Articles

बालगुन्हेगारीत बालक कोणाला म्हणायचे हा चिंतेचा विषय

By on July 30, 2024

बालगुन्हेगारीत बालक कोणाला म्हणायचे हा चिंतेचा विषय

माजी पोलीस महासंचालक डॉ प्रवीण दीक्षित यांचे परखड मत
हिंदू महिला सभेच्या वतीने ज्येष्ठ समाजसेविका डॉ अनुराधा सहस्त्रबुद्धे यांचा सजग पुरस्कार तर सर्पमित्र नीता गजरे-कुसळ यांचा साहस पुरस्काराने सन्मान

पुणे, दि. २९ जुलै, २०२४ : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने नुकत्याच केलेल्या सर्व्हेक्षणानुसार चांगल्या घरातील, पैसेवाली आणि उच्चशिक्षित आई-वडील असलेली मुले ही आज अनेक हिनस गुन्ह्यांमध्ये अपराधी असल्याचे दिसून आले आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार १८ वर्षांखालील मुलांना बालक म्हणता येते तर इतर काही संस्था १४ वर्षांखालील मुलांना बालक म्हणतात. नेमके बालक कोणाला म्हणायचे, या व्याख्येत असलेल्या गोंधळाचा फायदा आज अनेक गुन्हेगार घेतात, असे परखड मत माजी पोलीस महासंचालक डॉ प्रवीण दीक्षित यांनी मांडले. भ्रष्टाचार करीत अनेकदा अनेक जण या गुन्हेगारांना वाचविण्यासाठी झटतात. पुण्यातील पोर्श कार अपघात आणि पूजा खेडकर प्रकरणामध्ये आपण हा भ्रष्टाचार पाहिला आहे, असेही डॉ दीक्षित यांनी नमूद केले.

पुण्यातील हिंदू महिला सभेच्या वतीने टिळक रस्त्यावरील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ दीक्षित बोलत होते. कार्यक्रमात हिंदू महिला सभेच्या वतीने आणि डॉ प्रवीण दीक्षित यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेविका डॉ अनुराधा सहस्त्रबुद्धे यांचा कै. लीलावती फळणीकर स्मृती प्रित्यर्थ सजग पुरस्कार देऊन तर सर्पमित्र नीता गजरे-कुसळ यांना साहस पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले. हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले, आपलं घर या संस्थेचे विजय फळणीकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

साहस दिनाचे औचित्य साधत दरवर्षी हिंदू महिला सभेच्या वतीने साहस पुरस्कार दिला जातो. सदर वर्ष हे पुरस्काराचे चौथे वर्ष असून रोख रुपये —, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यासोबतच आपलं घर या समाजसेवी संस्थेचे विजय फळणीकर यांच्या आई कै. लीलावती फळणीकर स्मृती प्रित्यर्थ मागील वर्षीपासून सजग पुरस्कार देण्यात येत असून रोख रुपये —, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी बोलताना डॉ दीक्षित म्हणाले, “ज्या मुलांना आई वडील नाहीत, जी मुले उघड्यावर मोठी होतात ती मुले पुढे जाऊन गुन्हेगार होतात हा आपल्या समाजातील समज हा पूर्णपणे चुकीचा आहे. आज चांगल्या घरातील, पैसे असलेली आणि उच्च शिक्षित आई वडील असलेली मुले ही अंगावर काटा येईल असे हिनस गुन्हे करण्यात अग्रेसर असल्याचे एका सर्व्हेक्षणात दिसून आले. माझ्या मते या परिस्थितीला ती मुले नाहीत तर त्यांचे पालक जबाबदार आहेत. या मुलांना गुन्ह्यांपासून परावृत्त कसे करायचे आणि सक्षम कसे करायचे यावर काम करावे लागणार आहे.”

आज लहान मुलांना पालकांनी वेळ देण्याची, मायेची ऊब देण्याची गरज आहे असे सांगत डॉ अनुराधा सहस्रबुद्धे म्हणाल्या, “आपल्या आजूबाजूच्या समाजाचा विकास करायचा असेल तर केवळ रस्ते, वीज आणून तो विकास होणार नाही. माणसांचा विकास होतोय का हे जास्त महत्त्वाचे आहे. लहान मुले आणि महिलांसाठी पोलीस स्थानकात विशेष कक्ष व बालस्नेही अधिकारी असायला हवेत असे नियम असले तरी ते कागदावरच आहेत. विशेषतः बालगुन्हेगारांबद्दल संवेदनशीलता आज प्रशासनात दिसून येत नाही हे प्रकर्षाने जाणवते. लहान मुलांमध्ये लैंगिक शोषण, पॉर्नचे वाढते व्यसन या बाबींकडे आपण लक्ष देऊन त्याबद्दल मुलांमध्ये जागृती करायला हवी आहे.”

आपल्या समाजात उदमांजर, साप, मांडूळ या प्राण्यांबद्दल प्रचंड अंधश्रद्धा आहे. या चुकीच्या समजुतींमुळे अनेकदा प्राण्यांना त्यांचा जीव गमवावा लागतो. कोणताही प्राणी स्वतःहून माणसांवर हल्ला करायला येत नाही. जेव्हा त्याला जीवाचा धोका वाटतो तेव्हाच तो हल्ला करतो असे सर्पमित्र असलेल्या आणि आजवर तब्बल ७ हजार प्राण्यांचे प्राण वाचवीत त्यांना निसर्गात सुखरूप पोहोचविण्याचे काम करणाऱ्या नीता गजरे- कुसळ म्हणाल्या.

मी पोलीस आयुक्त असताना अनेक बालगुन्हेगारांना सक्षम करण्यावर भर दिला. त्यांना पुन्हा समाजात मिसळत यावे यासाठी कौशल्य शिकविण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले. समाजातील महिलांच्या संरक्षणासाठी आपण विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आज सुशिक्षित नागरिक सायबर गुन्ह्यांचे बळी आहेत, असेही डॉ दीक्षित म्हणाले.

सुप्रिया दामले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व मानपत्रांचे वाचन केले. सुधा राजगुरू यांनी आभार मानले, प्राची गोडबोले यांनी वंदे मातरम् सादर केले. वंदना जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

TAGS
RELATED POSTS

LEAVE A COMMENT