Author:

Praveen Dixit

Articles

शालेय विद्यार्थ्यांना संदेश

By on July 11, 2024

शालान्त विद्यार्थ्यांना संदेश-

प्रवीण दीक्षित

शालान्त परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला व 95% पेक्षा अधिक गुण मिळवून खुप विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  यशस्वी होणार्‍या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! त्यांना उत्तम मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, शिक्षिका, शाळेचे कर्मचारी ह्यांनी तळमळीने केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन! विद्यार्थ्यांना रात्रंदिवस प्रोत्साहन देणारे त्यांचे पालक तसेच त्यांचे कुटुंबीय ह्यांचेही मी मनःपूर्वक कौतुक करतो.

शालान्त  परीक्षा झालेल्या मुलांसाठी त्यांच्या 20 व्या वाढदिवशी जपानमधे दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसर्‍या सोमवारी ज्याल सोजिन नो हाय डे म्हणतात, त्या दिवशी सेजिन शिकी  हा विशेष समारंभ आयोजित केला जातो. त्यामधे गावातील सर्व व्यक्ती, शाळेतील शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित असतात. त्या समारंभात मुलांकडून शपथ घेतली जाते की, मी आता प्रौढ झालो आहे व प्रौढ व्यक्तीप्रमाणे मी आता सर्व नियमांचे काटेकोर पालन करणार आहे. आपलया कडे सुद्धा अशाच प्रकारवा समारंभ आयोजित करून मुलांना प्रौढत्वाची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे. 

बालमित्रांनो, मोठी स्वप्ने पहायला शिका व ती प्रत्याक्षात आणायचा प्रयत्न करा. मित्रांनो आता तुम्ही शाळेच्या संरक्षित वातावरणातून जगाच्या विस्तीर्ण अशा खुल्या वातावणात प्रवेश करत आहात. मला खात्री आहे, तुमच्या प्रत्येकाची काही स्वप्ने असतील. तुम्ही जरूर खूप मोठं व्हायची स्वप्न पहा. ही स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढील पाच वर्षात तुम्ही जेवढे प्रयत्न कराल तेवढी ती स्वप्ने प्रत्यक्षात येणे शक्य होणार आहे. ही स्वप्ने तुमच्या स्वतःची असु देत व त्यात पालकांनी सांगितले, मित्राने सांगितले, मैत्रिणीने सांगितले म्हणून मला अमुक अमुक व्हायचं आहे हा प्रकार कमी करा. तुमच्या पैकी अनेकांची काही स्वप्ने नसतीलही व पालकांनी सांगितले म्हणून एक विशिष्ट अभ्यासाची मी निवड केली आहे असे होऊ शकते. परंतु ज्या क्षणी तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय व्हायचे आहे व त्या दिशेने तुम्ही लवकर प्रयत्न सुरू कराल तेवढा तुमच्या वेळेचा सदुपयोग होणार आहे. स्पर्धा परीक्षा हे त्यातील एक स्वप्न असू शकते. आज केवळ पुण्यामधे कमीतकमी 2 लाख तरूण मुलं मुली अशी आाहेत, ज्यांनी अभियांत्रिकी,  वैद्यकीय, कृषी किंवा अन्य व्यावसायिक  विषयात पदवीपर्यंत अभ्यास केला आहे व त्यानंतर त्याना असे वाटायला लागले की मी स्पर्धा परीक्षेमधे निवड होण्यासाठी प्रयत्न करावा. त्यातील अनेक मुलं गेली 8 ते 12 वर्ष पदवी मिळाल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न करीत आहेत. मित्रांनो 12 वर्षात तुम्ही बारावी पूर्ण होता. पण पदवी मिळाल्यानंतर 8-12 वर्ष अशा प्रकारे प्रयत्न करणे हे तुमच्या वैय्यक्तिक आयुष्यात तुम्हाला, कुटुंबाला व राष्ट्राला परवडणारे नाही. केवळ वेळच नव्हे तर तुमची आर्थिक, शारिरीक, मानसिक दमछाक होणार आहे. हे टाळायचे अ‍सेल तर व्यावसायिक शिक्षणक्रम करत असतानाच मुक्त विद्यापिठातून तुम्ही अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास असे स्पर्धा परीक्षेस उपयोगी विषय घेऊन दुसरी पदवी घेऊ शकता व पाच वर्षातच तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकता. स्पर्धा परीक्षा ह्या भारत सरकाारर तर्फे संघ लोकसेवा आयोग घेत असते तर राज्यात राज्य लोकसेवा आयोग ह्या परीक्षा घेत असते. दर वर्षी लाखो तरूण स्पर्धा परीक्षा देऊन उत्तम नोकरी मिळवीत आहेत. ह्याची तयारी करण्यासाठी पुण्यातील अनेक संस्था मार्गदर्शन करीत आहेत.  आर्थिक टंचाईमळे कुठल्याही गरजू विद्यार्थ्याला अडथळा येऊ नये ह्यासाठी ज्यांना कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही अशा तरूणांसाठी महाराष्ट्र शासनाने अमृत ही संस्था सुरू केली आहे व त्या मार्फत अशा उमेदवारांना भरघोस आर्थिक मदत दिली जाते. आरक्षित उमेदवारांसाठी अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या संस्था शासनातर्फे काम करत आहेत.

