Articles

दाभोळकर, पानसरे व इतर खून खटला आणि ATS ची कारवाई –

By on August 22, 2018

डॉ. दाभोळकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश ह्या पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक येथील विवेकवाद्यांचे गेल्या पाच वर्षात गोळी घालून खून करण्यात आले होते. त्यातील मारेकर्‍यांचा तपास केंद्रीय व राज्य तपास पथके करत होती. त्यामधे कर्नाटकातील ATS च्या तपासात सापडलेल्या नोन्दवहीत काही नावे मिळाली होती. तेंव्हापासून ATS महाराष्ट्र त्यातील नावांचा पाठपुरावा करत होते व त्यातून नुकतेच नालासोपारा तेथे राहणार्‍या वैभव राऊत ह्याला पकडण्यात ATS महाराष्ट्र ह्यांना यश प्राप्त झाले. त्यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे तपास करत असतांना शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर, सचिन अणदुरे ह्यांना पकडण्यात आले व न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीतील चौकशीला मान्यता दिली.

ह्यांना पकडल्यानंतर 16 गावठी पिस्तुले, 10 पिस्तुल नळ्या, बंदूका बनविण्याचे साहित्य हे पुणे, औरंगाबाद, जालना, नालासोपारा ह्या ठिकाणाहून जप्त करण्यात ATS ला यश मिळाले. ह्या व्यक्ती internet च्या माध्यमातून स्फोटके कशी तयार करावी ह्याची माहिती घेत असल्याचे लक्षात आले.

डॉ. दाभोळकर खून खटल्याचा तपास मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार CBI ही संस्था करत होती व त्यांनी डॉ. वीरेंद्रसिंग तावडे हा त्यातील सूत्रधार होता व त्याच्या सांगण्याप्रमाणे सारंग अकोलकर आणि विनय पवार ह्यांना दोन वर्षांपूर्वी ह्या खूनासंबंधी अटक केली होती. परंतु आता ATS ने कारवाई करून वरील पकडलेल्या व्यक्तींची माहिती CBI ला दिल्यानंतर CBI ने डॉ. दाभोळकर यांचा खून करतांना कळसकरने दोन गोळ्या मारल्या व अणदुरे याने एक गोळी मारली अशी माहिती पुढे आल्याने ह्या खूनातील आरोपी म्हणून त्यांची नावे जाहीर केली आहेत. ह्या शिवाय वर पकडलेल्या व्यक्तीँची विचारपूस करत असतांना श्रीमंत कोकाटे, पोलीस निरीक्षक हिरेमठ व अन्य काही पोलीस अधिकारी ह्यांचेही खून करण्याच्या दृष्टीने त्यांचेही फोटो वा चित्रे गोळा केल्याचे जाहीर झाले आहे. डॉ. तायडे ह्याच्या संगणकामध्ये ` धर्मद्रोही ' अशा नावाची एक नस्ती (folder) असल्याचे उघडकीस आले आहे व त्यात वरील नावे समाविष्ट असल्याचे समजते. गेली अनेक वर्षे ह्या व्यक्तींचे खून होऊनही त्यात विशेष प्रगती झाली नव्हती. ज्या वेळेस एखादा खून हा वैतक्तिक हेव्यादाव्यातून किंवा पैशासाठी न होता एखाद्या कटकारस्थानामुळे होतो त्यावेळेस हे कट कारस्थान उघडकीस येण्यास बरेच अवघड होत असते. ह्याशिवाय सदरचे खून हे सार्वजनिक ठिकाणी अनेक लोकांच्या देखत होऊनही मारेकरी ओळखले जाऊ नयेत यासंबंधी मारेकर्‍यांनी सर्वप्रकारची दक्षता घेतल्याचे दिसते. अशा परिस्थितीत ह्या विवेकवाद्यांच्या खूनामागे कोणत्या व्यक्ती असाव्यात ? कोणत्या संस्था असाव्यात ? व त्यांनी कोणत्या हेतूने सदर कारवाई केली असावी ? ह्याबद्दल सर्वांच्या मनात भीती होती.

