Author:

Praveen Dixit

Articles

दामदुप्पटच्या नावाखाली फसवणुक

By on July 27, 2023

दामदुप्पटच्या नावाखाली फसवणुक –

प्रवीण दीक्षित.

निवृत्त पोलीस महासंचालक.

आर्थिक गुन्ह्यांमधे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे हे सर्वात जास्त प्रमाणात होतात. ह्या गुन्ह्यांची सर्वसाधारण पद्धत अशी असते की एखादी अपरिचित व्यक्ती महत्त्वाच्या ठिकाणी जागा भाड्याने घेते व जाहिरात करते की तुम्ही जेवढी रक्कम त्याच्या योजनेत गुंतवाल तेवढ्या रकमेवर बँकेतील ठेवलेल्या मुदतीच्या ठेव्यांच्या दरापेक्षा जवळ जवळ दुप्पट दर असेल. त्याशिवाय तुम्हाला घरगुती वापराची महागडी उपकरणे नगण्य किमतीत घरपोच मिळतील. सुरवातीला दोनतीन महिने ही व्यक्ती सांगितल्याप्रमाणे व्याज देते व तुमचा विश्वास संपादन केल्यावर तुमच्यामार्फत अन्य व्यक्तींनाही पैसे गुंतवणुक करण्याचे आवाहन करते. जेवढ्या अधिक व्यक्तींकडून तुम्ही रक्कम आणाल त्यातील काही टक्के तुम्हाला बक्षीस म्हणून दिले जातात. काही व्यक्तींना मिक्सर, मायक्रोवेव्ह, घरगुती वापराचे डबे इत्यादि साहित्यही दिले जाते. आठ ते नऊ महिन्यानंतर दर महिन्याला मिळणारे व्याज मिळेनासे होते. तक्रार केल्यास ठेवी स्वीकारणारी व्यक्ती भेटायला टाळाटाळ करते. फोन स्वीकारत नाही.


वर्षभरात ही व्यक्ती एकदिवस अचानक नाहिशी होते व भाड्याने घेतलेली जागा रिकामी झालेली असते. आर्थिक फसवणुक करणारी व्यक्ती तो पर्यंत परदेशात गेलेली असते व जातांना अनेकांनी ठेवलेल्या मोठमोठ्या रकमा गायब झालेल्या असतात. त्यानंतर आपण फसवले गेलो आहोत हे लक्षात आले की असे लोक पोलीसांकडे तक्रार करतात. तो पर्यंत मधे बराच काळ गेलेला असतो. पोलीसांच्या प्रयत्नांनी फसवणूक करणारी व्यक्ती देशात अथवा देशाबाहेर पकडली गेलीच तरीही लोकांनी ठेवलेल्या रकमा परत मिळणे दुरापास्त होऊन बसते. ही होणारी फसवणूक ponzi schems नावाने प्रसिद्ध आहे.

 

हे फसवणुकीचे प्रकार जास्त करून निवृत्त झालेल्या व्यक्तींचा मोठ्याप्रमाणावर बळी घेतात. कमी वेळात रक्कम दुप्पट होईल, मित्राने, ओळखीच्या माणसाने पैसे ठेवायला सांगितले त्यामुळे विशेष विचारपूस न करता अशा व्यक्ती आयुष्यभराची ठेव त्या माणसाच्या जवळ बिनधास्तपणे देत असतात. जेवढे आर्थिक मागासपण जास्त तेवढे तेथील व्यक्तींना फसवण्यात ह्या अपराधी व्यक्ती तरबेज असतात.

 

अशा प्रकारे एकाचवेळी अनेक जिल्ह्यात, अनेक राज्यात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे वारंवार उघडकीस येत असल्याने प्रत्येक पोलीस आयुक्तालयात आर्थिक गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एक पोलीस उपायुक्त नेमलेला आहे. फार मोठ्या रकमेची अफरातफर असेल तर त्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍याकडे आर्थिक गुन्ह्याच्या तपासाचे काम दिले आहे. अपराधी व्यक्ती पकडल्यानंतर त्याच्याकडील रकमेतून त्याने काही स्थावर मालमत्ता केली असल्यास ती जप्त करून येणार्‍या पैशातून पीडित व्यक्तींना ही रक्कम परत देण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या व्यक्तीची नेमणुक केलेली आहे. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमधे न्यालयाकडून शिक्षा होण्यापेक्षा पीडित व्यक्तीस गेलेली रक्कम परत मिळणे जास्त महत्त्वाचे असते.

 

शासनातर्फे जरी वरी व्यवस्था राबवलेली असली तरीही कष्टाने मिळवलेले पैसे अशाप्रकारे दामदुप्पट करण्याच्या मिषाने किंवा अन्य कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता त्यापासून दूर राहणे हे शहाणपणाचे आहे. भारत सरकारतर्फे व रिझर्व बँकेनेही अशा अपराधी व्यक्तींविरुद्ध कडक तरतुदी केल्या आहेत. परंतु तरीही अशा प्रकारे फसवणारे व त्यांच्या भूलथापांना बळी पडणारे लोक ठिकठिकाणी वारंवार नजरेस येत असतात. आर्थिक सुशिक्षितता, सावधानता बाळगून, शासनमान्य शेड्यल्ड बँका, शेअरमार्केट, म्युचुअल फंड ह्याठिकाणी रक्कम गुंतवणेच योग्य आहे. अथवा पैसे गेल्याचे दुःख करण्यापलीकडे हातात काही उरत नाही.

————————————-

Articles

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ

By on July 22, 2023

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ
राष्ट्रीय रौप्य महोत्सवी परिषद
12-13/11/2022 वडोदरा

प्रवीण दीक्षित
माजी पोलीस माहासंचालक, महाराष्ट्र

अखिल देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ मुंबई व वडोदरा
यांच्या संयुक्त विद्यमाने आज ही राष्ट्रीय रौप्य महोत्सवी परिषद सम्पन्न होत
आहे; त्यासाठी सर्व आयोजकांचे हार्दिक अभिनंदन. आजच्या ह्या परिषदेत माझी
सुविद्य पत्नी व मी आम्हाला ह्या परिषदेत उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध
करून दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो व उत्कृष्ट नियोजनाबद्दल
सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो.

