Articles

शिक्षक दिन

By on September 5, 2020

प्रवीण दीक्षित.

निवृत्त पोलीस महासंचालक.

5 सप्टेंबर ह्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् ह्यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा शिक्षकदिन म्हणजे, आपल्या गुरुंप्रति आदर व्यक्त करण्याची एक महत्त्वाची संधी. बाकी अन्य प्राणी व माणूस ह्यांच्यात महत्त्वाचा फरक म्हणजे, अन्य प्राण्यांना अनेक गोष्टी, लकबी ह्या जन्मजात प्राप्त असतात. माणूस हा जरी अत्यंत बुद्धिमान असला तरीही दुसर्‍या कोणीतरी एखादी गोष्ट शिकविल्याशिवाय तो ती शिकत नाही. माणसाला जी भाषा शिकवावी ती तो आत्मसात करतो. दुसर्‍यांच्या अनुभवाववरून शिकतो व अनेकांच्या अनेक स्तरावरील मार्गदर्शनाने तो आयुष्यभर शिकत असतो. असे म्हणतात की ज्ञान एवढे अफाट आहे की कितीही जन्म घेतले तरी हे संपूर्ण ज्ञान शिकणे अशक्य आहे.

मी लहान असतांना मराठी महिन्यांची नावे आठवड्याचे वार, नक्षत्रांची नावे अनेक मराठी श्लोक, पाढे हे मी माझ्या आईपासून शिकलो. थोडा मोठा झाल्यावर संस्कृत व्याकरण, काव्य, अनेक छंद माझे वडील पंडित नारायणशास्त्री दीक्षित ह्यांच्याकडून शिकण्याची सुसंधी मला प्राप्त झाली. वडील पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमधे शिक्षक असल्याने अन्य विषयांचे शिक्षकही त्यांचे सहकारी होते. ज्यांना ते प्रेमाने “सुहृद् समाज’’ म्हणत असत. ठोंबरे सरांकडून मी इतिहास शिकलो व इतिहासाची गोडी व महत्त्व कळू लागले. `पूर्व दिव्य ज्यांचे रम्य त्यांना भावी काळ’ हे शिकता शिकता आत्मविश्वासात वाढ होत गेली. बीजगणित व भूमिती ह्यातील विविध नियम, प्रमेये व त्यावर आधारित उदाहरणे हे एका विशिष्ट पद्धतीने पाहिल्याने ते कसे सोडवायचे ह्याचे ज्ञान त्याच्यातील खाचाखोचांसह श्री डोणजेकर यांच्याकडून शिकायला मिळाले. इंग्रजी कसे लिहावे, बोलावे विविध शब्दांची स्पेलिंग्ज न चुकता कशी लिहावी हे श्री घाटपांडे ,श्री व्ही. एस. गोखले, श्री व्ही. एस.देशपांडे ह्यांच्याकडून शिकायला मिळाले. श्री. मो. रा. वाळंबे हे माझे मराठी व्याकरणाचे गुरू तर  डॉ. स. वि. सहस्रबुद्धे ह्यांच्याकडून मी मराठीतील रसग्रहणे शिकलो.

शाळेशिवाय वसंत व्याख्यानमालेतील श्री. एस. एम्. जोशी, श्री. ना. ग. गोरे, श्री.ग. प्र. प्रधान ह्यांची वेळोवळी होणारी भाषणे राजकीय व सामाजिक प्रगल्भता वाढवीत होती. फर्ग्युसन कॉलेजमधे शिकत असतांना ऑक्सफर्ड येथे शिकून आलेले प्राचार्य ढवळे, प्रा. गोखले यांनी इंग्रजीतील महान नाट्यकार शेक्सपियर व इतर कवी ह्यांच्या रचनातील गोडी समजावून सांगितली. अर्थशास्त्राचे प्राध्यापक श्री. नाडकर्णी ह्यांनी सर्व व्यवहारातील अर्थशास्त्राच्या पाठीमागील विविध संकल्पना विशद केल्या. जमेल तेंव्हा डॉ. वि. म. दांडेकर व. डॉ. रथ ह्यांच्यामुळे भारतातील गरीबीचे भीषण चित्र डोळ्यासमोर उभे रहात असे. प्रा. वि. म. बाचल यांच्याकडून घटना व राज्यशास्त्र ह्या विषयात गोडी निर्माण झाली. कॉलेजमधे असतांना त्यांनी विद्यार्थ्यांना विधानमंडळ पहायला नेल्याचे व तेथील चर्चा ऐकल्याचे स्मरते. डॉ. बी. बी. कुलकर्णी हे माझे जर्मन भाषेचे प्राध्यापक. त्यांच्यामुळे जर्मन कवी गोएथे व अन्य लेखक यांचा सुपरिचय झाला. प्रा. राम बापट यांनी आंतरराष्ट्रीय राजकारण ह्याची गोडी निर्माण केली. पुणे विद्यापीठात प्रा. नरेन्द्र दाभोळकर हे कुलगुरू असतांना अनेक विषयांच्या चर्चासत्रांना हजर राहण्याची संधी प्राप्त झाली. प्राध्यापकांच्या संपामुळे बी. ए. चा निकाल वेळेवर लागणार नाही हे लक्षात आल्यावर “तुझा निकाल मी गुप्त तारेने जे एन.यु. नवी दिल्ली येथील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडिज चे डीन डॉ. आगवानी यांना कळवतो’’ ह्या त्यांच्या प्रोत्साहनपर आश्वासनामुळे माझ्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली.

