Internet चा वाढता उपयोग अनेक चांगल्या कारणांसाठी होत असला तरी त्याच बरोबर Internet च्या माध्यमातून अनेकप्रकारचे सायबर गुन्हे वाढीस लागले आहेत. महिलांची फसवणूक, आर्थिक फसवणूक, संगणक व संकेतस्थळे हॅक करणे ह्या संबंधी अनेकांना माहिती असते, परंतु Internet च्या माध्यमातून लहान मुलांचा अश्लील दृश्यांसाठी व विकृत मनोवृत्तीच्या लोकांची लैंगिक भूक भागविण्यासाठी फार मोठ्याप्रमाणावर वापर केला जातो ह्याची अनेकांना कल्पना नसते. किंबहुना आपल्या देशात ही समस्या नगण्य आहे अशी समजूत करून घेऊन मोठ्या प्रमाणात आपण आपली फसवणूक करत असतो. लहान मुलांचा अश्लील दृश्यांसाठी वापर ही इतर देशांप्रमाणे भारताचीही मोठी डोकेदुखी झाली आहे.
लहान मुलांच्या जननेंद्रियांशी विविध चाळे करणे व त्यामुळे आपली लैंगिक वासना शमविणे हे कायद्याच्या दृष्टीने गुन्हा असला तरी अशा असंख्य घटना पूर्वी संगणकाच्या सहाय्याने व आता स्मार्ट फोनच्या माध्यमातून सहज उपलब्ध झाल्या आहेत. अशा वासनापीडित व विकृत लोकांना लहान मुलांच्या आभासी चित्रांशी चाळे करता यावेत ह्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय तस्कर प्रयत्न करत असतात. गरीब लोकांच्या मुलामुलींचा अश्लील कामांसाठी उपयोग करून व त्याची आभासी चित्रे internet च्या सहाय्याने जगभर उपलब्ध करून देण्यासाठी गरीब लोकांना मोठमोठ्या रकमेची आमिषे दाखविली जातात व लहान मुलांच्या न
कळत त्यांचा गैरवापर केला जातो असे धक्कादायक प्रकार जगाच्या अनेक गरीब देशातून उघडकीस आले आहेत.
अमेरिका, इंग्लंड वा अन्य अनेक देशात Internet च्या माध्यमातून लहान मुलांची अश्लील चित्रे पाहणार्या व्यक्तींवर करडी नजर ठेवली जाते व त्यांना शोधून कठोर शिक्षाही केली जाते. त्याचप्रमाणे भारतातही अशा प्रकारे अश्लील चित्रे पाहाणार्यांवर कठोर कारवाईची आवश्यकता आहे. मुलांचा अश्लील गोष्टींसाठी वापर कसा थोपवावा ही जबाबदारी पार पा़डण्यासाठी पोलीस अधिकारी व ह्या कामासाठी वाहून घेतलेल्या स्वयंसेवी संस्था ह्यांनी मिळून एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे. तसेच राष्ट्रीय व राज्य स्तरावरील महिला व बाल आयोग, न्यायालयीन अधिकारी, सरकारी अधीकारी व कायदा राबविणारे पोलीस अधिकारी यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक आहेत. ह्या संबंधी International Justice Mission ही स्वयंसेवी संस्था अनेक देशात काम करत आहे. त्यांचीही ह्या कामात मदत घेऊन संबंधित अधिकार्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना इतर देशात अम्मल बजावणी करत असलेल्या उत्कृष्ट कारवायांशी परिचित करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर राज्य महिला व बाल आयोगाशी निगडीत स्वयंसेवी संस्थांमार्फत मुलांचा अश्लील चित्रीकरणासाठी वापर करण्या विरोधी जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्यामधे वर्तमानपत्रे व दूरचित्रवाणी फार मोठ्या प्रमाणत पुढाकार घेऊ शकतात. विशेषतः महानगरांमधे ह्यासंबंधी शाळा, पालक, पोलीस अधिकारी व सायबर तज्ज्ञ ह्यांच्या संयुक्त सभा दर महिन्याला आयोजित करणे जरुरीचे आहे. लहान मुलांचा अश्लीलतेसाठी वापर ही विकृती आहे हे मान्य करून त्यासंबंधीचे उपाय तातडीने करणे ही काळाची गरज आहे.