ह्यासंबंधात वर पकडलेल्या व्यक्तींचा पूर्वी हिंदू सनातन संस्था , हिंदू जनजागृती समिती, हिंदू गोवंश रक्षा समिती, रामसेना, शिवसेना ह्यांच्याबरोबर संबंध लक्षात घेऊन ह्या सम्बन्धित संस्थांवर बंदी आणावी अशी मागणी विवेकवादी व अन्य गटांकडून करण्यात येत आहे. वरील सर्व खूनांचा विचार करता, हे सर्व खून हिंदू धर्मावर टिका करणार्‍या हिंदू लोकांचे हिंदू लोकांनीच केलेले दिसतात. हिंदू धर्मावर टीका करणारे अन्य धर्मीय कोणीही त्यांचे लक्ष्य असल्याचे आत्तापर्यंत जाहीर झालेले नाही. त्यामुळे हिंदू धर्मामधे सुधारणा कराव्यात असे म्हणणारे व त्या सुधारणांना विरोध करणारे ह्यांच्यातील हा संघर्ष आहे असे दिसते. त्यामुळे हिंदू धर्मामधे सुधारणा करावी अशी मागणी करतांना त्यात कडवटपणा येणार नाही, किंवा त्यामुळे कोणी हिंसेस प्रवृत्त होणार नाही ही काळजी घेतल्यास ह्या संघर्षाची धार बोथट होऊ शकते. अर्थात कोणाचे विचार पटत नसल्यास त्यांची हिंसा करावी ह्या प्रवृत्तीचे कोणीही समर्थन करणार नाही.

ह्या संस्थांचा प्रचार, प्रसार व अनुयायी आत्तापर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकचा काही भाग यातील असल्याचे जाणवते. परंतु अशा विचारसरणीचे कडवे लोक भारताच्या अन्य भागातही आहेत किंवा कसे हे तपासातून पुढे येण्याची शक्यता आहे. सदर घटनांसाठी आवाश्यक तो निधी, सहाय्य, मनुष्यबळ, शस्त्रे व अ‍ॅम्युनिशन‍ कशा प्रकारे एकत्र केली जात होती ह्याबद्दलही चौकशीतून उजेड पडण्याची शक्यता आहे. सदर माहिती साकल्याने पुढे आल्यानंतर वर उल्लेख केलेल्या पैकी कोणतीही संस्था त्यास जबाबदार आहे असा पुरावा मिळाल्यास त्या संस्थेवर बंदी घालण्यास भारत सरकारला कारवाई करणे शक्य होईल. कोणत्याही संस्थेवर भारत सरकारने बंदी घातल्यास त्या संस्थेची देशविघातक कारवायांची पुराव्यांनीशी सर्व माहिती सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करावी लागते. त्यानंतर बंदी घालणे आवश्यक आहे किंवा कसे यास सर्वोच्च न्यायालय मंजूरी देत असते. त्यावरून एखाद्या संस्थेवर बंदी घालणे हा राजकीय निर्णय नसून ती कायदेशीर प्रक्रिया आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र व केंद्रात भा.ज.प. सत्तेत असल्यामुळे व त्यांचा अशा घटनांना पाठिंबा असल्याने, तपासात दिरंगाई होत होती ह्या आरोपात तथ्य नसल्याचे आत्तापर्यंत झालेल्या अटक सत्रामुळे स्पष्ट होते व त्यामुळे ह्या चर्चेला विराम देण्याची आवश्यकता आहे. तपास पथकातील काही अधिकार्‍यांची यथाक्रम बदली झाल्याने तपासावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही हेही या अटकांमुळे अधोरेखीत झाले आहे.

अनेकवेळा तपासिक यंत्रणांवर लवकर तपास करा अशा प्रकाराने दबाव वाढविल्याने काही खर्‍या किंवा खोट्या व्यक्तींना अटक केली असे दाखवून पुराव्याअभावी नंतर सुटका करण्याची नामुष्की निर्माण होते. त्यासाठी तपास यंत्रणांना निःपक्ष तपास करण्यास प्रोत्साहन मिळेल, समाजातील ज्यांच्या ज्यांच्याकडे छोटी मोठी जी काही देशविघातक कारवायांबद्दल माहिती असेल ती माहिती तपास यंत्रणांना उपलब्ध करून देणे जरुरीचे आहे. त्याचबरोबर पोलीस चौकशीत ज्या ज्या व्यक्तींची नावे, अर्थ सहाय्य करणार्‍यांची नावे, वाहन उपलब्ध करून देणार्‍यांची नावे, प्रशिक्षण देणार्‍यांची नावे निष्पन्न होतील त्या सर्वाँची कसोशीने चौकशी करून ती माहिती न्यायालयासमोर सादर करणे व न्यायालयातून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे हे पोलीस यंत्रणा व अभियोक्ता (prosecutors) यांचे महत्त्वाचे काम आहे.

येणार्‍या पुढील काळात ह्या संबंधी काय घडामोडी घडतात हे पाहणे त्यामुळे महत्त्वाचे आहे.

TAGS
RELATED POSTS

LEAVE A COMMENT