Articles

पुढील वर्षातील पोलिसांसमोरील आह्वाने

By on December 27, 2018

येणारे 2019 हे वर्ष निवडणुकांचे असल्याने पोलिसांसमोरील आह्वाने ही विशेष प्रकारची राहणार आहेत. लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका सध्याच्या परिस्थितीत वेगवेगळ्या वेळेला होणार असल्याने ही आह्वाने दुप्पटीने वाढणार आहेत. निवडणुकीच्यापूर्वी सर्व राजकीय पक्ष प्रचारामधे कार्यरत असतांना देशविघातक शक्ती राजकीय नेत्यांवर प्राणघातक हल्ले करून देशात अराजक माजविण्याचे पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. निवडणुक प्रचारात पैसे तसेच ताकदीचा गैरवापर करून विरोधी गटांना, व्यक्तींना तसेच वंचित, शोषित व्यक्तींना मतदानापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे. निवडणुकीचा प्रचार चालू असतांना समाजमाध्यमे व अन्य माध्यमे यांचा वापर करून खोट्या बातम्या किंवा पैसे देऊन छापून आणलेल्या बातम्या यांचा वापर करून समाजामधे धर्माच्या नावाखाली, भाषेचा उपयोग करून, जातीजातीत द्वेष निर्माण करून लोकांमधे प्रक्षोभ निर्माण करणे व त्यातून योग्यप्रकारे मतदान करण्यापासून लोकांना परावृत्त करणे यासाठी देशविघातक शक्ती उचल खाण्याची शक्यता आहे. ह्यात देशाबाहेरील शक्तींचाही हात नाकारता येत नाही.

ह्या अनुषंगाने दहशतवादाचे सतत होणारे प्रयत्न, शहरी माओवाद ह्या नावाखाली पोलीसांवरील हल्ले हेही तीव्र होण्याची शक्यता आहे. Internet चा वापर जसजसा वाढत चालला आहे तसतसे Internet च्या माध्यमातून दहशतवाद, सायबर गुन्हे, महिलांची फसवणुक, आर्थिक गुन्हे, फसवाफसवी, मुलांवरील लैंगिक हल्ले ह्यात वाढ होण्याची शक्यता आहे. ह्या गुन्ह्यांमधे गुन्हे शाबीत होण्याचे

प्रमाण नगण्य असल्याने हे गुन्हे करणारे गुन्हेगार अशाचप्रकारचे गुन्हे पुन्हा पुन्हा करण्यास मोकळे आहेत हे विसरून चालणार नाही. एकंदरीतच प्रचलित पद्धतीने होणार्‍या गुन्ह्यातसुद्धा 50% हून अधिक गुन्हे शाबीत न होण्यामुळे पोलिसांची प्रचंड ताकद व्यर्थ जात असते. गुन्हा नोंद करण्यापासून आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे प्रशिक्षण व त्याचा परिणामकारक वापर हे पोलीस प्रशासनासमोरील फार मोठे आह्वान आहे.

कायद्याचे आपणहून पालन करण्याची प्रवृत्ती जनतेतील सर्व थरांमधे वाढविण्यासाठी सर्व लोकांची, त्यासाठी आवश्यक संशोधन करणार्‍या संस्था, निधी उपलब्ध करून देणारे देणगीदार ह्यांची मदत व लोकप्रशिक्षण करण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचारी ह्यांनी मनःपूर्वक ही जबाबदारी ओळखून जास्तीतजास्त लोकांचा ह्या कामात पाठिंबा मिळवल्यास हे आह्वान ते पेलू शकतील. लोकांचा विश्वास टिकवायचा असल्यास नवनवीन तंत्रज्ञान, पारदर्शी व्यवहार, खंबीर नेतृत्त्व व भ्रष्टाचारमुक्त व्यवहार ही पोलिसांपुढील खरी आह्वाने आहेत. पोलीस हे करण्यास तयार आहेत का हे 2019 मधे स्पष्ट होणार आहे.

TAGS
RELATED POSTS

LEAVE A COMMENT