Articles

कोकणचा विकास व सुरक्षेचे प्रश्न!

By on April 13, 2022

प्रवीण दीक्षित

पोलीस महासंचालक (निवृत्त)

अ‍ॅडव्होकेट विलास पाटणे ह्यांनी कोकणच्या विकासासंबंधी तळमळीने अनेक विषयांवर `महाराष्ट्र टाइम्स’ मधे वेळोवेळी लिहलेल्या लेखांचे संकलन `अपरान्त कोकण’ ह्या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशित होत आहे; त्याबद्दल लेखकाचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. ह्या पुस्तकाच्या माध्यमातून मच्छिमार उद्योग, फळ उद्योग, कोकणातील मुलांचे कौशल्य, विकास हयाच बरोबर कोकणतील बंदरे, कोकण रेल्वे अशा अनेक दळणवळण क्षेत्रातील विषयांवरही लेखकाने आपले विचार व्यक्त केले आहेत. कोकणचा विकास करण्यासाठी अनेक उद्योगाच्या माध्यमातून अंदाजे 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक थोड्याच दिवसात होणार आहे. विविध उदयोगाच्या माध्यमातून कोकणचा विकास होत असतांना त्यामुळे कोकणातील निसर्गावर, तेथील माणसांवर होणारे अनेक विपरीत परिणाम लेखकाने नोंदवले आहेत व त्यासाठी नेमके काय उपाय करायला पाहिजेत हे लेखकाने नोंदवले आहे.

कोकण हा पालघर पासून सिंधुदुर्गपर्यंत पसरलेला चिंचोळा पण जवळ जवळ 700 कि. मी.हून अधिक मोठा भूभाग आहे. कोकणचा विकास होत असतांना, त्यातील सुरक्षेसंबंधीच्या बाबींकडेही लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. कोकणात आत्तापर्यंत पिढ्यानपिढ्या तिथे राहणारा माणूस हा इतरांना सुपरिचित होता व यातून निर्माण झालेल्या सामाजिक दडपणामुळे कोकणातील व्यक्ती ही क्वचितच गुन्हेगारीकडे वळत असे. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात असलेला कोकण हा तिथल्या शांततेसाठी व गुन्हेगारी पासून दूर असण्यासाठी प्रसिद्ध होता. वय 15 ते60 ह्यामधील पुरुष व्यक्ती रोजगारासाठी, मुंबई वा अन्य दूरच्या भागात जात राहण्यामुळे कोकणामधे अनेक गंभीर सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामधेच कोकणातील स्त्रियांच्या समस्यांकडे, कोकणात स्थैर्य रहावे ह्यासाठी लक्ष देणे आवश्यक आहे. असे म्हणतात की, पाणी नेहमी उताराकडे जात राहते त्याप्रमाणे जेथे रोजगार असेल तेथे कामगार येत राहतात. कोकणातील मच्छिमार उद्योग असो अथवा नारळ-सुपारीचा व्यवसाय असो ह्यासाठी फार मोठ्याप्रमाणात कामगारांची आवश्यकता असते. पारंपारिक कोकणी माणूस ह्या उद्योगांना उपलब्ध नसल्याने आता सुदूर अशा नेपाळ, बांगलादेश म्यानमार येथील व्यक्ती कोकणात दाखल होत आहेत. तसेच कोकणात प्रचंड गुंतवणुकीस  योग्य अशा कुशल व अकुशल कामगारांची चणचण भरुन काढण्यासाठी कोकण सोडून इतर प्रांतातील लोक कोकणात पोचत आहेत. कोकणातील निसर्गरम्य जागा वा उत्तम फळफळावळ ह्या मुळे अन्य प्रांतातील श्रीमंत लोक कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून कोकणातील मोक्याच्या जागा विकत घेत आहेत. कोकणात होणारा बंदर विकास, महामार्गांचे जाळे, कोकण रेल्वे अशांच्या बरोबरीनेच परप्रांतातील अनेक व्यक्ती कोकणात दाखल झाल्या आहेत. आज अशा बाहेरून आलेल्या व्यक्तींचा इतिहास व कोकणात येण्याचा उद्देश फार क्वचितच  तपासून पाहिला जातो त्यामुळे ह्या बाहेरून आलेल्या व्यक्ती ,ड्रग माफिया, दहशतवादी कारवाया, नक्षलवादी चळवळव अशा अनेक राष्ट्रविघातक कारवायांमधे गुंतलेल्या असतता. 1993 साली मुंबईत झालेले बाँबस्फोट कोणीही विसरू शकणार नाही ह्या बाँबस्फोटात वापरलेली स्फोटके श्रीवर्धन, म्हसळा, मुरूड ह्या ठिकाणी उतरविण्यात आली होती व तेथून मुंबईला पोचविण्यात आली हे सर्वश्रुत आहे. कोकणचा किनारा निसर्गरम्य असला तरीही पाकिस्तान व अन्य देशातून येणार्‍या देश विघातक  ताकदींसाठी आकर्षक राहिला आहे. मुंबईच्या सान्निध्यामुळे, मुंबईतील अनेक गुन्हेगार सुपारी देऊन कोकणामधे अपघात झाला असे दाखवून आपल्या वैर्‍यांना ठार मारतात असे दिसते. रस्ते चांगले होण्यामुळे अनेक गुन्हेगार वेगवान वाहनातून येऊन  पकडले जाण्यापूर्वीच सुटून जात आहेत. अपघातानंतर अपघात कोणी केला हे बर्‍याचवेळा अज्ञात राहते.

