मकरसंक्रांतीच्या निमित्त संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत महाराष्ट्रात संक्रांतीचे विशेष पर्व साजरे केले जाते. पूर्वीच्याकाळी संक्रांतीच्या निमित्ताने महिलांचे हळदीकुंकु, शेतकर्यांचे नवीन पीक घरी आणण्याची लगबग आणि विद्यार्थ्यांची गुरुजनांना भेटण्याची गडबड असे. थंडीला योग्य व शरीराला पोषक अशी तीळगुळाची पोळी, वडी, लाडू , हलवा लोक परस्परांना देत होते व आपले वैर विसरून परत एकदा मैत्रीपूर्ण वातावरण निर्मिती करत होते. ह्या सणाच्या निमित्ताने लोकांमधे एकमेकांना भेटणे सुखदुःखे सांगणे व पुन्हा नव्या जोमाने काम करणे हे सहज होत होते. जसजशी महानगरे विस्तारत गेली तसतशी अनेक ठिकाणची लोकं एकत्र राहण्यास सुरवात झाली. आजुबाजूला सतत हजारो किंवा लाखो लोकं असूनही एकमेकांशी बोलायला कोणालाच वेळ नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मित्र अथवा नातेवाईक ह्यांना भेटणे, गप्पा मारणे हे तर दूरच परंतु आई वडिलांना मुलांशी किंवा नवर्याला बायकोशीसुद्धा बोलायला वेळ नाही अशी वेळ आली आहे. त्यात भर म्हणून मोबाईल व व्हॉटस् अॅप सारखी समाज माध्यमे ह्यामुळे लोकांच्यात फक्त व्हर्च्युअल संबंध शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आज अनेक व्यक्ती मनोरुग्ण बनल्या आहेत व परिणाम म्हणून मुले व्हिडिओ गेम्सची बळी झाली आहेत. त्यातूनच आत्महत्येसारखा प्रसंग तरुण व्यक्तिंमधेसुद्धा आढळत आहे. संवादाच्या अभावी अन्य धर्मीय, अन्य जातीच्या अन्य भाषेच्या लोकांविरुद्ध चिथावणीखोर अशाच गोष्टी बोलल्या, वाचल्या जात आहेत. ह्यावर उपाय म्हणून नवीन वातावरणातही आजूबाजूच्या लोकांशी, कुटुंबातील सदस्यांशी व अन्य धर्मीय, प्रांत, भाषा, जातीमधील लोकांमधे विचारांची देवाणघेवाण आवश्यक झाली आहे. ह्यासाठी तरुणांमधे वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून, वृद्धांसाठी सहलींच्या स्वरूपात तर इतर लोकांसाठी कविसंमेलने वगैरे प्रकारे संवाद वाढविण्याचे मी ठिकठीकाणी प्रयोग केले. त्याला लोकांनीही उत्साहाने पाठिंबा दिला व त्यातून सौहार्द निर्माण झाले. संवाद केल्याने एकमेकांविरुद्धचा द्वेश, गैरसमज दूर होण्यास मदत झाली व लोक आपले काम आनंदाने करू लागले. पोलीस व जनता ह्यांच्यातही सुसंवाद घडविण्यासाठी पोलीसांचे मित्र बनून लोक पोलीसांबरोबर सार्वजनिक उत्सवात स्वयंसेवक म्हणून भाग घेऊ लागले. अशा प्रकारचे उपक्रम राबविल्यास नक्कीच जीवनातील धकाधकी कमी होऊन आपली सुखदुःखे आपण वाटून घेऊ शकतो.हिंसक घटना कमी करू शकतो. प्रयत्न करून बघा व तुमचा प्रयोग कसा यशस्वी होतो तेमुद्दाम कळवा.