॅप ह्यांचा पोलीसस्थानक पातळीपर्यंत वापर झाल्यास लोकांना पोलीस स्थानकामधे जाण्याची आवश्यकता कमी होईल. आज न्यायालये, तुरुंग व सार्वजनिक रुग्णालये ह्या ठिकाणी उपलब्ध व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढवून न्यायालये अथवा रुग्णालये येथे प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता कमी करण्याची गरज आहे. त्यासाठी गुगल मिटिंग सारखे नवीन तंत्रज्ञान आज निःशुल्क उपलब्ध आहे. त्याचाही वापर करण्याचा विचार व्हावा.
वरील उपाय करत असतांना पोलीसांचे आरोग्य व मनोधैर्य वाढविण्यासाठी कारवाई आवश्यक आहे. पोलीसांसाठी प्रतिबंधक, संरक्षक किट्स् मास्कस्, हातमोजे उपलब्ध करून देण्यासाठी केवळ शासनावर अवलंबुन न राहता सार्वजनिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. पोलीसांच्या निवासस्थानी आरोग्य तपासणी, योगासने, शारिरीक व्यायाम, स्वच्छता ह्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पोलीसांची रोगप्रतिबंधक ताकद वाढविण्यासाठी पोलीसांना फलाहार, ताजे जेवण व पुरेशी विश्रांती मिळते आहे ना ह्याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आजमितीस दोनशेहून अधिक पोलीस स्वतःच कोविडचे रुग्ण आहेत व त्यातील चारजण दगावले आहेत. मृत पोलीसांसाठी शासनाने जाहीर केलेली रक्कम त्यांच्या कुटुंबियांना तातडीने पोचविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांच्या घरातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी उपलबध करून देण्याची गरज आहे. पोलीसांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा कोविड संबंधीत रुग्णालय खर्च करण्याची जबाबदारी शासनाने घेणे गरजेचे आहे.
केंद्रसरकारचे `आरोग्यसेतू app’ केंद्रसरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच डाउनलोड करून जनता व पोलीस कोविड विरुद्धच्या लढ्यात मोठे योगदान देऊ शकतील. ह्याचबरोबर पोलीस करत असलेल्या समाजोपयोगी गोष्टींना मिडियामधून लोकांपर्यंत पोचवण्याची जरुरी आहे. त्यामुळे जनता, शासन व पोलीस एकदिलाने प्रयत्न करून कोविड 19 मुळे निर्माण झालेल्या आह्वानांना मात करु शकतील असा विश्वास आहे.