वाहतूक अपघातांमुळे भारतात दरवर्षी दीडलाखापेक्षा अधिक व्यक्ती आपले प्राण गमावतात. आपघातांमुळे जखमी होणार्या व्यक्तींची संख्या अचूकपणे उपलब्ध नसली तरी ती अंदाजे दहा लाखांहून अधिक आहे. चारचाकी वाहने व सार्वजनिक वाहतुकीची वहाने यांच्यामुळे होणार्या अपघातांपेक्षा स्कुटर्स, मोटरसायकल्स मुळे होणार्या अपघातांमधे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. प्रत्येक एक चारचाकी वाहनाच्यामागे कमीतकमी पाच दुचाकी वाहने नोंदवली जातात. शहरांच्या होणार्या वाढीमुळे महाराष्ट्रात हे प्रमाण ह्यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. रस्त्यावरील अपघात हे वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे , रस्त्यावर असलेल्या अनेक अनधिकृत आक्रमणांमुळे, रस्ते ठिकठिकाणी खणल्यामुळे, खड्ड्यांमुळे , बांधकाम साहित्य रस्त्यावरच टाकण्यामुळे होत असतात. प्रवेशबंद अशा मार्गिकेतून अचानक येणार्या वाहनांमुळे नियंत्रण सुटण्याने अनेक अपघात होतात. रस्त्यावर विविध वेगाने जाणार्या वाहनांमुळे अनेक अपघात होतात. अपघातांचे प्रमुख कारण दारू पिऊन वाहने चालवणे हे असते. चार चाकी वाहनांमधे बेल्ट लावल्याने मृत्यू होणार्या लोकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. परंतु दुचाकीवरून जाणार्या व्यक्ती ह्या अपघातामुळे मरण्याची, दुखापत होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. अचानक येणार्या स्पीड ब्रेकरमुळे, अन्य कारणांमुळे वेग नियंत्रित होऊ न शकल्याने दुचाकी स्वार व विशेषतः बेसावध असलेल्या मागील व्यक्ती अपघातांना सहज बळी पडतात.
वाहतुक अपघातातील हे मृत्यू टाळायचे असतील तर दुचाकी वाहनाने जाणार्या प्रत्येक व्यक्तीने ISI प्रमाणित हेल्मेट वापरणे अतिशय जरुरीचे आहे. त्याचबरोबर दारू पिऊन वाहन न चालवणे ही प्रत्येकाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळेच सर्व्वोच्य न्यायालयाने हेल्मेट सक्ती असावी असे निर्देश जारी केले आहेत. त्याची अम्मलबजावणी करणार्या पोलीसांना सहकार्य करुन आपण आपला जीव वाचवू शकतो व कुटुंबातील आपल्यावर अवलंबून असलेल्या लोकांची काळजी कमी करु शकतो. त्यामुळे प्रत्येक दुचाकी वाहकाने हेल्मेटशिवाय प्रवास करणार नाही असे प्रत्येक प्रवासापूर्वी स्वतःला बजावले पाहिजे.