स्वातंत्र्यपूर्वकाळामधे आपल्या समाजातील अनेक नामवंत व्यक्तींनी
राजकीय, आर्थिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांमधे बहुमोल कामगिरी करून,
केवळ आपल्या जातीबांधवांनाच नव्हे तर जातीची बंधने ओलांडून देशातील सर्व
समाजाला फार मोठे मार्गदर्शन केले होते. दुर्देवाने गांधीहत्येनंतर विनाकारण
ब्राह्मण समाजातील शेकडो कुटुंबांना आपल्या घराची व सम्पत्तीची राखरांगोळी
होतांना पहावे लागले; त्यामुळे प्रसिद्ध कादंबरीकार व आनंदीगोपाळचे लेखक श्री.
ज. जोशी ह्यांनी म्हटल्याप्रमाणे सर्व ब्राह्मण समाज हा स्वयंकेंद्री झाला व
त्याने अन्य समाजातील लोकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे सोडून दिले. ह्याचा
परिणाम म्हणून समाजातील हजारो तरूण तरूणी देश सोडून इतर राष्ट्रांमधे गेले
व तिथे त्यांनी स्वतःचे अत्युच्च यशाचे शिखर पादाक्रांत केले. ब्राह्मणांवरील
शारीरिक हल्ले जरी आता फारसे होत नसले तरीही त्यांना नावे ठेवायचे,

शाब्दिक टोमणे मारायचे आणि विनाकारण त्यांची निंदानालस्ती करायची हा
स्वतःला नेते म्हणविणार्‍या अनेक व्यक्तींचा गेली अनेक दशके लाडका उद्योग
आहे. अन्य वर्णीयांना सतत ब्राह्मणांविरुद्ध खरे खोटे सांगत राहून ब्राह्मणांनी
आमच्यावर अत्याचार केले अशी आवई कोणत्याही पुराव्यांशिवाय उठवत राहणे
ह्याच्यामधेच त्यांना आनंद मिळत असतो. दुर्दैवाने ह्यामागे भारत तोडो हा
परकीय शक्तींचा कुटिल डाव आहे व त्याला काही लोक बळी पडत आहेत.
परंतु ह्या सतत होणार्‍या उपेक्षेने किंवा ब्राह्मणांना होणार्‍या सर्व
प्रकारच्या विरोधाला किंवा पारंपारिक व्यवसायाला खीळ बसल्याने प्रचंड गरीबीला
न घाबरता ब्राह्मण समाजाने आपली मूल्यांवरील श्रद्धा ही सतत मनःपूर्वक
जपली आहे. मिळेल त्या विषयाचा सखोल अभ्यास करणे, त्यातही आपली भाषा,
संस्कृती, परंपरा आणि विचार जपणे आणि वाढवत राहणे, कोणतेही काम हे
हलके किंवा निषिद्ध न समजता प्रामाणिकपणे कौशल्याने, सचोटीने करत राहणे
ही ती मूल्ये आहेत. त्यात महिला असोत वा पुरूष; मुले असोत वा वृद्ध,
स्वतःचा स्वाभिमान राखून, एकमेकांना मदत करून परंतु कोणाकडेही तोंड न
वेंगाडता कुठल्याही प्रकारे गुन्हेगारीच्या मार्गाला न जाता, फसवाफसवी न करता
ब्राह्मण समाज वाटचाल करत आला आहे व ती अव्याहत चालू आहे. कोणत्याही
प्रकारे आरक्षणाचा फायदा न घेताही किंवा शिष्यवृत्या न मिळताही
ब्राह्मणसमाजातील अनेक मुले, मुली यांनी मोठमोठ्या पदव्या मिळवल्या आहेत
व ज्ञानसमृद्धी केली आहे. आजही ब्राह्मण समाजातील काही व्यक्ती अत्युच्च
पदी पोचलेल्या असल्या तरी आपले हजारो जातीबांधव हे निम्न मध्यमवर्गीय
ह्या स्तरात मोडतात व त्यांच्यासाठी यशाच्या संधी अजून उपलब्ध व्हायच्या
आहेत. ही मुले मुली आम्हाला मदत करा असे म्हणणार नाहीत तरीही जे
आपल्या व्यवसायात यशस्वी झाले आहेत त्यांनी आपल्या यशाची गुरुकिल्ली
ह्या मुलांसाठी उघड करणे आवश्यक आहे. भारत सरकार तसेच महाराष्ट्र
सरकार ह्यातल्या अनेक विभागांमधे दरवर्षी हजारो व्यक्तींची स्पर्धा परीक्षा
घेऊन भरती केली जाते. ह्या संबंधीची माहिती आज आंतर्जालाच्या मार्फत
सर्वांना आपल्या टिचकीवर उपलब्ध आहे. केवळ भारत सरकारचाच विचार केला

तर, सीमासुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल हया सारख्या सहा केंद्रीय
सशस्त्र पोलिस दलांनी मागील पाच वर्षात दोन लाख लोकांना रोजगार दिला
आहे. ह्या शिवाय येणार्‍या 18 महिन्यात 10 लाख युवकांना रोजगार देण्याचा
मोदी शासनाने निश्चय केला आहे. महाराष्ट्रातही 75 हजार युवकांना लवकरच
रोजगार देणार असल्याचे महाराष्ट्राचे नेते व ब्राह्मण असलेल्या देवेंद्र फडणवीस
ह्यांनी जाहीर केले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही रोजगार व शिक्षण ह्यात
आर्थिक मागास व अन्य कोठलेही आरक्षण नसलेल्या अशा गरिबांसाठी 10%
आरक्षण घटनेस अनुसरून आहे असा ऐतिहासिक निकाल दिला आहे. त्याचा
फायदा घेण्यासाठी युवकांनी पुढे यावे. महाराष्ट्र सरकारने अमृत अर्थात महाराष्ट्र
संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी संस्था हयाला मान्यता दिली आहे. परंतु
अद्याप त्याची कार्यवाही सुरू झाली नाही. ती तातडीने राबविण्याची आवश्यकता
आहे. ह्या संस्थेमार्फत ब्राह्मण समाजासह खुल्या प्रवर्गातील 96 जातींच्या
आार्थिक आणि शैक्षणिक प्रगीसाठी अमृतची स्थापना करण्यात आली आहे. असे
परशुराम सेवा संघचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ देशपांडे ह्यांनी सांगितले आहे.

सनदी सेवांसाठी तरूण विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शनाची `स्वातंत्र्यवीर
सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर’ येथे सर्व प्रकारची तयारी करून घेतली जाते.
आवश्यक त्या विषयांच्या टिप्पणी, प्राथमिक परीक्षा, लेखी परीक्षा, मौखिक
परीक्षा ह्यांची तज्ज्ञांकडू तयारी करून घेतली जाते. महेश कुलकर्णी हे वरील
काम निष्ठेने करीत आहेत. अशाच प्रकारच्या संस्था अन्य अनेक शहरांमधेही
निःशुल्कपणे वर्षानुवर्षे करीत आहेत, व्यवसायातही आज अनेक संधी उपलब्ध
आहेत. त्याचा आपण फायदा घेला पाहिजे.