जे. एन्. यु. म्हणजे ज्ञानाचे अखंड वाहणारे कारंजे होते.  International Court Of Justice चे न्यायाधीश डॉ. आर्. पी. आनंद, इतर देशांना कायदेशीर सल्ला देणारे डॉ. व्ही. एस्. मणी ह्यांच्याकडून भारत व अन्य देश ह्यांच्या व्यवहारातील कायदेशीर बाबी लक्षात आल्या. दोन्ही बाजू प्रभावीपणे कशा मांडाव्या हे उलगडले गेले. यु.नो व आंतरराष्ट्रीय संस्थांमधे भारताचे योगदान ह्याचे अफाट ज्ञान असणारे डॉ. एम्. एस्. राजन्, चीनच्या अंतर्गत घडामोडी स्पष्ट करणारे गो. पु. देशपांडे, प्रा. देशिंगकर हे प्रमुख होते. राजकीय विचार शिकवत असतांनाच दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक पिलाई ह्यांनी एम् ए. च्या दुसर्‍या वर्षाला असतांनाच यु. पी.एस् सी. च्या स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी प्रोत्साहन दिले. जे एन्. यु. चे ग्रंथालय, प्राध्यापक व खासदार एम् एल्. सोंधी यांची भारताची परराष्ट्र धोरणावरील व्याख्याने, सप्रु हाऊस येथील आंतरराष्ट्रीय विषयांचे ग्रंथालय ह्या सर्व गोष्टींमुळे कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या महागड्या क्लासला न जाताही पहिल्याच प्रयत्नात मी आय्. पी. एस्. ची परीक्षा उत्तीर्ण झालो.

हैद्राबाद येथील पोलीस अकॅडमीचे संचालक आर्. डी. सिंग , उपसंचालक मेहमूद बीन महम्मद ह्यांच्याकडून पोलीस कामाचा ओनामा मिळाला. त्याचबरोबर घोडदौड करण्याचे कसब हे रायडिंग मास्टर ओंकारसिंग व परेड करण्याची माहिती उस्ताद ख्रिस्तोफर व इनस्पेक्टर शर्मा ह्यांच्याकडून शिकता आली. इन्स्पेक्टर राणा ह्यांनी ज्युडो, कराटे व गिर्यारोहण ह्याचे धडे देऊन शारिरीक व मानसिक खंबीर होणयास मदत केली.

रोटरी इंटरनॅशनल ह्यांच्याकडून “वर्ल्ड पीस फेलो’’ म्हणून निवड झाल्यानंतर अमेरिकेतील ड्युक विद्यापीठातील सॅनफोर्ड स्कुल ऑफ पब्लिक पॉलिसी येथे  आंतरराष्ट्रीय विकास कसा साध्य करावा ह्याबद्दलचे सखोल शिक्षण घेता आले. अनेक देशातील वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करून एकसंधपणे आपले उद्दिष्ट कसे साध्य करावे त्याचे सादरीकरण कसे करावे, जागतिकीकरणात विकसनशील देशांची प्रगती कशी करावी ह्यासंबंधी तेथील अनेक प्राध्यापकांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. जागतिक बँकेत काम करणार्‍या प्रा. लेथेम, बजेट चे आर्थिक विकासातील महत्त्व विशद करणारे प्रा. शुक्ला, ऑस्ट्रियाचे घटनातज्ज्ञ डॉ. श्टायनर व इतर अनेकजण होते.

भारतीय पोलीस सेवेत असतांना सी.बी. आय. चे संचालक एम. जी कात्रे, आय. बी. चे संचालक व्हि. जी. वैद्य, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग, ह्यांचे बहुमोल मार्गदर्शन प्राप्त झाले. ह्या अनेकांच्या अनेक थरांवरील मार्गदर्शनामुळे सहायक पोलीस अधिक्षकापासून पोलीस महासंचालक ह्या सर्वोच्च पदापर्यंतची शिडी मी सहज चढू शकलो.

महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात उपाध्यक्ष म्हणून काम करत असतांना अध्यक्ष न्यायमूर्ती अंबादास जोशी ह्यांच्याकडून न्यायाची मागणी करण्यासाठी आलेल्या अशिलांकडे संवेदनाशीलपणे कसे पहावे ही दृष्टी मला प्राप्त झाली. त्याचबरोबर निकालपत्र लिहीतांना कायदेशीर बाबी कशा उलगडून दाखवाव्यात हे शिकायला मिळाले.

माझ्या जीवनावर मोलाचे पैलू पाडणार्‍या वर उल्लेखिलेल्या व त्याचबरोबर उल्लेख करू न शकलेल्या अनेक गुरुजनांना माझा सादर प्रणाम.

अज्ञानतिमरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया ।

चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः ।।

—————————————————-

TAGS
RELATED POSTS

LEAVE A COMMENT