महाविकास आघाडीच्या गृहमंत्री व पर्यटन मंत्री ह्यांनी संयुक्तरीत्या पत्रकारपरिषदेत जाहीर केले की, 27 जानेवारी 2020 पासून मुंबईतील विशिष्ट ठिकाणची मॉल्स, हॉटेल्स, दुकाने ही 24 तास चालू राहतील, त्यामुळे मुंबईतील लोकांना व मुंबईत भेटीसाठी येणार्या प्रवाशांना मोठी सोय होऊन रोजगार निर्मिती होईल. तसेच हा निर्णय पोलीस प्रशासन व वाहतुक विभाग ह्यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर घेण्यात आला आहे.
आजही रेल्वेस्टेशनच्या जवळ असलेली हॉटेल्स, हातगाडीवाले हे शेवटची लोकल जाईपर्यंत म्हणजेच रात्रीसाडेबारापर्यंत उघडी असत. तसेच मोठ्या हॉस्पिटल्सच्या जवळ असलेली औषधाची दुकाने 24 तास चालू असत व त्यामुळे गरजूंची नक्कीच सोय होत असे.
ह्याशिवाय झोमॅटो, स्वीगी वगैरे ऑनलाईन खाण्याचे पदार्थ पुरवणार्या कंपन्या किंवा amazon, grocer, flipcart सारख्या कंपन्या दुकानातील कोणतीही गोष्ट चोवीसतास ऑर्डर्स स्वीकारून दिवसभरात ग्राहकांच्या सोयीप्रमाणे त्या त्यांना पुरवतात. त्यामुळे खाण्याचे पदार्थ, औषधे, दुकानातील सर्व वस्तू दिवसाच्या कोणत्याही वेळेस घरपोच प्राप्त होत असतात व त्या न मिळण्याने कोणाचीही गैरसोय होत नाही.
अशा परिस्थितीत मुंबई 24 तास ह्या योजनेतून लोकांची कोणती गैरसोय दूर् करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे ह्यावर प्रश्नचिह्न आहे. ह्या योजने अंतर्गत मॉल्स, हॉटेल्स, दुकाने 24 तास चालू राहणार असल्याने हॉकर्स, हातगाडीवाले, फिरस्ते ह्यांना कोणत्याही नियमाने बंदी करणे अशक्य आहे. ह्या ठिकाणी काम करणारे लोक त्यांना आजही 12- 14 तास राबावे लागते व आठ तासाहून जास्त काम करण्यासंबंधीचे नियम न पाळल्याने क्वचितच काही कारवाई होते. त्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजना, पार्किंग, कामगार कायदे, अन्न सुरक्षा, अग्नि सुरक्षा, घन कचरा व्यवस्थापन आदि सर्व नियमांची अम्मलबजावणी केली जाईल, हे पर्यटनमंत्र्यांचे आश्वासन प्रत्यक्षात खरोखर किती राबवले जाईल हे शंकास्पद आहे.
परदेशात मॉल्स शहराच्या बाहेर एकांतजागी असल्याने त्या जागी येणार्या गाड्या व ग्राहक ह्यांच्यामुळे आजूबाजूला राहणार्या वस्तीतील लोकांना कोणताही उपद्रव होत नाही. मुंबईत मात्र सर्व मॉल्स हॉटेल्स, दुकाने ही भर वस्तीत निवासस्थाने असलेल्या ठिकाणी आहेत. त्यामुळे तेथे येणार्या वाहनांमुळे, ग्राहकांमुळे होणार्या गोंगाटाने आजुबाजूच्या लोकांना रात्रभर त्रास सहन करावा लागणार आहे. मॉल्स, हॉटेल्स, दुकाने यातून सतत बाहेर टाकला जाणारा कचरा उचलण्यासाठी सध्या दिवसासुद्धा सफाई कर्मचारी पुरेसे पडत नाहीत. त्यामुळे हा
जो प्रचंड कचरा रस्त्यावर निर्माण होणार आहे त्यामुळे सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. मुंबई 24 तासमुळे गणपती उत्सवात ज्याप्रमाणे लोकांच्या प्रचंड झुंडी रस्त्यातून फिरत असतात त्याप्रमाणे मुंबईतील व मुद्दाम मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांच्या प्रचंड झुंडी फिरतांना दिसतील.
मुंबई पोलीसातील 80% पोलीस दिवसासाठी नेमलेले असतात व 20% रात्रपाळीसाठी काम करतात. मुंबई 24 तासमुळे निर्माण होणार्या वाहतुकीच्या समस्या, मारामार्या व इतर गुन्हे, महिलांची सुरक्षितता ह्यासाठी रात्रीही दिवसाप्रमाणेच 80% पोलीस नेमणे आवश्यक आहे. सध्याच्या उपलब्ध पोलीसातून हे शक्य नसल्याने त्यासाठी प्रशिक्षित पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने नेमण्याची जरुरी आहे व ही उपलब्धता नजिकच्या काळात शक्य नसल्याने आहेत त्याच पोलीसांवर प्रचंड दबाव येणार आहे.
वरील परिस्थितीत प्रस्तावित प्रायोगिक तत्त्वावरील मुंबई 24 तासचा निर्णय घाईगर्दीने राबवण्याने कायदा व सुव्यवस्थेपुढे निर्माण होणार्या समस्यांकडे दुर्लक्ष्य होऊन मुंबईच्या समाज जीवनापुढे येणार्या काळात मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे व त्याचा गैरफायदा समाजकंटक घेण्याची शक्यता आहे.