माझ्या वडिलांची मी शाळेत असतांनाच डोळ्यांनी दिसत नाही ह्या
कारणासाठी नोकरी गेली. पण तरीही शाळेचे शिक्षण मी विशेष प्राविण्याने उत्तीर्ण
झालो. महाविद्यालयात व विश्वविद्यालयात गुणांमुळे नादारी मिळाली व पुणे
विद्यापीठ येथून पदवी, School Of International Studies JNU येथून
पदव्युत्तर अभ्यासक्रम मी पूर्ण केला. भारतीय पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर

रोटरी क्लबतर्फे अमेरिकेतील Duke विद्यापीठातील School of Public Policy
येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाली.

तुम्ही जर प्रामाणिकपणे मन लावून अभ्यास केला असेल तर अनेक
संधी तुम्हाला शोधत येतात व त्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता हे अधोरेखित
करण्यासाठी मी हे उदाहरण सांगत आहे.तरूणांनी मिळणार्‍या प्रत्येक संधीचा
आह्वान समजून स्वीकार करावा. येणार्‍या अडचणींवर मात करावी व
आायुष्यात यशस्वी व्हावे ही माझी व सर्व ब्राह्मण समाजाची कळकळीची इच्छा
आाहे. सर्वांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो.

—————— ——————– ——————-
संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी खालील लिंकला भेट द्यावी-
Day 1 proceedings on Nov 12 ,202
https://youtu.be/5LVQ5aLHRUs
Day 2 proceedings on Nov 13, 2022
https://youtu.be/DjQSSqDgmK0

Articles

परिपक्व राजकारणी

By on July 19, 2023

परिपक्व राजकारणी

प्रवीण दीक्षित

(निवृत्त पोलीस महासंचालक)

एकेकाळी महाराष्ट्रट, प्रशासनाच्या बाबतीत प्रगत राज्य म्हणून ओळखले जात असे. परंतु 2014 पूर्वीच्या दशकात महाराष्ट्रात आघाडीचे शासन सुरू झाले. हया काळात मुख्यमंत्री एका पक्षाचे तर गृहमंत्री दुसर्‍या पक्षाचे; त्यामुळे होणार्‍या निर्णायकी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत नाजुक बनली. जगातील सर्वात भीषण असा दहशतवादी हल्ला मुंबईवर झाला. समुद्रमार्गे दहशतवादी मुंबईत घुसले व त्यांनी तीन दिवस भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा सर्व व्यवहार ठप्प केला. शेकडो निरपराध व्यक्तींचे बळी घेतले. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना ह्या हल्ल्यात हुतात्मा व्हावे लागले. ह्या हल्ल्यानंतर असेच अनेक दहशतवादी हल्ले, शस्रास्त्रांची खुलेपणाने वाहतुक, मादक पदार्थांचा मोठा व्यापार, गुन्हेगारांचे पोलिसांवरील वर्चस्व, कोणत्याही गुन्हेगारांना शिक्षा न होणे हे प्रकार सर्रास सुरू झाले. केंद्राप्रमाणेच राज्यातील भ्रष्टाचार एवढाा वाढला की त्यामधे शासनाचा एकही विभाग, एकही जिल्हा मोकळा राहिला नाही. त्यामुळे सामान्य माणूस जिकीरीला येऊन महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे का? अ‍से वैतागाने विचारू लागला.

ह्या पार्श्वभूमीवर 2014 मधे राज्यात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देवेद्र फडणवीस ह्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली. मुख्यमंत्री होताच फडणवीस ह्यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री ही दोन्ही पदे स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. गृहमंत्री म्हणून त्यांनी जाहीर केले, की पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या व नेमणूका ह्याचे पूर्ण अधिकार महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख असणार्‍या पोलीस महासंचालाकांना देत आहे.  त्यामुळे विविध राजकारण्यांची मदत घेऊन भ्रष्ट पोलीस अधिकारी हव्या त्या ठिकाणी नेमणूक करून घेण्याला खीळ बसली. पोलीस अधिकारी व कर्मचारी ह्यांचे मनोबल वाढण्याला मदत झाली. पोलीस अधिकारी व कर्मचारी ह्यांच्या भरतीत पारदर्शीपणा आणून भ्रष्ट आधिकार्‍यांना व कर्मचारय़ांना पोलीसात पोचायचे दरवाजे बंद झाले.

दहशतवादामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांमधे अपप्रकार रोखण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक CCTV यंत्रणा लावण्याचे अधिकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले. त्यामुळे अवघ्या काही महिन्यातच ह्या सर्व महानगरातील सुरक्षा व्यवस्था बळकट होण्यास मदत झाली. तसेच पोलीसांच्या संरक्षणासाठी बुलेटप्रुफ जॅकेट्स घेण्याचा निर्णय करण्यात आला. ह्यामुळे पोलीस अधिकार्‍यांमधे सुसज्जता आली.

नक्षलवाद्यांच्या कारवाया महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या गडचिरोली, गोंदिया ह्या भागात थैमान घालत होत्या. ह्या जिल्ह्यातील भ्रष्टाचारी राजकारणी, लोकोपयोगी कल्याणकारी योजना वंचित, शोषित, पीडित अशा वनवासी जनतेपर्यंत पोचू देत नव्हते. त्यामुळे नक्षलवाद्यांचा जोर वाढत होता. रस्ते, शिक्षण, आरोग्य, दळणवळण संबधी सर्व योजना ठप्प झाल्या होत्या. पोलिसांकडे प्रभावी शस्त्रांचा अभाव, बॉंम्ब्स पासून संरक्षण देणार्‍या वाहनांचा अभाव, पोलीस अधिकारी व कर्मचारी ह्यांच्या कामात अडथळा आणणार्‍या बाबी दूर करण्यासाठी प्रशासनाचे पूर्णपणे असंवेदनशील धोरण त्यामुळे महाराष्ट्रातून कधी नक्षलवाद संपेल का? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात भर म्हणून शहरी नक्षलवादी, सुशिक्षित अशा प्रतिष्ठित व्यक्तींच्या माध्यमातून ह्या असंतोषात वाढ करीत होते. फडणवीस ह्यांनी गृहमंत्री झाल्यावर पोलीसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पोलीसांना पुरेशी प्रभावी शस्त्रास्त्रे, अन्य सामुग्री व धाडसी प्रशासकीय निर्णय घेतले. त्यामुळे गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 70 ते 75 पोलिस कर्मचारी शहीद होण्याऐवजी 40 नक्षलवादी पोलीसांच्या कारवाईत ठार झाले. अनेक प्रमुख नक्षल नेते धारातीर्थी पडले. इतर अनेक शरण आले. त्याच बरोबर सामान्य जनतेची उपेक्षा संपून तरुणांना रोजगार, व्यावसायिक प्रशिक्षण, आरोग्य सुविधा, शालेय मुलींना सायकली अशी अनेक कामे होऊ लागली; त्यामुळे नक्षल कारवायांना प्रतिबंध होऊन विकासाची कामे होऊ लागली. माओवादाच्या नावाखाली नक्षल व्यक्ती आंबेडकरवादी चळवळीचा गैरवापर करत होते. हा त्यांचा कपटी डाव उलथून पाडण्यात आला.

धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न चालू होते. “भारत तोडो’’ ह्या मोहिमेचाच तो भाग होता. परंतु समाजातील सर्व घटकांच्या न्याय्य मागण्यांबाबत संवेदनशील राहून पंतप्रधान मोदी ह्यांचा “सबका साथ सबका विकास’’ ही घोषणा फडणवीस ह्यांनी प्रत्यक्षात आणली. “पोलीस मित्र’’ ही संकल्पना रुजवून महाराष्ट्रातील सामान्य जनतेला समाजघातक कारवायांविरोधी प्रयत्नांमधे हातभार लावायला फडणवीस ह्यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे महिलांविरुद्ध होणारे गुन्हे, अनुसूचित जाती जमातींवर होणारे अत्याचार ह्यात मोठ्या प्रमाणात घट झाली.

विकासासाठी शहरांची होणारी वाढ लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवीन पोलीस आयुक्तालये सुरू करावीत अशी मागणी बरीच वर्षे  होत होती. ह्याचे गांभीर्य ओळखून मिराभाईंदर तसेच पिंपरी चिंचवड ह्या ठिकाणी नवीन पोलीस आयुक्तालये सुरू करण्यात आली. अतिरिक्त पोलीस महासंचालक ह्यांच्या नेतत्त्वाखाली समाजविरोधी गटांवर कारवाई होऊ लागल्याने त्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था निर्माण होण्यास मदत झाली.

पूर्वी पोलीस अधिकार्‍यांची वार्षिक गुन्हेविरोधी परिषद ही गृहमंत्र्यांच्या उपस्थितीशिवाय पार पडत असे. परंतु केंद्रात पोलीस महासंचालक ह्यांच्या वार्षिक परिषदेस पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याची प्रथा अमलात आली होती. ह्याचे अनुकरण करून महाराष्ट्रातही पोलीस अधिकार्‍यांच्या परिषदेस फडणवीस ह्यांनी पूर्णवेळ उपस्थित राहण्याचे मान्य केले. त्यामुळे ही परिषद म्हणजे औपचारिकता न राहता त्यात दहशतवाद विरोध, नक्षलवाद विरोध, सायबर व आर्थिक सुरक्षा, महिला सुरक्षा अशा अनेक बाबींवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्याचा परिणाम होऊन जनसामान्यांचा शासनावरील विश्वास दृढ झाला.

गुन्हेगारांना न्यायालयाकडून शिक्षा होणे हाच गुन्हेगारीस प्रतिबंध करण्याचा प्रभावी उपाय आहे हे लक्षात घेऊन गुन्हे शाबीत होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी पोलीस तपासात अत्याधुनिक तंत्रज्ञानानाचा वापर करणा्यावर फडणवीस हयांनी भर दिला. CCTNS प्रणााली यशस्वीपणे राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य झाले. न्यायवैद्यक संस्था मजबूत करण्यात आल्या. तुरुंग विभागात तुरुंगातून चालणार्‍या अवैध प्रकारांना प्रतिबंध करण्यात आले.

वरील धाडसी व धडाडीचे निर्णय हे केवळ फडणवीस हे एक परिपक्व राजकारणी असल्यामुळेच शक्य झाले. पोलीस अधिकार्‍यांच्या चांगल्या हेतूने घेतलेल्या निर्णयांमागे फडणवीस खंबीरपणे उभे रहायचे धाडस दाखवत असत. दिवसभर काम करून रात्री दोन वाजे पर्यंत काम करायचे व आलेल्या प्रत्येक संदेशाला त्वरीत उत्तर द्यायचे हा फडणवीस ह्यांच्यातील विशेष गुण आहे. जनसामान्यांचे प्रश्न संवेदनाशीलपणे हाताळणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था उत्तम राखून विकासाला चालना देणार्‍या देवेंद्र फडणवीस ह्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्व शुभेच्छा!

———————————   ——————————

 

 

Articles

सार्वजनिक लोकोपयोगी कामे करताना घ्यायची काळजी

By on June 21, 2023

सार्वजनिक लोकोपयोगी कामे करताना घ्यायची काळजीः

प्रवीण दीक्षित.

(निवृत्त पोलीस महासंचालक)

21/6/2023

रोटरी क्लब पुणे लक्ष्मी रोड तर्फे आयोजित आजच्या कार्यक्रमात श्री अजेय चौगुले अध्यक्षपदाची पुढील वर्षासाठी जबाबदारी सांभाळत असताना मी आणि माझी पत्नी ह्यांना त्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होता आले ह्याचा आम्हाला अत्यंत अभिमान व आनंद आहे. येणार्‍या वर्षात अजेय ह्यांच्या नेतृत्त्वाखाली आपण ठरवलेली लोकोपयोगी कामे यशसवी होवोत अशी शुभेच्छा मी अजेय व त्यांचे सहकारी ह्यांना सुरवातीलाच देऊ इच्छितो.

आज हया कार्यक्रमामधे अत्यंत प्रतिष्ठित अशा “Rotary Vocational Excellence” Award ने सन्मानित डॉ. उमेश शाळिग्राम ह्यांचे मी कृतज्ञतापूर्व हार्दिक अभिनंदन करतो. डॉ. शाळिग्राम व त्यांच्या सहकार्यांनी COVISHIELD ही लस उपलब्ध करून भारत तसेच जवळ जवळ 150 देशातील कोट्यवधी लोकांना COVID 19 च्या महामारीतून यशस्वीपणे वाचविण्यासाठी फार मोठी मदत केली आहे. हे सर्व लोक त्याबद्दल डॉ. शाळिग्राम व त्यांच्या सहकार्‍यांचे ऋणी राहतील. जागतिक स्तरावर एवढी मोठी कामगिरी करणारी व्यक्ती ही आज आपल्यामधे उपस्थित आहे ह्याचा अत्यंत अभिमान वाटत आहे. पुण्यातील व्यक्तींनी सबंध भारताला अनेक वेळेला नेतृत्त्व दिले आहे. त्या सर्व महान विभूतींमधे डॉ. शाळिग्राम ह्यांनी एक महत्त्वाचा आयाम जोडलेला आहे. सामान्य माणसाला आरोग्यदायी जीवन देण्याच्या डॉ. शाळिग्राम ह्यांच्या नेतृत्त्वाखालील सर्व चमूला आपल्या सर्वांतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!

