20 लाखांहून अधिक वस्ती असणार्या महानगरांच्या बाबतीत 2016 मधील गुन्ह्यांचा अहवाल, पहिल्यांदाच NCRB ने नुकताच प्रकाशित केला आहे. आर्थिक उलाढालींच्या दृष्टीने वाढती लोकसंख्या शहरांकडे आकर्षित होत आहे. ह्यातील फक्त पाच टक्के व्यक्तींकडे शहरात राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये उपलब्ध असतात व अन्य व्यक्ती बर्याचवेळा गुन्हे करायला प्रवृत्त होतात. त्याचप्रमाणे शहरांमधे सामाजिक नियंत्रण जवळ जवळ नसल्याने समोरची व्यक्ती कोण आहे, कशा प्रकारे गुन्हे करू शकते हे समजणे अवघड असल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे एक आव्हान ठरत आहे.
NCRB च्या अहवालातील गुन्ह्यांच्या आकडेवारीचा अभ्यास करून, त्याने सुरक्षेचे धोरण ठरविण्यासाठी प्रशासक त्याचा वापर करतात. जरी गुन्हेगारीची आकडेवारी त्या शहरातील अथवा राज्यातील सुरक्षेच्या वातावरणाबाबत पूर्ण चित्र दाखवू शकत नसली तरीही त्यावरून बरीचशी कारणमीमांसा करता येते. काय सुधारणा कराव्यात ह्याची दिशा नक्की करता येते. व त्यामुळे ह्या अहवालाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर व पुणे ह्या तीन महानगरात भारतीय दंड विधानाप्रमाणे खालील प्रमाणे गुन्हे घडलेः
2014 | 2015 | 2016 | |
मुंबई | 40,361 | 42,940 | 39,617 |
नागपूर | 10,359 | 11,018 | 11,711 |
पुणे | 14,468 | 15,349 | 16,296 |
वरील आकडेवारीतून स्पष्ट होते की; मुंबई शहर हे संपूर्ण CCTV. च्या निगराणीत आणणे, रस्त्यावरील पोलिसांची गस्त वाढवणे, गुन्हेगारांविरुद्ध दोषसिद्धीचे प्रमाण वाढवणे व अन्य उपायांमुळे मुंबईतील गुन्हेगारीत 3,323 ने कमी झालेली दिसते. यासाठी पोलिस
आयुक्त मुंबई, दत्ता पडसळगीकर व त्यांचे सहकारी हे अभिनंदनास पात्र आहेत. नागपूर आयुक्तालयात कामटी व आजुबाजूचा नवीन भाग नागपूर पोलिस आयुक्तालयाशी जोडला गेल्याने तेथे गुन्ह्यांमधे किरकोळीने वाढ आहे. पुणे शहरातील गुन्हेगारी सतत वाढत आहे. विशेषतः पिंपरी चिंचवड औद्योगिक वस्तीतील गुन्ह्यातील वाढ ही त्याला प्रामुख्याने कारणीभूत असावी. पिंपरी चिंचवड भागासाठी नवीन पोलिस आयुक्तालय होणे ही काळाची गरज आहे.
स्थानिक व विशेष कायद्यांप्रमाणे केलेल्या कारवाईबाबत 2016 मधे या तीन महानगरात पुढील प्रमाणे परिस्थिती आहे.
2014 | 2015 | 2016 | |
मुंबई | 59,838 | 66,676 | 59,072 |
नागपूर | 27,666 | 33,113 | 42,866 |
पुणे | 22,084 | 19,332 | 19554 |
वरील आकडेवारी स्पष्ट करते की नागपूरमधे गुंड, भूमाफिया, गैरकायदेशीर दारू, जुगार, दारू पिऊन वाहने चालविणे अशांवर कठोर कारवाई करण्यामुळे तेथे गुन्हेगारीला चाप बसला आहे. दारू पिऊन वाहन चालविणार्यांविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे नागपूरमधे मरणार्यांची संख्या 339 पर्यंत रोखता आली, परंतु पुण्यात 481 व्यक्तींना अपघातामुळे आपले प्राण गमवाववे लागले. रस्स्तावरील खड्डे, वाढती आक्रमणे, हॉकर्स, दुचाकीवरून जातांना हेलमेट न वापरणे, दारू पिऊन वहाने चालविणे, उलट दिशेने प्रवास करणे, ट्रॅफिकचे सिग्नल न पाळणे, दुचाकीवरून स्टंटबाजी करणे अशा अनेक कारणांमुळे शहरातील प्रवास दिवसेंदिवस असुरक्षित होत आहे.
