Author:

Praveen Dixit

Articles

डीप स्टेट व डावा दहशतवाद!

By on November 10, 2024

डीप स्टेट व डावा दहशतवाद!

प्रवीण दीक्षित

काही वर्षांपूर्वी भीमा कोरगाव ह्या ठिकाणी अचानक 1 जानेवारीला हुतात्म्यांना श्रद्धांजली देणयासाठी लाखो लोक एकत्र आले, व त्यानंतर काही तासातच संपूर्ण महाराष्ट्रात दंगल उसळली. त्यात जीवितहानी झाली, संपत्तीचे नुकसान करण्यात आले व पुढे अनेक दिवस राज्यात अराजकाचे वातावरण होते. जातीय तेढ इतकी वाढली की आता राज्यभर जातीय दंगली सुरु होतात की काय अशी भीती समाजात निर्माण झाली. कोण लोक होते याच्या मागे, व का त्यांनी असे अराजक निर्माण केले? शेजारील देशात ज्या हिंदू व अन्य अल्पसंख्यांकांवर अत्याचार होतात त्यांना नाइलाजाने भारतात येऊन वर्षानुवर्षे रहावे लागते व निर्वासित म्हणून समजल्याने कोणतेही अधिकार मिळत नाहीत. त्यांना नागरिकत्व देण्यासाठी भारत सरकारने नागरीकत्व कायद्यात सुधरणा करताच, दिल्ली व अन्य ठिकाणी डावे व मुसलमान संघटनांनी बरेच महिने आंदोलन करून अराजकाचे वातावरण निर्माण केले. शेतकर्‍्यांच्या कल्याणासाठी भारत सरकारने तीन कायदे प्रस्तावीत केले, त्याबरोबर पंजाब व अन्य भागातील डाव्या गटांशी संलग्न अनेक जणांनी स्वतःला शेतकरी म्हणत खलिस्तानी झेंडे हातात घेऊन महिनोन महिने दिल्लीच्या आजू बाजूचे रस्ते बंद करून शेवटी लाल किल्ल्यावर 15 आँगस्टला खलिस्तानी झेंडा फडकवला. मणिपुर मधे दोन वर्षांनंतरही स्थानिक जमातींमधिल अविश्वास तेवत ठेवण्यात येऊन सामान्य जीवन उध्वस्त झाले आहे. कुठून ह्यांना प्रेरणा मिळते? बस्तर मधे अबुजमाड भागात मुक्त प्रदेश जाहीर करून तिथे देश विघातक चळवळ चालवायची, पोलिसांना ठार मारायचे, त्यांची शस्त्रे पळवायची व लोकांचे जीवन अशक्य करायचे.

वर सांगितलेली ही काही उदाहरणे आहेत. विविध कारणांनी देशात अराजक माजवायचे, असंतोषाचे वातावरण आहे असे दाखवायचे. कधी धर्माच्या नावाखाली, कधी जातीच्या नावाखाली, कधी आदिवासींच्या गटांमध्ये भांडणे लावून देश विरोधी वातावरण तयार करायचे, विकासात खीळ घालायची. लोकांनी लोकशाही मार्गाने निव़डून दिलेल्या जन प्रतिनिधींना ते फक्त हिंदूंचे प्रवक्ते आहेत असे खिजवून शासन करू द्यायचे नाही, ही ती प्रवृत्ती आहे. दुर्दैवाने भारतातील अनेक विचारवंत (influencers) ह्याला बळी पडले आहेत. त्यातील काही पत्रकार आहेत, काही electronic माध्यमांमधे प्रवक्ते आहेत, काही लेखक आहेत, काही वकील आहेत तसेच काही स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवणारे ही आहेत. अनेकांनी अशासकीय संस्था चालवल्या आहेत व विशिष्ट मुद्द्यासाठी प्रचार यंत्रणा राबवल्या आहेत. परदेशातून त्यासाठी येणारा निधी जाहीर केलेल्या उद्दिष्टासाठी न वापरता धर्म बदलण्यासाठी लालूच देण्यासाठी वापरायचा व अल्प संख्यांक धोक्यात आहेत म्हणून हाकाटी पिटायची व जगभर भारताची बदनामी करायची. भारतात धर्म स्वातंत्र्य धोक्यात आहे असे अहवाल तयार करायचे व त्याला जागतिक संस्थांमधे प्रसिद्धी द्यायची. जिथे तरुण मिळतील अशा हुकमी जागा म्हणजे महा विद्यालये आणि विश्व विद्यालये. त्यातील अनेक, भारत सरकारने चालवलेली आहेत, ह्याशिवाय, काही खासगी आहेत तर काही राज्य सरकारने. त्याठिकाणी डाव्या विचारांचे काहूर माजवून तरुणांना अभ्यास करू द्यायचा नाही व तरुण बेरोजगार आहेत म्हणून आंदोलने करायची. ह्या शिवाय सर्वोच्च न्यायालयात वारंवार अर्ज दाखल करून स्वतःच्या बाजूचे आदेश मिळवायचे व ते न मिळाल्यास न्यायालये सरकारची रखेल आहेत म्हणून कांगावा करायचा. निवडणुकीच्या वेळी उमेदवारांची माहिती गोळा करून त्यांना आपल्या मतांचा प्रचार करण्यासाठी प्रलोभने दाखवणे व निवडणुकीच्या प्रक्रियेवर छाप पाडणे. निदान आपल्या विरुद्ध कोणी काही बोलणार नाही ह्याची खात्री करणे. समाज माध्यमांतून राष्ट्रीय राजकीय पक्षांवर खोट्या प्रचाराची राळ उडवून देणे. प्रबोधनाच्या नावाखाली लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण धुमसत ठेवणे ही ह्यांची चाल आहे. घटनेने दिलेल्या विविध स्वातंत्र्यांचा फायदा घ्यायचा व आपल्या विरुद्ध विचारांच्या लोकांची पायमल्ली करणे हा त्यांचा सुप्त डाव आहे.

थोडक्यात जो पर्यंत आपल्या विचारांचे लोक सत्तेत येत नाहीत तो पर्यंत सर्व प्रकारे देश खिळखिळा करणे हेच जोर्ज सोरोस असो अथवा खलिस्तानी पन्नु असो, चीन-प्रणीत डावे असोत वा अमेरिकेच्या किंवा कँनडाच्या तालावर नाचणार्‍या NGOs असोत, ह्यांचा खरा उद्देश आहे. भारतीय मतदार जागरूक आहेत पण त्यांनी ह्या अपप्रवृत्तींपासून सतत सतर्क राहणे आवश्यक आहे. हीच ह्या डीप स्टेट व डाव्या विचारांच्या प्रचार करणार्यांपासून वाचायची गुरुकिल्ली आहे. त्यासाठी, बुद्धीपूर्वक, श्रद्धेने स्वमंत्र, स्वयंत्र, स्वतंत्र, व स्वविद्या प्रकट करणे व ते आचरणात आणणे हाच सनातन धर्माचा आदेश आहे.

***********   *********   ****************