रोटरी क्लब लक्ष्मीरोड पुणे ह्यांनी अनेक लोकोपयोगी कामे आजपर्यंत यशस्वीपणे पार पाडलेली आहेत. जशी – पाणीपुरवठ्याच्या योजना, शौचालये बांधणे, शाळेमधे बाक देणे, अनाथ मुलांसाठी वसतिगृह बांधणे, वंचित वर्गातील व्यक्तिंसाठी आरोग्य, शिक्षण, पर्यावरण योजना राबविणे…. इत्यादि. अन्य ठिकाणच्या रोटरी सदस्यांनीही अनेक लोकोपयोगी कामे वर्षानुवर्षे उत्कृष्टपणे पार पाडलेली आहेत व समाजामधे नाव कमावले आहे. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात सुरक्षा सल्लागार म्हणून काम करत असताना पुण्यातील ससून हॉस्पिटलमधे भेट देण्यासाठी म्हणून मी गेलो असताना तेथे अनेक ग्रामीण वृद्ध स्त्री पुरुष येत असताना पाहले होते. त्यातील अनेक जणांना आपल्या आधीच्या भेटीचे कागद बरोबर आणण्याचे सुद्धा लक्षात येत नसे. त्यासाठी रोटरी क्लबने OPD Software तेथे लावण्याची सोय केली होती, त्यामुळे आलेल्या रुग्णाने आपले नाव सांगितले किंवा आपल्या अंगठ्याचा ठसा दिला की त्याचा पूर्वीचा आरोग्य इतिहास त्वरित उपलब्ध होत असे व वेळेची बचत होत असे.

नक्षलवादाच्या प्रभावाने गडचिरोलीतील दुर्गम भागांमधे आरोग्य, शिक्षण ह्या सुविधा मिळणे आजही अवघड आहे. अशावेळी मुंबईतील माझ्या मित्रांनी जे रोटरी क्लबचे सदस्य आहेत, त्यांनी उदारहस्ते लाखो रुपये देणगी देऊन वृद्ध स्त्री, पुरुष अशा आठशेहून अधिक व्यक्तिंच्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यास मदत केली आहे. दुर्गम भागात आरोग्यासाठी तपासणी करणे, गरजू व्यक्तींना सुसज्ज अशा रुग्णालयात नातेवाइकाबरोबर नेणे व परत आणणे आणि शस्त्रक्रिये नंतरही जरुरीची औषधे पुरविणे अशी ही योजना आहे. दृष्टी प्राप्त झाल्यानंतर ह्या व्यक्तिंच्या चेहर्‍यावर उमटणारा आनंद तुम्हालाही एक वेगळाच आनंद देऊन जातो.

ह्याच आठवड्यात मुंबईतील रोटरी सदस्याने दिलेल्या उदार देणगीमुळे गडचिरोलितील अति दुर्गम व नक्षलपीडित अशा भागातील मुलींना शाळा दूर असल्यामुळे शाळा सोडायला लागू नये म्हणून 150 सायकली देण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे शाळा सोडून नक्षल चळवळीत सामिल होण्यापासून ह्या मुली वाचणार आहेत व समाजामध्ये शांतता नांदणार आहे. तरुण आदिवासी मुले व मुली ह्यांची वेळोवेळी लग्ने लावणे व त्यांना संसारोपयोगी वस्तू भेट देणे हा कार्यक्रम नियमित चालू आहे. मुलांसाठी आज प्रत्येक पोलीस ठाण्यात गोष्टीच्या पुस्तकांचे ग्रंथालय बनवण्यात आले आहे व मुले त्याचा फायदा घेत आहेत. दिवाळीच्या वेळी नवी मुंबईच्या मित्रांनी ट्रक भरून दिलेले संसारोपयोगी भांडी, फराळाचे पदार्थ, साड्या, धोतरे, गडचिरोलीतील गरजूंना दिले आहेत.

कोविड 19 च्या महामारीत, पुण्यातील भोर, पुरंदर येथील वृद्धाश्रमांसाठीही रोटरी सदस्याने भरघोस देणगी देऊन तेथील गरजूंना मोठी मदत केलेली आहे.

पुण्यातील येरवडास्थित   Regional Mental Hospital येथे रुग्णांसाठी 200 नवीन पलंग व गाद्यांची गरज होती. नुकतेच पुण्यातील माझे मित्र ह्यानी उदारपणे त्यातील 100 पलंग व गाद्या तिथे उपलब्ध करून दिल्या आहेत. RMH ला अजून 100 पलंग व गाद्यांची आवश्यकता आहे व मानसीक रुग्णांसाठी आपण ती मदत करावी अशी मी विनंती करतो.

सार्वजनिक लोकोपयोगी कामे करताना शासकीय विभाग आणि स्वयंसेवी संस्था ह्यांनी एकत्र येऊन कोणतेही काम केल्यास ते काम यशस्वीपणे पार पाडता येते. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे रोटरी इंटरनॅशनलने पोलिओ निर्मूलन ह्यासाठी केलेले अथक परिश्रम हे होय. रोटरी व अन्य आरोग्य अधिकारी, कर्मचारी ह्यांच्या प्रयत्नांमुळे आज पोलिओचे जगातील सर्व भागातून निर्मूलन झाले आहे. शासकीय विभागात नेहमीच निधीची चणचण भासत असते त्यामुळे स्वयंसेवी संस्थांनी उदारहस्ते मदत केल्यास लोकांच्या अडचणी कमी होऊ शकतात ह्याची अनेक उदाहरणे आहेत. लोकोपयोगी कामे करत असताना काही गोष्टी जरुर लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जसे- लाभार्थी कोण असावेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या साठी महिला केंद्रित लोकोपयोगी कामे केल्याने एक महिलाच नव्हे तर तिचे संपूर्ण कुटुंबही प्रगती करते. लोकोपयोगी कामे करताना जर दुर्गम भागातील वनवासी ह्यांना प्राधान्य दिले तर ह्या लोकांचा शहरांकडे येणारा ओघ थोडा कमी होऊ शकतो. शहरात येऊन शहरात राहण्याची कौशल्ये लवकर स्वीकारता न आल्याने येणार्‍याा बाहेरच्या लोकांमधील अनेकजण वाममार्गाला लागण्याची शक्यता असते. सार्वजनिक लोकोपयोगी केलेली कामे ही केवळ देणगीच्या बळावर चालू राहणे अवघड असते, त्यामुळे ज्यांना मदत केलेली असेल त्यांच्याध्ये कौशल्ये निर्माण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणे ह्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. लोकोपयोगी कामांना मदत देणार्‍या दानशूर व्यक्तिंचा शोध घेणे, कर्मचार्यांना प्रशिक्षण देणे, ज्यांना मदत केली असेल त्यांच्या प्रगतीचा आलेख वारंवार तपासणे आणि त्यासाठी मदत देणे, ह्यासाठी आधुनिक सॉफ्टवेअर वापरणे आवश्यक आहे. दानशूर व्यक्तिंशी संपर्क ठेऊन केलेल्या कामाची प्रगती त्यांना वारंवार कळविणे जरुरीचे आहे. ही कामे करत असताना कामे यशस्वी कशी झाली ह्या संबंधीची नोंद ठेवणे व नवीन सदस्यांना त्याबद्दल परिचित करणे उपयोगी ठरते.