गंभीर दुखापतीची आकडेवारी पाहता, मुंबईत 1384 , नागपूरमधे 240 व पुण्यात 660 व्यक्तींवर हल्ले झाले. पुण्यातील गँगवॉर्स, गुंडगिरी, बेकारी व दारू ही त्याची प्रमुख कारणे असावीत. महिलांच्या सुरक्षेचा विचार करतांना, छेडछाड करणे हा महत्त्वाचा गुन्हा आहे. छेडछाडीच्या मुंबईत 2199, नागपूरमधे 411 तर पुण्यात 685 घटना घडल्याचे अहवालात नमूद आहे. मुंबई, पुणे ह्या महानगरातील नुकत्याच बसविलेल्या CCTV. कॅमेर्यांचा वापर करून संबधित पोलिस अधिका र्य़ांनी आपणहून अशा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करणे व तांत्रिक पुराव्याच्या आधारे संबंधित गुन्हेगारांच्या विरुद्ध दोषारोप पत्र दाखल करणे आवश्यक आहे. तसेच सर्व कॉलेजेस, शाळा, बसेस, व बसस्टँड या ठिकाणी CCTV. लावणे सक्तीचे करणे गरजेचे आहे.
महिला सुरक्षेच्या दृष्टीने NCRB च्या अहवालाप्रमाणे 2016 मधे मुंबईत 716, नागपूरमध्ये 171 तर पुण्यात 358 बलात्कार झाले. मुंबईत 14 तर नागपूर येथे 9 गँगरेपच्या घटना नमूद आहेत. NCRB च्या अहवाला प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात बलात्काराच्या घटनांमधे 98.5 % घटनांमधे आरोपी पीडितेच्या परिचित होते. घरातील आजोबा, वडील, मुले, नातेवाईक व शेजारी ह्यांनी हे बलात्कार केल्याचे नमूद आहे. घरातील ह्या व्यक्तींच्या बाबतीत आईने अधिक सतर्कता दाखविणे व पीडित मुलीबरोबर सतत संवाद ठेवणे आवश्यक आहे. शहरातील वापरात नसणार्या इमारती, अंधारी जागा, निर्जन बागा अशा ठिकाणी पुरेशी सुरक्षा, उजेडाची व्यवस्था व पोलिस गस्त वाढविण्याची आवश्यकता आहे. ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण 20% आहे. बहुतेक वेळेला पीडित महिला घरातील व समाजातील दडपणामुळे न्यायालयासमोर जबाब फिरविते अथवा उपस्थित रहात नाही व त्यामुळे बलात्कारासारखे
दुष्कृत्य करूनही आरोपी मोकाट राहतो. ह्यासाठी पीडितेची प्रथम खबर दाखल करतांनाच व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे, मॅजिस्ट्रेट समोर जबाब घेणे अशा प्रकारची काळजी पोलिसांनी घेणे जरूरीचे आहे. जबरी चोर्यांचे प्रमाण पाहता, मुंबईत 1152 , नागपूरमधे 340 व पुण्यात 490 व्यक्तींना लुबाडण्यात आले. सोनसाखळी चोरीच्या घटनांमधे संपूर्ण राज्यामधे 1420 ने गुन्ह्यांमधे घट झाली. तरीसुद्धा रस्त्यावरील पोलिसांची गस्त वाढविणे आवश्यक आहे. बेकायदेशीर दारू, ड्रग्ज वापरणारे यांवरील कारवाई वाढविण्याची आवश्यकता आहे.
वाहन चोर्यांमधे मुंबईत 3121 वाहने चोरीस गेली, नागपूरमधे 1520 तर पुण्यात 3078 वाहने चोरीस गेली. नागपूर व पुण्यात महाराष्ट्र पोलिसांनी सुरू केलेल्या evahanchoritakrar.com ह्या पोर्टलमुळे चोरीस गेलेली वाहने सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. मुंबई पोलिसांनीही सदर पोर्टलप्रमाणे चोरीच्या वाहनांची नोंदणी ह्या पोर्टलमधे केल्यास चोरीची वाहने सापडण्यासाठी मदत होऊ शकेल. तसेच वाहन मालकांनी वाहनांमधे तातडीने अलार्म लावणे आवश्यक आहे.
बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याबद्दल मुंबईत 99, नागपूरमधे 374 तर पुण्यात 112 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. मुंबई व पुणे पोलिसांनी ही कारवाई वाढविण्याची गरज आहे.
जनतेला विश्वासात घेऊन व पोलिसांनी दिलेल्या सुरक्षेच्या सूचनांचे पालन करून महानगरे सुरक्षित बनविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.