देशांतर्गत सुरक्षेपुढील आव्हाने –
श्री दीपक करंजीकर हयांच्या अफगाणिस्तान वरील ‘अस्वस्थ सूत्र’ व श्री अय्यर लिखित “ Who painted my money white” ह्या इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद ‘विघ्नविराम’ ह्या दोन पुस्तकांचा दीनदयाळ प्रेरणा केंद्र आणि परममित्र पब्लिकेशन्स आयोजित प्रकाशन समारंभ आज दि. २२/४/२२ रोजी ठाणे येथे होत आहे. त्याबद्दल मी लेखकाचे व प्रकाशकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. देशांतर्गत सुरक्षा कायम टिकवणे हे भारतासारख्या खंडप्राय देशापुढे फार मोठे आव्हान आहे. भारताचा लिखित स्वरूपात उपलब्ध असलेला गेल्या २५०० वर्षांचा इतिहास व त्यापूर्वीचा हजारो वर्षांचा हिंदू संस्कृतीचा विकास ह्याचा आज घडत असलेल्या अनेक गोष्टींवर खोल परिणाम जाणवतो. भारताची भौगोलिक स्थिती, भारतात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक गोष्टींची रेलचेल, भारतातून जगाला आवश्यक अशा अनेक कलाकृतीच्या गोष्टी, मसाल्याचे पदार्थ, रेशीम, दागदागिने ह्यामुळे गेली २५०० वर्ष भारतावर परकीयांकडून सतत आक्रमणे होत राहिली. त्यातील जवळ जवळ सर्व आक्रमणे भारताने यशस्वीरीत्या नेस्तनाबूत केली. परंतु त्याच बरोबर परकीय आक्रमकांनी अनेक भारतीयांची हत्या, विध्वंस करत इथल्या लाखो लोकांना जबरदस्तीने धर्मांतर करायला लावले. धर्मांतरात इस्लाम व ख्रिश्चन हे प्रमुख होते. ह्या दोन्ही धर्मांनी धर्मांतर केलेल्या त्या लोकांचा उपयोग करून त्यांच्या माध्यमातून ह्या लोकांची निष्ठा ही भारतापेक्षा भारताबाहेरील ताकदींना चालू राहील ह्या साठी जोरदार प्रयत्न केले. व हेच प्रयत्न आजही तितक्याच जोमाने चालू आहेत. व दुर्दैवाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अनेक दशके येथील राजकीय सत्तेनेही त्याला खतपाणी घातले. भारतात राज्य कोणाचेही असले तरी इथले राज्यकर्ते आपल्याला अनुकूल राहतील, ह्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करण्यात आले व तसेच प्रयत्न आजही चालू आहेत.
ह्या प्रयत्नांचे विविध स्वरूप वेळोवेळी जाणवत राहते. मुख्य म्हणजे फोडा व राज्य करा (Divide and Rule) हे धोरण आहे. भारतातील लोक एकसंध राहू नयेत व त्यांनी एकदिलाने प्रयत्न करू नये ह्यासाठी ह्या परकीयशक्ती देशांतर्गत विविध गोष्टींचा जसे धर्म, जात, भाषा, प्रांत, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, मुले ह्यांचा सर्रास उपयोग करून देशामधे सतत अंतर्गत अस्वस्थता राहील व राज्यकर्त्यांचे लक्ष विकासाकडे न लागता ह्या समस्यांचे निराकरण करण्यात खर्ची पडेल ह्याची खात्री केली जाते. ह्या उल़ट भारत सतत सर्व चराचरामधे ऐकच आत्मा आहे हेच सर्वांना सांगत राहतो. जगातील प्रगत समजल्या जाणार्या देशांकडे लक्ष दिल्यास, आढळून येते की त्या ठिकाणी ती राष्ट्रे एक विशिष़्ट धर्म देशाचा धर्म म्हणुन जाहीर करतात व त्या धर्माला अनुकूल अशी धोरणे ठेऊन