शासनातर्फे संचालक समाज कल्याण विभाग हे वंचित, पीडित, शोषित अशा विविध घटकांसाठी नवनवीन योजना राबवत असतात. सुदैवाने हे कार्यालय पुण्यात उपलब्ध आहे. त्यामुळे संचालक समाजकल्याण, संचालक आरोग्य विभाग, संचालक शिक्षण विभाग, ह्या संबंधित शासकीय अधिकार्‍यांशी संपर्क वाढवून नवीन योजनांची माहिती घ्यावी व लोकांच्या नेमक्या काय गरजा आहेत ही माहिती शसकीय अधिकार्‍यांपर्यंत पोचवावी.

पोलीस आयुक्त, नागपूर म्हणून काम करत असताना प्रत्येक पोलीस ठाण्या अंतर्गत बाल गुन्हेगार म्हणून आढळलेल्या व्यक्तिंची यादी मी बनवली होती. रोटरी क्लबच्या मदतीने प्रशिक्षित अशा दोन अधिकार्‍यांची (counsellors) नेमणूक करण्यात आली. वर्षभरात सदर मुले, त्यांचे पालक ह्यांना वारंवार भेटी देऊन ह्या मुलांना गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांना व्यवसाय कौशल्ये देण्यात आली. सदर व्यवसाय कौशल्ये देण्यासाठी रोटरिचे सदस्य असलेले अनेक उद्योजक पुढे आले. व नंतर ह्याच मुलांना त्यांनी आपल्या व्यवसायात चांगले पगार देऊन कर्मचारी म्हणून नेमणूक केली. त्यातील अनेक जणांनी स्वतःचे व्यवसाय उभारून स्वतःला व स्वतःचे घर चालवायला मोठी मदत केली. एका दानशूर व्यक्तिने आपल्या मोटर चालक प्रशिक्षण शाळेत अशा अनेक मुलांना मोटर चालवायचे प्रशिक्षण दिले. त्यातील अनेक मुले आज स्वतःची टॅक्सी चालवत आहेत.

रोटरी क्लब पुणे ह्यांच्या प्रोत्साहनाने, रोटरी वर्ल्ड पीस फेलो म्हणून माझी निवड केली होती व त्यातून अमेरिकेतील ड्युक विद्यापीठातून आन्तर्राष्ट्रीय विकास धोरण ह्या विषयात मला प्रगत अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यामुळे अनेक देशातील रोटरी सदस्यांना मला भेटता आले व त्यांच्या अनुभवातून बरेच काही शिकता आले व अनेक लोकोपयोगी सार्वजनिक कामांमधे योगदान देता आले. ह्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मी तयार केलेला माझा बाल कामगार प्रथा स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कशी कमी करता येईल हा शोध प्रबंध मी वेगळा अध्यक्षांच्या मार्फत पाठवत आहे तो आपण सवडीने पहावा.

आपल्या सर्व लोकोपयोगी कामांमधे आपण यशस्वी व्हावे अशी आमच्यातर्फे सदिच्छा!  व आपणा सर्वांना शुभेच्छा

                      ——————-                          

 

Articles

स्पर्धा परीक्षेत मराठी उमेदवारांची टक्केवारी कशी वाढवावी

By on June 21, 2023

स्पर्धा परीक्षेत मराठी उमेदवारांची टक्केवारी कशी वाढवावी

प्रवीण दीक्षित

(निवृत्त पोलीस महासंचालक)

 

  संघ लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणार्‍या तीन टप्प्यातील स्पर्धा परीक्षेसाठी भारताततून दहा लाखाहून अधिक उमेदवार परीक्षा देतात. विविध गाळण्या पार करून त्यातील सुमारे 900 उमेदवारांना नेमणुकीसाठी निवडले जाते. त्यातील ह्या वर्षी 90 उमेदवार हे महाराष्ट्रातील होते. हे प्रमाण कसे वाढवता येईल ह्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.  दहा लाखातील 90 उमेदवारांमधे यायचे असेल तर उमेदवारांनीही प्रामाणिकपणे झटून तयारी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फेही विविध पदांसाठी नुकत्याच जाहीर झलेल्या निकाला प्रमाणे 405 उमेदवारांची वर्ग 1 साठी शिफारस करण्यात आली आहे.यशस्वी उमेदवारांनी परीक्षेसाठी घेतलेले विषय पाहिल्यास दिसते की त्यतील 80 टक्के ह्यांनी  engineering, agriculture, ayurvedic, medicine  हे पदवी परीक्षेसाठी घेतले होते व त्यानंतर पुढील 3-4 वर्षे त्यांनी राज्यशास्त्र, सार्वजनिक प्रशासन , इतिहास, समाज शास्त्र  हे विषय घेतले होते. म्हणजेच आयुष्यातील महत्वाची 4 वर्षे त्यांची वाया गेली होती. ह्यावर उपाय म्हणजे, सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमातच राज्यशास्त्र, सार्वजनिक प्रशासन, इतिहास, समाज शास्त्र हे विषय शनिवारी, रविवारी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी शिकवण्याची व्यवस्था करणे जरुरीचे आहे. त्यामुळे राष्ट्राला होतकरू उमेदवार तरुणपणीच प्राप्त होतील.

