प्रवीण दीक्षित.
निवृत्त पोलीस महासंचालक
9 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी मुंबईकडे येणार्या पुष्पक एक्सप्रेसमधे सायंकाळी इगतपुरी ते कसारा ह्या घाटात 8 ते 10 दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत प्रवांशांकडील रोख रक्कम आणि मोबाईल लुटले. ह्या दरोडेखोरांनी एका महिलेवर तिच्या पतीदेखतच बलात्कार केला. काही धाडसी प्रवाशांनी त्यातील दोघांना पकडले व कल्याण येथील पोलीसांच्या ताब्यात दिले. प्रकाश पारधी, अर्शद शेख अशी पकडलेल्यांची नावे आहेत. अमली पदार्थांचे व्यसन या घटनेमागे असावे त्यामुळे पैशांसाठी हा प्रकार झाला असावा असा संशय पोलीसांनी व्यक्त केला. या दोघांकडे चौकशी करून त्यांच्या अजून दोन साथीदारांना पोलीसांनी अटक केली. हे चौघेही 19 ते 21 वयोगटातील असून त्यातील तिघे इगतपुरी, घोटी भागातील व एक जण मालाड भागातील रहिवासी आहे. दरोडेखोरांकडे शस्त्रे असतानाही काही प्रवाशांनी धाडस दाखवून दोन दरोडेखोरांना पकडले त्यामुळे आरोपींचा शोध लागू शकला. इगतपुरी, घोटी, कसारा हा डोंगर दर्यांचा भाग असल्याने रेल्वे रुळांच्या बाजूस मनुष्यवस्ती नाही व त्याचा गैरफायदा घेऊन रेल्वे प्रवाशांना लुटण्याचे प्रकार येथे वारंवार होत असतात. सदर भाग मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर आहे. ठाणे ग्रामीण व नाशिक ग्रामीण पोलीस हे ही ह्या भागात नसल्यातच जमा आहेत; त्यामुळे नाशिक, ठाणे व जवळच्या अन्य भागातील गुन्हेगारांचे सामान्य प्रवासी वारंवार शिकार होतात.
सदर घटना घडली त्याच्या दोन दिवस आधी न्हावा शेवा बंदरातून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डिआरआय) अधिकार्यांनी इराणहून आलेल्या शेंगदाणा तेलामधे लपवून आणलेले 25 किलो `हेरॉइन’ जप्त केले. ह्याची किम्मत सुमारे 125 कोटी रुपये असावी. सदर हेरॉइन हे अफगाणिस्तानातील कंधार मधून आल्याचे समजते. ह्या पूर्वीही जुलै महिन्यात `डिआरआय’ ने मुंबई बंदरातून 293 किलो हेरॉइन जप्त केले होते. करोना काळात अमली पदार्थ बाळगण्यामधे फार मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसते व जवळजवळ 600 व्यक्तींवर कारवाई केल्याचे निष्पन्न झाले आहे. 2019 मधे मुंबई पोलीसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने 716 किलो अमली पदार्थांचा साठा जप्त केला, 2020 मधे 1,023 किलो व 2,021 मधे 3,835 किलो अमली पदार्थ साठा जप्त केला आहे. शहरांबरोबरच ग्रामीण भागातील तरुणही ह्या व्यसनांच्या आहारी जात आहेत. ह्याला आळा घालण्यासाठी अमलीपदार्थ विरोधी कक्ष निर्माण करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ह्यांनी दिल्याचे समजते.
नुकतेच मुंबई ते गोवा जाणार्या क्रुजवर ने धाड टाकून कोकेन व अन्य ड्रग्ज बाळगल्याबद्दल आर्यन खान , मुनमुन धमेचा व अन्य आठ जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर बॉलिवुड मधील तरुण नटनट्या ह्यांना ड्रग्ज पुरवणार्या अनेक व्यक्तींना पकडण्यात आले.
मुंबई, ठाणे बाहेरील दिवा, टिटवाळा भागामधे अनेक नायजेरियन व इतर देशातील परदेशी व्यक्तींनी आपला मुक्काम टाकल्याचे दिसते. त्यातील अनेकजण ड्रग्जच्या व्यापारात असल्याबद्दल पकडले गेले आहेत. ठाण्यातील कल्याण, भिवंडी ह्या भागामधील इराणी वस्त्यांमधे अनेक महिला पुरूष ड्रग्जचा व्यापार करतात. ठाण्यील चेन स्नॅचिंगच्या घटनांमधे ह्या इराणी व्यक्ती ड्रग्जच्या अमलाखाली गुन्हे करतांना आढळल्या आहेत.
मुंबई बाहेरील मीरा भाईंदर, वसई भागातही ड्रग्ज माफियांच्या वाढत्या कारवांयामुळे त्रस्त झालेल्या जागरूक स्थानिक नेतृत्त्वाने केलेल्या मागणीमुळे तेथे शासनाने गेल्यावर्षी नवीन पोलीस आयुक्तालय सुरू करण्यास परवानगी दिली व त्यामुळे बेकायदेशीर कारायांवर थोडा आळा बसला. तसेच दिवा, टिटवाळा, कसारा ह्या भागातील लोकांनी व रेल्वे प्रवाशांनीही ह्या भागात प्रभावी पोलीस गस्तीची मागणी केली आहे. ह्याचा एकत्रित विचार करून सदरच्या भागामधे रेल्वे व आजुबाजूचा भाग ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस महानिरीक्षक पदाच्या अधिकार्याची आवश्यकता आहे. पारंपारिक ठाणे परिक्षेत्रातील पोलीस महानिरीक्षक हे सिंधुदुर्ग पासून पालघरपर्यंतच्या भागाचे समन्वयक म्हणून काम करतात. परंतु त्यांच्याकडून इगतपुरी, घोटी, कसारा, दिवा वगैरे भागामधे वाढणार्या गुन्हेगारीला आळा घालणे अवघड आहे. नवी मुंबई येथील राज्य राखीव पोलीस गट (SRP ) यातील जवान ह्या प्रस्तावित पोलीस महानिरीक्षकांच्या मदतीला देऊन पोलिस गस्त वाढवणे आवश्यक आहे. तरच स्थानिक लोकांमधे व रेल्वे प्रवाशांमधे सुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकेल.
12 ऑक्टोबर 2021 रोजी गृहमंत्र्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची बैठक बोलावल्याचे समजते. त्यावेळी ह्या प्रश्नावर तातडीने चर्चा अपेक्षित आहे.
——————————————-