इतर धर्मीयांना दुय्यम स्थान देतात. त्यामुळे ह्या देशांची अर्थनीती, परराष्ट्रनीती ही विविध पक्ष सत्तेवर आले तरी त्यात सातत्य राहते. भारतात मात्र प्रत्येकवेळी अनेक विरोधी गटांना बरोबर नेण्याची तारेवरची कसरत करावी लागते. निव़डणूक जिंकण्यासाठी त्यामुळे काही राजकीय पक्षांनी पुष्टीकरणाचे धोरण स्वीकारले. त्यातच “भारत हा कधीही एक राष्ट्र नव्हता, आर्य लोक हे भारताच्या बाहेरून आलेले आहेत. इथल्या मूल निवासी लोकांवर त्यांनी सतत अत्याचार केले आहेत” अशा धादांत खोट्या गोष्टींचा हिरीरीने प्रचार केला जातो व आजही शालेय अभ्यासक्रमात त्या स्वरूपाचे धडे मुलांना शिकवले जातात. मुलांना परकीय भाषेत शिक्षण देऊन, तुम्हाला जगभर नोकर्या मिळतील, भारतातील वरिष्ठ पदे मिळतील असा खोटा आशावाद निर्माण करून लाखो पालक परवडत नसतांनाही मुलांना परकीय भाषेत शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देतांना दिसतात. संस्कृतमिश्रित हिंदीपेक्षा इंग्रजी शिकुन आपला विकास होइल हा प्रचार आज ही करण्यात येत आहे. ज्या मुलांना भारताचा इतिहास, भारतीय विचार, भारतीय भाषा ह्यांचा गंध नाही अशी भारत विरोधी सेना निर्माण करण्याची आपली अहमहमिका लागलेली दिसते. समाजमाध्यमांच्या अनियंत्रित वापराने त्यात भर पडत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर ह्यात फरक पडेल अशी अपेक्षा आहे.
अशा परिस्थितीत भारत एकसंध कसा ठेवायचा व ही जबाबदारी केवळ काही सुरक्षासंस्था, सनदी अधिकारी, काही विचारवंत पार पाडू शकतील का हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. भारत तोडू इच्छिणार्या ह्या ताकदी शासनातील सर्वोच्च व्यक्ती, राजकीय पक्षांचे नेते, प्राध्यापक, पत्रकार, लेखक अशा लोक मानसावर ठसा ऊमटवणार्या महत्त्वाच्या व्यक्तीँना विविध प्रकारची लालुच दाखवून समाजात दुही निर्माण करतात , विविध प्रकारची आंदोलने , रस्ता रोको कार्यक्रम करतात, व लोकांनी निवडुन दिलेल्या शासनास काम करणे अशक्य करतात. ह्या कारवायांची सविस्तर माहिती ‘विघ्नविराम’ ह्या कादंबरीत वाचायला मिळते.
ह्या दृष्टीने अफगाणिस्तानचा विचार करणे महत्त्वाचे आहे. मुलतत्ववाद्यांनी मुल्ला व मौलवी ह्यांच्या माध्यमातून सामान्य लोकांना सतत मागास ठेवलेले आहे. सर्व नैसर्गिक संसाधने असुनही लोकांना आधुनिक शिक्षण न मिळाल्याने तेथील लोक हाल अपेष्टा सहन करत राहतात. शेक़डो वर्षे ते भारतावर आक्रमण करुन संपत्ती लुटत राहिले व आता गेली दोनशे वर्षे आक्रमणाला बळी प़डत आहेत. ह्यासाठी ‘अस्वस्थ सूत्र’ हे अफगाणिस्तान वरील पुस्तक जरुर वाचावे.
२०१४ साली नरेन्द्र मोदी केन्द्रात सत्तेत आल्या पासून ह्यात बदल करीत आहेत. आणखी काही बदल तातडीने करणे गरजेचे आहे.
ह्या दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशन निमित्ताने माझे विचार आपल्या समोर मांडायला संधी दिल्या बद्दल मी आयोजकांचा ऋणी आहे,
——————– ——————– ————————-