  ह्या परीक्षांसाठी अभ्यास कसा करावा ह्याबद्दल नंतर चर्चा करू. प्रथम इच्छुक उमेदवारांनी स्पर्धा परीक्षेसाठी करावयाचा अर्ज हा अत्यंत काळजीपूर्वक, बिनचूक व उपलब्ध माहिती बरोब्बर देऊन पूर्ण करणे आवश्यक आहे हे अधोरखित करणे गरजेचे आहे. अनेक चांगले उमेदवार अर्जात केलेल्या चुकांमुळे निवडीबाहेर फेकले जातात; व त्याबद्दल सतत दुःख व्यक्त करतात. अर्ज बिनचूक कसे भरायचे, ह्यामधे तुम्ही आरक्षणाचा फायदा घेत आाहात की नाही? घेत असल्यास कोणत्या वर्गात घेत आहात; अनुभव लिहीत असतांना नमूद केलेले दिनांक नीट आहेत ना, तुमचे नाव, जन्मतारीख, वय ह्या सर्व गोष्टी व तसेच तुम्ही कोणत्या पदासाठी इच्छुक आहात ह्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. अनेक पदांसाठी शारीरिक क्षमतेकडे विशेष लक्ष दिले जाते. जसे, उंची, दृष्टी, छातीचा घेर, वजन वगैरे. ह्या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उल्लेखलेली शारिरीक क्षमता आपल्यामधे आहे का नाही ह्याची वैद्यकीय अधिकारयांकडून अर्ज भरण्यापूर्वी तपासणी करुन घ्यावी ज्या योगे परीक्षा उत्तीर्ण होऊनही शारिरीक दृष्ट्या सक्षम नाही हे ऐकण्याची वेळ येणार नाही.

समांतर आरक्षण अपेक्षित असल्यास खेळाडू तसेच आर्थिक दुर्बळ गट इत्यादी आवश्यक प्रमाणपत्रे अद्ययावत आहेत ना हे अर्ज भरण्यापूर्वी तपासणे आवश्यक आहे. खेळाडू म्हणून निवड व्हावी अशी इच्छा असल्यास आपण ज्या खेळात भाग घेतला होता तो खेळ शासनमान्य यादीत आहे का तसेच ज्या स्पर्धेत भाग घेतला असेल ती संस्था शासनमान्य आहे का हे तपासणे गरजेचे आहे. मान्यता नसलेल्या संस्थेच्या स्पर्धेमधे भाग घेतल्याचे प्रमाणपत्र नमूद केल्याने शेकडो उमेदवारांना निवड झाल्यानंतरही काढून टाकण्यात आले आहे. राष्ट्रीय व राज्य स्तरावरिल मान्यताप्राप्त स्पर्धेत सुवर्ण किवा रजत पदक मिळाले असल्यासच खेळाडू म्हणून फायदा मिळू शकतो.  निवड होण्यासाठी खोटी प्रमाणपत्रे बनविणे, सामाजिक माध्यमातून प्रश्नपत्रिका मिळविण्याचा प्रयत्न करणे, खोटे उमेदवार उत्तर पत्रिका लिहीण्यासाठी पाठविणे वगैरे सर्व अपप्रकारांपासून दूर राहणे आवश्यक आहे. अन्यथा फौजदारी कारवाईला तोंड द्यायला लागेल व तुम्ही आयुष्याचे नुकसान ओढवून घ्याल.

 पुढील 25 वर्षात भारताला जगातील प्रगत राष्ट्र बनवण्याची जबाबदारी यशस्वी उमेदवारांवर आहे व ती ते यशस्वीपणे पार पाडतील अशी अपेक्षा आहे. स्पर्धा परीक्षेत निवड झाल्यानंतर यशस्वी उमेदवार ज्या ठिकाणी राहणारा असेल ते ठिकाण सोडून अन्यत्र काम करावे लागणार आहे हे समजून घेणे गरजेचे आहे; अन्यथा मला दूर नेमणूक दिली म्हणून नाराज होऊन नोकरी सोडायची वेळ येते. स्पर्धा परीक्षेनंतर समाजातील गरजू व्यक्तिंची सेवा करण्यासाठी आपली निवड झाली आहे हे लक्षा ठेऊन, कोणताही भ्रष्टाचार न करता सेवा देणे गरजेचे आहे. भ्रष्टाचारामुळे परिवीक्षाधीन (probationer) अधिकार्‍यांपासून निवृत्तीला थोडे दिवस शिल्लक असलेल्या अधिकार्‍यांना नोकरीतून बडतर्फ व्हावे लागले आहे व आयुष्यभर नाचक्कीचा शिक्का घेऊन फिरावे लागते. शासन देत असलेल्या पगारात आनंदाने राहण्याची कला स्वतः व कुटुंबाने अंगिकारण्याची जरूर आहे. शासकीय सेवेत ठराविक कालावधीनंतर अन्यत्र बदली होणार आहे, ह्यासाठी मानसिक व शारिरीक तयारी ठेवणयाची जरुरी आहे. ह्या सर्व गोष्टींचा उघड्या डोळ्याने गंभीर विचार करावा; व त्या मान्य असल्यास सरकारी नोकरीत रुजु व्हावे.

स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी?

 संघ लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेसंबंधी होणारे बदल, वेळापत्रके, अभ्यासक्रम अटी व शर्ती अशा अनेक गोष्टी उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर ठेवत असतात. संकेत स्थळावरील माहिती ही उमेदवाराने वाचली आहे असे गृहीत धरली जाते व अमूक बदल मला माहीत नव्हता ही सबब अमान्य केली जाते. त्यामुळे स्पर्धा परीक्षांना बसायचे ठरवण्या पूर्वी व नंतर वेळोवेळी ह्या संकेतस्थळांना भेट देणे अत्यंत आवश्यक आहे. ह्याील कोणत्याही बाबीबाबत काही शंका, प्रश्न, अडचण असल्यास आयोगाला त्वरित इ-मेल पाठवणे व त्याचे रेकॉर्ड जपून ठेवणे उपयोगी पडते. यशस्वी उमेदवारांनी लिहीलेल्या उत्तरपत्रिका हयाही संकेतस्तळावर मिळू शकतात. त्यांचा अभ्यास करणे फायद्याचे ठरते. यशस्वी उमेदवारांनी दिलेल्या मुलाखती मुद्दाम संग्रही ठेवाव्यात व वारंवार वाचाव्यात त्यामुळे चांगले मार्गदर्शन होते. प्रश्नपत्रिकेत कोणत्या विषयांवर प्रश्न विचारले जातील, तसेच प्रश्नमंजूषा (question bank) उपलब्ध आहेत का? हे तपासून पहावे. गेल्या तीन ते पाच वर्षाच्या विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध असतात. त्या दिलेल्या वेळेत सोडविण्याचा सराव परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. हुबेहुब तेच प्रश्न जरी आले नाहीत तरी परीक्षकांना कोणते विषय महत्वाचे वाटतात ते आपल्या लक्षात येते.

