प्रवीण दीक्षित माझी आई, कालिन्दी नारायण दीक्षित अनेक लोकांना दीक्षितकाकू तर घरातील सर्वांना ताई ह्या नावाने माहित होती. 1978 साली वयाच्या 58 व्या वर्षी व दीक्षितसर गेल्यानंतर दहा महिन्यातच त्यांनी जगाचा निरोप घेतला. कुलाबा (रायगड) जिल्ह्यातील महाडजवळील नाते गावच्या नारायण (नाना) जोशी ह्यांच्या चंपूताई ह्या जेष्ठ आपत्य. अभ्यासात वर्गात सतत प्रथम असूनही गावात शाळा चवथीपर्यंतच असल्याने त्यांना शिक्षण सोडावे लागले. व त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे लवकरच लग्न झाले व त्या पुणे जिल्ह्यातील भोर व नंतर पुणे शहरात आल्या. चिंतामणराव देशमुख हे नाते गावचे. आईचे आजोळ म्हणजे बिरवाडीचे पुरोहित. महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार बिरवाडीचे होते. आम्ही सात भावंडे. वडिलांना सात बहिणभाऊ. आईला एक भाऊ व तीन बहिणी. वडील व आई हे दोघेही घरातील थोरले असल्याने वडिलांचे सर्व बहिणभाऊ, आईचे बहिणभाऊ व घरातील सर्व भावंडे यांची शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी ताईंनी समर्थपणे सांभाळून सर्वांना उच्च शिक्षित करून आपल्या पायावर समर्थपणे उभे केले. अशाप्रकारे सर्वांच्याच त्या खरोखरच्या ताई बनल्या. व त्यामुळे मुलेही त्यांना आई ऐवजी ताई या नावानेच संबोधत असत. 1964 मधे वडील पन्नास वर्षांचे असतांनाच व घरातील एकमेव अर्थार्जन करणारे असतांनाच डोळ्याची शल्यक्रिया अपयशी होऊन त्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसेनासे झाले. हा संपूर्ण घरावर वज्राघातच होता. पण त्यातही डॉक्टरांकडे, वडिलांना अनेकवेळा मुंबईला नेणे, सितापूरला (उत्तर प्रदेश) नेण्याचे काम त्यांनी समर्थपणे केले. त्याचबरोबर घरातील सर्व कामे पहाटे पाच वाजल्यापासून आनंदाने करणे हयात कधी खंड पडत नसे. सर्व मुले जेवायला बसली की प्रत्येकाला मधे थोडाही खंड न पडता गरम गरम घडीच्या पोळ्या वाढणे हे त्यांचे कौशल्य न विसरण्या सारखे होते. त्या शिवाय उन्हाळा आला की विविध प्रकारचे पापड, कुरडया, सांडगे ,लोणची, भाजणी, मेतकुट, साखरंबा, गुळंबा असे विविध प्रकार त्या करत असत. ह्या शिवाय घरातच खास व्यवस्था करून त्यांनी उखळ आणि जाते बसवून घ्यायची व्यवस्था केली होती. मुलांचे शाळेचे कपडे घरीच शिवण्यासाठी त्या मुद्दाम शिवण शिकल्या होत्या व मुलांच्या मापाप्रमाणे त्यांना दरवर्षी नवीन कपडे मिळत असत. ह्या शिवाय त्यांना भरतकामाची आणि स्वेटर्स बनविण्याची हौस होती. घरातल्या प्रत्येकाला त्यांनी विणलेला स्वेटर थंडीत उबदार ठेवत असे. ताई अतिशय धार्मिक होत्या. सोळा सोमवारचे व्रत माझ्या आठवणीत त्यांनी दोन वेळेला केले होते व्रताचे उद्यापन करण्यासाठी सोळा मेहुणे बोलावून त्यांचा स्वयंपाक स्वतः केला होता. दर श्रावण महिन्यात बटु व नवरात्रात कुमारिका पूजन असायचे. ह्या शिवाय `श्रीराम जयराम जय जय राम ’ हा जप त्या सतत करीत असत. लाख बेलपत्रे, लाख तुळशी, लाख दुर्वा वाहण्याचे व्रत पूर्ण करण्यासाठी त्या सर्व पुणे शहरात पायात काही न घालता फिरत असत. दीक्षित सरांच्या बरोबर संहिता यज्ञाच्या वेळेस त्यांनी समर्थपणे आलेल्या सर्वांना रोज नवीन पक्वान्न वाढून सगळ्यांची वाहव्वा मिळवली होती. त्या कलावती देवी यांच्या पूजनात रंगून जात. घरी येणार्या सर्व बाळगोपाळांना लाडू, वडी याचा खुराक कधीही चुकत नसे. घरामधे कधीही कोणतीही अडचण असल्याचे त्यांनी मुलांना कधीच भासू दिले नाही. त्यांचा उत्साह एवढा असे, की शाळेत जाऊन इंग्रजी शिकता आले नाही तरी त्या माझ्याबरोबर इंग्रजी शिकत असत. ताईंच्याबरोबर मंडईत जायचे असो अथवा अन्यत्र! त्याही वेळेचा उपयोग करून त्या सत्तावीस नक्षत्रे, बारा महिने, पाढे शिकवत शिकवत चालत असत. 1972 मधे मी कॉलेजमधे असतांना जर्मनमधे पहिला आलो व रँगलर महाजनींतर्फे मला बक्षिस देण्यात आले. त्यावेळेस त्यांनी काश्मिरहून आणलेल्या काळ्या वुलन कापडाचे जाकिट मला शिवले होते. 1975 मधे मी पुण्याहून दिल्लीला गेलो त्यावेळेस त्यांनी मुद्दाम सांगितले, “भूक लागली की खात जा व झोप आली की झोपत जा. म्हणजे तुझी प्रकृती चांगली राहील.’’ 1977 मधे दीक्षित सर गेले. त्यामुळे त्यांना अतिशय दुःख झाले. IPS च्या प्रशिक्षणासाठी मी हैद्राबाद येथील पोलीस अकादमित असतांना उपसंचालक अय्यर ह्यांनी मला बोलावून घेतले व सांगितले, “ताई गेल्याची तार आली आहे.’’ बराच वेळ माझा त्याच्यावर विश्वास बसला नाही. परंतु नियतीपुढे माणूस असहाय्य असतो हेच खरे. ताईंचे एक वाक्य कायम लक्षात राहिले. “माझा प्रत्येक मुलगा एक एक कोटी रुपयांचा आहे. व ती माझी श्रीमंती कायम राहील.’’ आयुष्यभर इतरांचे चांगले व्हावे म्हणून चंदनाप्रमाणे झिजणार्या माझ्या आईच्या पवित्र आणि प्रेमळ स्मृतीस आज त्यांच्या पुण्यतिथिच्या दिवशीच म्हणजे श्रावण वद्य द्वादशी रोजी माझा शतशः दंडवत. मातृदेवो भव । |