 मित्रांनो, ही स्वप्ने पाहतांना मला अपयश येईल का ही भीती प्रत्येकाच्या मनात असते. परंतु त्या भीतीवर प्रयत्न करून विजय मिळविणे आवश्यक आहे. या भीतीने अनेक मुले मुली खचून जाऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलताना दिसतात. मित्रांनो, अपयशावर मात करणे हाच पुरुषार्थ आहे व त्यासाठी तुमचं आत्मबळ प्रखर असणे आवश्यक आहे. निराशा, भीती ह्याच्यावर मात करायची असल्यास रोज देवाची प्रार्थना करा, चांगला व्यायाम करा. वेळेचे चांगले नियोजन करा, योग्य वेळेस घरचे चांगले जेवण जेवा व किमान 6 ते 7 तास शांत झोपा त्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहील, मन शांत राहील एकाग्रता वाढेल  व येणार्‍या कोणत्याही अडचणीवर, अपयशावर तुम्ही सहजपणे मात करू शकाल. मित्रांनो,

सुवर्णपुष्पितां पृथ्वीं विचिन्वन्ति त्रयो जनाः

शूरश्च कृतविद्यश्च, यश्च जानाति सेवितुम् ।।

 म्हणजे सोन्याने मढलेली ही पृथ्वी तीन प्रकारच्या व्यक्ती उपभोगू शकतात. हे तीन जणं म्हणजे, जो शूर आहे, सुविद्य आहे व जो सेवा करू शकतो. हे करत असताना प्रयत्नपूर्वक काही धोक्यांना टाळणे आवश्यक आहे. जसे नशा आणणारे आमली पदार्थ, दारू, सिगारेट, —इत्यादि. ही व्यसने अशी आहेत की जी मित्रांमुळे, निराशेमुळे, गम्मत म्हणून एखाद्या व्यक्तीने अंगिकारली तरीही त्यातून त्यांची कधी सुटका होणार नाही. व्यसनाांचा शेवट एकच आहे आणि तो म्हणजे स्वतःचा पूर्ण विनाश!