 Prelim मधे 8-9 विषयांवर 6-7 प्रश्न असतात. जी उत्तरे माहित असतील, ती करावीत व अवघड वाटणारे प्रश्न, सर्व प्रश्न पत्रिका संपल्यावर सोडवण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी रोज घडणार्‍या गोष्टींची नोंद करून ठेवावी. लेखी परीक्षेतील काही विषय हे सक्तीचे असतात तर काही विषय हे ऐच्छिक असतात. सक्तीचे विषय जसे व्याकरण, निबंध, दिलेल्या परिच्छेदावरील प्रश्न ह्यासाठी दर आठवड्यास किमान एक पूर्ण पेपर लिहून तो तज्ज्ञ व्यक्तीकडून तपासून घ्यावा. निबंधामधे लिहीण्यापूर्वी विविध मुद्‌दयांची नोंद करावी. सुरवातीस प्रस्तावना, आपल्याला काय सांगायचे आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती, त्यानंतर आपण निबंध कशा प्रकारे लिहिणार आहोत जसे क्रमवारी पद्धतीने, तुलनात्मक पद्धतीने, विश्लेषण पद्धतीने हे स्पष्ट करावे. शक्यतो विषयासंबंधी दोन्ही बाजूची मते द्यावीत व शेवटी स्वतःचे मत काय आहे ते कारणांसह सविस्तर सांगावे. आपण काय लिहिले आहे ते अनुमान सकारात्मक पद्धतीने मोजक्या शब्दात द्यावे. मुद्द्यांची पुनरावृत्ती करू नये वेगळ्या विचारासाठी नवीन परिच्छेद सुरू करावा. परिच्छेद साधारण वीस ओळींपर्यंत असावा. लेखकाचे विचार अचूक आठवत नसल्यास लेखकाचे नाव, पुस्तकाचे नाव नमूद करून ते विचार स्वतःच्या शब्दात मांडावेत. आपण लिहिलेल्या मुद्द्यातून शेवट करावा व शेवट हा उल्लेखलेल्या मुद्दयांच्या विरुद्ध नसावा.

विषयाचा अभ्यास करण्यासाठी स्पर्धापरीक्षेत जे विषय आपण घेणार असू त्या विषयांचा महाविद्यालयापासून अभ्यास केल्यास त्याचा खूप फायदा होतो. जसे राज्यशास्त्र, सार्वजनिक प्रशासन, आन्तर्राष्ट्रीय संबंध, अर्थशास्त्र, समाज शास्त्र, मानसशास्त्र, तर्कशास्र, भूगोल, इतिहास वगैरे. ह्या विषयांचा पदव्युत्तर पर्यंतचा अभ्यास अपेक्षित असतो. त्यासाठी प्रसिद्ध लेखकांची किमान दोन अभ्यासक्रमासाठी नेमलेली पुस्तके समजून अभ्यास करावा. अवघड शब्द अर्थासकट लक्षात घ्यावेत. स्वतःच्या शब्दात विविध मुद्द्यांवर टिपा तयार कराव्यात. एक प्रकरण संपले की त्यातील आपल्याला काय समजले ते स्वतःच्या शब्दात लिहावे व तो विषय पक्का करावा. त्या विषयासंबंधीच्या चार ते पाच प्रश्नपत्रिका दिलेल्या वेळेत लिहून पूर्ण करण्याचा सराव करावा. त्या विषयासंबंधी शक्य असल्यास अ‍ॅकॅडमिक जर्नलमधील लेख वाचावेत. व त्याच्या टिपा काढून तयार ठेवाव्यात. उत्तरे लिहीताना त्याचा वापर केल्यास नक्की फायदा होतो.

पाच ते आठ मुलामुलींनी एकत्र येऊन अभ्यास केल्यास त्याचे अनेक फायदे होतात. दर आठवड्यास एक विषय गटामध्ये वाटून घ्यावेत व प्रत्येकाने केलेल्या तयारीच्या आधारे सादरीकरण करून एक तास चर्चा करावी. काढलेले मुद्दे एकमेकांना द्यावेत सदर चर्चा करतांना तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली चर्चा केल्यास त्याला योग्य दिशा प्राप्त होते. व विषय समजण्यास त्याचा मोठा फायदा होतो. आकाशवाणीवर रोज रात्री 9 वाजता दिल्या जाणार्‍या बातम्या, त्या नंतर असणारे स्पॉटलाइट ही तज्ज्ञ व्यक्तिंची चर्चा अद्ययावत राहण्यास उपयोगी राहते. सदर चर्चा आता आकाशवाणीच्या NewsonAIR ह्या अ‍ॅपवर आणि संकेतस्थलावर भेट देऊन ऐकता येते. राष्ट्रीय विचाराच्या वर्तमान पत्रांमधील लेखकांचे लेख मुद्दाम वाचावेत तसेच दूरदर्शन वरील चर्चा ऐकाव्यात. विविध विकासोपयोगी, लोककल्याणाच्या योजनांबद्दल पंतप्रधानांनी केलेली भाषणे व शासकीय प्रकाशने जशी, योजना, लोकराज्य ही नेहमी वाचनात ठेवावी. आन्तर्राष्ट्रीय संबंधांसाठी Indian Council of World Affairs च्या संकेतस्थळाला वरील गोष्टींचाभेट द्यावी व भारतीय दृष्टिकोन समजून घ्यावा.

मुद्देसुद विचार, विचारांची स्पष्ट मांडणी, खोलात जाऊन विषयाचा तसेच समस्येचा अभ्यास व त्यासंबंधी सकारात्मक उपाय योजना ह्यामुळे उमेदवाराचे व्यक्तिमत्व छाप पाडून जाते व अन्य उमेदवारांपेक्षा त्याची निवड नक्की होण्याची शक्यता असते. पोपटपंची लगेचच उघड पडते व ते उमेदवार नाकारले जातातत. मुलाखतीत सहजपणा असावा व गंभीरपणे विचार करून बोलावे.

 काही कारणाने परीक्षेत यश न मिळाल्यास त्यामुळे खट्टू होऊ नये. एका पाठोपाठ तीन वेळा परीक्षा देण्याचा कसोशीने प्रयत्न करावा. त्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शक्य असेल तिथे काम करून अर्थार्जन करावे व वेळ काढून परीक्षेसाठी प्रयत्न चालू ठेवावेत. केलेले प्रयत्न वाया जात नाहीत.

माठी तरुण हे नक्कीच हुषार आहेत वरील गोष्टींचा साकल्याने सराव केल्यास ते स्पर्धा परिक्षेत मोठ्या प्रमाणात यशस्वी होतील ह्याची खात्री आहे.

——————————————-