“आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणार्या डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हॉस्पिटल्स तसेच आरोग्य सेवा पुरविणार्या विविध संस्था यांठीकाणी अनेकदा हिंसेचा उद्रेक होतो.. डॉक्टर्सना मारहाण केली जाते, मालमत्तेचे नुकसान केले जाते. या हिंसेला रोखणे हे एक कठीण आव्हान आहे मात्र सजग प्रयत्न केल्यास अशा हिंसेच्या घटना रोखणे, त्याची तीव्रता कमी करणे सहज शक्य आहे. अशा वेळी पुण्यामध्ये आज पथदर्शी अशा तात्काळ मदत सेवा (Quick Response Services) या अभिनव प्रकल्पाची सुरुवात होत आहे, याचा मला विशेष आनंद होत आहे. आणि अधिक कौतुकाची बाब म्हणजे माझे सर्व निवृत्त पोलीस सहकारी असलेली निवृत्त पोलिस कल्याण संस्था (NPKS) यात सहभागी आहे” असे प्रतिपादन श्री. प्रवीण दीक्षित (माजी पोलिस महासंचालक – महाराष्ट्र राज्य आणि सदस्य – महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण, मॅट) यांनी आज पुणे शहर पोलीस मुख्यालयात आयोजिलेल्या समारंभात केले.
“मी पोलीस आयुक्त आणि महासंचालक असताना काही डॉक्टर्स माझ्याकडे बंदूक परवाना मिळविण्यासाठी आले होते. ही खरेच चिंतेची बाब आहे पण मी त्यांना तसे करू नका असे सांगितले. कारण, हिंसक जमावासमोर बंदूक घेऊन सामोरे जाणे हा काही उपाय असू शकत नाही. गर्दी, हिंसक जमाव यांचे स्वतःचे असे मानसशास्त्र आहे, ते नीट समजून घेतले पाहिजे. त्यांना हाताळण्याचे जे यथायोग्य प्रयत्न आहेत ते सातत्याने केले जावेत” अशी अपेक्षा श्री. प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केली. उपक्रमास शुभेच्छा देताना त्यांनी निवृत्ती नंतर महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकाऊ डॉक्टर्स विरुद्ध होणारी हिंसा व ती रोखण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यांचे अनुभव सांगितले.
डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स संदर्भातील हिंसेच्या घटनांसाठी प्रतिबंध, मनाई आणि निवारण या तीनही पातळ्यांवर बहुविध उपाययोजना करण्यासाठी निवृत्त पोलिस कल्याण संस्था (NPKS) आणि कोअर इंडिया इंस्टिट्यूट ऑफ लीगल मेडिसिन (CIILM) या दोन संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमधून तात्काळ मदत सेवा (Quick Response Services) या अभिनव प्रकल्पास आज प्रारंभ झाला. या प्रकल्पांतर्गत डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स यांच्यावरील हल्ले व हिंसा याबाबत विविधांगी उपाय योजना अंमलात आणल्या जाणार आहेत. हिंसेच्या अप्रिय घटनेप्रसंगी तातडीची मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनातील तज्ज्ञ अशा निवृत्त पोलीस अधिकारीवर्गाची एक टिम सदैव तैयार असेल.
प्रत्येक हॉस्पिटलच्या सुरक्षा यंत्रणेची वेळोवेळी तपासणी करणे, तपासणी दरम्यान निरीक्षणास आलेल्या त्रुटींवर चर्चा आणि मार्गदर्शन, प्रशिक्षण, हिंसा घडत असेल अशा प्रसंगी त्वरित संपर्क साधून परिस्थिती नियंत्रणात आणणे, भविष्यकालीन उपाय योजना उदा. हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि कर्मचारी यांचे वेळोवेळी आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण, आवश्यक त्या सूचना अशा अनेक आघाड्यांवर या प्रकल्पांतर्गत सखोल काम केले जाईल. प्रथमतः शांतता प्रस्थापित करणे यास सर्वोच्च प्राधान्य असेल, त्यानंतर पुढील कार्यवाही. कायदेशीर सल्ला, रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांशी सुसंवाद साधणे, प्रसिद्धी माध्यमांपुढे आवश्यक ती व खरी माहिती समोर मांडणे आदी उपक्रम या प्रकल्पांतर्गत केले जाणार आहेत.
सदर समारंभास डॉ. संचेती, डॉ. श्रीकांत केळकर (ज्येष्ठ नेत्र तज्ज्ञ), डॉ. संतोष काकडे (सदस्य, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग – महाराष्ट्र, मुंबई), सुरेश कमलाकर (अध्यक्ष – मध्यवर्ती समिती, निवृत्त पोलिस कल्याण संस्था) यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी डॉ. मोहन आगाशे (मानसोपचार तज्ज्ञ व ज्येष्ठ रंगकर्मी) होते.
ज्येष्ठ डॉक्टर संचेती यांनी सदर प्रकल्पास शुभेच्च्छा देताना सांगितले की, “माझे वडील एक किराणा दुकानदार होते पण त्यांनी मला वैद्यकीय क्षेत्रात पाठविले कारण आमच्या फॅमिली डॉक्टरांनी तसे सांगितले होते. डॉक्टरांविषयी पूर्वी असणारा तो विश्वास पुढे हरवत गेला. या अविश्वास, साशंकतेचे परिवर्तन डॉक्टरांच्या विरुद्ध हिंसेत होते. आज सुरु होणारा प्रकल्प सकारात्मक आहे.”
डॉ. श्रीकांत केळकर यांनी माणसांच्या अहंभावाची काही उदाहरणे सांगून हिंसा किती सहज केली जाते हे सांगितले. यास आळा घालायचा असेल तर अशा प्रकल्पांची अतिशय गरज आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.
डॉ. संजय गुप्ते यांनी रुग्ण व डॉक्टर यांचा सहप्रवास असावा असे सांगून दोघांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे असे सांगितले.
डॉ. मोहन आगाशे म्हणाले की “डॉ. संजय गुप्ते जे म्हणाले तो माझ्या अलीकडच्या नाटकाचा (जरा समजून घ्या ना..) शेवट आहे. अनारोग्य वाढले की हॉस्पिटल्स वाढतात आणि समजूत कमी झाली की फक्त कायदे वाढतात. बुद्धी बरोबर संवेदनशील मनही हवे. समाज बदललाय, सारे काही पैशांसाठी अशी परिस्थिती आहे. मी माझ्या अभिव्यक्ती द्वारे कोणाचीही बाजू न घेता प्रश्न मांडायचा प्रयत्न करतो. प्रश्न तर आहेत, त्यांची उत्तरेही आपण अनुभवांच्या आधारे शोधायला हवीत.”
विनायक जाधव (अध्यक्ष – पुणे निवृत्त पोलिस कल्याण संस्था) आणि डॉ. भाग्यश्री काकडे (कोअर इंडिया इंस्टिट्यूट ऑफ लीगल मेडिसिन) यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. प्रणाली सावंत यांनी केले.