 मित्रांनो, यौवनं धनसम्पत्तिः प्रभुत्त्वं अविवेकिता।

एकैकं अपि अनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ।।

म्हणजे तरूणपण, धनदौलत, अधिकार आणि सारासार विचाराचा अभाव ह्यातील एक गोष्टही व्यक्तीचा नाश करते, जिथे चारही गोष्टी एकत्र येतील तेथे नाशही विजेच्या वेगाने होत असतो. पोर्शे गाडी अपघातासारखी प्रकरणे सध्या सर्वत्र गाजत आहेत. व्यसनाधिनता, तारुण्य व अविवेकिता ह्यांचे हे बळी आहेत. 18 वर्षाचे होईपर्यंत वाहन चालवण्याचा मोह टाळा. विरुद्ध दिशेने प्रवास करू नका. हेल्मेट वापरा अन्यथा भारतात दरवर्षी 2 लाख व्यक्तींचा जीव जातो. त्यापैकी तुम्हीही एक असू शकता.

बालमित्रांनो, प्राचीन भारतात गुरुकुलातील अभ्यास संपल्यानंतर गुरू विद्यार्थ्यांना जो उपदेश करीत तो तैत्तिरीय उपनिषदाच्या शिक्षावल्लीच्या 11 व्या अनुवाकामध्ये दिला आहे त्याचे सुरवातीचे दोन मंत्र खालीलप्रमाणे आहेतः

सत्यं वद। धर्मं चर। स्वाध्यायान्माप्रमदः । सत्यान्नप्रमदितव्यम्। धर्मान्नप्रमदितव्यम्। कुशलान्नप्रमदितव्यम्। स्वाध्यायप्रवचनाभ्यां न प्रमदितव्यम्।

त्याचा अर्थ असा, खरेपणाने वागण्यात चूक करू नकोस. धर्माच्या विपरीत म्हणजे नियमांविरुद्ध वागू नकोस. कौशल्ये वाढत राहतील ह्याची खात्री कर. ऐश्वर्य प्राप्त करू देणार्‍या मंगल कामांना सोडू नकोस. स्वाध्याय आणि प्रवचन ह्याची हेळसांड करू नकोस. शेवटी गुरू सांगतात, – ‘‘यानि अस्माकं सुचरितानि । तानि त्वया उपास्यानि’’ आमचे जे जे चांगले अनुकरणीय आचरण आहे त्यांची तू उपासना कर. बाकीच्याची नको. 

मित्रांनो, तुमच्या उत्कृष्ट प्रयत्नांनी, तुमच्या पालकांना, शिक्षकांना, शाळेला व देशाला अभिमान वाटेल अ‍से यश संपादन करा. तुमच्यापैकी प्रत्येकाला मनःपूर्वक शुभेच्छा!

***************   ************   **************

 

Articles

नवीन गुन्हेगारी कायद्याने काय साध्य होईल?

By on July 2, 2024

नव्या फौजदारी कायद्यांनी काय साधणार?

मुंबई तरुण भारत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच ‘भारतीय न्याय संहिता (द्वितीय सुधारणा) (एनबीएस-२०२३)’, ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (द्वितीय सुधारणा) (बीएनएसएस- २०२३)’ व ‘भारतीय साक्ष्य (द्वितीय सुधारणा) (बीएस-२०२३)’ अशी तीन विधेयके लोकसभेत सादर केली आणि ती एकमताने मंजूरही झाली आहेत. राष्ट्रपतींनी या विधेयकांना मंजुरीही दिली आहे. त्यामुळे ‘इंडियन पिनल कोड (आयपीसी)’, ‘क्रिमिनल प्रोसिजर कोड (सीआरपीसी)’ आणि ‘इंडियन एव्हिडन्स अ‍ॅक्ट’ हे तीनही कायदे आता रद्द झालेले आहेत. त्याऐवजी गेल्या आठ ते दहा हजार वर्षांपासून जपलेल्या भारतीय तत्वज्ञानाचा आणि भारतीय दार्शनिकांनी मांडलेल्या विचारांचा साकल्याने विचार करुन आजच्या काळामध्ये सुसंगत ठरतील, असे नवीन कायदे बनवण्यात आलेले आहेत.

https://www.mahamtb.com/Encyc/2024/6/29/new-criminal-acts-implement.html