ह्या व अशा अनेक सुरक्षेसंबंधीच्या बाबींचा विकास करत असतांनाच गांभीर्याने अभ्यास करून त्यावर उपाय योजणे आवश्यक आहे. त्याती काही उपाय विशद करण्याचा मी प्रयत्न करतो.

-> कोकणातील संपूर्ण किनारपट्टीवर व विशेषतः खाड्यांच्या बाजूला सौर विद्युत चलित कॅमेरे बसवण्याची आवश्यकता आहे की, ज्यामुळे तेथे होणारी माणसांची हालचाल टिपली जाईल व आवश्यकतेप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करता येईल.

-> कोकणातील महामार्ग हा पूर्णपणे CCTV  लावून सतत नजरेखाली राहील अशी व्यवस्था आवश्यक आहे

-> परप्रांतातून व अन्य देशातून येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी त्याचे आधार कार्ड व अन्य आयडेंटिटी कार्ड ठेऊन त्याची वेळोवेळी पडताळणी करणे गरजेचे आहे.

-> कोकणातील जमिनी विकतांनाही केवळ पैशाकडे लक्ष न देता त्या व्यक्तीचा पूर्व इतिहास तपासणे जरुरीचे आहे.

-> कोकणामधे अनेक ठिकाणे जरी दूर पसरलेली असली तरीही Information Technology  चा फार मोठ्याप्रमाणावर उपयोग करून टेली मेडिसिन व टेली एज्युकेशन ह्यांचा वापर करून हे अंतर कमी करता येऊ शकते.

-> कोकणात येणार्‍या उद्योगांना त्यांच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील तरुणांना सर्टिफिकेट, डिप्लोमा, डिग्री अशा विविध थरांवरती शिक्षणाची सोय करणे हे बंधनकारक करणे आवश्यक आहे ज्यामुळे ह्या उद्योगांना आवश्यक कुशल कामगार कोकणातून उपलब्ध होऊ शकतील.

-> कोकणाची व पर्यायाने देशाची सुरक्षा करण्यासाठी  कोकणातील जनतेचे वारंवार प्रबोधन करून त्याना पोलीसमित्र, कोस्टगार्डमित्र, कोकणरेल्वे मित्र, कोकणातील बंदरेमित्र  म्हणून काम करण्यास आवश्यक प्रशिक्षण व प्रोत्साहन देण्याची जरुरी आहे.

त्याच बरोबर मी काही प्रश्न ही विचारु इच्छितोः

-> प्रदूषित पाणी कोणतीही स्वच्छता प्रक्रिया न करता समुद्रात सोडून मासळीचा  विनाश करणारे आपण कधी शहाणे होणार?

 

-> शहरातील उघडी गटारे आपले आरोग्य धोक्यात आणत आहेत , मलेरियाने लोक हवालदील झालेले आहेत हे आपण थांववणार आहोत, का याकडे दुर्लक्ष करत राहणार आहोत ?

 

-> वाढत्या गाळामुळे कोकणातील एकेकाळी उत्तम असणारी बंदरे आपण गमावून बसलो आहोत. नद्यांमधील बेसुमार वाळूउत्खनन करून आपण नद्यांचा विनाश करत आहोत. बेसुमार वृक्षतोड करून आपण दरवर्षी येणार्‍या पुराला कारण होत आहोत हे आपण थांबवणार आहोत की नाही ?

 

-> स्फोटकांच्या बेसुमार वापरण्याने खडकांत भेगा निर्माण झाल्या आहेत व दरवर्षी दरडी कोसळत आहेत हे थांववणार की नाही ?

 

-> वाळीत टाकणे सारख्या कुप्रथा आजही चालू असल्याच्या तक्रारी मधून मधून येत असतात. अनेक अंधश्रद्धा आपण सोडायला तयार नाही व त्यामुळे आपले नुकसान होत आहे हे आपल्याला मान्य नाही .

 

-> अर्ज फाटे करणे व त्यासाठी अन्याय होतो म्हणून सर्वोच्च न्यायालयापर्यंत वर्षानुवर्षे भांडत राहण्याने आपण किती नुकसान करून घेणार आहोत ?

कोकणाच्या विकासासाठी सर्व संबंधित आज ह्या ठिकाणी व्यक्त झालेल्या चिंतनाचा आवश्य विचार करतील अशी मला आशा आहे.

`अपरान्त कोकण’ ह्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने माझे विचार आपल्यासमोर मांडता आले हे मी माझे भाग्य समजतो व कोकणातील सर्वांना त्यांच्या विकासवाटेवर शुभेच्छा देतो.

TAGS
RELATED POSTS

LEAVE A COMMENT